भ्रामक कथ्याची गढी उद्ध्वस्त करणारा ‘छावा’

01 Mar 2025 12:06:27
 
movie
चित्रपटाने जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते नाणे किती खणखणीत वाजलेले आहे हेच यावरून दिसून येते. भ्रामक ऐतिहासिक कथ्यांचा या निमित्ताने धुरळा उडालेला आहे व छत्रपती संभाजी महाराजांची ‘धर्मवीर’ ही सहज प्रतिमा साकार करणारे सत्य समोर आणले आहे, हेच या घटनेतील तथ्य होय. भ्रामक कथ्यांची गढी आता उद्ध्वस्त होताना दिसत आहे. ‘छावा’ चित्रपट हा प्रदर्शनाचे मोठमोठे उच्चांक मोडत निघालेला आहे, यामागचे हेच कारण आहे.
चित्रपटाने जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते नाणे किती खणखणीत वाजलेले आहे हेच यावरून दिसून येते. भ्रामक ऐतिहासिक कथ्यांचा या निमित्ताने धुरळा उडालेला आहे व छत्रपती संभाजी महाराजांची ‘धर्मवीर’ ही सहज प्रतिमा साकार करणारे सत्य समोर आणले आहे, हेच या घटनेतील तथ्य होय. भ्रामक कथ्यांची गढी आता उद्ध्वस्त होताना दिसत आहे. ‘छावा’ चित्रपट हा प्रदर्शनाचे मोठमोठे उच्चांक मोडत निघालेला आहे, यामागचे हेच कारण आहे.
अभिनेता विकी कौशल यांच्या अभिनयाने आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या कसबी दिग्दर्शनाने साकारला गेलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाने सध्या धूम उडवून दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील अ.भा. साहित्य संमेलनातही याची दखल घेतलेली आहे, हे विशेष. एवढे काय आहे या चित्रपटात? हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला भारतभर जी अभूतपूर्व लोकप्रियता लाभते आहे, ती कशामुळे? या चित्रपटाच्या यशाचे गमक काय आहे? साध्या सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे तर, लोकांच्या काळजाचा या चित्रपटाने ठाव घेतलेला आहे.
या चित्रपटाच्या तांत्रिक अंगाविषयी, त्यातील संगीताविषयी, पटकथा आणि संवाद, त्याचबरोबर कलाकारांची निवड आणि त्यांनी ताकदीने साकारलेल्या भूमिकांविषयी आतापर्यंत बरेच काही लिहिले आणि बोलले गेले आहे. त्याचा पुनरुच्चार येथे करण्याची गरज नाही. या चित्रपटाने एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे आणि तो म्हणजे, आतापर्यंत विशिष्ट हेतूने एक भ्रामक कथ्य (फेक नरेटिव्ह) रेटत राहणार्‍या काही आपमतलबी मुखंडांना या चित्रपटाच्या यशाने आणि लोकप्रियतेने सणसणीत चपराक लगावली आहे. त्यांच्या भ्रामक कथ्याचे बुरूज ढासळून पार भुईसपाट होताना पाहून ही मंडळी अत्यंत अस्वस्थ झालेली आहेत. आपल्या देशाचा जाज्ज्वल्य इतिहास केवळ आपल्याच दृष्टीकोनातून मांडला जावा आणि पाहिला जावा, असा दुराग्रह या मंडळींनी सतत चालविला होता. या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जी स्वराज्य चळवळ धगधगत ठेवली होती, तो सर्व प्रेरणादायी अभिमानास्पद इतिहास या मंडळींसाठी गैरसोयीचा होता. मुळात विदेशी इस्लामी आक्रमकांनी या देशावर आक्रमण करून येथील संस्कृती नष्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. आपली तथाकथित संस्कृती येथील जनतेवर थोपण्याचाही उद्योग चालविला होता. या उद्योगाला चाप लावण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. ते या आक्रमकांच्या विरोधात उभे राहिले होते. हा वास्तव इतिहास खोडून काढण्याचा कावा या चित्रपटामुळे उद्ध्वस्त झाला आहे आणि त्याला जनतेचे व्यापक समर्थन लाभले आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकार करून औरंगजेबाच्या सुलतानशाहीला हादरा दिला होता आणि त्यांच्या स्वर्गवासानंतर आपण हे स्वराज्य सहज धुळीत मिळवू शकतो या औरंगजेबाच्या अहंकाराला छत्रपती संभाजी महाराज यांनी भुईसपाट करून टाकले होते. आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी जे अविस्मरणीय बलिदान दिले आहे ते खरोखरच चिरस्थायी आणि प्रेरणादायी आहे. ही बलिदानाची गाथा मराठी मनावर कायमची कोरली गेली आहे; पण या हिंदी चित्रपटाच्यानिमित्ताने तिला जो पुन्हा उजाळाच नव्हे तर झळाळी मिळाली असेच म्हणावे लागते. आपल्याला गैरसोयीचा ठरणारा खरा इतिहास खोल गाडून टाकावा आणि ऐतिहासिक तथ्ये डावलून सोयीची मांडणी करावी, असा उपद्व्याप या देशात आपमतलबी आणि समाजविघटनकारी मंडळींनी सतत चालविला होता. पण या चित्रपटामुळे तरुण पिढीच नव्हे तर बाल प्रेक्षक मंडळीसुद्धा असा प्रश्न उपस्थित करू लागली आहे की, असा अभिमानास्पद आणि प्रेरणादायी इतिहास आम्हाला शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून का शिकविला जात नाही? आमच्यापासून तो दडवण्याचा आणि दडपून ठेवण्याचा प्रयास का होत असतो? त्यांच्या अशा टोकदार प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत आता या आपमतलबी मंडळींमध्ये उरलेली नसल्यामुळे मग त्यांनी या चित्रपटाच्या संदर्भात मूळ प्रश्नाला सोयीस्कर बगल देता यावी यासाठी उलटसुलट वादविवाद उकरून काढण्याची आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे भरकटवण्यासाठी मोहीम चालविली आहे. त्यांच्या या सापळ्यात आपण सापडून चालणार नाही.
 
 
कित्येक शतकातून असे महापुरुष जन्माला येतात की ते आपल्या जीवनाने चिरकाल लोकमानसावर आपला ठसा उमटवितात, पण काही महापुरुषांचा उदात्त ध्येयापोटी झालेला मृत्यू आणि ओजस्वी बलिदानदेखील चिरस्थायी प्रेरणेचा मृत्युंजय स्रोत बनतो, हे अधोरेखित करणारा वनराज सिंहाचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आतापर्यंत काही विशिष्ट मंडळींच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर मालिका, नाटक आणि चित्रपट काढणार्‍यांनी महाराजांच्या क्रूर छळाचा जो भाग वगळण्याची भूमिका घेतली होती. तो भाग काही प्रमाणात का होईना; पण पडद्यावर आणण्याची हिंमत निर्माता आणि दिग्दर्शक यांनी दाखविली आहे. त्यांचे हे धाडस वाखाणण्याजोगे आहे. या चित्रपटाचा शेवट केवळ माणसाच्या अंगावर शहारा आणत नाही, तर तो त्याला अंतर्मुख करतो. आपल्या इतिहासाबाबत विचार करायला भाग पाडतो. चित्रपटाचा शेवट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडताना काही भावनिक होणारे, भावनातिरेकाने अश्रू ढाळणारे व त्याचबरोबर नि:शब्द होणारे प्रेक्षक आपण पाहिले तर या चित्रपटाने समाजमानसावर घडविलेला परिणाम लक्षात येतो. वैचारिक गुलामीतून मुक्त होत या चित्रपटाने जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते नाणे किती खणखणीत वाजलेले आहे हेच यावरून दिसून येते. भ्रामक ऐतिहासिक कथ्यांचा या निमित्ताने धुरळा उडालेला आहे व छत्रपती संभाजी महाराजांची ‘धर्मवीर’ ही सहज प्रतिमा साकार करणारे सत्य समोर आणले आहे, हेच या घटनेतील तथ्य होय. भ्रामक कथ्यांची गढी आता उद्ध्वस्त होताना दिसत आहे. ‘छावा’ चित्रपट हा प्रदर्शनाचे मोठमोठे उच्चांक मोडत निघालेला आहे, यामागचे हेच कारण आहे.
 
Powered By Sangraha 9.0