रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे मंत्रालयाच्या कारभारात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. ही सुधारणा जशी तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, तशी ती दिवसेेंदिवस वाढणारी गरज ओळखून महानगरांमधील गाड्यांची संख्या आणि फेर्या यांमध्येही वाढ यातही दिसून येत आहे.
प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झालेल्या, भारतीयांच्या श्रद्धेचे व समरसतेचे प्रतीक बनलेल्या महाकुंभ 2025ने अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 40 कोटी भाविक या कालावधीत प्रयागराज इथे पवित्र संगमावर स्नानासाठी येतील असा अंदाज सुरुवातीला वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात तब्बल 65 कोटींहून अधिक भाविक या पर्वकाळात प्रयागराजला आले आणि 144 वर्षांनी जुळून आलेल्या या पावनयोगावर त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. देशभरातल्या विविध पंथांच्या साधूसंतांसह देशाच्या कानाकोपर्यांतून आलेले भाविक सर्व आर्थिक स्तरांतले होते. त्यात जसे ’नवकोट नारायण’ होते, तसे ’दरिद्री नारायण’ही त्याच भक्तिभावाने सहभागी झाले होते. त्याबरोबरच परदेशस्थ भारतीय होते आणि हिंदू धर्माविषयी आस्था असणारे परदेशी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा महाकुंभ सर्वार्थाने यशस्वी, अविस्मरणीय व्हावा आणि त्यातून हिंदू धर्माची एक नवी ओळख जागतिक पटलावर निर्माण व्हावी, यासाठी गेली 3 वर्षे उत्तरप्रदेश सरकार केंद्र सरकारच्या मदतीने आवश्यक त्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी झटत होते. यासाठी स्वतंत्र 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातूनच 200 हून अधिक पक्के रस्ते, 21 उड्डाणपूल आणि अनेक पुलांची निर्मिती झाली. म्हणूनच यात्रेकरूंचा इथवरचा प्रवास सुकर, आनंददायी आणि अविस्मरणीय झाला. खाजगी वाहने तसेच बसेसने प्रवास केलेल्या भाविकांनी उत्तर प्रदेशातल्या रस्त्यांची आणि अन्य पायाभूत सुविधांची केलेली वाखाणणी ही त्या कामाला मिळालेली मोठी पोचपावती म्हणावी लागेल. याबरोबरच विमानाने आणि रेल्वेने प्रयागराजला गेलेल्या भाविकांची संख्याही लक्षणीय होती.
या कालावधीत देशाच्या विविध भागांमधून 16 हजारांहून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या खास प्रयागराजसाठी सोडून देशभरातल्या सर्वसामान्य भाविकांची खूप मोठी सोय भारतीय रेल्वेने केली. या गाड्यांमुळेच निम्न आर्थिक स्तरातले भाविकही या पावनकाळात प्रयागपर्यंत पोहोचू शकले. या अतिरिक्त गाड्या सोडण्यासाठी आणि त्यामुळे होणार्या गर्दीचे नीट नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासन, नागरी सुरक्षा दल, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच अभियांत्रिकी विभाग यांनी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या या सेवेची उचित नोंद घेत केंद्रीय रेल्वे तसेच माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्यक्ष भेटून या सर्वांची प्रशंसा केली आणि त्यांचे आभारही मानले.
भारतीय रेल्वेने केवळ या महाकुंभाच्या कालावधीत विशेष कामगिरी केली असे नाही. ही प्रासंगिक जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तमरितीने निभावलीच. मात्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे मंत्रालयाच्या एकूणच कारभारात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. ही सुधारणा जशी तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, तशी ती दिवसेेंदिवस वाढणारी गरज ओळखून महानगरांमधील गाड्यांची संख्या आणि फेर्या यांमध्ये झालेली वाढ यातून दिसून येते आहे. रेल्वे प्रवास हा देशातील बहुतेकांना परवडणारा आणि सोयीचा असा प्रवास. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतीच राहणार हे लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाकडून अनेक नव्या गाड्यांची घोषणा अलीकडच्या काळात करण्यात आली आहे. यात लांब पल्ल्याच्या गाड्या जशा आहेत तशा कमी अंतरावर धावणार्या गाड्याही असणार आहेत.
अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ’वंदे भारत’ गाड्यांची संख्या 200ने वाढणार असून कमी आर्थिक उत्पन्न गटातील प्रवाशांना परवडावे, यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील जनरल कोचची संख्या 14 हजारांनी वाढणार आहे. तर केवळ जनरल कोच असलेल्या 100 ’अमृत भारत ट्रेन’ देशाच्या विविध भागांत चालू होणार आहेत. तसेच जालना-औरंगाबाद, नागपूर-वर्धा अशा कमी अंतरावर धावणार्या 50 नवीन ‘नमो भारत’ या गाड्या सुरू होणार आहेत.
रेल्वेच्या लोकल गाड्यांना मुंबई आणि तिच्या उपनगरांची ’जीवनवाहिनी’ म्हटले जाते. इथला बहुतेक चाकरमानी हा त्याच्या कामाचे ठिकाण गाठण्यासाठी रेल्वेवर अवलंबून असतो. दिवसाच्या 24 तासांतील जेमतेम 2 ते 3 तास ही ’जीवनवाहिनी’ विश्रांती घेऊन उरलेले 21 ते 22 तास ती अव्याहत धावत लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचवत असते.
मुंबईच्या मध्य तसेच पश्चिम मार्गावरून दिवसाकाठी हजारो लोकल गाड्या लाखो प्रवाशांची ने-आण करत असतात. मात्र भारताची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराच्या दिशेने देशाच्या अनेकविध भागांतून रोज लाखो लोक नशीब आजमावण्यासाठी येतात. त्यामुळे या रेल्वेगाड्या अपुर्या पडणे स्वाभाविकच आहे. ही गर्दी विभागण्याचा उपाय म्हणून ’मेट्रो’, ’मोनो’ हे पर्यायही आता उपलब्ध आहेत. तरीही लोकल गाड्यांची संख्या वाढवावी ही प्रवाशांची मागणी आहे. ही गरज लक्षात घेऊन सिग्नलिंग यंत्रणेत सुधारणा करत दोन लोकल गाड्यांमधले अंतर कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता हे अंतर 180 सेकांदाचे आहे, ते 150 सेकंदांपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आणखी 300 गाड्या जास्त चालवता येतील असा अंदाज आहे.
वातानुकूलित लोकल गाड्या वाढवायचाही रेल्वेचा विचार आहेच पण त्याचबरोबर सर्वसाधारण लोकल गाडीचे डिझाईन आणखी चांगले करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते अधिकाधिक आरामदायी कसे होईल, हवा अधिकाधिक खेळती कशी राहील याचा अभ्यास केला गेला आहे. या वर्षाअखेरीस अशा नव्या गाड्या तयार होऊन 2026 मध्ये त्यातल्या काही रुळांवरून धावू लागतील, असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.