राम कारुण्यसिंधू

विवेक मराठी    10-Mar-2025   
Total Views |
Karunastake
श्रीरामाच्या भेटीसाठी, भक्तीसाठी कोट्यवधी जन्मांपासून रामभक्त तळमळत आहे. हृदयातील ही आग शांत करण्यासाठी तुझ्या करुणेला महापूर येऊन त्याचा वर्षाव तुला करावा लागेल. असे झाले तरच ही मनातील तळमळ शांत होईल. तू तर ’कारुण्यसिंधू’ म्हणजे करुणेचा महासागर आहेस, तेव्हा तुला हे अशक्य नाही. अशी विनवणी भक्त श्रीरामाला करीत आहे.
श्री समर्थ रामदास स्वामी रचित ’अनुदिनि अनुतापे’ या करुणाष्टकातील पुढील श्लोक असा आहे -
जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटी।
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू
षड्रिपूकुळ माझें तोडिं याचा समंधू ॥6॥
 
 
(हे रामा, तुझ्या भक्तिवियोगाची आग माझ्या हृदयात आहे. मी जन्ममरणाच्या फेर्‍यात अडकल्याने कित्येक कोटी जन्मापासून माझे हृदय जळत आहे. तेव्हा तुझ्या दयेचा पूर लोटू दे आणि माझ्या मनातील तळमळ शांत होऊ दे. हे करुणेचा सागर असलेल्या रामा, हे तू कर आणि कामक्रोधादी षड्रिपूंचा माझ्याशी असलेला संबंध कायमचा दूर कर.)
 
 
या पूर्वीच्या श्लोक क्रमांक-5 मध्ये सुहृदांचा, स्वजनांचा, नातलगांचा मायापाश तोडता येत नाही, अशी व्यथा साधकाने प्रकट केली आहे. भक्त साधक म्हणतो, माझे मन, अशाश्वत भौतिक गोष्टींच्या नादी लागले आहे व त्यातून ते आनंद, समाधान शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. पण भौतिक जगातील गोष्टी क्षणभंगूर असल्याने त्यापासून मिळणारा आनंद तात्पुरता असतो. तो खरे समाधान मिळवून देऊ शकत नाही. शाश्वत अशा रामभक्तीत ते सामर्थ्य आहे. ते मी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि रामभक्तीचा माझा निश्चय कायमस्वरूपी राहात नाही.
 
 
स्वामी म्हणतात, “घडिंघडी विघडे हा निश्चयो अंतरीचा।” भक्त म्हणतो, माझ्या मनात तुझ्या भक्तीची ओढ व तळमळ लागली आहे. वियोगाच्या अग्नीने माझे मन पोळून निघत आहे. माझे मन अगणित जन्मांपासून ही आग सहन करीत आहे. साधकाची रामभक्तीची तळमळ या जन्मातील आहे, हे आपण समजू शकतो; परंतु भक्त जेव्हा म्हणतो की, रामाच्या वियोगाने माझे हृदय कोट्यानुकोटी जन्मांपासून तळमळत आहे हे कसे काय? अशी शंका मनात येणे स्वाभाविक आहे. अगणित जन्म पार पडले हे आपण कसे मानायचे? तथापि अनेक पूर्वजन्म होऊन गेले याला भगवद्गीतेत आधार आहे.
 
 
गीतेच्या चवथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, ’मी हा योग यापूर्वी विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला होता, तो पुढे सूर्याने मनूला सांगितला. आणि तोच योग आता मी तुला सांगत आहे.’ हे ऐकल्यावर अर्जुनाने शंका उपस्थित केली, ‘हे श्रीकृष्णा, तुमचा जन्म तर अलिकडचा आहे. तुम्ही मथुरेत जन्मला आणि तुमचे बालपण गोकुळात गेलेे हे मला माहीत आहे. सूर्य तर फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. असे असताना तुम्ही सूर्याला योग सांगितला याची संगती लागत नाही.’ येथे अर्जुनाने आपल्याच मनातील शंका बोलून दाखवली आहे, आता यांवर भगवंतांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे -
 
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥ (भ.गी. 4.5 )
 
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ’हे परंतपा अर्जुना, माझे आणि तुझेही यापूर्वी अनेक जन्म होऊन गेले आहेत. ते सर्व जन्म मी जाणतो, पण तू मात्र ते जाणत नाहीस. त्यामुळे मी सूर्याला केव्हा, कसा हा योग कथन केला अशी शंका तुझ्या मनात उत्पन्न झाली आहे.’ आता हे प्रत्यक्ष भगवंताचे निश्चयात्मक निवेदन असल्यामुळे आपण भगवद्वचनाची तार्किक चिकित्सा करणे योग्य होणार नाही. कारण समर्थांनी दासबोधात स्पष्टपणे सांगून ठेवले आहे, ’भगवद्बचनी अविश्वासे। ऐसा कोण पतित असे।’ (दा.1.1.21 ) तेव्हा साधक म्हणतो, ‘जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी’ यावर आपल्याला शंका घेता येणार नाही. भक्ताची ही व्यथा खरी आहे असे मानावे लागते.
 
 
भक्ताच्या हृदयात पेटलेली ही वियोगाची आग भौतिक स्वरूपाची नाही, तशी ती असती तर पाण्याने ती शांत करता आली असती. पाण्याचे बंब जरी बोलावले तरी हृदयातील या आगीला, तळमळीला ते विझवू शकणार नाहीत. यावर एक उपाय म्हणजे रामाला विनंती करणे, रामाला सांगणे की, ‘हे रामा, तुझी दया, अनुकंपा यांनीच ती आग कमी होणार आहे. माझे अंतःकरण तुझ्या भेटीसाठी, तुझ्या भक्तीसाठी कोट्यवधी जन्मांपासून तळमळत आहे. हृदयातील ही आग शांत करण्यासाठी तुझ्या करुणेला महापूर येऊन त्याचा वर्षाव तुला करावा लागेल. असे झाले तरच ही मनातील तळमळ शांत होईल. तू तर ’कारुण्यसिंधू” म्हणजे करुणेचा महासागर आहेस, तेव्हा तुला हे अशक्य नाही. भक्त येथे सांगत आहे की, माझे हृदय अगणित जन्मांपासून वियोगाने जळत आहे. त्याच्या या उद्गारातून भक्ताच्या तळमळीची तीव्रता आजमावता येते. भगवंत दयाळू, ‘कारुण्यसिंधू’ असल्याने त्याला भक्ताची दया येऊन तो कृपा करेल, पण एवढ्याने आपल्याला भवसिंधू पार करून शाश्वत रामचरणी विलीन होता येईल असे भक्ताला वाटत नाही.
 
 
भक्त जन्ममरणाच्या फेर्‍यात अडकल्याने रामभेटीची तळमळ वाढत गेली. मागील जन्मात कर्म करावे व त्याची फळे भोगण्यासाठी जन्माला यावे. या जन्मातील कर्माची फळे भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावे. अशा अनेक जन्मांत रामभक्तीचा, भेटीचा निश्चय केला, पण तो टिकला नाही. माझ्या देहबुद्धीमुळे प्रत्येक वेळी त्यात धरसोडपणा निर्माण झाला. याची कारणे शोधताना साधकाला जाणवले की, कामक्रोधादी वासनांमुळे आपण जन्मांच्या पुनरावृत्ती भोगत राहिलो व ध्येयापासून भ्रष्ट झालो. ’काम’, ’क्रोध’, ’लोभ’, ’मोह’, ’मद’ आणि ’मत्सर’ हे परमार्थ मार्गातील सहा शत्रू आहेत. या शत्रूंनी माझ्या मनावर ताबा मिळवल्याने मी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकत गेलो. या सहा शत्रूंनी मला पूर्णतः व्यापून टाकल्याने ते जणूकाही माझे कूळ आहे असे वाटू लागले आहे. या सहा शत्रूंसोबतचा कुळाचा संबंध तोडून टाकल्याशिवाय माझी परमार्थमार्गात प्रगती होणार नाही. तेव्हा हे रामा, तूच आता माझ्याबाबतीत या शत्रूंचा संबंध तोडून टाक, नाहीसा कर. या शत्रूंचा बंदोबस्त करून मला त्यांच्यापासून मुक्त कर. भगवद्गीतने या वासनांचा उल्लेख ‘नरकाकडे नेणारी द्वारे’ असा केला आहे.
 
 
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्मयं त्यजेत् ॥ (भ.गी.16.21)
 
 
अर्थात, ’काम’, ’क्रोध’ आणि ’लोभ’ ही आत्म्याचा नाश करणारी नरकाची द्वारे आहेत. म्हणून त्यांचा त्याग करावा. लोभातून ’मोह’ निर्माण होतो. ’काम’ कल्पनेत यश मिळत गेले तर त्यातून ’मद’ तयार होतो व अपयशाने ’मत्सर’ उत्पन्न होतो. अशा रीतीने या सहा शत्रूंची संगती लावता येते. हे सारे माणसाचा नाश करून त्याला नरकाकडे घेऊन जातात. यासाठी साधक रामाला विनंती करीत आहे की, ’षड्र्िपूकुळ माझें तोडिं याचा समंधू’ हे कारुण्यसिंधू रामा, तुझ्या वियोगाची तळमळ शांत करण्यासाठी तू या परमार्थ मार्गातील शत्रूंचा संबंध माझ्याशी येऊ देऊ नको, हे षड्र्िपू जन्मोजन्मी माझ्याबरोबर आहेत, तो संबंध तू तोडून टाक व मला त्यापासून मुक्त कर.
 
 

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..