@मोहन भिडे 9421141941
‘सा. विवेक’चे रत्नागिरी येथील हितचिंतक मोहन भिडे यांनी स्वयंप्रेरणेने आतापर्यंत ‘राष्ट्रोत्थान’ या ग्रंथाच्या निमित्ताने 380 महिलांना वर्गणीदार केले आहे. त्यासंबंधी त्यांचे मनोगत.
मी मोहन माधव भिडे. रत्नागिरीत राहतो. वाणिज्य शाखेतील पदवीधर असून बँकेतून निवृत्त झालो आहे. संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित असून सध्या माझ्याकडे ‘धर्म जागरण समन्वय जिल्हा संयोजक द. रत्नागिरी’ अशी जबाबदारी आहे.
‘सा.विवेक’चा मी गेली अनेक वर्षे वाचक आहे. समाजजीवनातील विविध विषयांचे, घटनांचे देशहित आणि समाजहिताच्यादृष्टीने सांगोपांग, सखोल विश्लेषण-विवेचन करणार्या ‘सा.विवेक’चे गावोगाव वाडी-वस्तीपर्यंत वाचक असावेत अशी सर्वच स्वयंसेवकांची धारणा असते. तशी ती माझीही आहे.
रा.स्व.संघाच्या शंभर वर्षांच्या अखंड साधनेची मीमांसा करणारा आणि संघाने समोर ठेवलेल्या पंचसूत्रीचे विश्लेषण करणारा ‘राष्ट्रोत्थान’ हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. त्यासाठी केलेले आवाहन पत्रक वाचनात आले. तत्क्षणी हा ग्रंथ तसेच अंक अधिकाधिक कुटुंबांपर्यंत नेण्याचा दृढ संकल्प केला. अर्थात याचे श्रेय यासाठी कौशल्याने पण सतत पाठपुरावा-मार्गदर्शन करणारे ‘सा.विवेक’चे प्रवासी प्रतिनिधी राजेश गावडे यांचे. मी पूर्ण केलेल्या नोंदणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. या संकल्पपूर्तीसाठी मला संघाने दिलेलं दायित्व सांभाळून अध्यात्मातील ’जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत ’या वचनाप्रमाणे, ’जी जी भेटे व्यक्ती, ती ती ‘सा. विवेक’ची ‘वाचकशक्ती’ असं मानून, जे जे मला भेटले आणि ज्यांना ज्यांना मी भेटलो. त्याच्या त्यांच्यात मला ‘सा.विवेक’चा वाचक दिसला. त्यातून ’राष्ट्रोत्थान’ ग्रंथाकरिता संकल्पाप्रमाणे प्रकाशनपूर्व नोंदणी करता आली. हे काम चार टप्प्यांत केले.
प्रत्यक्ष भेट : प्रत्यक्ष भेटींची शंभरी पार केली. अनेक कुटुंबात राष्ट्रोत्थान आणि धर्मजागरण दोन्हींसाठी वेळ देता आला. त्या कुटुंबांच्या नातेवाइकांनाही आवाहन करता आले. बहुतेक सर्व कुटुंबांमध्ये उत्तम स्वागत झाले. ‘आपण जायचा अवकाश, स्वयंसेवकांची आणि संघाची समाज वाट पाहतो आहे. संघ सांगेल त्याचा स्वीकार करायला हिंदू बांधव तयार आहे’, हे माझ्या लक्षात आले. (अर्थात अपवाद असतातच; पण तेही आपल्याला शिकवितात.) आपापल्या रूचीप्रमाणे कुणालाही संघाचे काम सहज करता येईल हे कळले.
संदेश योजना : सुमारे सहाशे जणांना भ्रमणध्वनी संदेशाच्या माध्यमातून संपर्क केला. एक ग्रंथ नोंदणी आवाहन संदेश, एक ग्रंथ आवश्यकता संदेश, एक ग्रंथ महत्ता संदेश, एक आठवण, एक स्मरण संदेश अशी संदेशांची क्रमबद्ध मालिका करून स्वयंसेवक, संघहितैषी, संघानुकूल व्यक्ती, प्रबुद्ध नागरीक अशी वर्गवारी करून चार-चार दिवसांनी संदेश पाठवून नोंदणी केली.
संभाषण : स्वतःच्या भ्रमणध्वनी संचात जतन केलेल्या मित्र, नातेवाईक, परिचित प्रत्येकाला राष्ट्रोत्थान ग्रंथाबाबत संभाषणातून माहिती दिली.
नित्य संपर्कातील व्यक्ती : कुटुंबाच्या नित्य संपर्कातील व्यक्ती, जसे की वर्तमानपत्र विक्रेते, दूध आणून देणारे, किराणामाल दुकानदार, केशकर्तन करणारे, घरकाम करणार्या मदतनीस, पौरोहित्य करणारेेे, फळे आणि भाजीपाला विक्रेते, अधूनमधून ज्या भोजनगृहात आपण जातो तिथले आपल्याशी संबंधित, तसेच सोनार, शिक्षक, प्राध्यापक, ब्युटी पार्लर, छायाचित्रकार, सनदी लेखापाल, कायदा आणि कर सल्लागार, वैद्यकीय उपचार करणारे अशा सर्वांना माहिती सांगितली. मी बालपणापासून स्वयंसेवक आणि माझी पत्नी राष्ट्र सेविका समितीचे काम करते. माझ्या कौटुंबिक अनुभवातून असे ध्यानात आले की, स्त्रियांना जर या कामाचे मोल उमगले तर निसर्गतः पुरुषांपेक्षा स्त्रियांची उपजत दृष्टी सर्वंकष आणिक्षमताही सरस असते. त्या या विषयात अधिक उत्तम काम करू शकतात. तेव्हा या निमित्ताने ‘आदिशक्ती’चा योग्य उपयोग करून घेतला तर आपण उद्दिष्टाप्रत अधिक लवकर पोहोचू. तसेच कुटुंबातील माता-भगिनी, लेकी-सुना यांच्या नावाने नोंदणी केली तर त्यांचा सन्मान होतो. त्यांना हा हिंदूहिताचा, देशहिताचा विचार समजला तर तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो. त्यांना विचार पटला तर त्या स्वतः कुटुंबातील सर्व कर्तव्य जबाबदार्या पार पाडून समाजहिताचे काम प्रभावी करतात. म्हणून सर्वांना नीट आवाहन करून अधिक संख्येने महिलांची नोंदणी करण्याचा प्रयत्न केला.
महिला अजूनही स्वत:च्या क्षमतेबद्दल साशंक आहेत. काहींना संकोच वाटतो; पण तरीही आपल्याला सुनियोजित संपर्क ठेवता आला तर त्या कोणतेही सकारात्मक काम अगदी उत्तम करू शकतीत.