@डॉ. श्रीकांत कार्लेकर
भूजल ही राज्यातील महत्त्वाची नैसर्गिकसंपदा असून पिण्यासाठी, जलसिंचनासाठी, उद्योग-धंद्यासाठी, नदीपात्राची जलधारण व प्रवाही क्षमता टिकून राहण्यासाठी आणि पाणथळ जागांच्या अस्तित्वासाठी भूजलाचे मोठेच योगदान आहे. मात्र आज हे भूजल माणसाच्या हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहेत. जाणवणारा भूजलाचा तुटवडा आणि टंचाई दूर करण्यासाठी कृत्रिम भरपाईचा प्रयोग होणे आवश्यक आहे. पुणे परिसरात दिसून आलेले जीबीएस या विकाराचे वाढते प्रमाण हा भूजल प्रदूषणाबद्दल असलेले आपले अज्ञान आणि दुर्लक्ष याचा परिणाम आहे.
सध्या पुण्यातील विहिरी आणि विशेषतः विंधन विहिरी किंवा बोअरवेल यातील भूजल दूषित असल्याचे आढळले आहे. हे पाणी दैनंदिन वापरासाठी योग्य नसल्याचा निष्कर्ष संशोधनातून पुढे आला आहे. पुणे जिल्ह्यात जीबीएस या विकाराचे रुग्ण आढळल्यानंतर मध्यवर्ती पुण्याप्रमाणेच उपनगरामधील पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा पुढे आला आहे.
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली किंवा जमिनीखाली वाहणार्या पाण्यास “भूजल” किंवा भूमिगत पाणी (Groundwater) असे म्हणतात. जमिनीवर पडणार्या पावसापैकी आणि बर्फ वितळून तयार झालेल्या पाण्यापैकी 33% किंवा त्यापेक्षा जास्त पाण्याची कमी-अधिक तापमानानुसार वाफ होते. सुमारे 50% पाणी जमिनीवरून नद्यांच्या रूपाने वाहून जाते व 17 टक्के जमिनीत मुरते. जमिनीत मुरलेले पाणी खडकातून पाझरून भूपृष्ठाखालून भूजल स्वरूपांत वाहात असते.
पुणे परिसरात 50 ते 100 मीटर खोल असलेल्या बोअरवेलमधील भूजल प्रदूषित झालेले असून त्यात ’कॉलिफॉर्म्स’ हे आरोग्यास घातक असलेले विषाणू आढळले आहेत. हे पाणी इतके प्रदूषित आहे की ते पिण्यासाठी, आंघोळीसाठी अथवा दैनंदिन घरगुती कामासाठीदेखील योग्य नसल्याचे लक्षात आले आहे. 10 ते 20 मीटर खोल विहिरीतील पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. भूजलातील स्त्रोतांत पृष्ठभागावरील प्रदूषित पाणी मिसळल्याने ही पाण्याची गुणवत्ता बिघडलेली आहे. सांडपाणी व मैलापाणी वाहून नेणार्या भूमिगत जलवाहिन्यांची गळती हीसुद्धा या प्रदूषणास कारणीभूत आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी याच प्रकारे भूजलाच्या प्रदूषणामुळे उपलब्ध पाण्याची प्रत कमी होत आहे व ते पाणी पिण्यास अयोग्य बनत आहे. अनेक नवनवीन विकार आणि आजारांना हे पाणी निमंत्रणही देत आहे.
प्रदूषित भूजल पिण्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही एक मोठी समस्या राज्यांत वेगाने निर्माण होऊ लागली आहे. भूजल प्रदूषित होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढल्याचे लक्षात येते आहे.
भूजलाचा अभ्यास असे सांगतो की, हे भूजल कोणत्याही रासायनिक, किरणोत्सारिक किंवा जैविक प्रदूषणापासून पृष्ठभागावरील पाण्यापेक्षा तुलनात्मकरित्या फार जास्त सुरक्षित असते. हे पाणी भूगर्भात असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वातावरणीय बदलांचा, अगदी दुष्काळाचाही याच्यावर फारसा परिणाम होत नाही. साधारणपणे हे पाणी स्थानिक पातळीवर मिळत असल्यामुळे पुरवठ्यासाठीची साधने स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे हे पाणी आर्थिकदृष्ट्याही फायद्याचे आहे. या पाण्याची रासायनिक संरचना ही जास्तीत जास्त वेळा साधी सोपी व सरळ असते. तसेच हे पाणी खडकांत व काही वेळा भूगर्भात अगदी खोल अडकले असल्यामुळे ते गढूळपणा, आक्षेपार्ह रंग किंवा घातक सूक्ष्मजीवांपासून मुक्त असते. त्यामुळे याला वापरण्यायोग्य करण्यासाठी यावर फार क्रिया कराव्या लागत नाहीत.
जमिनीखाली अनेक प्रकारच्या जलभेध्य, पार्य खडकात जोड, संधी आणि भेगात पाण्याचा साठा असतो. अशा पाणी धरून ठेवणार्या खडकांना जलजशैल किंवा जलधारक खडक (Aquifer) असे म्हणतात. जलधारक खडकाच्या विस्तारावर अंतर्गत भूजलसाठ्याचे प्रमाण अवलंबून असते. कोकण, मलबार व कारवार आणि कारोमांडल भागांतील समुद्रकिनार्यावर भूजल जमिनीच्या पृष्ठभागानजीक आढळते तर राजस्थान, दक्षिण पंजाब या ठिकाणी बर्याच खोलीवर सुमारे 30 ते 60 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त खोलीवर भूजल असते. भूपृष्ठाखाली 1500 मीटर्स खोलीपासून भूजल झपाट्याने कमी होत जाते. 10 हजार मीटर्स खोलीवर ते अजिबात आढळत नाही.
जास्त खोलीवरील भूकवचाचा दाब खोलीनुसार वाढत जाऊन खडकातील छिद्रे बुजल्यामुळे पार्यता नष्ट होऊन खडक जलाभेध्य बनतात. भूजल विविध प्रकारे भूपृष्ठावर किंवा जमिनीवर येते. कारंजी, फवारे, विहिरी, झरे यांच्यामार्फत भूजलाचा आविष्कार पृष्ठभागावर होतो. जेथे भूजलाची पातळी पृष्ठभागाला छेदते अशा ठिकाणी पाणी झर्यांच्या (Springs) रूपाने बाहेर पडते. भरपूर वृष्टी असणार्या डोंगराळ भागांत झरे नेहमीच आढळतात. अशा तर्हेचे अनेक झरे पावसाळ्यात आपल्या सह्याद्री प्रदेशात अनेक ठिकाणी आढळतात.
काही ठिकाणी भूगर्भातून उष्ण किंवा उबदार पाणी, नियमितपणे पृष्ठभागावर येत असते. सामान्यपणे आजूबाजूच्या पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त तापमान असलेल्या या झर्यांच्या पाण्यात अनेक प्रकारची खनिजे विरघळलेली असतात. यांना उष्ण पाण्याचे झरे असे म्हटले जाते.
भूजल जेव्हा प्रदूषित होते तेव्हा ते स्वच्छ होण्याची शक्यता खूप कमी असते. भूपृष्ठाखाली दर मीटरला 30 सेंटिमीटर इतक्या गतीने भूजल पुढे सरकत असते. त्यामुळे त्यातील प्रदूषके सहजगत्या इतरत्र पसरत नाहीत. पाणी प्रदूषकांनी संपृप्त बनूनच पुढे जात राहते. शिवाय भूजलाचे तापमान भूपृष्ठावरील पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे व मुळातच या पाण्यात जिवाणू कमी असल्यामुळे प्रदूषकांचे विघटन होण्याची क्रियाही या पाण्यात होत नाही. त्यामुळे भूजल एकदा प्रदूषित झाले की हजारो वर्षे त्याच अवस्थेत राहते. लेड, आर्सेनिक, फ्लोराईड ही द्रव्ये त्यात कायमच आढळतात.
नेमक्या किती विस्तृत भागात भूजल प्रदूषित झाले आहे याचा अंदाज करता येत नाही. अमेरिकेसारखे काही श्रीमंत देश यावर भरपूर पैसा खर्च करून प्रदूषित भूजल क्षेत्रांचे मापन करतात, प्रदूषणाचे प्रमाणही शोधतात. पण ही खर्चिक गोष्ट असल्यामुळे बर्याच देशांत केली जात नाही. अर्थातच त्यामुळे यासंबंधीची खूपच कमी आकडेवारी आज आपल्याला उपलब्ध आहे. जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यावरून असे दिसते की, शहरातून केल्या जाणार्या पाणीपुरवठ्यासाठी जे भूजल वापरले जाते त्यात 45% सेंद्रिय रासायनिक प्रदूषके असतात.
शहरी भागात साठलेले पाणी भूमिगत होऊन भूजलाचे फार मोठे प्रदूषण होते. डिझेल आणि पेट्रोलची भूमिगत साठवण, विषारी द्रावकांची उद्योगांच्या परिसरातील भूमिगत साठवण यामुळे सुद्धा हे प्रमाण वाढते.
मुंबईसारख्या किनारी प्रदेशात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे खार्या पाण्याचे भूजलातील प्रमाण वाढते व भूजल खारट होते. विंधन विहिरींच्या वाढत्या संख्येमुळे नैसर्गिकरित्याच अशा विहिरींच्या पाण्यात आर्सेनिकचे प्रमाण वाढते आणि पाणी प्रदूषित होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार बांगलादेश, पश्चिम बंगाल येथे असे आर्सेनिकयुक्त भूजल पिणार्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
प्रदूषित झालेले भूजलाचे साठे किंवा क्विफर स्वच्छ करणे हे केवळ अशक्य असे काम आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे त्याची व्याप्ती, मोठे प्रमाण, दुर्गमता आणि अतिशय संथगती. शिवाय प्रदूषित पाणी वर खेचणे, स्वच्छ करणे व पुन्हा भूजल साठ्यात परत पाठवणे हे फार खर्चाचे काम. त्यामुळे भूजल प्रदूषित होऊ न देणे हाच त्यावर एकमेव उत्तम उपाय आहे. शिवाय भूमिगत साठवण प्रदेशातून म्हणजे अंडरग्राऊंड स्टोरेजमधून कुठलीही रसायने, प्रदूषके, तेल इत्यादी झिरपून भूजल साठ्यापर्यंत जाऊ न देणे हाही एक चांगला उपाय ठरू शकतो.
पावसाच्या पाण्याबरोबरच नद्या, तळी, सरोवरे, खाड्या आणि पाणथळ प्रदेशातील पाणी झिरपून भूजल साठे तयार होतात. पाणी झिरपण्याच्या वेगापेक्षा पाणी उपसण्याचा वेग वाढला आणि प्रमाण वाढले की, भूजल साठेही कमी होत जातात. गेल्या शतकांत भूजल उपसण्याच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा दहा पटीने जास्त वाढ झाल्याचा एक अभ्यास सांगतो.
भूजलाचे प्रदूषण आपल्याला दिसत नसल्यामुळे त्याबद्दल आपण बर्याच वेळा बेफिकीर असतो. त्यामुळे भूजल प्रदूषणाविषयी जनजागृती होणे अतिशय गरजेचे असल्याचे अनेक भूजल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भूजल उपसा वाढल्यामुळे होणारे परिणामही हानिकारक आहेत. जमिनी खचणे, किनारी प्रदेशांत पाणी खारट होणे, खोलवर गेलेल्या विहिरींतून फ्लोरिन, आर्सेनिक यांसारखी द्रव्ये पाण्यातून वर येणे अशा अनेक समस्या यातून उद्भवतात. त्यामुळे भूजलाचा कमी उपसा व भूजल प्रदूषणावर नियंत्रण यांचा पसरणार्या रोगराईच्या संदर्भात प्राधान्याने विचार होणे आता अपरिहार्य ठरते आहे हे नक्कीच.
भूजल ही राज्यातील महत्त्वाची नैसर्गिकसंपदा असून पिण्यासाठी, जलसिंचनासाठी, उद्योग-धंद्यासाठी, नदीपात्राची जलधारण व प्रवाही क्षमता टिकून राहण्यासाठी आणि पाणथळ जागांच्या अस्तित्वासाठी भूजलाचे मोठेच योगदान आहे. मात्र आज हे भूजल माणसाच्या हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहेत. जाणवणारा भूजलाचा तुटवडा आणि टंचाई दूर करण्यासाठी कृत्रिम भरपाईचा (Replenishment) प्रयोग होणे आवश्यक आहे. टंचाईचे मुख्य कारण हे कमी खोलीवरच्या जलधारक खडकांचे न होणारे पुनर्भरण आणि खोल विंधन विहिरींच्या अनिर्बंधपणे वाटणार्या संख्येमुळे खोल जलधारक खडकातील झपाट्याने कमी होणारा भूजलाचा साठा हेच आहे.
सांडपाण्याच्या अत्यंत चुकीच्या व्यवस्थापनामुळे बरेच पृष्ठजल व भूजल प्रदूषित झाले आहेत. निरनिराळ्या उद्योग समूहातून कोणत्याही प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया न करता पृष्ठजलात अनेक रसायने व प्रदूषके सोडली जात आहेत आणि यावर कुठलाही कायदेशीर वचक नाही!
विंधन विहिरी किंवा बोअरवेल यातील भूजल दूषित झाले आहे की नाही हे समजण्यासाठी नियमित पाणी चाचणी करणे आणि दूषित घटकांसाठी पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे आवश्यक असते. बोअरवेलचे बांधकाम योग्य प्रकारे झाले आहे की नाही, उच्च दर्जाचे आवरण, सीलिंग आणि योग्य ड्रिलिंग तंत्र वापरले गेले आहे की नाही हेही पाहाणे फायद्याचे असते. संभाव्य दूषित जल स्त्रोतांपासून दूर असलेले स्थान निवडणे, दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) सारख्या योग्य गाळण्याची प्रक्रिया किंवा पद्धती वापरणेही इष्ट ठरते.
भूजल आणि जलजशैल यांची आपल्या देशातील दुर्दशा वर्णन करण्यापलीकडे आहे. अजूनही सर्वसमावेशक असे जलजशैल मानचित्रीकरण किंवा जलधारक खडकांचे (Aquifer ) मानचित्रीकरण (Aquifer mapping ) झालेले नाही. नेमके किती भूजल स्त्रोत उपलब्ध आहेत याचीही माहिती आज आपल्याकडे नाही.
भूजलाच्या या बिघडलेल्या प्रतीमुळे जगभरात अनेक ठिकाणी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. भूरचनेचा आणि खडकांचा विचार करता जलस्त्रोत, नदी, विहीर, कालवा, तलाव यांपैकी कुठलाही असला तरी त्यातील पाण्यात अनेक क्षार थोड्याफार प्रमाणात असतातच. त्यावरूनच या पाण्याची प्रत ठरते; पण यातील क्षारतेत वाढ झाली की तो जलस्त्रोत हानिकारक ठरू शकतो. नदीखोर्यांचा अनिर्बंध वापर कमी करणे, नदीमार्ग त्याच्या उगमापासूनच प्रदूषणरहीत कसे राहतील त्याच्या योजना तयार करणे, तळी व सरोवरांच्या पाण्याची निगा वाढविणे, भूजल प्रदूषित करणारे सर्व उद्योग बंद करणे, भूजलाचा अनिर्बंध व अविवेकी वापर थांबविणे या सर्व उपायांची आता तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक झाले आहे. हे झाले तरच भूजल प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल. पुणे परिसरात दिसून आलेले जीबीएस या विकाराचे वाढते प्रमाण हा भूजल प्रदूषणाबद्दल असलेले आपले अज्ञान आणि दुर्लक्ष याचा परिणाम आहे. भविष्यात हे संकट उग्र रूप धारण करणार नाही, याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज आहे.