@डॉ. प्रशांत म्हसे 9011411066
आपल्या देशात शेतीस जोडव्यवसाय म्हणून पशुपालन व कुक्कुटपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पशुपालन या वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी या दोघांच्या समन्वयातून दुग्धव्यवसाय व पशुपालन क्षेत्रात क्रांती घडण्यास मदत होणार आहे.
शेतकर्यांसाठी पशुपालन हा आता केवळ जोडधंदा उरला नाही तर तो एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. राज्यातील अनेक शेतकरी हा व्यवसाय व्यावसायिक पद्धतीने करीत आहेत. पशुधनापासून दूध, अंडी, मांस, लोकर, सेंद्रिय खते व औषधी द्रव्ये या बाबी मिळतात. यामुळे शेतकरी व पशुपालकांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मदत होते. सध्या उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने दुग्धव्यवसाय किंवा पशुपालन व्यवसायात बर्याच समस्या येत आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-एआय) मोठा आधार मिळाला आहे. या तंत्रज्ञानामुळे गायी, म्हैशी, शेळी, मेंढी आदी पशूंच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यास मदत झाली. याशिवाय पशुपालन, दूध उत्पादकता, आहार यासह व्यवस्थापनाच्या विविध बाबी सहज हाताळता येतील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा पशुपालन व्यवस्थापनात वापर करण्यासाठी संवेदक (पशुपालनाची माहिती विकसित करण्यात आलेले यंत्र - सेन्सर), संकलन (स्टोरेज) व पृथक्करण (प्रोसेसिंग) या तीन मुख्य प्रणालीचा वापर केला जात आहे. संवेदक प्रणालीत डिजिटल संवेदक, डिजिटल कॅमेर्याद्वारे माहितीसंग्रह करून पुढे पृथक्करणासाठी पाठविले जाते. संवेदक प्रणालीत संकलित झालेली माहिती संगणकात समाविष्ट केली जाते.
भारतामध्ये पशुपालनात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान पुढे नेण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (डीएसटी आयआयटी मुंबई आणि आयआयटी खरगपूर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय), कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणाली (एनएआरईएस) या संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
आरोग्य व आहाराची काळजी (हेल्थ सेन्सर)
सेन्सर्सद्वारे पशूचे सुरुवातीचे आजार शोधण्यास मदत होते. उदा. डिजिटल मनगटी घड्याळ जसे आपल्या शरीरातील हृदयाची गती व तापमान मोजते, त्याप्रमाणे पशूच्या शरीरावर डिजिटल उपकरण लावून त्यांच्या हृदयाची गती, तापमान आणि हालचालीची पातळी यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष ठेवण्यास मदत होते. त्यामुळे पशूंच्या आजारांचे निदान जलद होण्यास मदत होते. जसे की, स्तनदाह होण्यापूर्वी म्हणजे प्राथमिक अवस्थेत असताना उपचार करून पुढील होणारे नुकसान व खर्च टाळता येतो. विशेष म्हणजे पशूंना संतुलित आहाराचे अचूक प्रमाण आणि पोषणमूल्ये ठरवून दूध व मांसाचे उत्पादन वाढवता येण्यासाठी ही प्रणाली काम करते.
या तंत्रामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते, वेळीच निदान आणि उपचार करता येतात आणि रोगनियंत्रण होते व संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी होते.
पर्यावरणीय देखरेख
हे तंत्रज्ञान केवळ जनावरांचे आरोग्य सुधारत नाही तर उत्पादकता व गोठ्याचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. पर्यावरणीय संवेदक (सेन्सर) पशूच्या निवार्यात (गोठ्यात) बसवून गोठ्यातील हवेची गुणवत्ता, आर्द्रता आणि तापमानाचा मागोवा घेता येतो आणि त्यातील बदलांनुसार वेळोवेळी कृत्रिमरित्या आवश्यक बदल करून भोवतालचे वातावरण पोषक करता येते. याखेरीज गोठ्यातील पाणी व उर्जेचा वापर योग्य प्रमाणात ठेवता येतो.
स्वयंचलित दूध काढणी यंत्र
आज शेतमजुरांची समस्या भेडसावत आहेत. त्याचा मोठा परिणाम शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने स्वयंचलित यंत्र (रोबोट) दूध काढू शकतात. दूधाच्या गुणवत्तेची परीक्षण करू शकतात आणि प्रत्येक गाय व म्हशीच्या दूधाच्या उत्पादनाची नोंदणी ठेवू शकतात. रोबोटिक्सचा वापर दूध काढण्याबरोबर गोठ्यांची स्वच्छता व चार्याच्या वितरणास होतो. यामुळे खर्चाची बचत वेळ आणि मजुरी वाचते.
प्रजनन व्यवस्थापन
या तंत्राद्वारे गायी व म्हशींतील प्रजनन व्यवस्थापन करता येते. गोठ्यातील बर्याच गायी व म्हशींचा गाईंचा माज कालावधी (माज येणे म्हणजे पशुला लैंगिक समागमाची इच्छा होणे. गायी आणि म्हशींमध्ये माज येण्याला ऋतुचक्र म्हटले जाते.) लक्षात येत नाही आणि वेळेवर जर कृत्रिम रेतन केले नाही तर गाय व म्हैस गाभण राहत नाहीत. त्यासाठी हे तंत्र पशूंचे प्रजनन वेळ शोधण्यास मदत करतात. गाय व म्हशीच्या शरीरावर सेन्सर कॅमेरे बसवले जातात. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवले जाते.
दिशादर्शक प्रणाली (जीपीएस)
जीपीएस ट्रॅकर्स (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) या दिशादर्शक प्रणालीद्वारे जनावरांचे स्थान आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. एखादे जनावर चोरीला गेले असेल तर त्याचा जीपीएसच्या मदतीने शोध घेता येणार आहे.
एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पशुपालनाचा विकास होणार असला तरी हे तंत्रज्ञान कसे वापरावे यासाठी शेतकरी, कृषी साहाय्यक व कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तरच या तंत्रज्ञानाचे फलित समोर येईल.
- सहलेखक डॉ. प्रशांत पवार, डॉ. उमा तुमलाम
लेखक व सहलेखक शिरवळ जि.सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.