पर्वणी महाकुंभाची

विवेक मराठी    01-Mar-2025
Total Views |
@मिलिंद सुधाकर जोशी
 9822011595
 
 prayagraj mahakumbh 2025
माणसाला ‘माणूस‘ बनविण्यासाठीच सण, उत्सव, पर्व आणि पर्वणी असतात. सर्व भ्रामक भेदाभेद मिटावेत आणि सनातन हिंदूधर्मीय एकत्र यावेत यासाठीच कुंभ आहे. या महाकुंभात विशाल जनसागर निर्माण होतोच; पण त्याही पलीकडे जाऊन तिथे निर्माण होतो आस्थेचा, भक्तीचा, आस्तिकतेचा आणि सकारात्मक उर्जेचा महासागर व्हावा, समाज एकत्र यावा, तेजस्वी व्हावा, हा उद्देश.
प्रयागराज महाकुंभला जाण्याआधी तिथल्या गर्दीची आणि त्यानंतर घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीची वर्णने, बातम्या आणि त्यांचे केले जाणारे राजकारण हेही कळत होते. जाऊ नका असे सल्ले दिले जात होते. तिथे जाण्याचे काही अडलेय का? या वयात हा धोका कशाला पत्करता? असे प्रश्नही विचारले गेले. परंतु 144 वर्षांनी येणार्‍या या पावन पर्वात आणि ऋषिमुनींच्या, संतमहंतांच्या आणि अब्जावधी भक्तांच्या तपाने, भावभक्तीने आणि त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या भूमीत आपण नाही जायचे तर कोणी जायचे? त्यांच्या उपकारांचे स्मरण व जाणीव ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता आपण नाही व्यक्त करायची तर कोणी करायची?
 
काय सांगो आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती
काय द्यावे यांसी व्हावे उतराई, ठेवीता हा पायी जीव थोडा
 
तुकोबांच्या या उक्तीनुसार पायी जीव ठेवणे हेसुद्धा उतराई होण्यासाठी जिथे थोडेच आहे, तिथे मी 1% इतकी जोखीम पत्करायला काय हरकत आहे? तिथे जाण्याने माझ्यातली आस्तिकता, सात्विकता आणि मानवता वाढणार असेल, तिला पुष्टी मिळणार असेल तर मग मी का जाऊ नये? जायलाच हवे, हा विचार दृढ झाला. लाखोंच्या साक्षीने समापन झालेल्या महाकुंभात 45 दिवसांत 65 कोटी भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे.
 
 prayagraj mahakumbh 2025 
 
सनातन हिंदू धर्माचे उच्चतम वैशिष्ट्य असलेल्या कर्मविपाकाच्या सिद्धांताची माहिती असल्याने आणि अभ्यास केला असल्याने पापे धुतली जात नाहीत व त्यांची फळे भोगावीच लागतात हेही स्पष्टपणे जसे मला माहीत होते, तसे ते बहुतांश लोकांना माहीत होते. त्रिवेणी संगमात स्नान करून बाहेर आलो. शेजारी एक वृद्ध आजी होत्या. त्या खूश दिसत होत्या. त्यांना सहजच विचारले, “क्यू मैय्या, बहुत खुष हो, सब पाप जो धूल गये?” या प्रश्नावर त्या माऊलीचे उत्तर अंतर्मुख करून गेले. त्या म्हणाल्या, “भैया पाप कभी धुलते हैं क्या? उनके फल भुगतने ही पडते है। हम यहा शुद्ध होने आये है और आगे पाप ना हो पुण्य हो ऐसा मैयासे सबके लिए आशीर्वाद चाहते है।” आता यापेक्षा समज काय वेगळी असते? जे या माउलीला कळले ते तिच्यापर्यंत कोणी पोहोचवले? जे तिला कळत होते, ते सर्व अधिकारी महापुरुषांना कळत नसेल का?
 
 
आई लहानपणी सतत आपल्या मनावर बिंबवत असते, “तुला डॉक्टर, इंजिनीयर, मोठा साहेब व्हायचे आहे ना मग शाळेत जा.” शाळेत गेल्यामुळे माणूस मोठा होतो का? आणि शाळेत गेल्यानंतर किती कष्ट घ्यावे लागतात, हे तिला ठाऊक नसेल का? मुलांची शाळेत जाण्याची सुरुवात व्हावी म्हणून ती तसे सांगते. शाळेत जाण्याने का कोणी डॉक्टर होते? असे द्वेषाधिष्ठित, तिरकस प्रश्न विचारून आणि आई मुलात कलागत लावण्याची इच्छा असणार्‍यांना ही आईची माया कशी कळणार ? आणि त्या मुलाचेही आईबद्दलचे प्रेम कसे समजणार?
 
 prayagraj mahakumbh 2025 
 
संत, ऋषी हे समाजाची आईच होते. ज्ञानोबांना माउली उगाच नाही म्हणत. तुकोबाही म्हणतात -
 
तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज नेती सांभाळीत
 
रामदासस्वामी आर्ततेने प्रार्थना करतात, विनवणी करतात -
 
कल्याण करी रामराया, जनहित विवरी
 
तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी
 
माणसाला माणूस बनविण्यासाठीच आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठीच, आपला आणि परधर्मीय असा कुठलाच भेद न मानता, आत्यंतिक तळमळीने आणि आंतरिक कळवळ्याने हा सर्व उपदेश केला गेलाय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठीच हे सण, उत्सव आणि पर्व, पर्वणी आहेत. या ग्रहस्थितीत आणि या पवित्र ठिकाणी आणि या पाण्यात असे काही विशेष आहे की, जे माणसाच्या सत्प्रवृत्त बनण्याला मोठी चालना देते. म्हणूनच हजारो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे आणि राहील. दर सहा वर्षांनी होणार्‍या अर्धकुंभात एकाच विचारांचे उदा. द्वैती, अद्वैती, द्वैताद्वैती, विशिष्टाद्वैती इ. इ. एकत्र येतात. चर्चा करतात. सहा वर्षांत काय झाल्याचा आढावा घेऊन पुढे काय करायचे ते ठरवतात. अशीच चर्चा दर 12 वर्षांनी येणार्‍या पूर्णकुंभात हे विविध विचारांचे तपस्वी विचारवंत एकमेकांत करतात. धर्म आणि मानवहिताच्या दृष्टीने एकत्रित विचार करून पुढे काय करायचे ते ठरवतात. इथले आखाडे हे असे वैचारिक असतात. या चर्चा इथे रोज होणार्‍या सत्संगातील विचार ऐकून प्रगल्भ झालेले आधिकारी आणि श्रोते ते विचार सर्वदूर पोहोचवतात. सर्व चर्चा ऐकल्या असल्याने त्यांच्या गावाच्या स्थानीय श्रोत्यांच्या शंकांचे निरसन करण्यास ते सक्षम झालेले असतात. शंकानिरसन झाल्याने हे विचार भक्कमपणे रुजतात. शारीरिक स्नान, वैचारिक स्नान आणि पवित्र भूमी निवास - संत सहवास, अशी ही दुसरी त्रिवेणी.
 
 
संगमस्नान करून आल्यावर होणारा दैवी आनंद, प्रसन्नता आणि भाववृद्धी मी स्वत: अनुभवली आहे. या उत्कट अनुभूतीसमोर झालेले कष्ट किंवा थोडाफार त्रास नगण्य. ज्यांना त्रास झालाय ते तो स्वखुषीने स्वीकारताय मग बाकीच्यांच्या वांझ वेदनांचे कौतुक कशाला. घाटांवर अनेक लोकांचे निरीक्षण केले. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हीच प्रसन्नता आणि आनंद मला दिसला. इथे स्पृश्य- अस्पृश्य, उच्च- नीच, जात-पात, भाषा, पंथ, धर्म, उत्तर - दक्षिण, गरीब - श्रीमंत असे कुठलेही भेद नव्हते. कुणासाठीही वेगळे घाट नव्हते. वेगळी व्यवस्था नव्हती. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे प्रत्यक्षात दाखवणारे हे सनातन धर्माचे खरे स्वरूप आहे. सर्व भ्रामक भेदाभेद मिटावे आणि सनातन हिंदूधर्मीय एकत्र यावा यासाठीच कुंभ आहे.
 
 
या संपूर्ण रचनेत विज्ञान, बुद्धिनिष्ठता आणि चिंतन आहे. समाज एकत्र यावा, धर्माचरणी व्हावा, संरक्षित व्हावा, तेजस्वी व्हावा या साठीच जसा लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला तसेच हेही उत्सव आहेत. या विचारांमुळेच भारत तात्त्विकदृष्ट्या विश्वगुरू, विश्वमार्गदर्शक होऊ शकतो; मात्र आधी त्यात घुसलेला कचरा साफ केला पाहिजे. विचार शुद्ध स्वरूपात सर्वात आधी आपल्या इथे रुजले पाहिजेत.
 
 
हे सर्व हितविचार आणि यातील बुद्धिप्रामाण्य जनसामान्यांना समजावून सांगणारी जी व्यवस्था होती ती योजनाबद्ध पद्धतीने नष्ट केली गेली. तिचे पुनरुज्जीवन करायला हवे. इंग्रजाळलेल्या पश्चिमाभिमुखी शिक्षण व्यवस्थेतून हे तर्कसुसंगत विचार कुठे समजतात? अत्याचारी आक्रामकांबद्दल आत्मियता, कौतुक आणि प्रेम असलेल्या तसेच स्वधर्माबद्दल तुच्छता बाळगणार्‍या तथाकथितांनी आणि त्यांच्यासारखेच असलेल्या स्वार्थी राजकारण्यांनी स्वसंस्कृतीबद्दल लज्जा आणि घृणा निर्माण होईल अशीच व्यवस्था केली. भेदाभेद दूर करण्याऐवजी त्याला खतपाणी घालणारे, भ्रामक आणि खोटे तसेच द्वेष पसरवणारे आणि वाढवणारे विचार रुजविले. या विचारांमुळेच आणि अभ्यासाच्या अभावामुळेच कुंभामुळे काय होणार आहे? असे तर्कदुष्ट कुत्सित प्रश्न विचारले जातात. अशा अडाणी विद्वानांना सत्य सांगून प्रतिवाद करायलाच हवा.
 
 
हिंदूंना जसे भेदाभेद नको आहेत तसे तुष्टीकरणही. कारण द्वेषरहित, सर्वसमावेशक आणि विविधतेचा स्वीकार करणारी आणि विश्वकल्याणाची आस असणारी ही सनातन हिंदू धर्म विचारसरणी आहे. या मुळेच इथे लोकशाही टिकून आहे. जनतेचा कल आणि कौल आणि मागणीही हीच आहे. हरियाणा, दिल्ली आणि विशेषत: महाराष्ट्राचे निवडणूक निकाल हेच प्रमाणित करतात. धर्मविचारांबरोबर राजकीय विचारही तितकेच महत्त्वाचे असतात. राजकारण हा दुर्लक्षण्याचा विषय नाही.
 
समर्थांनी तर सांगितलेच आहे -
 
मुख्य हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण।
 
तिसरे ते सावधपण । सर्वविषई॥
 
 
अनेक राजकीय निर्णय आणि तसे केलेले कायदे हे देशासाठी आणि हिंदुहितासाठी घातक ठरले आहेत. या पुढेही ते ठरू शकतात. एकत्र येण्याचे फायदे आणि हीत हिंदुंच्या आता लक्षात यायला लागले आहे. हिंदू मानसिकतेतला हा सुखावह बदल हा महाकुंभ आणखी दृढ करेल. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा भविष्यातला धोका आणि ‘जब जब बट गये, तब तब कट गये’ हा इतिहास लक्षात घेऊन ‘एक है तो सेफ है’ हा पर्याय सातत्याने निवडण्याची आणि विभाजनवाद्यांना पराभूत करण्याची गरज आहे. हिंदुहितासाठी सजग असलेली हिंदू मतपेढी तयार व्हायला हवी. हिंदुना स्वधर्म रक्षण्यासाठी हे करावेच लागेल.
 
 
महाकुंभ पर्व । सनातन गर्व
 
महाकुंभ का अटल संदेश । एकजुट हो अपना देश
 
महाकुंभ पर्वाच्या चपखल घोषणा या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. जवळ जवळ अर्धा भारत कुंभला आला, जगाच्या कानाकोपर्‍यातून लोक आले. जगातल्या धार्मिक आयोजनातील उच्चांकी महाप्रचंड संख्येने आलेल्या श्रद्धाळूंची व्यवस्था करण्याचे शिवधनुष्य उचलणार्‍या मोदी आणि योगी यांचे, त्यांच्या सरकारी यंत्रणांचे, कर्मचार्‍यांचे या आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांचे, आणि प्रयागच्या नागरिकांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. या सर्वांना त्रिवार मानवंदना.
 
 
गर्दीमुळे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर भावूक झालेले योगीजी बघताना ही नौटंकी नाही हे लगेच लक्षात येत होते. रक्ताचे पाणी करून, बारकाईने सर्व गोष्टींकडे लक्ष देणारे असे समर्पित नेतृत्व आणि त्या नेत्याच्या मनात ध्येयाबद्दल निष्ठा, प्रेम आणि आपुलकी असल्याशिवाय सर्व सहकारी असे प्रेरित होत नाहीत. राजा कालस्य कारणम !! हेच खरे.
 
या आधीही कुंभ आयोजित केले गेले; पण आयोजकांची भूमिका कंत्राटदारी होती. आत्ताच्या आयोजकांची भूमिका हे घरचे महत्त्वाचे कार्य असल्याची होती. या दोन्ही भूमिकांमध्ये फार मोठा फरक आहे. यामुळेच नवनवीन कीर्तिमान होत होते. सर्व जगाने कौतुकाने, डोळे विस्फारुन, आश्चर्यचकीत नजरेने या महासोहळ्याकडे आणि त्याच्या आयोजनाकडे बघितले आहे. याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटायला हवा.
 
खरोखर अतिशय नेटके आणि शिस्तबध्द आयोजन केले होते. स्वच्छता तर कमालीची होती. जागोजागी कचरा गोळा करण्याच्या मोठ्या पिशव्या ठेवलेल्या होत्या. ठरावीक वेळाने सातत्याने पिशव्या बदलल्या जात होत्या. संपूर्ण घाटावर कुठेही कचर्‍याचा ढीग किंवा प्लास्टीकची रास दिसली नाही. सर्व कर्मचारी प्रेरीत होऊन अगदी मनापासून काम करत होते. अपेक्षेपेक्षा दुप्पट संख्येने लोक आले असताना व्यवस्था आणि स्वच्छता राखणे अत्यंत कठीण असते; परंतु ते अवघड काम करून दाखवले. परिणामी सनातन धर्म आणि भारत यांची मान उंचावली आहे. या महाकाय कार्याचे आणि त्यातून होणार्‍या विशाल हिंदू संघटनाचे आणि हिंदुंच्या मनात स्वधर्माविषयी प्रेम आणि अभिमान जागृत होण्याचे सर्व श्रेय या दोघांना आणि सर्व सहयोगी आणि सहकार्‍यांना आहे. या कार्याबद्दल देश आणि सनातन धर्म या सर्वांचा कायमच ऋणी राहील.
 
 
मोदी आणि योगी या दोघांचाही आध्यात्मिक अधिकार फार मोठा आहे. दोघांनाही मानणारे कोट्यवधी लोक आहेत. या लोकप्रियतेचा वापर त्यांनी सनातन गौरव वाढविण्यासाठीच केलाय. स्वत:चे भ्रामक तत्त्वज्ञान रचून ते खरेच असल्याचा दुराग्रह, हट्ट आणि हेकेखोरपणा त्यांनी दाखवला नाही. असत्य, शास्त्रविरोधी आणि अर्धेमुर्धे विचार अनुयायांच्या गळी उतरवून हिंदूहिताचा आणि देशाच्या एकसंधतेचा बळी त्यांनी दिला नाही. ते ऐक्यलंपट आणि सद्गुणविकृत नाहीत. हे त्यांनी कठोर निर्णय घेऊन दाखवून दिले आहे. दोघेही मुख्यमंत्री झाले. मोदीजी पंतप्रधान झाले; पण त्यांनी संत किंवा महात्मा होण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यांचे आचार विचार आणि त्यांचे संस्कार त्यांना असे कदापीही करू देणार नाहीत, अशी माझी खात्री आहे. कोरोनात थाळी वाजवण्यापासून ते दिवे लावण्यापर्यंतचे मोदीजींचे सर्व प्रयत्न देश जोडण्याचेच होते. कुंभही याला अपवाद नाही.
 
 
महाकुंभाचे मला जाणवलेले आध्यात्मिक, धार्मिक, तात्त्विक, वैचारिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व माझ्यापरीने मांडत शेवटी माझ्या कवितेच्या माध्यमातून जगनियंत्याकडे एक मागणी करतो.
 
 
बोलघेवडा कवी न व्हावा, उक्ती कृतीची जोड व्हावी
माझ्या कृतीने या जगण्याची सरळ सोपी कविता व्हावी!!

ठाऊक आहे मजला हेही तृटी खूप देशात अजुनी
निष्ठा तरीही देशावरची तसूभरही कमी न व्हावी !!

परदेशी सुबत्तेचा मोह न मजला कधी पडावा
मी इथल्या मातीत जन्मलो राखही या मातीतच व्हावी !!

नको भेदाभेद अमंगळ ही जनता सारी एक व्हावी
तिरंग्याला वंदन करता छप्पन्न इंचांची छाती व्हावी !!

अंतिम इच्छा हीच दयाळा पुढच्या नव्हे तर जन्मोजन्मी
धर्म मजला हाच मिळावा मायभूमीही हीच मिळावी !!