Divya Desam Temples
@अनुष्का आशिष
‘दिव्य देसम्’ हे वैष्णव परंपरेशी निगडीत आहे. दिव्य म्हणजे पवित्र तर देसम म्हणजे स्थान. तामिळ वैष्णव संतांना ‘आळ्वर’ म्हणतात. जसे त्रेसष्ट नायनार होते तसे तामिळ वैष्णव आळ्वर हे बारा होते. इसवी सनाच्या पाचव्या, सहाव्या, सातव्या व आठव्या शतकांत हे बारा आळ्वर होऊन गेले. ह्या बारा आळ्वरांनी निश्चित केलेली भगवान विष्णूची 108 स्थाने म्हणजेच दिव्य देसम्.
ती 2023 या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सरती संध्याकाळ होती. माझ्या आई आणि मुलीबरोबर मी तामिळनाडूतील मंदिरांच्या सहलीसाठी गेले होते. चोळ साम्राज्याची तीन महान मंदिरे म्हणजेच 'The Great Living Chola Temples' बघणे हे या सहलीमागचे मुख्य उद्दिष्ट होते. नव्या वर्षाची पहिली सकाळ तंजावूरचे बृहदिश्वर आणि गंगैकोंडचोळपुरमचे बृहदिश्वर बघून साजरी झाली. संध्याकाळी तिरूचिरापल्लीच्या जवळ असलेल्या श्रीरंगम येथील ’थिरुवनाईकोविल’ म्हणजेच जांबूकेश्वर हे पंचमहाभूतांपैकी, जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर पाहून श्रीरंगनाथस्वामी मंदिरात आम्ही आलो. तीन अतिप्रचंड मंदिरे बघून आधीच थकून गेलो होतो आणि त्यानंतर जाणार होतो ते जगातील सर्वात मोठे मंदिर होते. ही संध्याकाळ माझ्या आयुष्यात एक अनमोल आठवण बनून येणार आहे याचा तोपर्यंत मला पत्ताही नव्हता. त्यावेळी श्रीरंगनाथस्वामी मंदिरात अतोनात गर्दी होती. यत्र तत्र सर्वत्र नुसती माणसेच माणसे... अशी गर्दी तामिळनाडूच्या कोणत्याच मंदिरात अनुभवली नव्हती. लोक जणू काही मंदिरात मुक्कामाला आले आहेत असे त्यांच्याकडे बघून वाटत होते.
@अनुष्का आशिष
155 एकर एवढ्या मोठ्या जागेवर वसलेले, संपूर्ण जगातले क्षेत्रफळाने सर्वात मोठे असलेले हे हिंदू मंदिर. या मंदिरात प्रवेश करताना आम्ही तिघी त्या गर्दीत चेपून गेलो होतो. मंदिरात संगीतसेवा सुरू होती. उत्सवमूर्तीला एका पालखीत ठेवले होते. लोक त्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी अक्षरश: झटत होते. हे बघून आम्ही पुरते चक्रावून गेलो होतो. इतक्या गोंगाटात आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यावर समजले की मुख्य दर्शन बंद झाले आहे. तेव्हा आता या गोंगाटात थांबायचे नाही असा विचार करून आम्ही मंदिरातून कशाबशा बाहेर पडलो. सर्वात आधी भरभरून श्वास घेतला आणि तिथे बंदोबस्ताला असलेल्या पहिल्या पोलिसाला,“मंदिरात इतकी गर्दी का?” विचारले. त्यावर,“उद्या वैकुंठ एकादशी आहे, दर्शनाचा मुहूर्त पहाटेचा आहे,” असे समजले. दिव्य देसम्, श्रीरंगम आणि वैकुंठ एकादशीशी झालेली ही माझी पहिली तोंडओळख...
मंदिरातील ते भारावलेले वातावरण माझ्या मनावर खोल ठसा उमटवून गेले. एरव्ही ज्या गर्दीत घुसमटायला झाले होते तिथे परत पाय ठेवण्याचा मी विचारही करू शकले नसते, तिथे ’काहीतरी’ असे होते ज्याची मला भुरळ पडली होती. श्रीरंगम इथल्या रंगनाथस्वामीच्या अकल्पित अनुभवाने मी अस्वस्थ होत इंटरनेटवर शोध सुरू केला. त्यातूनच ’दिव्य देसम्’ नामक अनमोल चीज माझ्या आयुष्यात अवतीर्ण झाली.
काय आहे दिव्य देसम? आणि वैकुंठ एकादशीचे इतके महत्त्व का? ते तर आपण पाहूच! पण तत्पूर्वी पूर्वपीठिका जाणून घेऊ.
आपल्या भारत भूमीवर पुरातन काळापासून नाना राजघराणी राज्य करून गेली. नर्मदा नदीने भारतवर्षाला दोन भागांत विभागले. उत्तरेकडे नंद, मौर्य, गुप्त अशी घराणी झाली तर दक्षिणेत चोळ, पल्लव, चालुक्य, होयसळ, सातवाहन, वाकाटक, पांड्य, चेर अशी घराणी नांदून गेली. उत्तर-दक्षिणेत भौगोलिक भिन्नता असली तरीही दोहोतला सनातन धर्माचा धागा समान होता. अतिप्राचीन भारतात शैव, वैष्णव, शक्ती, सौर व गाणपत्य हे पाच सांप्रदाय कार्यरत होते. पैकी सौर-गाणपत्य पंथ हळूहळू लयाला गेले. शाक्त पंथ हा तांत्रिक साधनेपुरता मर्यादित राहिला. शैव व वैष्णव परंपरा मात्र आजतागायत चालू आहेत. मधल्या कालखंडात काहीशी मरगळ आलेल्या समाजात, आदि शंकराचार्यांनी नवचैतन्य फुलवले. भारताच्या चारही दिशांना चार मठ आणि कांची कामकोटी मठ स्थापन करून वैदिक धर्माची पुन:स्थापना केली. आदि शंकराचार्यांनी शैव अधिक नेमकेपणाने सांगत ’स्मार्त’ परंपरा पुढे नेली. अद्वैत परंपरेचे पालन केले.
त्याचवेळी भारतात विशेषतः दक्षिणेकडे वैष्णव परंपरेचे माहात्म्य होते. तरी त्यावरून उत्तर-दक्षिणेत भेद कधीच नव्हता. एकाच धर्माच्या सांस्कृतिक धाग्यात उत्तर-दक्षिण गुंफले गेले होते. तामिळनाडू राज्यात एकत्र नांदत असलेली शैव व वैष्णव परंपरा हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. शैव व वैष्णवांची अतिशय गूढ व प्राचीन मंदिरे तिथे आहेत. शिवाय तिथला लाडका देव मुरुगनची देवालयेही आहेत. पुरातन काळापासून ह्या मंदिरांत होणारे विधी, पूजापद्धती आजतागायत चालू आहेत. शैवांची 276 मंदिरे ’पाडल पेट्र स्थाने’ या नावाने ओळखली जातात. महाराष्ट्रासारखी महान संत परंपरा असलेल्या तामिळनाडूच्या कोणत्याही शैव मंदिरांत गेल्यावर 63 संतांच्या मूर्ती ओळीने उभ्या असलेल्या दिसतात. ह्या मूर्ती कधी दगडाच्या तर कधी पंचधातूंच्या असतात. ह्या शैव संतांना ’नायन्मार’ म्हणतात. ह्या नायन्मार संतांनी भारतभरातील 276 मंदिरांवर, त्या त्या मंदिरांतील शिव व पार्वतीवर श्लोक रचले.
मी वर उल्लेख केलेले ’दिव्य देसम’ हे वैष्णव परंपरेशी निगडीत आहे. दिव्य म्हणजे पवित्र तर देसम म्हणजे स्थान. तामिळ वैष्णव संतांना ’आळ्वार’ म्हणतात. जसे त्रेसष्ट नायन्मार होते तसे तामिळ वैष्णव आळ्वार हे बारा होते. इसवी सनाच्या पाचव्या, सहाव्या, सातव्या व आठव्या शतकांत हे बारा आळ्वार होऊन गेले. ह्या बारा आळ्वारांनी निश्चित केलेली भगवान विष्णूची 108 स्थाने म्हणजेच दिव्य देसम. 108 श्रीविष्णु मंदिरे. आळ्वार म्हणजे ’पूर्णपणे समर्पित’. हे आळ्वार विष्णुभक्तीत, भक्तिरसात पूर्णपणे रममाण झाले होते. तामिळ भाषेत श्रीविष्णूला ’पेरूमाळ’ असे संबोधतात. आता अस्तित्वात असलेली तामिळनाडूतील बहुतेक सगळीच भव्यदिव्य मंदिरे ही दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी बांधली आहेत. एकाच जागी परत परत मंदिरे बांधली गेली, प्रत्येक राज्यकर्त्याने ती वाढवली. या बारा आळ्वारांनी पूर्ण भारतातील 106 मंदिरे शोधली. तिथल्या महाविष्णूवर म्हणजेच पेरूमाळवर आणि श्रीलक्ष्मी म्हणजेच थायर किंवा नच्चियारवर ओव्या लिहिल्या. त्यांच्यावर श्लोक लिहिले. यांना ’पासुरामी’ म्हणतात. यांत मंदिरांची वर्णने केली. मंदिरांतल्या पाण्याच्या कुंडांची म्हणजेच पुष्करिणीची वर्णने केली. मंदिराच्या कळसाचे वर्णन केले. तिथल्या स्थळपुराणाचे वर्णन केले. आळ्वारांनी वर्णन केलेली मंदिरे आधीपासूनच अस्तित्वात होती. मात्र त्यांनी महत्त्वाची अशी नेमकी मंदिरे शोधली. या 106 मंदिरांना ’दिव्य देसम्’ म्हणतात. या मंदिरांचे स्थानमहात्म्य अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.
बारा आळ्वारांनी एकूण 4000 श्लोक किंवा पासुरामी लिहिल्या. ह्या पासुरामी एकत्रितपणे ’नालयिरा दिव्य प्रबंधम्’ नामक ग्रंथात नवव्या-दहाव्या शतकात समाविष्ट केल्या गेल्या. या ग्रंथाला ’द्रविड वेद’ असेही म्हणतात. तामिळ साहित्यामध्ये इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकातील ’तामिळ संगमा’ या ग्रंथाचा समावेश होतो. तामिळसंगमा या ग्रंथाबरोबरच ’नालयिरा दिव्य प्रबंधम्’ या ग्रंथालाही विशेष महत्त्व आहे.
सगळेच बारा आळ्वार हे पेरूमाळशी निगडीत आहेत. पोईगाई (श्रीविष्णूच्या शंखाचे रूप), भूतळ्वार (गदा), पेयळ्वार (तलवार), थिरूमलीसई (सुदर्शन चक्र), नम्माळवार (वैकुंठातील पेरूमाळचे सेनाप्रमुख विष्वक्सेनचे रूप), मधुराकवी (वैनतेय-गरुड), कुलशेखर (पेरूमाळच्या गळ्यातील कौस्तुभाचे रूप), पेरियाळ्वार (पेरूमाळचे वाहन- गरुडाचे रूप), थिरूमंगई (सारंग- धनुष्यबाण), थिरूप्पन (पेरूमाळच्या शरीरावरील खूण- श्रीवत्स), थोंडारादीपोड्डी (पेरूमाळच्या गळ्यातील वैजयंतीमाला) हे ते आळ्वार होत. पैकी पोंगई, भूतळ्वार व पेयळ्वार ह्या तीन आळ्वारांना ’आद्य आळ्वार’ म्हणतात. हे तीन आळ्वार द्वापारयुगापासून अस्तित्वात होते अशी वैष्णवांची श्रद्धा आहे. तर आंडाळ आळ्वार म्हणजे प्रत्यक्ष श्रीलक्ष्मीचे ’भूलक्ष्मी’ स्वरूप. ह्या आळ्वारांशी निगडीत मंदिरे दक्षिण भारतात आहेत. मदुराई जवळ श्रीविळीपुथ्थर येथे आंडाळचे एक भव्य व फार महत्त्वाचे असे दिव्य देसम् मंदिर आहे. इथे आंडाळची पेरूमाळच्या पत्नीची ’भूदेवी’ म्हणून पूजा केली जाते. ज्याप्रमाणे मदुराईच्या, मिनाक्षी सुंदरेश्वरमच्या मंदिरात सुंदरेश्वरम शिवापेक्षा पार्वती मीनाक्षीचे जास्त महत्व आहे त्याप्रमाणे श्रीविळीपुथ्थरला आंडाळचे महत्त्व पेरूमाळपेक्षा जास्त आहे.
हे असे असले तरीही, तार्किकदृष्ट्या विचार केला आणि ऐतिहासिक पुरावे पाहिले तर ह्या आळ्वारांचा कालखंड पाचव्या ते आठव्या शतकांपर्यंत धरला जातो. हे आळ्वार फक्त ब्राह्मण वर्णाचे नसून चारही वर्णांचे होते. ह्यांमध्ये एक स्त्री (आंडाळ) होती. पूर्वीच्या काळचा विचार करता ही अतीव आश्चर्यकारक व सुखावह गोष्ट आहे.
या आळ्वारांनी भारतातील 106 महाविष्णु स्थाने म्हणजेच दिव्य देसम् निश्चित केली हे आपण पाहिलेच. मात्र दिव्य देसम् मंदिरांची संख्या ही 106 नसून 108 आहे. आपण आपल्या जीवनकाळात 106 मंदिरांचे दर्शन घेऊ शकतो. मात्र 107 व 108 या स्थानी आपण आपल्या आयुष्यात कधीच पोहोचू शकत नाही. कारण ही स्थाने पृथ्वीतलावर नाहीत. यांतले 107 वे स्थान आहे ’क्षीरसागर’ तर 108 वे स्थान आहे ’वैकुंठ’ प्रत्यक्ष पेरूमाळचे चरणकमळ. जर आपण आपल्या जीवनातील सर्व कर्तव्य सदाचारी राहून यशस्वीपणे पार पाडली, मनोमन पेरूमाळचे सदोदित स्मरण केले व दिव्य देसम्च्या शक्य तितक्या मंदिरांचे दर्शन घेतले तर नक्कीच आपल्या मृत्युपश्चात क्षीरसागर व वैकुंठाची प्राप्ती होईल असा प्रत्येक सश्रद्ध वैष्णवाचा मनापासून विश्वास असतो.
आळ्वारांनी 106/8 स्थाने जी निश्चित करताना त्यांना काही विभागांत विभागले. आळ्वार मूळचे तामिळ असल्याने, दिव्य देसम्ची बहुतांशी मंदिरे ही तामिळनाडूमध्ये आहेत. मंदिरांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत... चोळ नाडू, चेरा किंवा मलई नाडू, नाडू नाडू, थोंडई किंवा पल्लव नाडू, पांड्य नाडू, वद नाडू व विन्नुलगा नाडू. नाडू म्हणजे राष्ट्र. याचाच हा अर्थ आहे की तामिळनाडूच्या ज्या भागांवर ज्या राजघराण्याची सत्ता होती त्याचे नाव त्या त्या विभागाला मिळाले. सर्वात जास्त म्हणजेच 40 मंदिरे ही चोळ नाडूत आहेत. मलई म्हणजे टेकडी-डोंगर. केरळ आणि केरळाला लागून असलेल्या भागातून पश्चिम घाट जातो. त्या भागांत असलेल्या मंदिरांना मलई किंवा चेर नाडू म्हणतात. पांड्य नाडू म्हणजे मदुराई-तिरुनेलवेलीचा भाग. थोंडई किंवा पल्लव नाडू म्हणजेच चेन्नई-कांचीपुरमचा भाग. नाडू नाडू मध्ये उत्तर तामिळनाडूतील दोन मंदिरे आहेत. वद नाडू म्हणजे दिव्य देसम्मधली मंदिरे जी तामिळनाडू-केरळच्या बाहेर आहेत. तर विन्नुलगा नाडू म्हणजे क्षीरसागर व वैकुंठ.
दक्षिणेच्या भूमीवर असलेले, कावेरी व कोल्लीडम या परम पवित्र नद्यांमुळे तयार झालेल्या श्रीरंगम बेटावर वैष्णवांचे अतिशय महत्त्वाचे मंदिर आहे, ते आहे श्रीरंगनाथस्वामी. ह्याच मंदिरात वैकुंठ एकादशीचा सोहळा मी अनुभवला. त्यावेळेस आलेल्या अनुभूतीने मी परत परत या मंदिराकडे ओढली गेले. याचे कारण, श्रीरंगनाथस्वामीचे मंदिर हे सगळ्यांत पहिले दिव्य देसम् आहे.