@विवेक गिरिधारी 9422231967
गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून राष्ट्र समर्पित भावनेने कार्यरत असणार्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्व व व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आढावा घेणारा हा विशेष लेख.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याला आपली कर्मभूमी मानून डॉ. स्वर्णलता भिशीकर या अत्यंत समरसून गेली साडेतीन दशके तेथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून कार्यरत होत्या. बौद्धिक अथवा आध्यात्मिक क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठण्याची स्वतःला संधी असताना त्यात गुंतून न पडता त्यांनी शिक्षणातून मनुष्यघडणीचा व वंचितांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला होता. आध्यात्मिक क्षेत्राची अनिवार ओढ व स्वाभाविक स्वभाव असला तरी त्यांनी प्रत्यक्षात मात्र सामाजिक क्षेत्रात, ग्रामीण भागात भक्कमपणे पाय रोवून काम केले. या ‘जीवनयोगा’ची साधना त्यांनी आयुष्यभर केली. असे हे दुर्लभ व्यक्तिमत्त्व कौटुंबिक संस्कारातून व ज्ञानप्रबोधिनीच्या मुशीतून कसे घडले, स्वतःला कसे घडविले व इतरांना कसे घडवित गेले हा त्यांचा प्रवास विलक्षण प्रेरणादायी व निश्चितपणे जाणून घेण्यासारखा आहे.
बालपणातील संस्कार व शिक्षण
लताताई भिशीकर यांचा जन्म नागपूरमध्ये 1 मे 1951 रोजी झाला. त्यांचे वडील म्हणजे चं.प. तथा बापूसाहेब भिशीकर हे जुन्या पिढीतील एक सव्यसाची पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यामुळे पत्रकाराच्या घरात वाढलेल्या लताताईंवर लहानपणापासून वाचन लेखनाचे वैचारिक संस्कार होणे अगदीच स्वाभाविक होते. लहानपणापासून त्यांना वाचनाची गोडी लागली. क्रांतिकारक, देशभक्तांची तसेच संतांची चरित्रे त्या आवडीने वाचत असत आणि स्वतःशीच विचारमग्न होत असत. आई कुसुमताई या राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ सेविका होत्या. आईचे साधेपणाचे, ईश्वरनिष्ठेचे तसेच सोशिकतेचे अन् परिश्रमशीलतेचे संस्कार बालमनावर न झाले तरच नवल होते. मोठे काका नाना भिशीकर हेही संघाचे कार्यकर्ते व सावरकरप्रेमी होते. आजोबा परमानंद भिशीकर हे समर्थ सज्जनगड मंडळाचे कार्यकर्ते होते. त्यानुळे घरात संघ परिवारातल्या मंडळींप्रमाणे सज्जनगडाच्या रामदासी संप्रदायातील मंडळींचीही उठबस असे. अशा देशभक्त व आध्यात्मिक वातावरणात बालवयातील लताताईंची जडणघडण झाली.
लताताई यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील बाल शिक्षण मंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण विमलाबाई गरवारे प्रशालेत (पूर्वीची डेक्कन जिमखाना भावे स्कूल) झाले. 1967 मध्ये 11 वी शालांत परीक्षेच्या वेळी त्या विषमज्वराने बर्याच आजारी पडल्या आणि परीक्षा बुडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परीक्षेत जेमतेम गुण मिळवून पास होतील असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र अन्य मैत्रिणींपेक्षा अधिक गुण मिळवून त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक दाखविली. त्यामुळे पुढे मेडिकलला जाण्याच्या दृष्टीने घरच्यांनी त्यांना फर्ग्युसनमध्ये शास्त्रशाखेत प्रवेश घेतला. यादरम्यान त्यांचा संबंध महाविद्यालयात चालणार्या ‘साहित्य सहकार’ चळवळीशी आला आणि वाचनवेड्या लताताईंना प्रकर्षाने जाणवले की, आपला पिंड हा साहित्याचा आहे, आपण कला शाखेकडे जायला हवे होते. त्यामुळे इंटर सायन्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळणे शक्य असतानाही त्यांनी स.प. महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. यामुळे आई-वडील नाराज झाले खरे; पण त्यांनी विरोध केला नाही. साहित्याची आवड असणार्या लताताई कलाशाखेत मात्र मनापासून रमल्या. दुसर्या वर्षापर्यंत त्यांनी मराठी साहित्य विषय अभ्यासला. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर याचबरोबर रॉबर्ट ब्राऊनिंग, एलिझाबेथ या इंग्रजी कवींच्या साहित्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. कुसुमाग्रज हे तर त्यांचे या क्षेत्रातील दैवतच बनले.
ज्ञान प्रबोधिनीशी संपर्क व कामाची सुरुवात
त्याकाळी म्हणजे 1962 मध्ये ज्ञान प्रबोधिनीची पुण्यात नुकतीच स्थापना झाली होती. प्रबोधिनीतर्फे मुलांसाठी प्रबोध शाळा व मुलींसाठी एक मंडळ चालविले जात असे. या मंडळात नववीपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या मुली येत असत. या मंडळात लताताई नववीत असल्यापासून जाऊ लागल्या. नलूताई उजळंबकर व लताताई या एकाच शाळेतील वर्गमैत्रिणी होत्या. प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंतराव लेले व नलूताई उजळंबकर हे जवळजवळ रहात असत. यामुळे या दोघीजणी प्रबोधिनीशी जोडल्या गेल्या. स्वामी विवेकानंदांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणे, त्यावर चर्चा करणे व परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन संस्कारवर्ग घेणे असे काहीसे या मंडळाचे स्वरूप होते. 1967च्या कोयना भूकंपात ससून रुग्णालयातील भरती होणार्या रुग्णांची देखभाल करण्याचे काम या मंडळातील मुलींकडे सोपविण्यात आले होते. रुग्णांच्या जेवणखाण व औषधाची व्यवस्था करणे, त्यासाठी लोकांकडून निधी गोळा करणे, रुग्णांच्या नातेवाईकांचे पत्ते शोधून त्यांच्या भेटी घडवून आणणे यात इतर मुलींसोबत लताताईंनी हिरीरीने काम केले. महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणार्या लताताईंचा लोकांच्या दुःखाशी इतक्याजवळून समरस होण्याचा तो पहिलाच अनुभव होता!
या मंडळाच्या निमित्ताने लताताईंचा ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक असणार्या डॉ. वि.वि. तथा आप्पा पेंडसे यांच्याशी जवळून संपर्क आला आणि त्यांच्या जीवनाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. स्वामी विवेकानंदांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानावर आधारित आधुनिक भारताची उभारणी करणारी शिक्षणप्रणाली सिद्ध करणार्या ज्ञान प्रबोधिनीच्या या प्रयोगाकडे त्या आकृष्ट झाल्या. प्रबोधिनीमध्ये युवती कार्यकर्ती म्हणून जोमाने सक्रीय झाल्या. ‘रूप पालटू देशाचे’ हा प्रबोधिनीचा वसा त्यांनीही घेतला. दरम्यानच्या काळात त्यांचे शास्त्र शाखेतून कला शाखेत स्थित्यंतर झाले होते. आप्पांचे या स्थित्यंतराबाबत अनुकूल मत व पाठिंबा होताच; कारण यामुळे लताताईंना प्रबोधिनीच्या कामासाठी अधिक वेळ मिळणार होता. असे असले तरी हा शाखा बदलाचा निर्णय पूर्णपणे लताताईंचा होता. त्यांनी आपले मत लताताईंवर लादले नव्हते. कला शाखेच्या तिसर्या वर्षात मात्र लताताईंनी प्रबोधिनीच्या कामाला पूरक ठरेल या हेतूने मानसशास्त्र हा विषय निवडला. 1971 मध्ये बी.ए.च्या अंतिम परीक्षेत त्या विद्यापीठात पहिल्या आल्या. काविळ झाल्याने एम.ए. (मानसशास्त्र)च्या वर्षी त्याचे कॉलेज बुडाले तरी चिकाटीने घरी अभ्यास करून त्या विद्यापीठात दुसर्या आल्या. सकाळी सातला डबा घेऊन घराबाहेर पडणे, कॉलेज पार पडल्यावर ग्रंथालयात थोडा वेळ अभ्यास करून प्रबोधिनीत प्रज्ञा मानस संशोधिकेत दुपारी चार तास चाचण्या घेण्याचे काम करून संध्याकाळी युवती विभागात मुलींचे दल घेऊन रात्री 8 नंतर घरी जाणे असा त्यांचा बी.ए.च्या दुसर्या वर्षापासूनच दिनक्रम झाला होता.
1973 मध्ये एम.ए.नंतरची दोन-तीन वर्षे मात्र त्यांनी प्रबोधिनीचे पूर्ण वेळ काम केले. प्रबोधिनीची1975च्या सुमारास मुलींसाठीची कन्यका प्रशाला सुरू झाली. त्यापूर्वी मुलींसाठी दोन तासांच्या प्रबोध शाळा सुरू होत्या. कन्यका प्रशालेत लताताईंबरोबर हेमाताई अंतरकर, नलूताई उजळंबकर, विद्याताई हर्डीकर व रंजनाताई अभंग यांचा पुढाकार होता. विद्याताई हर्डीकर या कन्यका प्रशालेच्या पहिल्या प्राचार्या झाल्या. लताताईही प्रशालेत काही वेळ अध्यापन करीत असत. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिकेत दहा वर्षे वाचनकौशल्ये व अनुषंगिक मानसशास्त्रीय संशोधन व प्रशिक्षणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. या दरम्यान आप्पांच्या आग्रहाखातर ‘वाचन कौशल्ये’ या विषयात त्यांनी 1981 च्या सुमारास विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी परिश्रमपूर्वक संपादन करत लौकिक शिक्षण पूर्ण केले. पीएच.डी.साठी त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती.
कन्यका प्रशालेतील अध्यापन व प्रज्ञा मानस संशोधिकेतील काम थांबवून त्यांच्याकडे आप्पा पेंडसे यांच्या स्वीय सहाय्यकाची मोठी जबाबदारी 1981पासून आली. आप्पांनंतर संचालक झालेल्या आदरणीय अण्णा ताम्हणकर यांच्या सचिव म्हणूनही त्यांनी पुढे सहा वर्षे जबाबदारी सांभाळली. 1984मध्ये पंजाबात काढण्यात आलेल्या सद्भावना यात्रेत पुण्यातील युवतींची तुकडी त्यांच्या विशेष प्रयत्नातून सहभागी झाली होती. स्वतः लताताई त्यात सहभागी होत त्यांनी पंजाबातील फिरोजपूर-तरणतारणपासून अमृतसरच्या सुवर्णमंदिरापर्यंत तेथील शीख बांधवांसमोर एकता टिकवून धरण्याचे आवाहन करत पदयात्रेतून हिंदीतून संवाद साधला. पाठोपाठ 1987 मध्ये देशाचे लक्ष वेधले गेलेल्या सतीप्रथेचा निषेध व अभ्यास करण्यासाठी युवतींचा राजस्थान दौरा काढला. याच वर्षी म्हणजे 1987 मध्ये अमेरिकेतील ‘इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया’ येथे आठ महिने अतिथी व्याख्याता म्हणूनही काम केले. यातील काही काळ त्यांनी लोकांशी संपर्क करून निधी संकलन करणे, प्रवचने देणे यासाठीही उपयोगात आणला.
सुमारे 10 वर्षे युवती विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी हे युवती संघटनाचे काम प्रामुख्याने पुण्यात केले. यादरम्यान स्वतःसाठी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये विवाहबंधनात न अडकता संपूर्ण ध्येयसमर्पित व व्रतस्थ असे त्यागमय जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून देशसेवेसाठी जगण्याचा जीवनपथ विचारपूर्वक निश्चित केला. त्यासाठी त्यांनी प्रबोधिनीची तृतीय प्रतिज्ञा घेतली होती.
सोलापूरमध्ये उभे राहिलेले प्रबोधिनीचे काम
अत्यंत कडक शिस्तीच्या व ध्येयवादी असणार्या अवंतिकाबाई यांचा त्यावेळी सोलापूरच्या शैक्षणिक वर्तुळात आदरयुक्त दरारा होता. 1989मध्ये स्व. अवंतिकाबाई केळकर यांच्या सोलापुरातील ‘बाल विकास मंदिर’ या प्राथमिक शाळेचे ज्ञान प्रबोधिनीकडे हस्तांतरण झाले. आप्पा पेंडसे हयात असताना केळकर दांपत्याचा या हस्तांतरणाबाबत त्यांच्याशी बोलणे व पत्रव्यवहारही झाला होता. ज्ञान प्रबोधिनीतर्फे या शाळेच्या संचालनाची जबाबदारी प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. अण्णा ताम्हणकर यांनी लताताईंकडे सोपविली होती.
या हस्तांतरणानंतर माध्यमिक शाळेतील अन्य तुकड्यांची त्याला मागाहून जोड मिळाली. सोलापुरात एकही पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र नाही हे लक्षात घेऊन ‘शिशु अध्यापिका विद्यालया’ची मुहूर्तमेढ रोवण्यात लताताईंनी 1991मध्ये पुढाकार घेतला. काही वर्षांपूर्वी रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण करणार्या या महाविद्यालयाने शासनाच्या बालवाडी अभ्यासक्रम निर्मितीतही योगदान दिले आहे. शिशु अध्यापिका व प्राथमिक शिक्षणाची नूतन इमारतही आता अलीकडेच त्यांच्या प्रयत्नातून उभी राहिली आहे. शाळांना व इमारतींना सरकारी मान्यता, न्यायप्रविष्ट खटल्यांचा पाठपुरावा यासाठी मुंबईला शासनदरबारी चिवटपणे लताताईंनी मारलेल्या फेर्या, निधी संकलनासाठी उपसलेले अमर्यादित कष्ट याला तोड नाही. कोणत्याही तडजोडी अथवा लटपटी न करता एकट्या मुंबईच्या मंत्रालयात त्यांनी सोलापूरवरून 85 हेलपाटे मारले!
वंचितांचे शिक्षण हा लताताईंच्या विलक्षण आत्मीयतेचा विषय होता. म्हणूनच त्यांनी 1994 मध्ये सोलापूर शहर साक्षरता अभियानाच्या निमंत्रक म्हणून जबाबदारी घेतली होती. सोलापूर शहरातील 38 झोपडपट्ट्यांमध्ये सलग दोन वर्षे सुमारे 1800 साक्षरता केंद्रे चालविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. सोलापूर शहरातील 27,500 निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आराखडा त्यांनी बारकाईने तयार केला. या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊन सोलापूर जिल्ह्याला पुरस्कार मिळाला. सोलापूर जिल्ह्यात 18 बाल कामगार सायंशाळा व पुनर्वसन केंद्रे चालू करण्यातही लताताईंनी पुढाकार घेतला. बाल कामगारांचे पुनर्वसन यासाठी सलगपणे पाच वर्षे लताताई कार्यरत होत्या. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कुमठे येथे साखरशाळा चालू करण्यातही त्यांनी यादरम्यान पुढाकार घेतला होता.
मराठवाड्यातील शैक्षणिक व ग्रामविकासाचे कार्य
1993 मध्ये मराठवाड्यातील किल्लारी भूकंपानंतरच्या नारंगवाडी, तावशीगड, हराळी या गावांमध्ये मदतकार्यासाठी प्रबोधिनीचे कार्यकर्ते धावून गेले. पाठोपाठ 1995मध्ये हराळी येथे तेथील ग्रामस्थांच्या आग्रहावरून प्रबोधिनीची ग्रामीण निवासी शाळा सुरू झाली. सुरुवातीला मारुती मंदिरातील सभामंडपात भरणारी शाळा लवकरच विस्तीर्ण वास्तूत भरू लागली. या शाळेच्या जागेसाठी स्थानिक ग्रामस्थांनी काही जागा देऊ केली तर उर्वरीत जागा प्रबोधिनीने देणग्या उभारून रीतसर विकत घेतली. येथे दोनशेच्या आसपास मुले निवासी आहेत. तितकीच मुले परिसरातील गावांमधून रोज शाळेत येत आहेत. आज एकूण 50 एकराच्या विस्तीर्ण जागेवर नुसती शाळाच नव्हे तर पाठोपाठ कृषीतंत्र निकेतनाची उभारणीसाठी करण्यात आली आहे. कमी पाण्यावर तग धरू शकणारी पेरू, सीताफळ, आंबा व लिंबू यांच्या फळबागांचे प्रयोग करण्यात आले. फळप्रक्रिया उद्योगाचाही प्रयोग करण्यात आला. येणार्या पिढ्यांसाठी आशास्थान असणारे एक नवे शिक्षणतीर्थ या एकेकाळी भूकंपामुळे उजाड झालेल्या मराठवाड्यातील बंजर भूमीवर उभे राहिले आहे. भूकंपावेळच्या तात्कालिक मदतकार्यातून सुरुवात झालेले हे कार्य फक्त शैक्षणिक पुनर्वसनापाशी न थांबता मराठवाड्याच्या मागासलेपणाच्या प्रश्नांच्या मुळाशी असलेल्या कारणांशी जाऊन भिडले आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला लताताईंचा तेथील गेल्या दोन दशकांपासून असलेला नित्य निवास ही तेथे काम करणार्या कार्यकर्त्यांसाठीची मोठी ऊर्जा होती. कारण या सर्व वाटचालीत अग्रक्रमाचे स्थान असणारे प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व लताताईंचे मार्गदर्शक व सहकारी डॉ. व. सी. तथा अण्णा ताम्हणकर यांचे 2017 मध्ये निधन झाले. परिसरातील मागास खेडेगावांमध्ये सामाजिक व शैक्षणिक विविधांगी कामे सांभाळणार्या तरुण कार्यकर्त्यांच्या संचाला प्रेरणा देत व सतत नवनवी आव्हाने देत कार्यप्रवण ठेवण्यात त्यांचा मोलाचा व निर्णायक वाटा होता.
काव्यप्रतिभेचा उत्स्फूर्त हुंकार व बहरलेली लेखनप्रतिभा
लताताईंनी ऐन विशीच्या उंबरठ्यावर असताना आपल्या तरल भावना कवितेच्या रूपाने शब्दबद्ध करण्यास सुरुवात केली. यशोदा हे टोपणनाव वापरून त्यांनी लिहिलेला ‘देवचाफे’ हा कवितासंग्रह ’हंस प्रकाशन’ने 1982 मध्ये प्रसिद्ध केला. त्याला राज्य पुरस्कार मिळाला. लताताईंचे दैवत असणार्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांची या कवितासंग्रहाला प्रस्तावना मिळाली. याहून मोठा पुरस्कार तो कोणता? या पुस्तकाची दुसरी आवृत्ती त्यांची मैत्रीण हेमाताई अंतरकर व लताताईंच्या भगिनी क्रांती भिशीकर यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध झाली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ या सुप्रसिद्ध कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद लताताईंनी विसाव्या वर्षी केला होता. इतके वर्षे अप्रकाशित राहिलेला हा अनुवादित कवितासंग्रहसुद्धा ‘देवचाफे’च्या दुसर्या आवृत्तीसोबत प्रसिद्ध झाला!
1982 नंतर प्रबोधिनीच्या कामाच्या धबडग्यात लताताईंची काव्यप्रतिभा काहीशी झाकोळली खरी. पण त्याबद्दल त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही. कारण त्यांनी या जीवनातील उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम अगोदरच ठरवून टाकला होता. स्वतःतील काव्यप्रेरणा जपत त्यांनी प्रबोधिनीतील 23 ओजस्वी व देशभक्तीने ओतप्रोत भरलेली गीतांची (पद्यांची) रचना केलेली आहे. त्यातून निर्माण होणारी अचूक भावनिर्मिती याला खास लताताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा स्पर्श आहे. कविमनाच्या लताताईंची प्रत्यक्षात बहरली ती मात्र लेखनप्रतिभा. इतरांसाठी असणारा हक्काचा सुट्टीचा ‘रविवार’ हा मात्र लताताईंसाठी ‘लेखनवार’ असे. इतर वेळेस कामांच्या फटींमधून मिळणार्या तुकड्या तुकड्या वेळेपेक्षा त्यांना रविवारी मनसोक्त सलग लेखन करायला वेळ मिळे.
पुण्यात असताना सुमारे 10 वर्षे आणि नंतर सोलापूर व हराळी येथे असतांना सुमारे 25 वर्षे असे एकूण त्यांनी 35 वर्षे प्रबोधिनीच्या वार्षिक वृत्ताचे अत्यंत आत्मीयतेने व जवळपास एक हाती असे केलेले लेखन आहे. त्यात नुसती वर्षभरातल्या उपक्रमांची जंत्री अथवा गोळाबेरीज मांडलेली नाही तर उपक्रमांची वाढ, त्याचे प्रयोजन, कामासोबत वाढणार्या कार्यकर्त्यांचा परिचय असे उपयुक्त तपशीलही आहेत. कामातील अडी-अडचणी, आव्हाने याचाही उल्लेख आहे. वाचणार्याला प्रबोधिनीची त्यादरम्यान आंतरिक वाढ कशी झाली याची जाणीव करून देणारे हे लेखन हा प्रबोधिनीसाठी एक मोठा ऐतिहासिक ठेवा आहे! लताताईंनी ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक वं.आप्पा पेंडसे यांचे परिश्रमपूर्वक केलेले चरित्रलेखन हा देखील प्रबोधिनीत नव्याने दाखल होणार्या कार्यकर्त्यांसाठी मोलाचा ठेवा आहे. याशिवाय लताताईंचे सुरुवातीच्या काळातील प्रबोधिनीचे शैक्षणिक प्रयोग ग्रंथरूपाने शब्दबद्ध करण्यातही महत्त्वाचे योगदान आहे. सुरुवातीच्या काळात ‘माताजी-अरविंद काय म्हणाले’ या पुस्तकाच्या लेखनात त्यांनी आप्पा पेंडसे यांना मदत केली होती.
भगिनी निवेदिता यांचे शिक्षणविचार तसेच ‘युगनायक’ हे स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्र अशी दोन पुस्तके लताताईंनी विवेकानंद केंद्रासाठी लिहिलेली आहेत. ’युगनायक’ या पुस्तकाच्या विक्रीने एक लक्षाचा टप्पा ओलांडला आहे. रामकृष्ण मठाचे भूतपूर्व अध्यक्षस्वामी रंगनाथानंद यांचेही त्यांनी ओघवते चरित्रलेखन केले आहे.
उत्तमोत्त्तम आध्यात्मिक ग्रंथांचा मराठीत अनुवाद
लताताईंच्या लेखनकार्यात मूळ इंग्रजी आध्यात्मिक पुस्तकांच्या मराठी अनुवादाचा असाही मोठा भाग आहे. आचार्य विनोबांच्या भूदान चळवळीतील विमला ठकार या ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या. अध्यात्म व सामाजिक कार्य याबाबतच्या त्याच्या मौलिक चिंतनाचा मोठा चाहता वर्ग आजही आहे. त्यांच्या सुमारे दोनशे पानी ‘अवधूत प्रसादी’ या हिंदीतील प्रवचनांचा ‘आत्मोल्लास’ या नावाने मराठी अनुवाद लताताईंनी केला आहे. त्यांनी केलेला हा पहिला अनुवाद. विवेकानंद केंद्राचे संस्थापक मा. एकनाथजी रानडे यांनी स्वामी विवेकानंदांच्या इंग्रजीतील निवडक विचारसूत्रांचे संकलन ‘अ राउजिंग कॉल टू हिंदू नेशन’ या नावाने संकलित केले आहे. त्याचा लताताईंनी ‘हिंदू तेजा जाग रे’ या नावाने मराठी अनुवाद विवेकानंद केंद्राने प्रसिद्ध केला आहे. हे त्यांचे अनुवादित दुसरे पुस्तक.
स्वामी रंगनाथानंद यांच्या ‘द मेसेज ऑफ उपनिषदाज’ या सहाशे पानी ग्रंथाचा त्यांनी मराठीत केलेला अनुवाद ’उपनिषदांचे अंतरंग’ या नावाने रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केला आहे. योगी श्रीअरविंद यांच्या ’द सिक्रेट ऑफ द वेदा’ या सुमारे साडेपाचशे ग्रंथाचा त्यांनी ‘वेदरहस्य’ या नावाने मराठीत केलेला अनुवाद पॉण्डेचेरीच्या ’श्रीअरविंद आश्रमा’ने नुकताच अलिकडे प्रकाशित केला आहे. स्वामी राम लिखित ‘लिव्हिंग विथ हिमालयन मास्टर्स’ हे सुमारे 500 पानी पुस्तक त्यांनी ‘हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात’ या नावाने मराठीत अनुवादित केले आहे. या ग्रंथांच्या पानांची संख्यासुद्धा आपल्या सारख्या सर्वसामान्यांची छाती दडपून टाकणारी आहे. रामकृष्ण मठातील स्वामी निर्वेदानंद यांच्या 200 पानी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. लताताईंच्या लेखनकर्तृत्वाची दखल घेत सोलापूर साहित्य परिषदेचा दत्ता हलसगीकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला पहिला पुरस्कार 2013 मध्ये त्यांना मिळालेला आहे.
सामाजिक कार्याला मिळालेले आध्यात्मिक अधिष्ठान
सामाजिक कार्याबरोबरच लताताईंच्या विचार चिंतनाला मिळालेले अध्यात्माचे कोंदण ही एक लोभस व दुर्मीळ जोड आहे. अध्यात्मभाव हा लताताईंचा सहज स्वाभाविक भाव आहे. लताताईंनी अध्यात्म क्षेत्रात स्वामी माधवनाथ यांच्याकडून अनुग्रह घेतलेला होता. निंबाळचे गुरुदेव रानडे यांनाही त्या गुरुस्थानी मानत. ज्येष्ठ कार्यकर्त्या व अध्यात्मिक साधक विमलाजी ठकार यांच्या तीन शिबिरांमध्ये लताताई सहभागी झाल्या होत्या. 1987मध्ये झालेली प्रथम भेट व त्यानंतर विमलाजी ठकार यांच्या सोबतचा लताताईंचा ऋणानुबंध हा त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे 2011पर्यंत कायम होता. ‘माणूस घडणं म्हणजे काय? याचे मूर्तिमंत रूप म्हणजे स्वर्णलताताई. सामाजिक कार्याचा जोडीने आध्यात्म जगणे हाही एक पुरुषार्थ आहे.’ हे विमलाजी यांचे लताताईंबद्दलचे उद्गार हेही विलक्षण नेमके व बोलके आहेत. 2007 मध्ये मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूर येथे मौनात राहून वर्षभर केलेली एकांतसाधना हे लताताईंचे आणखी एक वेगळेपण होते.
आपल्या आवडीच्या अध्यात्म व मानसशास्त्र या विषयांचे सखोल अध्ययन व चिंतन लताताईंपाशी होते. यात प्राप्त केलेल्या अधिकारवाणीमुळे 1991 मध्ये अमेरिका व कॅनडा येथील 11 प्रमुख शहरात या दोन्ही विषयांवर त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने व प्रवचने झाली होती. 2009 मध्येही अशाच प्रकारचा परदेश दौरा झाला होता.
ओघवत्या लेखनशैली बरोबरच ओजस्वी रसाळ वाणीचे व प्रसन्नतेचे वरदान लताताईंना लाभले होते. शब्दबंबाळ व पांडित्यपूर्ण मांडणी टाळून जिव्हाळ्याच्या पण प्रेमळ व निग्रही भाषेतील मांडणी अनेकांना भावणारी असे. खरे तर त्यांची शब्दामागची अनुभूतीची जीवनतपश्चर्या, अधिकार हाच अधिक प्रभाव निर्माण करणारा असे. पुण्यातील रामकृष्ण मठात सलगपणे गेली काही वर्षे उपनिषदांवरची व्याख्यानमाला त्यांनी गुंफली आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी व पतंजली योगसूत्रे यावर अनेक ठिकाणी नियमितपणे प्रवचने व व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. अनेक वर्षे सोलापूर ज्ञान प्रबोधिनीत त्या दर रविवारी होणार्या सत्संगात मांडणी करत असत. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना अध्यात्माचा पाया असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्या अध्यापकांच्या, कार्यकर्त्यांच्या विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी), अरविंद आश्रम (पुदुच्चेरी व नैनिताल) येथे अभ्यासभेटी/शिबिरे योजत असत. यामुळेच अगदी त्यांच्या स्वयंपाकाच्या शांतामावशी यांनाही कन्याकुमारी बघता आले. अनेक दौर्यात लताताई स्वतःही सहभागी होत असत.
लौकिक अर्थाने त्यांनी स्वतःच्या प्रपंचाची चूल मांडली नाही. पण त्या जिथे गेल्या तिथे ज्ञान प्रबोधिनीचे मोठे स्नेह परिवार उभे राहिले. कुटुंबप्रमुखासारखे त्यांनी प्रबोधिनी कुटुंब सांभाळले. त्यांच्या ऋजु व्यक्तिमत्त्वाने, आत्मीयतेने साधलेल्या संवादाने व साध्या आचरणाने प्रभावित होऊन फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर विदेशातील मराठी मंडळीही या मराठवाड्यातील आडवळण्या ‘हराळी’ गावात त्यांना भेटण्यासाठी, परिसरातील प्रबोधिनीचे काम समजावून घेण्यासाठी नियमितपणे येत असत. भेटायला येणार्या व्यक्तीबरोबरचा मग ती व्यक्ती किती का साधी असेना होणारा जिव्हाळ्याचा प्रेमळ संवाद मनात साठवून ती व्यक्ती तृप्ततेने परतत असे. सहज भावाने होणारा अकृत्रिम स्नेह-संवाद व वाट्याला आलेले विलक्षण अगत्य अनुभवून ती व्यक्ती लताताईंशी, प्रबोधिनी परिवाराशी जोडली जात असे. असे अनन्यसाधारण व प्रबोधिनीचे भावमयकोश समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व अनुकरणासाठी मोठा वारसा पुढील पिढ्यांसाठी मागे ठेवून काळाच्या पडद्याआड गेले आहे.