एकदिवसीय आणि टी-20 प्रकारात भारतीय संघाने मागची दोन वर्षं जे वर्चस्व गाजवलं त्यासाठी आता करंडकाचं कोंदण मिळालं आहे. आधी 2024 चं टी-20 विश्वचषक विजेतेपद आणि 2025 चं चॅम्पियन्स करंडक विजेतेपद यामुळे भारतीय संघ दोन्ही प्रकारात चॅम्पियन ठरला आहे. रोहित, विराट आणि जाडेजासारख्या ज्येष्ठ खेळाडूंच्या नावावर चौथा आयसीसी करंडक लागला आहे. भारतीय संघाने आयसीसी विजेतेपदांचा दुष्काळ गेल्या वर्षभरात मिटवला आहे.
तुमच्या कर्तृत्वावर जोपर्यंत विजेतेपदाची मोहोर उमटत नाही, तोपर्यंत तुम्ही चॅम्पियन ठरत नाही. सृष्टीचा नियमच आहे तसा. तुमचा एक पराभव तुमच्याविषयी हजारो प्रश्न निर्माण करतो. तुम्ही मिळवलेला विजयच या प्रश्नांची उत्तरं देतो. भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक जिंकून सध्या तेच केलं आहे. कारण, या स्पर्धेपूर्वीचे चार महिने आठवा. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात आणि मग ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत झालेल्या पराभवामुळे संघात काहीही बरं सुरू नव्हतं. रोहित आणि विराटचं अपयश सलणारं होतं. त्यात रोहितला तर शेवटच्या कसोटीत स्वत:लाच संघाबाहेर बसवावं लागलं होतं. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी होती. विराट, रोहित आणि जाडेजा यांच्यावर धावा करा, नाहीतर घरी बसा असा दबाव होता. रोहीतवर नेतृत्व टिकवण्यासाठी दबाव होता. संघात दोन गट असल्याचीही चर्चा होती. सगळं वातावरण नकारात्मक होतं.
पण, स्पर्धा बदलली, कसोटीतील लाल चेंडू जाऊन पांढरा चेंडू आला. आणि भारतीय संघाने पुन्हा एकदा कात टाकली आहे. मागच्या 12 वर्षांचा आयसीसी एकदिवसीय चषकाचा दुष्काळ आता संपला आहे. एकदिवसीय आणि टी-20 प्रकारात भारतीय संघाने मागची दोन वर्षं जे वर्चस्व गाजवलं त्यासाठी आता करंडकाचं कोंदण मिळालं आहे. आधी 2024 चं टी-20 विश्वचषक विजेतेपद आणि 2025 चं चॅम्पियन्स करंडक विजेतेपद यामुळे भारतीय संघ दोन्ही प्रकारात चॅम्पियन ठरला आहे.
2023च्या एकदिवसीय विश्वचषकात सलग 10 सामने निर्विवाद जिंकूनही अंतिम सामन्यात कांगारूंकडून 6 गडी राखून झालेला पराभव भारतीय चाहत्यांना आजही सलत होता. पण, चॅम्पियन्स करंडकात जिगरबाज खेळ करून चषकही आपल्याच हातात असेल याची खातरजमा भारतीय संघाने केली आहे. न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीतही भारताशी झुंज दिली. पण, सामन्यात वर्चस्व दिसलं ते भारतीय संघाचंच. न्यूझीलंड संघाने 6 बाद 251 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. पण, कुठेही भारतीय फिरकीपटूंना फलंदाजांना वरचश्मा गाजवू दिला नाही. उलट चारही फिरकीपटूंनी मिळून 38 षटकांमध्ये फक्त 154 धावा देत 5 बळी मिळवले आणि किवी फलंदाजांना रोखलं. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने या संपूर्ण स्पर्धेतली एकमेव शतकी सलामी देताना वेगाने धावा वाढवून पुढच्या फलंदाजांचं काम सोपं केलं. जेव्हा जेव्हा फलंदाजांवर दडपण आलं ते खेळाडूंनी षटकार ठोकत घालवलं. म्हणूनच भारतीय डावांत 9 षटकार पाहायला मिळाले. फटकेबाजीच्या नादात 7 गडी बाद झाले. पण, विजय आटोक्यात राहिला.
या यादगार विजेतेपदासाठी निर्णायक ठरलेल्या गोष्टी पाहूया,
अंतिम अकराजणांत 4 फिरकीपटूंची निवड
भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकातील आपले सामने दुबईत खेळणार होता. तिथली खेळपट्टी धिमी असते, असं इतिहास सांगतो. त्यामुळे संघात कुलदीप, अक्षर, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जाडेजा अशा चार फिरकीपटूंची निवड झाली तेव्हा आश्चर्य कुणालाच वाटलं नाही. या चौघांपैकी दोन जण गरजेनुसार खेळतील असा लोकांचा होरा होता. कारण, आंतरराष्ट्रीय सामन्यात 3 तेज गोलंदाज आणि 2 फिरकीपटू खेळवण्याचाच प्रघात आहे. स्पर्धेच्या एक आठवडा आधी जसप्रीत बुमरा खेळणार नाही, हे स्पष्ट झालं. त्याच्या जागी वरुण चक्रवर्ती या पाचव्या फिरकीपटूची निवड झाली आणि यशस्वी जयसवालला घरी बसवलं, तेव्हा मात्र अनेकांनी भुवया उंचवल्या. हे काहीतरी वेगळं होतं.
त्यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं म्हणणं होतं, ‘आम्ही अंतिम अकरामध्ये कुणाची निवड होऊ शकते, हे बघून संघ निवडलाय.’ आणि रोहितने तर पुढे जाऊन सांगितलं की, ‘कुलदीप आणि वरुण हे दोघंच फिरकीपटू आहेत. बाकीचे तीनही अष्टपैलू खेळाडू आहेत!’ संघाची रणनीती काहीतरी वेगळी असणार याचा अंदाज एव्हाना येऊ लागला होता. ...आणि पुढे जे घडलं ते पाहून तर जाणकारांनी तोंडांत बोटं घातली. पहिल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघात एकाचवेळी जाडेजा, अक्षर, कुलदीप आणि वरुण असे चार-चार फिरकीपटू दिसू लागले. यात अक्षर तर पाचव्या क्रमांकावर के.एल. राहुलच्या आधी फलंदाजीला येऊ लागला. रोहितची अष्टपैलू फिरकीपटू ही माहिती त्याने तंतोतंत खरी केली. विशेष म्हणजे चौघांनी आपल्यावर सोपवलेली कामगिरी अगदी यथार्थपणे निभावली. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 9 बळी मिळवले. आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजीला आणलं तेव्हा तेव्हा संघाला बळी मिळवून दिला. अक्षरने आपल्या वाट्याला आलेली षटकं किफायतशीर पद्धतीने टाकली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फलंदाजीचा पाचवा क्रमांक तीन अर्धशतकी भागिदारींनी सत्कारणी लावला. अक्षरच्या नावावर 5 सामन्यांत 109 धावा आहेत. 42 ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे. फटकेबाजीची नैसर्गिक सवय सोडून त्याने स्पर्धेत 74 च्या स्ट्राईक रेटनी धावा केल्या आहेत.
चार फिरकीपटूंनी मिळून स्पर्धेत 21 बळी मिळवले आहेत. अंतिम सामन्यांत तर दोन्ही संघातील फरक या फिरकीपटूंनी टाकलेली षटकंच ठरली. चौघांना एकत्र खेळवण्याचा प्रकार एकदिवसीय क्रिकेटमध्ये विरळाच. पण, ती जोखीम गंभीर आणि रोहीत यांनी घेतली आणि ती यशस्वी केली.
विराट कोहली पाठलागांचा बादशाह
आधीच्या कसोटी मालिकांमध्ये काही खराब फटके खेळल्यानंतर विराट आता कसोटीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक राहिलेला नाही, अशी हाकाटी सुरू झाली होती. पण, एकदिवसीय मालिकेत त्याला फॉर्ममध्ये परतण्याची एक संधीच मिळाली. कारण, हा त्याचा सगळ्यात आवडता क्रिकेटमधील प्रकार आहे.
विराटने आपल्याला पाठलागांचा बादशाह का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. महत्त्वाच्या सामन्यात कामगिरी उंचावतात ते चॅम्पियन असतात आणि विराटने चॅम्पियनच आहे. पाकिस्तान विरुद्ध नाबाद 100 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 धावा करत त्याने भारतीय संघ सुरक्षितपणे कसा जिंकेल हे पाहिलं. अंतिम सामन्यात तो एका धावेवर बाद झाला. पण, पूर्ण स्पर्धेत त्याने 218 धावा केल्या त्या 54 च्या सरासरीने. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा टप्पा त्याने ओलांडला आणि विक्रमी 51 वं शतकही झळकावलं. शिवाय पाठलाग करताना 8,000 धावांचा टप्पा पार करून एक नवा विक्रम रचला. एकदिवसीय कारकीर्दीत विराटने 5,890 धावा फक्त एकेरी धावा पळून काढल्या आहेत. ही थक्क करणारी कामगिरी आहे.
भक्कम मधली फळी
सखोल फलंदाजी हे भारतीय संघाचं वैशिष्ट्य आहेच. यावेळी ते प्रकर्षाने दिसलं. कारण, प्रत्येक सामन्यात यातील प्रत्येकाने विजयी कामगिरी बजावली. रोहित आणि शुभमनने वेगवान सुरुवात करून द्यायची आणि या पायावर इतरांनी मधली षटकं बिनधोक खेळून काढायची अशी रणनीती ठरून गेली होती. ती जबाबदारी प्रत्येकानेच पेलली. श्रेयस अय्यर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर संघातून गायब झाला होता. दुखापत हे एक कारण होतं. रणजी सामने न खेळून बीसीसीआयचा ओढवून घेतलेला रोष हे दुसरं कारण होतं. पण, मधलं सगळं विसरून श्रेयसने या स्पर्धेत जबाबदारीने फलंदाजी केली. 5 सामन्यांत 246 धावा करत तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्या नावावर दोन अर्धशतकं लागली. तसेच चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून अपेक्षित असलेलं स्थैर्य प्रत्येक सामन्यात त्याने संघाला दिलं.
विराट, श्रेयस, अक्षर आणि पाठोपाठ के.एल. राहुल, हार्दिक आणि रवींद्र जाडेजा अशी भक्कम फलंदाजांची फळी भारतीय संघात होती. यातल्या प्रत्येकाने वेळेचं आणि आव्हानाचं भान ठेवून समयोचित धावा आणि भागिदार्या रचल्या. अंतिम सामन्यात के.एल. राहुल नाबाद 34 धावा करत संघासाठी उभा राहिला. भारतीय संघाने या स्पर्धेतील 5 पैकी 4 विजय हे दुसरी फलंदाजी करताना मिळवले. दुबईच्या खेळपट्टीवर कृत्रिम प्रकाशझोतात चेंडू जास्त वळतो. आणि दुपारच्या मानाने फलंदाजी जास्त आव्हानात्मक होते. पण, भारतीय फलंदाजांनी गरजेनुसार, खेळांत बदल करत संघाला विजयाच्या वाटेवर नेलं.
हिटमॅन रोहीत आणि शुभमनची वेगवान सलामी
रोहित शर्मावर चांगल्या सुरुवातीनंतर 20 किंवा 30 धावा करून बाद होत असल्याचा आरोप अंतिम सामन्यापूर्वी होत होता. तेव्हाच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केलं होतं, ‘तुम्ही आकडेवारी बघताय. आणि आम्ही खेळाडूचा प्रभाव बघतो.’ याचं कारण, रोहितने तोपर्यंत अर्धशतकं ठोकलं नसलं तरी एक महत्त्वाचं काम केलं होतं. पहिल्या 10 षटकांत सर्व सामन्यांत मिळून 100 च्या वर धावा करणारा तो एकमेव फलंदाज होता. हे त्याने नियमितपणे केलं. या बाबतीत रचिल रवींद्र आणि इतर युवा फलंदाजही त्याच्या मागे होते. नंतरच्या षटकांमध्ये धावांचा कमी होणारा वेग (खासकरून दुबईत) पाहिला तर या आकडेवारीचं महत्त्व लक्षात येईल. अंतिम फेरीत तर त्याच्या 76 धावांचं मोल शतकापेक्षा कमी नव्हतं. प्रत्येक सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून देण्याचं काम भारताच्या सलामीच्या जोडीने केलं.
शुभमन गिल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतच फॉर्ममध्ये होता. आणि हा फॉर्म त्याने या स्पर्धेतही कायम ठेवला. रोहितला आवश्यक साथ दुसर्या बाजूने देतानाच तो लवकर बाद झाला तर पुढे फलंदाजीला स्थैर्य देण्याचं काम त्याने चोख केलं. 5 सामन्यांत 47 च्या सरासरीने त्याने 188 धावा केल्या आणि बांगलादेशविरुद्ध शतकही झळकावलं.
एकूणच ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमापन नेमकं कसं होणार, हे आधीचेच प्रश्न चॅम्पियन्स करंडकानंतरही विचारले जातील. त्यावर चर्चा आधीसारखीच सुरू राहील. पण, रोहित, विराट आणि जाडेजासारख्या ज्येष्ठ खेळाडूंच्या नावावर चौथा आयसीसी करंडक लागला आहे. भारतीय संघाने आयसीसी विजेतेपदांचा दुष्काळ गेल्या वर्षभरात मिटवला आहे. रोहित शर्मा चारही आयसीसी करंडकांच्या (एकदिवसीय विश्वचषक, कसोटी अजिंक्यपद, चॅम्पियन्स करंडक आणि टी-20 विश्वचषक) अंतिम फेरीत पोहोचलेला एकमेव कर्णधार ठरला आहे, हे आताचं सत्य आहे.
येणारे दोन महिने हे इंडियन प्रिमिअर लीगचे आहेत. त्यानंतर जून महिन्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होईल. तेव्हाच या सगळ्या चर्चा पुन्हा एकदा सुरू होतील.