Jayanti Kathale, the owner of PurnaBramha
मराठी अन्नाला जगभरात आकर्षक पद्धतीने सादर करण्याचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलंय जयंती कठाळे यांनी. त्यासाठी त्यांनी अस्सल महाराष्ट्रीय जेवण-खाण उपलब्ध करून देणारं पूर्णब्रह्म’ रेस्तराँही सुरू केलंय. ‘पूर्णब्रह्म’च्या 5000 शाखा सुरू करून केवळ व्यवसाय वाढवणं हे त्यांचं उद्दिष्ट नसून, मराठी अन्नसंस्कृती जागतिक पातळीवर पोहोचवून तिचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत टिकवणे हे आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात. त्या भागवण्यासाठी तो मेहनत करतो, असं म्हटल्यास चूक ठरू नये. यांपैकी पहिली गरज, अर्थात ‘अन्न’ ही फक्त शारीरिक गरज न रहाता, मानसिक आणि सामाजिक गरज बनते... जेव्हा माणूस आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर असतो तेव्हा. मग शोध सुरू होतो सरावाच्या अन्नाचा... ज्यावर आपला पिंड पोसला गेलाय ते कुठे मिळेल? जर सवयीचं, सात्विक अन्न मिळत नसेल, तर ते कसं उपलब्ध करून देता येईल? हे प्रश्न अनेकांना पडतात, पण त्यावर उत्तर म्हणून, आपल्या राज्याचं जेवण-खाण उपलब्ध करून देणारं रेस्तराँ उभ करणारी व्यक्ती लाखांत एखादीच असते. महाराष्ट्राबाहेर राहून, जगभर मराठी अन्नाला आकर्षक पद्धतीने सादर करण्याचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहणार्या ‘जयंती कठाळे’ याही लाखांत एखाद्याच आहेत.
पेशाने अभियंता आणि ‘इन्फोसीस’सारख्या कंपनीत ड्रीम जॉब करत असताना, मराठी पदार्थ देणारं रेस्तराँ सुरू करण्यासाठी हातातली नोकरी सोडण्याचा वेडेपणा कोण करू शकतं? पण हा वेडेपणा केला, बंगलोरमध्ये रहाणार्या जयंती कठाळे यांनी. त्या मूळच्या नागपूरच्या. नोकरीसाठी बंगलोरमध्ये येऊन स्थायिक झालेल्या जयंती कठाळे ‘इन्फोसीस’सारख्या नामवंत कंपनीत नोकरी करीत होत्या. आयटी क्षेत्रात काम करत असल्याने देशविदेशांत फिरणं होत होतं. अशा प्रवासादरम्यान, परदेशात दाक्षिणात्य खाणं मिळतं; पण महाराष्ट्रीय पदार्थ मिळत नाही ही खंत त्यांना होतीच. ऑस्ट्रेलियातून भारतात येत असताना, विमानात शाकाहारी पदार्थ न मिळाल्याने, निव्वळ ब्रेड बटर खाऊन त्यांना सत्तावीस तास प्रवास करावा लागला होता. यावेळी त्यांचं तीन महिन्यांचं बाळ त्यांच्यासोबत होतं. या प्रवासादरम्यान त्यांची खूप आबाळ झाली. त्यावेळी महाराष्ट्रीय खाणं जगाच्या पटलावर नेण्याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. मराठी जेवण-खाण म्हणजे निव्वळ ‘वडापाव’ आणि ‘पिठलं-भाकरी’ एवढंच नसून त्यापुढेही बरंच आहे जे ’सोलफूड‘ म्हणजेच आत्म्याला सुखावणारं आहे. हीच गोष्ट जागतिक पटलावर नेण्याचं स्वप्न जयंती कठाळे या स्वयंसिद्धेने पाहिलं आणि "empowerment of ladies, empowerment of kitchen on business platform' हा उद्देश मनाशी बाळगून, 2012 साली ‘मनस्विनी फूडस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या ब्रँडखाली ‘पूर्णब्रह्म’ची स्थापना केली.

महाराष्ट्रीय पदार्थ उत्तम आहेत, सात्विक आहेत, समाधान देणारे आहेत, मग जागतिक पटलावर मागे का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, त्यांचं मार्केटिंग होत नाही आणि त्याबद्दल बोललं जात नाही. जर माझ्या पदार्थांना लोकांसमोर आणायचं असेल, तर लहानसं का होईना, एक रेस्तराँ सुरू करायचं ही जिद्द मनाशी बाळगताना जयंतीताईंनी पाहिलं वाक्यं लिहिलं होतं, मला पाच हजार सेंटर्सची चेन सुरू करायची आहे; जिथे महाराष्ट्रीय पदार्थच मिळतील. लहानपणापासून ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असंच कानावर पडत असल्याने, कुठलाही विचार न करता आपल्या महाराष्ट्रीय रेस्तराँचं नाव ‘पूर्णब्रह्म’ ठेवायचं हे मनाशी पक्के करून जयंतीताईंनी ’पूर्णब्रह्म’साठी लहान पावलं उचलायला सुरुवात केली. सोशल मीडियाचा योग्य उपयोग करून मोदक, चकल्या, दिवाळीचा फराळ विकणे अशा गोष्टी त्यांनी सुरू केल्या. यात जम बसल्यावर त्यांनी आपल्या कुटुंबासमोर ‘पूर्णब्रह्म’ रेस्तराँ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ‘पूर्णब्रह्म’ची निर्मिती करताना सर्वप्रथम आर्थिक नियोजन केले. त्यांच्याच शब्दांत सांगायच झाल्यास, “आज म्हंटलं व्यवसाय सुरू करते, नि उद्या सुरू केला असं होत नाही. म्हणूनच नोकरीत असतानाच मी ‘पूर्णब्रह्म’ची वेबसाईट बनवली होती. नावाच्या ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून ठेवलं होतं.” व्यवसायाला लागणार आर्थिक पाठबळ त्यांनी आपल्या कुटुंबातूनच उभं केलं होतं. घरातल्या सदस्यांचा भक्कम पाठिंबा असल्याने त्यांना या आव्हानात्मक आणि पुरुषी वरचष्मा असलेल्या क्षेत्रात जम बसवता आला. जयंतीताई सांगतात की, त्या एका मोठ्या कुटुंबात लहानाच्या मोठ्या झाल्याने, आई-आजी यांना उत्तम स्वयंपाक करताना पाहिलंय आणि त्यासाठीचे नियोजन करण्याचं बाळकडू घरातूनच मिळाल्याने ‘पूर्णब्रह्म’च्या उभारणीत त्याचा खूप फायदा झाला. उत्तम स्वयंपाक करण्याच्या आवडीला त्यांनी व्यवसाय म्हणून पाहिलं आणि मराठी भोजनाला ‘ब्रँड’ म्हणून उभं करण्याचं चॅलेंज स्वीकारलं. एक स्त्री म्हणून या व्यवसायात तुम्हाला त्रास झाला का? या प्रश्नावर जयंतीताई म्हणतात, “अर्थातच एक स्त्री म्हणून या पुरुषप्रधान व्यवसायात भक्कम पाय रोवून उभं रहाताना भरपूर अडचणी आल्या आणि त्यातूनच मी शिकत गेले. या क्षेत्राची स्वतःची अशी आव्हानं होतीच; पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सुरुवातीला अनेकांनी स्त्री म्हणून मला गंभीरपणे बघितलंच नाही. व्यवसायातले काही भागीदार, पुरवठादार पुरुषप्रधान मानसिकतेचे असल्याने, व्यवसायाचे निर्णय घेताना अनेकदा त्रास झाला. अडचणीही आल्या; पण त्यावेळेनुसार योग्य ते निर्णय घेऊन स्वतःला आणि कार्यक्षमतेला सिद्ध करता आलं. यामुळेच आज इतक्या वर्षांनंतर मी निव्वळ एक स्त्री नसून, या व्यवसायातली अनुभवी व्यक्ती म्हणून माझ्याकडे आदराने पाहिलं जातं.”
म्हंटलं तर कठीण अशा या व्यवसायात, 'you have to think practically, not emotionally' हे तत्त्व जयंतीताईंनी कसोशीने पाळलंय. लहानश्या 450 स्क्वेअर्स फुटांतून 5700 स्क्वेअर्स फुटांच्या आलिशान रेस्तराँपर्यंत केलेला प्रवास या तत्त्वाचं फळ म्हणायला हरकत नाही. कोणताही निर्णय घेताना दीर्घकालीन विचार करायला हवा. ‘स्वतःच्या चुकांतून खूप शिकायला मिळालं’ असं जयंतीताई सांगतात. “सुरुवातीला काही निर्णय घाईघाईत घेतले गेले, जे नंतर जड गेले. काही ठिकाणी योग्य टीम नसताना शाखा उघडण्याचा निर्णय घेतला; ज्यामुळे काही अडचणी आल्या. यातून शिकायला मिळालं की कोणताही निर्णय घेताना दीर्घकालीन विचार करायला हवा. योग्य लोकांसोबत काम करणं आणि प्रत्येक टप्प्यावर नीट नियोजन करणं गरजेचं आहे”, जयंती सांगत होत्या.
आज जयंती कठाळे म्हटलं की, त्यांनी मेहनतीने उभा केलेला ‘पूर्णब्रह्म’ ब्रँड आणि त्यांची कायम नऊवारी साडीतली ठसकेदार छबी समोर येते. ‘नऊवारी साडी नेसून काय स्वयंपाक करणार?’ असा प्रश्न विचारून खिल्ली उडवणार्यांना त्यांचं उत्तर आहे, “आपल्या आज्या-पणज्या याच साडीत असायच्या आणि ‘अन्नपूर्णा’ बनून आपल्याला ’पूर्णब्रह्म’ ताटात वाढायच्या. त्यांची साडी तुम्हांला खटकली नाहीतर माझी का खटकावी?” या उत्तरासाठी सोशल मीडियावर त्यांना यासाठी भरपूर ट्रोल करण्यात आलं; पण या ट्रोलिंगला शांतपणे उत्तर देण्याचं किंवा दुर्लक्ष करण्याचं काम त्यांनी केल्याने आज, नऊवारी साडी ही त्यांची ओळख बनली आहे. “जेव्हा मी माझ्या स्टाफला नऊवारी साडी आणि धोतर नेसायला सांगते, तेव्हा, मीही त्याचप्रकारे कपडे घालायला हवे म्हणून मी पूर्णवेळ नऊवारीत असते. मी नऊवारीत स्वयंपाक करते, रेस्तराँ ंसांभाळते, गाडी चालवते, शॉपिंग करते. आज मॉलमध्ये गेलं की, याच साडीमुळे मला लोकं ओळखतात. सोशल मीडियावर काही ट्रोल्सनी जेवणाच्या दरांवर, कधी मराठी जेवणाच्या वैशिष्ट्यांवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘पूर्णब्रह्म’मध्ये येणार्या ग्राहकांना मराठी पदार्थ मिळतात, मात्र ते आई किंवा आजीच्या हातच्या चवीचे असू शकत नाही. कारण ती चव फक्त स्वतःच्या घरातच मिळते. ग्राहकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि मिळवलेला विश्वास याच्या जोरावर, ‘पूर्णब्रह्म’ने सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला शांतपणे हाताळलंय. दुसर्याची रेघ पुसून लहान करण्यापेक्षा, माझी रेघ मेहनतीने मोठी करण्यावर माझा भर असतो”, या विधानातून जयंतीताईंचा कणखरपणा सहज जाणवतो.
आज ‘पूर्णब्रह्म’मध्ये, अगदी पाच महिन्यांच्या तान्ह्या बाळापासून ते नव्वदीच्या ग्राहकांसाठी वेगवेगळे मेन्यू उपलब्ध आहेत. जयंतीताई सांगतात, “लहानपणी आम्ही ताट रिकामं केलं की, आम्हाला एक रुपया दिला जायचा, अजूनही घरी दिला जातो. मात्र, ताटात काहीही टाकलं, की भांडी घासावी लागायची. याच धर्तीवर, ‘पूर्णब्रह्म’मध्ये जेवायला येणार्या ग्राहकांच्या बालगोपाळांनी आपलं खाणं पूर्ण संपवलं तर त्यांना ‘फार्मर फ्रेंड’ म्हणून स्टार्स दिले जातात आणि मोठ्यांना बिलात सूट दिली जाते. मात्र, अन्न टाकल्यास काही रक्कम घेतली जाते. यामागचा हेतू हाच, की अन्नपूर्णेचा आणि अन्नाचा मान राखला जावा. ‘पूर्णब्रह्म’ची घडी बसवताना अनेक आठवणींची साठवण आमच्याकडे झालीय. आवर्जून सांगायचं म्हणजे, एका ग्राहकाने आमच्या पिठल्याबद्दल खास फीडबॅक दिला होता की, त्याला त्याच्या आजीच्या हाताच्या पिठल्याची चव आठवली. आमच्यासाठी हे अत्यंत आनंदाचे क्षण असतात.”
गेल्या बारा वर्षांत मराठी पदार्थ देणारं सर्वात मोठं रेस्तराँ म्हणून ‘पूर्णब्रह्म’ नावारूपाला आलंय. शून्यातून सुरू केलेल्या या प्रवासात, जयंतीताईंनी अनेक अन्नपूर्णांना आपल्यासोबत घेतलंय. ‘पूर्णब्रह्म’च्या स्टाफमध्ये सत्तर टक्क्यांहून जास्त महिला काम करतात. ‘पूर्णब्रह्म’ची शाखा उघडतानाही महिलांचा सहभाग अत्यावश्यक असतो. ‘जी अन्नपूर्णा संपूर्ण कुटुंबाचं उदरभरण करते, तिला अर्थार्जन करायला देण्याची’ ही योजना कौतुकास्पदच आहे. पुढील काही वर्षांत, ‘पूर्णब्रह्म’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संकल्प जयंतीताईंनी केलाय. कझाकिस्तान, दुबई, पर्थनंतर अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीत शाखा सुरू करायचा मानस आहे. “माझं ध्येय फक्त व्यवसाय वाढवायचं नसून, मराठी अन्नसंस्कृती जागतिक पातळीवर पोहोचवून तिचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत टिकवायचा आहे”, जयंती कठाळे अभिमानाने सांगतात.
‘पूर्णब्रह्म’च्या 5000 शाखा सुरू करण्याचं ध्येय बाळगणार्या जयंती कठाळेंना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय, ज्यात पू. सरसंघसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरात झालेला सन्मान, ‘झी मराठी’चा सन्मान यांचा समावेश आहे. मराठी माणूस, त्यातून ही एक स्त्री खंबीरपणे या व्यवसायात घट्ट पाय रोवून उभी आहे. कुठेही आपल्या स्त्रीत्वाचा बाऊ न करता येणार्या प्रत्येक संकटाला, संधीला हसून, ठसक्यात जयहिंद, नमस्कार म्हणणार्या या अन्नपूर्णेला आणि तिच्या ‘पूर्णब्रह्म’ला शुभेच्छा!