की घेतले व्रत न हे...

विवेक मराठी    06-Mar-2025   
Total Views |
vivek 
'ज्ञान प्रबोधिनी’ या संघटनेच्या माध्यमातून, तीन दशकाहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या डॉ. स्वर्णलता भिशीकर. मानसशास्त्रातली डॉक्टरेट मिळवणार्‍या लताताई ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात भरीव योगदान देत आहेत, त्या संवेदनशील कवयित्री-लेखिका आहेत आणि आध्यात्मिक विषयातला त्यांचा अधिकारही वादातीत आहे. एकाच व्यक्तीत झालेला हा त्रिवेणी संगम वाचकालाही प्रेरक ठरेल यात शंकाच नाही.
’देशाचं रूप पालटण्यासाठी वचनबद्ध’असणारी आणि त्याकरिता स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या प्रकाशात कार्यरत असणारी ’ज्ञान प्रबोधिनी’ ही संघटना. 1962 मध्ये पुण्यातल्या सदाशिव पेठेत कै.डॉ. वि.वि. उपाख्य आप्पा पेंडसे यांनी प्रबोध शाळेच्या रुपात तिचं बीज रोवलं, ते या समाजातल्या बुद्धिमान मुलांमुलींमधून समाजाभिमुख आणि समर्पित नेतृत्व उभं करण्यासाठी ! आज चाळीशी ओलांडलेल्या या ’प्रौढ’ संघटनेचा पुण्यात आणि पुण्याबाहेरही अनेक अंगांनी विस्तार झाला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात, एकसुरी पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्त्व आलेल्या काळातही, पठडीच्या बाहेरचे अनेक प्रयोग करणारी संघटना म्हणून ज्ञान प्रबोधिनीचं समाजात स्थान आहे.
 
 
चाकोरीबाहेरच्या या कार्यात कै. आप्पांना जशी मोजक्या समविचारी स्नेह्यांची साथ मिळाली, तशी शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं स्वप्न पाहणार्‍या युवक युवतींचीही साथ मिळाली. डॉ. स्वर्णलता भिशीकर उर्फ लताताई या त्यापैकीच एक. लताताईंचे वडील चं. प. भिशीकर, पुणे तरुण भारतचे संपादक अन् संघ परिवारातलं एक आदरणीय नाव. तर आई सौ. कुसुमताई या समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या. अशा घरात जन्म झाल्यानं समाजसेवेचं वेड त्यांना वारसाहक्कात मिळालेलं ! आईवडिलांबरोबरच मोठे काका नाना भिशीकरही संघाचे कार्यकर्ते अन् सावरकरप्रेमी. आणि आजोबा कै. परमानंद भिशीकर समर्थ सज्जनगड मंडळाचे कार्यकर्ते. त्यामुळे संघ परिवारातल्या ज्येष्ठ मंडळीइतकीच घरात सज्जनगडवासीयांचीही ऊठबस. वडिलांच्या फत्रकारितेमुळे वाचनवेडाचं बाळकडूही लहान वयातच मिळालेलं! अशा या पोषक वातावरणात बुद्धिमान अन् संवेदनशील लताताईंची घडण वेगळी न होती तरच नवल !
 
 
चं.प. भिशीकरांनी तथा बापूसाहेबांनी पुण्यात राष्ट्रीय विचारांचे अनेक लोक जोडले होते. प्रबोधिनीचे कै. आप्पा पेंडसे त्यापैकीच एक. त्या काळात ज्ञान प्रबोधिनीतर्फे मुलांसाठी ’प्रबोध शाळा’ आणि नववीपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी एक मंडळ चालत असे. या मंडळात लताताई नववीत असल्यापासून जाऊ लागल्या. विवेकानंदांच्या साहित्याचा अभ्यास करणं, परिसरातल्या झोपडवस्तीत जाऊन तिथल्या मुलांसाठी संस्कार वर्ग घेणं, असं या मंडळाच्या कामाचं स्वरूप होतं. तर येणार्‍या मुलींसाठी दर रविवारी अभ्यास वर्ग असत आणि विविध ठिकाणी अभ्यास सहलींचंही आयोजन करण्यात येई. शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता या मुलींनी देशस्थितीचा, इथल्या प्रश्नांचाही डोळसपणे अभ्यास करावा ही भूमिका त्यामागे होती.
या मंडळाची एक सदस्य या नात्यानं लताताई ज्ञान प्रबोधिनीच्या संपर्कात आल्या तरी त्यांच्या प्रत्यक्ष सामाजिक कार्याला सुरुवात झाली, महाविद्यालयातल्या पहिल्या वर्षी. 1967 साली-कोयना भूकंपाच्यावेळी. तेव्हा कोयनानगरच्या भूकंपक्षेत्रात प्रबोधिनीनं एक महिना मदत छावणी उभारली होती. सगळे कार्यकर्ते आपली दैनंदिन कामं बाजूला ठेवून गटागटाने तिथं जात होते. तर पुण्याच्या ससून रुग्णालयात भरती होणार्‍या रूग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी मुलींच्या मंडळावर सोपवण्यात आली होती. जमलेल्या निधीतून रूग्णांच्या जेवणखाणाची, औषधाची व्यवस्था करणं तसेच बोलायच्या स्थितीत असलेल्यांकडून नातेवाईकांचे पत्ते घेऊन त्यांची भेट घडवून आणणं असं कामाचं स्वरूप होतं. त्या अनुभवांविषयी बोलताना लताताई म्हणाल्या, ’लोकांच्या दु:खांशी इतक्या जवळून ओळख होण्याची ही पहिलीच वेळ होती. तेव्हा महाविद्यालयात जाणं बंद करून आम्ही ससूनमध्येच मुक्काम केला होता. ’
 
 
संघ परिवाराच्या माध्यमातून आईवडीलही समाजकार्यात असल्याने, लताताईंच्या या कामाला घरून विरोध होणं शक्यच नव्हतं. मात्र त्याच काळात तीन वेळा झालेल्या टायफॉईडमुळे नाजूक प्रकृती झालेल्या आपल्या लेकीनं इतकी दगदग करू नये, असं त्यांच्या आईला वाटे. या मुद्द्यावरून बरेचदा आईची बोलणी खावी लागत. कधी आपल्या मृदू बोलण्याने आईला कामाचं महत्त्व पटवून देत तर कधी आईच्या रागाकडे कानाडोळा करत लताताईचं काम चालूच होतं. मात्र इंटरनंतर केलेल्या शाखाबदलानं लताताईंनी आईची तीव्र नाराजी ओढवून घेतली.
 
 
त्याचं झालं असं की, मॅट्रीकची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्याने प्रथेनुसार लताताईंनीही फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. आपल्या तीक्ष्ण बुद्धीच्या या लेकीनं तिच्या आजोबांप्रमाणे (आईचे वडील) डॉक्टर व्हावं अशी त्यांच्या आईची तीव्र इच्छा होती. मात्र फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या लताताईंचा तिथल्या साहित्य सहकार चळवळीशी संबंध आला आणि आपल्या वाचनवेड्या मनाचा ओढा कलाशाखेकडे आहे, आपला पिंड कवीचा आहे याची त्यांना जाणीव झाली. तेव्हा इंटर सायन्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावरही, वैद्यकशाखेत प्रवेश मिळणं निश्चित असतानासुद्धा लताताईंनी आपल्या मनाचा कौल मानला. आणि कलाशाखेत प्रवेश घेतला.
 
 
या निर्णयाने आईवडील नाराज झाले खरे पण आप्पांचा मात्र या शाखाबदलाला पूर्ण पाठिंबा होता. त्याला दोन कारणं होती. एक म्हणजे लताताईंची साहित्याची आवड त्यांच्या लक्षात आली होती आणि दुसरं म्हणजे शाखाबदलामुळे लताताईंसारखी एक ’भरवशाची’ कार्यकर्ती ज्ञान प्रबोधिनीच्या कामासाठी अधिक वेळ देऊ शकणार होती. ’अर्थात शाखाबदलाचा निर्णय सर्वस्वी माझा होता. आप्पांची त्याला संमती असली तरी त्यांनी त्यांचं मत माझ्यावर लादलं नव्हतं’ लताताई सांगत होत्या,‘आणि आई बापू चिडले खरे, पण माझं प्रबोधिनीत जाणं त्यांनी कधीच बंद केलं नाही. कारण माझ्या कामाला त्यांचा विरोध नव्हता. त्यामागची माझी तळमळ प्रामाणिक आहे याची जाणीव त्यांना होती. पण सर्वसामान्य आईवडिलांप्रमाणे त्यांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा होत्या.’
 
 
साहित्याची आवड म्हणून कलाशाखेत गेलेल्या लताताई खर्‍या अर्थाने तिथे रमल्या. त्यांच्यातल्या कवयित्रीच्या घडणीचा तो काळ होता. कुसुमाग्रज हे तर त्यांचं दैवत होतं. त्यांच्या बहुतेक कविता लताताईंना आजही मुखोद्गत आहेत. कुसुमाग्रजांच्या कवितांचा खूप मोठा संस्कार त्यांच्या काव्यावर आहे. त्या काळातल्या विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर या बिनीच्या कवींबद्दलही मनात प्रेम होतं. मराठी कवितांबरोबरच रॉबर्ट ब्राऊनिंग, एलिझाबेथ यांच्यासारख्या श्रेष्ठ इंग्रजी कवींचेही संस्कार होत होतेच.
 
 
महाविद्यालयात मराठी साहित्य हा अभ्यासविषय म्हणून दुसर्‍या वर्षापर्यंत अभ्यासला. शेवटच्या वर्षी मात्र त्यांनी संपूर्ण मानसशास्त्र निवडलं. याचं कारण म्हणजे कलाशाखेला आल्यावर मानसशास्त्र या नव्याने विकसित होणार्‍या विषयाशी त्यांची ओळख झाली. साहित्याशी या शास्त्राच्या असलेल्या अतूट संबंधामुळे त्याच्याविषयी जवळीक निर्माण झाली. त्यातूनच मानसशास्त्राचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करावा असं लताताईंना वाटू लागलं.
 
 
तो काळ ज्ञान प्रबोधिनीच्याही वाढीचा काळ होता. बुद्धिमान मुलांचं शिक्षण आणि त्यांचा मानसशास्त्रीय विकास हा विषय केंद्रस्थानी ठेवून प्रबोधिनीत ’प्रज्ञा मानस संशोधिकेची’ निर्मिती होत होती. तेव्हा आपलं मानसशास्त्रातलं शिक्षण या कामाला पूरक होईल असं लक्षात आल्यावर पदवीला मानसशास्त्र घेण्याचं लताताईंनी नक्की केलं. इतकंच नव्हे, तर पदवीपासून पुढच्या प्रत्येक परीक्षेत या विषयातलं आपलं नैपुण्य सिद्ध केलं. बी. ए. च्या परीक्षेत विद्यापीठात त्या पहिल्या आल्या. काविळीमुळे कॉलेज बुडलं तरीही घरी अभ्यास करून एम.ए.च्या परीक्षेत विद्यापीठात दुसर्‍या आल्या. एम.ए.नंतरची दोन-तीन वर्षं पूर्णवेळ प्रबोधिनीच्या कामासाठी दिली. ’प्रबोधिनीच्या कार्यकर्त्याने काम करतानाच भरपूर शिकलं पाहिजे’ असा आप्पांचा आग्रह असे. त्यामुळे लताताईंनी पीएच.डी. केलीच पाहिजे यासाठी आप्पांनी अक्षरश: लकडाच लावला. पीएच.डी.साठी लताताईंचा विषय होता ’वाचन कौशल्यांचा विकास’. प्रशिक्षणाने वाचन कौशल्यांचा विकास होऊ शकतो का, वाचनातल्या रसविषयामुळे मुलांच्या वृत्ती कशा तयार होतात, कौटुंबिक वातावरणाचा त्यावर कसा परिणाम होतो’ या मुद्द्यांवर त्यांनी संशोधनात भर दिला होता. आज वाचन कौशल्याचं प्रशिक्षण ही ज्ञान प्रबोधिनीची एक महत्त्वाची ओळख आहे, त्याचा पाया लताताईंनी घातला आहे.
 
 
‘आकलनासहितच्या वाचनाचा वेग 3/4 महिन्यांच्या प्रशिक्षणाने वाढू शकतो, अगदी वयाच्या पन्नाशीनंतरही वाचनवेगात लक्षणीय बदल होतो’, हे या संशोधनानंतर लक्षात आलं. चांगल्या बुद्धिमत्तेचा इयत्ता पाचवीतल्या विद्यार्थ्याचा प्रति मिनिट जर 80 ते 100 शब्द असा वेग असेल तर प्रशिक्षणानंतर तो दुप्पटीने क्वचित चौपटीने वाढू शकतो. यामुळे अभ्यासाच्या वेळेचीही बचत होते’. असा या संशोधनाचा निष्कर्ष थोडक्यात सांगता येईल.
 
 
या आगळ्या संशोधनामुळे लताताईंना, दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्स अशा राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्थांमधल्या अधिकार्‍यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची संधी मिळाली.
महाविद्यालयीन जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करताना एकीकडे ज्ञान प्रबोधिनीचं कामही लताताई जोमानं करत होत्या. सकाळी सात वाजता घरून डबा घेऊन निघायचं, कॉलेज झाल्यावर लायब्ररीत थोडा वेळ अभ्यास करून मग प्रबोधिनीत जायचं ते रात्री 8 वाजेपर्यंत. बी. ए.च्या दुसर्‍या वर्षापासून रोज दुपारी 4 तास ’प्रज्ञा मानस संशोधिके’त इंटेलिजन्स टेस्टींगचं काम करत. तर संध्याकाळच्या वेळी युवती विभागात मुलींचं दल घेत असत. पीएच.डी.च्या काळातही रोज नियमितपणे त्या प्रबोधिनीचं काम करतच होत्या.
 
 
एम. ए. नंतर दोन-तीन वर्षं पूर्णवेळ काम करत असताना, कै.आप्पांच्या प्रेरणेनं आणि नलूताई उजळंबकर, रंजनाताई अभंग, हेमा अंतरकर, विद्या हर्डीकर या समविचारी मैत्रिणींबरोबर, 1975 साली ज्ञान प्रबोधिनीची मुलींची शाळा सुरू करण्यात लताताईंनी पुढाकार घेतला. मुलांची प्रशाला सुरू झाल्यानंतर सहा वर्षांनी मुलींची शाळा सुरु करण्यात आली. त्याआधी मुलींसाठी प्रबोध शाळा सुरू होत्या. शाळेनंतर दोन तास मैदानी खेळ खेळण्यासाठी, तसंच अभ्यासातल्या मार्गदर्शनासाठी पुण्याच्या विविध शाळांमधील बुद्धिमान मुलींना एकत्र जमवणं असं त्या प्रबोध शाळेचं स्वरूप होतं. एका वर्षी तर एस.एस.सी. परीक्षेत पुण्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या 30 मुलींपैकी 10 मुली प्रबोध शाळेत येणार्‍या होत्या. त्यामुळे प्रबोध शाळेविषयी पालकांच्या मनात अनुकूल मत निर्माण झाल्यानं शाळा सुरू करण्याला चांगला प्रतिसाद लाभला. 15 मुलींना एकत्र घेऊन शाळा सुरु झाली. या अनुभवाबद्दल बोलताना लताताई म्हणाल्या, ‘वीस-पंचवीस वयाच्या नुकत्याच एम.ए. वगैरे झालेल्या आम्ही अननुभवी शिक्षिका होतो. पण उत्साह प्रचंड होता, देण्यासारखंही खूप काही होतं. हे शिक्षण टवटवीत होतं, त्यामुळे पालकांनाही खूप मजा वाटायची.’
 
कामात बदल
 
 
प्रबोधिनीचा कार्यकर्ता हा सर्व प्रकारच्या कामात तरबेज असावा लागतो. भले त्याच्या रूचीचे विषय वेगळे असले तरी आव्हान म्हणून नवनवीन विषय स्वीकारून त्यातलेही बारकावे समजून घ्यावे अशी प्रथा कै.आप्पांपासून आजही प्रबोधिनीत चालू आहे. प्रसंगोपात का होईना लताताईंनाही पीएच.डी. नंतर कामात बदल करावा लागला. तोवर प्रशालेत अध्यापनाचं आणि प्रज्ञा मानस संशोधिकेत काम करणार्‍या लताताईंवर, पीएच.डी.चा प्रबंध सादर केल्याच्या दुसर्‍याच दिवशी कै. आप्पांच्या सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी आली. त्या काळात कै.आप्पांची प्रकृती बरी नव्हती, डॉ. व. सी. तथा आण्णा ताम्हणकरांवर ग्रामविकासाची जबाबदारी असल्याने तेही पुण्यापासून दूर होते. तर विद्यमान संचालक डॉ. गिरीश बापट तेव्हा पीएच.डी.साठी कॅनडात होते. त्यामुळे लताताईंनी आप्पांच्या सचिव म्हणून संचालक कार्यालयात काम करायला सुरुवात केली.
 
 
दिवसातले 15 ते 18 तास...सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊपर्यंत काम चालू असे. यात मुख्यत्वे कै. आप्पांचा पत्रव्यवहार सांभाळणं, लोकांबरोबरच्या त्यांच्या भेटी ठरवणं, आंतरराष्ट्रीय लोकांबरोबरचे संबंध असं कामाचं स्वरूप होतं. त्याचबरोबर आपल्या या मानसपित्याची शुश्रूषाही त्या करत असत. वास्तविक पाहता अध्यापनात रूची असलेल्या, मुलांबरोबर काम केलेल्या एखाद्या व्यक्तीला सचिवाचं कार्यालयीन काम खूप कोरडेपणाचं वाटू शकतं, पण या कामाविषयी बोलताना लताताईंनी सांगितलं की, ’आप्पांचा स्वभावच असा होता की त्यांच्या मनात सतत काहीतरी उसळत असे. सतत नवनवीन कल्पना सुचत असत, त्यामुळे हे कामही माझ्यासाठी आनंददायी अन् खूप काही शिकवणारंच होतं. आप्पांच्या स्वभावात पित्याची वत्सलता होती, त्याचा या काळात अधिक जवळून प्रत्यय आला.’
 
 
कै.आप्पांच्या निधनानंतर प्रबोधिनीच्या ग्रामविकसन कार्यात असलेल्या डॉ.अण्णा ताम्हणकरांनी संचालकपदाची धुरा सांभाळली. तेव्हाही सहा वर्षं आण्णांची सचिव म्हणून लताताईंनी काम केलं. या दोघांबरोबर सचिव म्हणून काम करताना, ज्ञान प्रबोधिनीच्या विविध भागांचं समन्वयन करणं, कै. आप्पांच्या ’माताजी - अरविंद काय म्हणाले’, ’राष्ट्रद्रष्टे विवेकानंद’ या पुस्तकांच्या निर्मितीत मदत, कै.आप्पांचं चरित्र लेखन, विमलाताई ठकारांच्या एका पुस्तकाचा ’आत्मोल्लास’ नावाने मराठीत अनुवाद अशी कामंही बरोबरीनं चालू होती.
 
 
अमेरिका वारी
 
दरम्यान, लताताईंनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्याची दखल अमेरिकेतही घेतली गेली. तिथल्या ’इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हानिया’ या विद्यापीठात 1987 साली ’व्हिजिटिंग लेक्चरर’ म्हणून लताताईंना बोलावण्यात आलं. तिथल्या बी.एड्.च्या कोर्समधील ’बुद्धिमान मुलांचं शिक्षण’ या विषयावरील अभ्यासक्रम ठरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अमेरिकेतल्या 8 महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी इंग्रजी भाषेच्या वाचनकौशल्याचे वर्ग, विद्यापीठातल्या स्पॅनिश, चायनीज प्राध्यापकांसाठी घेतले. तसंच अमेरिकेतल्या 17/18 शहरांमध्ये प्रबोधिनीवर व्याख्यानं दिली, स्लाईड शोही केले.
 
सोलापूरला प्रयाण
 
अमेरिकेहून परतल्यावर एक नवं काम जणू काही लताताईंची वाटच पाहत होतं. लहानपणाची पाच-सहा वर्षं सोडल्यास बाकी काळ पुण्यात घालवलेल्या लताताईंवर सोलापुरात ज्ञानप्रबोधिनीची उभारणी करण्याची जबाबदारी आली. ’बाल विकास मंदिर’ या नावाची कै.अवंतिकाबाई केळकरांची जुनी शाळा सोलापूर शहरात होती. वय झाल्याने केळकर दाम्पत्याला शाळा चालवणं जमत नव्हतं, तेव्हा ज्ञान प्रबोधिनीसारख्या संघटनेने शाळा चालवायला घ्यावी अशी अवंतिकाबाईंची इच्छा होती. कै.आप्पा हयात असताना त्या दोघांचा पत्रव्यवहारही झाला होता. एका पैचीही अपेक्षा न ठेवता केळकर दांपत्य आपली शाळा प्रबोधिनीच्या हवाली करू इच्छित होतं हे विशेष. अखेर ही शाळा चालवायला घेण्याचं सर्वसहमतीने ठरलं आणि लताताईंनी चारुदत्त पालेकर या बी.ई. झालेल्या कार्यकर्त्यासह सोलापुरला प्रयाण केलं.
 
 
सोलापुरकरांनी प्रबोधिनीचं चांगलं स्वागत केलं. बालविकास मंदिर ही सातवीपर्यंतची शाळा होती. ज्ञान प्रबोधिनीने माध्यमिक विभाग सुरू केला. प्राथमिक स्तरावरच्या शिक्षणात अधिक जिवंतपणा कसा आणता येईल, शिशुशिक्षणात नवनवीन प्रयोग कसे करता येतील याविषयी शिक्षकांशी सतत चर्चा करणं, अंमलात आणण्याजोग्या गोष्टी वेळ न दवडता अंमलात आणणं यावर अधिक भर दिल्यानं पालक आजही प्रशंसोद्गार काढतात. ज्याला जीवनशिक्षण म्हणता येईल अशा प्रकारचं शिक्षण या शाळेत दिलं जातं. अगदी छोट्या मुलांनाही नियोजन कौशल्यं शिकवली जातात. त्यातूनच लहानसहान गोष्टीतही नियोजन करण्याचं वळणच या मुलांना पडून जातं. मग घरी गणपती आणायचा असला तरी मुलं कामाचं खातेवाटप करतात. त्यातून त्यांचं वेगळेपण दिसून येतं. या बरोबरच वैज्ञानिक दृष्टी विकसित करण्याचं उद्दिष्टही शाळेनं डोळ्यासमोर ठेवलं आहे.
 
संवेदनशील कवयित्री
लताताई सामाजिक कार्यात नसत्या तर आज कदाचित आपण त्यांना संवेदनशील, तरल मनाच्या कवयित्री म्हणूनच ओळखलं असतं. महाविद्यालयीन वयात त्यांच्यावर असलेला रामँटिसिझमचा प्रभाव त्यांच्या कविता वाचनातही जाणवत राहतो. ’यशोदा’ या टोपणनावाने लिहिलेल्या ’देवचाफे’ या काव्य संग्रहातल्या या ओळी त्यांच्या काव्यप्रतिभेची साक्ष देतात.
 
धग दाटली शिवारी गेले तडे भुईला
 
अन् राख हिर्वळीची उडता भिडे नभाला
 
ग्रिष्मात ऐन ऐशा प्राणान्तिच्या क्षणाला
 
बहरून येत कैसे ते दोन देवचाफे ?
 
आयुष्यातले अग्रक्रमाचे विषय बदलले तसं त्यांच्या कवितेचं रूपही. ही काव्यप्रतिभा प्रबोधिनीच्या कामात राष्ट्रभक्तीपर
 
गीतांतून व्यक्त होऊ लागली.
 
 
 
साक्षरता अभियान
 
पुणे, निगडी, साळुंब्रे, सोलापूर, हराळी - जिथे जिथे प्रबोधिनीच्या शाळा आहेत त्या शाळांमधली स्वयंस्फूर्त शिस्त आणि नेटकं नियोजन हे अनेकदा प्रशंसेचे विषय ठरतात. गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवातही प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सहभाग लोकांचं लक्ष वेधून घेतो. प्रबोधिनीच्या या नियोजनकौशल्य आणि संघटित शक्तीमुळे सोलापुरातल्या साक्षरता अभियानाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे सोलापुरातलं जनजीवन अधिक जवळून तर पाहता आलंच शिवाय संपूर्ण भारतात सोलापूर जिल्ह्याला साक्षरता अभियानात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाल्यानं ज्ञान प्रबोधिनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. सोलापूर ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यवाह या नात्याने लताताईंकडे नेतृत्वाची धुरा आली. या अभियानाविषयी बोलताना लताताई म्हणतात, ‘माझ्या आतापर्यंतच्या सामाजिक कामातला मला खूप काही शिकवून गेलेला हा अनुभव आहे. त्या काळात सोलापुरातल्या 38 झोपडपट्ट्यांशी माझी अगदी जवळून ओळख झाली. सर्व कामाचं आम्ही प्रबोधिनीच्या पद्धतीने नेटकं नियोजन केलं. झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यांचं एक जाळंच त्या निमित्ताने विणलं गेलं. एकूण 2000 साक्षरता वर्ग दोन वर्ष चालू होते ते याच कार्यकर्त्यांच्या बळावर. या कार्यकर्त्यांना आम्ही मानधनही देत नव्हतो. आमच्याकडे पैसेच नव्हते.’ असे हे स्वेच्छेने चाललेले वर्ग होते. या अभियानात शिकवणार्‍या आणि शिकणार्‍यांमध्येही स्त्रियांचं प्रमाण अधिक होतं, हे
विशेष!
 
रात्री 12 वाजता वैदू लोकांसाठीचा साक्षरता वर्ग घेतला जात असे. इतक्या मोठ्या प्रमाणावर तरीही अतिशय शिस्तबद्धतेने चालणार्‍या या कामांची महापालिका आयुक्त डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी प्रशंसा केली. झोपडपट्ट्यांमधून लताताईंना मिळणारा आदर पाहून तेव्हाचे सोलापूरचे महापौर मनोहर सपाटे म्हणाले, ’अहो ताई आम्ही कसले महापौर? तुम्हीच खर्‍या महापौर! लोक आम्हाला मत देतात, पण मानत नाहीत. तुम्हाला मानतात!’
 
 
हे काम करताना असंही लक्षात आलं की केवळ साक्षरतेने या देशातले प्रश्न सुटणार नाहीत. ते प्रश्न रोजगाराशी भिडलेले आहेत. हाताला काम आणि थोडं बरं राहण्याइतपत पैसा ही लोकांची खरी गरज आहे. या अभियानाच्या निमित्तानं झोपडवस्तीतून फिरताना बालकामगारांच्या प्रश्नांशी ओळख झाली. त्यांच्यासाठी काहीतरी ठोस करण्याची गरज सर्व कार्यकर्त्यांना जाणवू लागली. त्यातूनच बालकामगार शाळश सुरू झाली.
 
बाल कामगार शाळा
 
हे बाल कामगार प्रामुख्याने सोलापूरमध्ये असलेल्या सूतगिरण्यांमधून काम करणारे होते. या कामामुळे त्यातल्या बहुतेकांना क्षयाची बाधा होती, काही मुलं पोट भरण्यासाठी दारूच्या दुकानात, चहाच्या दुकानात, बांधकामावर काम करत होती. या मुलांना एकत्र करून शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं लागलं. पन्नास मुलांना घेऊन प्रबोधिनीची बाल कामगार शाळा सोलापुरात सुरू झाली. या शाळेतही प्रबोधिनीने आपलं वेगळेपण जपलं आहे. लताताई सांगत होत्या, ‘प्रत्येक मुलाशी व्यक्तिगत संबंध हे आपल्या शाळेचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आजच्या काळात ज्याला मूल्यशिक्षण म्हटलं जातं ते देण्याचा प्रयत्न असतो. विवेकानंदांच्या गोष्टी सांगणं, देशप्रेम रुजवणारी गीतं त्यांच्याकडून म्हणवून घेणं, आपल्या घरी कसं वातावरण असलं पाहिजे या विषयी त्यांच्याशी बोलणं, पैसा हे सर्वस्व नाही हे त्यांच्या मनावर बिंबवणं यावर विशेष भर असतो. त्यांचे इयत्तावार वर्ग करता येत नाहीत. तर दाखल होतानाची शैक्षणिक पातळी लक्षात घेऊन त्याच्यापासून पुढे शिकवावं लागतं. त्यामुळे त्यांच्यासाठी जास्त शिक्षकांची गरज असते.’
 
 
शालेय शिक्षणाबरोबरच या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिलं जातं. मेणबत्त्या, खडू तयार करण्याचं प्रशिक्षण तसंच वायरिंग, फिटींगचं प्रशिक्षणही दिलं गेल्याने काही मुलं व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकतात.
 
 
सोलापुरचं काम हे गेल्या पंधरा वर्षांत उभं राहिलेलं काम. ते उभं करताना हितचिंतक जसे पाठीशी होते तसे कामात अडथळा आणणारे हितशत्रूही होतेच. या ना त्या प्रकारे खोडसाळपणा करून कामात बाधा आणण्याचेही प्रकार अनेकांनी केले. सर्वसामान्य कार्यकर्ता या आघातांनी काम अर्धवट सोडून निघून गेला असता पण लताताईंसह सर्वांनीच याचा खंबीरपणे मुकाबला केला. ’अण्णा ताम्हणकरांसारखे कार्याध्यक्ष, गायत्रीताईंसारख्या सहकारी बरोबर असल्याने लढण्याचं बळ आलं. खच्चीकरण करणार्‍या अनुभवांमुळे, एखाद्या क्षणी सोडून द्यावं हे सगळं असं वाटे. पण ज्ञान प्रबोधिनीचे तसे संस्कार नव्हते आमच्यावर. हे काम जिद्दीने यशस्वी करायचं असा आम्ही सर्वांनी चंगच बांधला होता.’ लताताई म्हणाल्या.
 
मुक्काम पोस्ट हराळी
 
काम थांबवण्याचं दूरच राहिलं, सोलापुरचं कामही चहू दिशांनी वाढू लागलं. आणि दहा वर्षांपूर्वी एक नवंच काम ज्ञान प्रबोधिनीसमोर आव्हान म्हणून उभं ठाकलं. ते म्हणजे सोलापुरपासून, 2 तासांच्या अंतरावर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या हराळी येथे भूकंपग्रस्त भागातल्या मुलांसाठीची शाळा उभारणं. 1993 मध्ये भूकंप झाल्यावर तात्पुरती मदत करण्याकरता हजारोनी लोक आले पण तिथल्या लोकांच्या अनेक वर्षांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिथे स्थिरावल्या मोजक्याच संघटना. ज्ञान प्रबोधिनी ही त्यापैकीच एक. सोलापुरच्या वर्धिष्णू कामाची जबाबदारी नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांच्या हाती सोपवून डॉ.अण्णा ताम्हणकर आणि लताताई आता हराळीला आले आहेत. या वंचितांच्या जीवनात ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी शेतकरी कुटुंबातून येणार्‍या इथल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीने शेतकी प्रशिक्षण देण्यासाठी शेतीशाळा उभारण्याचं त्यांचं स्वप्न आहे. दहावीपर्यंत असलेल्या या शाळेत सुमारे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातली निम्म्याहून अधिक मुलं वसतिगृहातच राहतात.
 
 
आण्णांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या कामाचा व्यापही वाढता आहे. या कामाची घडी बसवण्यासाठी अण्णांना मदत करणं या हेतूने लताताई हराळीत आल्या आहेत. शिक्षकांचे तास पाहणं, वेगवेगळ्या संस्थांकडून आर्थिक सहकार्य मिळवण्यासाठी प्रकल्प लेखन करणं, इथल्या शिक्षणात जास्तीत जास्त चैतन्य आणण्यासाठी प्रयत्न करणं, सहनिवासातलं वातावरण चांगलं कसं राहील याकडे लक्ष पुरविणं असं त्यांच्या, सध्याच्या कामाचं स्वरूप आहे.
 
 
जवळपास गेली 37 वर्षं ज्ञान प्रबोधिनीत वेगवेगळ्या पदांवर काम करणार्‍या लताताईंची खरी ओळख पूर्णवेळ कार्यकर्ती अशीच आहे. व्यक्तिगत लाभाचा विचारही मनात न आणता, समाज प्रबोधनासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणार्‍या आणि आपलं आयुष्यच राष्ट्रासाठी निर्मोही वृत्तीनं अर्पण करणार्‍या लताताईंसारखी ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वच खरं तर आपल्याला जगण्याची उभारी देत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ’की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ या काव्यपंक्तीचा अर्थ अशा व्यक्तींच्या सान्निध्यात लख्ख उमजतो.
 
 
आजवरच्या त्यांच्या भरीव शैक्षणिक कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे. यात शासनातर्फे देण्यात येणार्‍या सावित्रीबाई फुले पुरस्कारासह, स्त्री शक्ती पुरस्कार, सरदार महादेव बळवंत नातू पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार, साने गुरुजी पुरस्कार, राष्ट्रतेज अटलजी पुरस्कार तसंच अमेरिकन बिब्लिओग्राफीक असोसिएशन तर्फे दिला गेलेला ‘वुमन ऑफ दि इयर 2000’ पुरस्कार आदींचा समावेश आहे.
 
 
आयुष्याच्या या टप्प्यावर आध्यात्मिक साधना ही आपल्यातली प्रबळ प्रेरणा आहे याची लताताईंना जाणीव झाली आहे. अर्थात ज्ञान प्रबोधिनीपासून दूर न जाता, दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ आध्यात्मिक वाचनासाठी, चिंतनासाठी द्यावा अशी त्यांची इच्छा आहे. परंतु कामाच्या व्यापात अजून तरी त्यांना ते शक्य झालेलं नाही. स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य स्वामी माधवनाथांकडून त्यांनी दीक्षा घेतली आहे. विमलाताई ठकारांचे कृपाशीर्वाद त्यांना लाभले आहेत. गेली 12 वर्षं दर रविवारी सोलापुरात त्यांची दासबोध, ज्ञानेश्वरी, वेद, उपनिषदं या विषयांवर प्रवचनं होतात. अतिशय शांत स्वरात केलेली ती प्रवचनं ऐकणार्‍याला मंत्रमुग्ध करतात.
 
 
या लेखानिमित्त लताताईंच्या सहवासात हराळी मुक्कामी राहण्याचा योग आला. त्याचवेळी त्यांचे आईवडिलही महिनाभरासाठी वास्तव्याला होते. आपल्या मुलीला तिच्या व्यापातून वेळ काढणं जमत नाही म्हणून नव्वदीचे बापूसाहेब आणि ऐंशीच्या उंबरठ्यावरच्या कुसुमताई तिथे येऊन राहिल्या होत्या. लताताईंची दिवसभराची व्यस्तता पाहताना त्यांच्या चेहर्‍यावर कौतुकाचे भाव होते. दुपारचा काही वेळ लताताई आईवडिलांबरोबर भावार्थ गीता वाचण्यासाठी देत होत्या. त्या दिवशी अध्याय झाल्यावर, आपल्या आईवडिलांच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. आपल्या या गुणवंत लेकीच्या पाठीवरून आशीर्वादाचा हात फिरवताना कुसुमताई म्हणाल्या, ‘अगं लता, कोणी कोणाला नमस्कार करायचा हे ठरवायला हवं!’
 
माझं भाग्य हे की, या भावपूर्ण सोहळ्याची मी साक्षी होते.
 
 
मला खात्री आहे, अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या लताताईंना, आईने दिलेला हा पुरस्कार अधिक आनंद देऊन गेला असेल.
***
9594961865
(पूर्वप्रसिद्धी - सा. विवेक, 4 एप्रिल 2004 - आम्ही सावित्रीच्या लेकी या लेखमालेतून)
 

कविता (अश्विनी) मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.