भटके-विमुक्तांना सामाजिक सन्मान नवीन परिवर्तनाची नांदी

विवेक मराठी    03-Mar-2025
Total Views |
@राहुल चव्हाण 8149201214
rss 
संपूर्ण एकरस हिंदू समाज निर्माण करण्यासाठी सर्व स्तरांमधून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. मागील काही वर्षापासून विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून हे प्रयत्न होत आहे. समरसतापूर्ण व्यवहार हेच सर्व सामाजिक प्रश्नांचे उत्तर आहे. देशभरातील भटके-विमुक्त समाजातील 150 संतांना विशेष निमंत्रित म्हणून महाकुंभात बोलविण्यात आलं. या समाजातील लोकांनी महाकुंभात अमृतस्नान करून समरसतेच्या महाकुंभाचे दर्शन घडविले.
प्राचीन काळापासून समन्वय, सहकार्य व सहयोग या तत्त्वांवर आपला समाज मार्गक्रमण करीत आहे. प्रत्येक घटकाचे अस्तित्व लक्षात घेऊन त्याला आपला उत्कर्ष करण्याची संधी देणारा हा हिंदू धर्म. सहअस्तित्व हे या धर्माचे तत्त्व असल्यामुळे अनेक पंथ, उपासना पद्धती इथे विकसित होऊ शकल्या, परंतु इस्लामी आक्रमणानंतर ही परंपरा खंडित झाली. या सुलतानी आक्रमणामुळे अनेक समाजघटकांना भटकंती स्वीकारावी लागली. आपला देव, देश आणि धर्म टिकवण्यासाठी डोंगर-दर्‍यांचा आश्रय घ्यावा लागला. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने शिकार, चोरी करावी लागली. धर्म टिकवण्यासाठी गावागावांत घराघरांत जाऊन देवीचे जागरण, गोंधळ करून भिक्षा मागणारा हा भटके-विमुक्त समाज मुख्य प्रवाहापासून मात्र लांब गेला. पुढे इंग्रज आले त्यांनी या समाजाला जन्मजात गुन्हेगार ठरविले.
 
 
या समाजाला प्रेमाने, आपुलकीने जवळ घेण्याची नितांत आवश्यकता आहे. या समाजाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज होती. सामाजिक सन्मान या समाजाची भूक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे होते. मागील अनेक वर्षापासून यासाठी अनेक संस्था, संघटना प्रयत्न करीत आहे. भटके-विमुक्त विकास परिषद, समरसता गुरुकुलम्, भटके-विमुक्त कल्याणकारी परिषद, भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान, गोंधळी भटके विमुक्त जाती-जमाती विकास संघ, घुमंतु अर्धघुमंतु विकास परिषदेसारख्या संघटना या समाजाचे उत्थान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या समाजावर होणार्‍या अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये सर्व संघटना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतात. परभणी येथील सिकलकरी समाजाच्या अल्पवयीन मुलावर झालेला जीवघेणा हल्ला असो किंवा परभणी येथील वैदू समाजाच्या अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचे प्रकरण असो, हिंगोली येथे गोसावी समाजाच्या महिलेवर झालेला हल्ला असो या सर्व घटनांमध्ये संपूर्ण हिंदू समाज या पीडित कुटुंबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. वरील सर्व घटनांमुळे भटके-विमुक्त समाजघटकांच्या मनामध्ये मुख्यधारेतील समाजाबद्दल एक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटके-विमुक्त समाजाची शासकीय कागदपत्रे ही एक मोठी समस्या आहे, राजे उमाजी नाईक शासकीय कागदपत्र वाटप अभियान महाराष्ट्र शासनाने राबवून या समाजाप्रती संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे.
rss 
मुख्यधारेतील समाजाच्या मनामध्ये भटके-विमुक्त समाजघटकाबद्दल आपुलकीची भावना नाही, ही मूळ समस्या आहे. समाजात भेद नाही पण दरी मात्र आहे. पद्मश्री स्व. प्रभाकर मांडे म्हणतात - हिंदू समाजाच्या मनामध्ये भटके-विमुक्त समाजाप्रती विश्वास व आपलेपणाची भावना निर्माण करणे हे मुख्य आपले काम आहे या दृष्टीने प्रयत्नांची आवश्यकता आहे. वरील सर्व समस्यांचे उत्तर म्हणजे आपला समरसतायुक्त व्यवहार हेच आहे. समरसता किंवा समता ही केवळ भाषणे, लेख, पुस्तक लिहिण्यापुरती गोष्ट नसून, ही व्यवहाराची गोष्ट आहे. जेव्हापर्यंत आपल्या व्यवहारामध्ये, कृतीमध्ये समरसता दिसून येणार नाही तेव्हापर्यंत एकरस समाज निर्माण होणार नाही.
 
रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम
 
अयोध्या येथे 22 जानेवारी 2024ला रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली. या पवित्र सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी उद्योगजगत, सिनेमासृष्टी, खेळजगत व राजकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना राममंदिर ट्रस्टकडून निमंत्रण देण्यात आले होते. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशभरातून हजारो साधुसंत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले होते. आपण राममंदिर ट्रस्टचे अभिनंदन केले पाहिजे ते यासाठी की, प्राचीन काळापासून देव, देश आणि धर्म टिकविण्यासाठी, धर्माचे जागरण व प्रबोधन करण्यासाठी आपले जीवन खर्ची घालणार्‍या भटके-विमुक्त समाजाचे स्मरण ठेवून या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रित केले गेले. देशभरामधून भटके-विमुक्त समाजप्रमुख, सामाजिक नेतृत्व त्यांना सन्मानपूर्वक अयोध्या येथे बोलाविले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या 11 कुटुंबांना मुख्य पूजेचा मान मिळाला, त्यामध्ये तुळजापूर येथील कैकाडी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते महादेवराव गायकवाड हेसुद्धा होते. या सोहळ्यामध्ये मिळालेली सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक या सर्वांमुळे संपूर्ण भटके-विमुक्त समाज आनंदाने भावविभोर झाला आहे. अवघा हिंदू बंधू बंधू..... हा राम मंदिर ट्रस्टकडून संपूर्ण हिंदू समाजाला दिलेल्या संदेश होता.
ही मालिका इथेच थांबली नाही. मानवत येथे प.पू. गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या भागवतकथेचे आयोजन केले होते. कथा आयोजन समितीने भटके-विमुक्त समाजाचे स्मरण ठेवून नाथजोगी समाजाचे बाबाराव साळुंखे व गिरीगोसावी नंदूजी गिरी या कुटुंबांना आरतीचा सन्मान दिला. मानवतमधील इतिहासामध्ये प्रथमच भटके-विमुक्त समाज या प्रकारच्या आयोजनामध्ये सहभागी झाले होते. लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे गणेश उत्सवाची परंपरा सुरू केली. पुढे जाऊन या परंपरेने भव्य रूप धारण केले. आजसुद्धा पुण्यामध्ये मानाचा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे यावर्षी प्रथमच भटके-विमुक्त समाजाला या गणपती मंडळाने आरती करण्यासाठी सन्मानपूर्वक निमंत्रण दिले. बंजारा समाजाचे संतोषजी राठोड, सिकलकरी समाजाचे चांदसिंग कल्याणी सहकुटुंब आरतीमध्ये सहभागी झाले होते. ज्या डोंबारी समाजाने इतके वर्ष अपमान व अन्याय सहन केला या समाजाला जेव्हा मानाच्या गणपतीची आरती करण्याची संधी मिळाली, तेव्हा समाजप्रमुख विलासजी जाधव हे आपले आनंदाश्रू रोखू शकले नाही.
उपराष्ट्रपती भवनाचे निमंत्रण
भटके-विमुक्त समाजाला सामाजिक सन्मान देण्याचे प्रयत्न सर्वच क्षेत्रांमधून होण्याची आवश्यकता आहे. दिल्ली शहरात अनेक भटके-विमुक्त जातीचे लोक राहतात. हा संपूर्ण समाज अतिशय हलाखीचे जीवन जगतो. लोकसभा, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन हे फक्त या समाजाने दूरचित्रवाणी किंवा वर्तमानपत्रांमध्ये पाहिलेली असतात. दिल्लीमधील कार्यकर्त्यांनी या समाजाला ही भवने दाखवण्याचा मानस व्यक्त केला व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हा प्रस्ताव मोठ्या आनंदाने स्वीकारला, एवढेच नाही तर या समाजाला आपल्या उपराष्ट्रपती भवनामध्ये सहभोजनाचे निमंत्रण दिले. दिल्ली शहरातील विविध भटके-विमुक्त जातीमधील 50 नेते उपराष्ट्रपती भवन येथे पोहोचले. जगदीप धनखड यांनी त्यांचे स्वागत केले. प्रत्येकाजवळ जाऊन त्यांचा व्यक्तिगत परिचय करून घेतला. त्यांच्या पंगतीमध्ये बसून सहभोजन घेतले. या प्रकारची वागणूक प्रथमच भटके-विमुक्त समाजाला मिळाली होती. सर्वांच्या आनंदाचा ठावठिकाणा नव्हता. उपराष्ट्रपती भवनामध्ये या प्रकारचा सन्मान आपल्याला मिळेल याची कल्पना या समाजाने स्वप्नात सुद्धा केली नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपराष्ट्रपती महोदयांनी ज्या आत्मीयतेने, प्रेमाने, आपुलकीने या सर्व समाजघटकांना जवळ घेतले ती गोष्ट आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रयागराज कुंभासाठी उत्तर प्रदेश सरकारचे निमंत्रण
144 वर्षानंतर येणारा महाकुंभ 2025मध्ये प्रयागराज येथे सुरू झाला. केवळ पंचांगामध्ये लिहिलेली एक ओळ पाहून कोट्यवधी लोक आध्यात्मिक साधनेसाठी एकत्र येतात व अमृतस्नान करतात, सत्संग करतात, हे जगाला पडलेले एक कोडेच आहे. हे कुंभ आध्यात्मिक पर्व आहे, आर्थिक पर्व आहे, त्याचप्रमाणे हा सामाजिक समरसतेचा मंत्र देणारा कुंभसुद्धा आहे. प्रयागराज महाकुंभ आयोजन समिती व उत्तर प्रदेश सरकारने अनुसूचित जाती-जमाती व भटके-विमुक्त समाजातील संत, भागवतकार, महाराज यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले. इतिहासामध्ये प्रथमच भटके-विमुक्त समाजाच्या संतांना या प्रकारे कुंभामध्ये विशेष निमंत्रण देऊन बोलावले होते. त्यामध्ये महाराष्ट्रामधील गोसावी समाजाचे भगत रोशन मकवान महाराज, धनगर समाजाचे गुरू पू.फरांदे महाराज, बंजारा समाजाचे संत पूज्य गोरक्षनाथ महाराज, योगेश्वर पुरी महाराज, सरोदी समाजाचे समाधान महाराज गुरालकर इत्यादी व देशभरातील भटके-विमुक्त समाजातील 150 संतांना विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात आले. दि. 26 जानेवारीला या सर्व साधुसंतांनी अमृतस्नान केले. या अभूतपूर्व सन्मानामुळे संपूर्ण भटके-विमुक्त समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे संत सभामध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य व संघाचे अ. भा. कार्यकारणी सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते या सर्व साधुसंतांचा यथोचित सन्मान केला गेला. केशव प्रसाद मौर्य यांनी भटके-विमुक्त समाजाची गौरवशाली परंपरा मांडली तर भय्याजी जोशी यांनी प्रत्येक कुंभात याप्रमाणे भटके-विमुक्त समाजातील संत, साधू, महाराज यांना विशेष निमंत्रित करण्याची योजना आखावी असे आवाहन केले. समरसतापूर्ण व्यवहार हेच सर्व सामाजिक प्रश्नांचे उत्तर आहे असा भाव त्यांनी व्यक्त केला.
भटके-विमुक्त समाजाचे अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार व शासकीय कागदपत्र न मिळणे इत्यादी समस्या आहेत, तसेच या समाजाला सामाजिक सन्मान न मिळणे ही सुद्धा एक समस्याच आहे. भटके-विमुक्त समाजाप्रति समरसतापूर्ण व्यवहार व सामाजिक सन्मान ही काळाची आवश्यकता आहे. संपूर्ण एकरस हिंदू समाज निर्माण करण्यासाठी सर्व स्तरांमधून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. मागील काही वर्षापासून विविध संघटना, संस्थाद्वारा होणारे प्रयत्न, कार्यक्रम बघता आता खर्‍या अर्थाने भटके-विमुक्त समाजाचा विकासाचा व सामाजिक सन्मानाचा मार्ग मोकळा झाला असे दिसते. या प्रकारचे प्रयत्न संपूर्ण हिंदू समाजाने करावेत हीच रा.स्व.संघाची भूमिका आहे. संपूर्ण भटके-विमुक्त समाजघटकाला हिंदू समाज जेव्हा प्रेमाने, आपुलकीने जवळ घेईल तेव्हाच भारताचे विश्वगुरू बनण्याचे स्वप्न साकार होईल. सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना.... या गीताप्रमाणे आपला व्यवहार होणे आवश्यक आहे.
लेखक भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रांतचे
प्रमुख आहेत.