आपले राजकीय अस्तित्व संपले आहे, आपला जनाधार संपला आहे हे लक्षात आले तरी आपली वळवळ न थांबवणारे पक्ष आज महाराष्ट्रात आहेत. भावनिक अस्मिता हा त्यांचा प्राणवायू आहे. त्यामुळे भावनिक, भाषिक अस्मिता फुलवून आपला स्वार्थ साधण्यासाठी हे पक्ष आणि त्याचे विश्वप्रवक्ते सदैव तयार असतात. अशा ढोंगी पक्षांना आणि त्यांच्या नेतृत्वाच्या आकलन शक्तीला कोणता पुरस्कार द्यावा? हा आजचा प्रश्न आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मा. भैयाजी जोशी यांचा एक जाहीर कार्यक्रम मुंबईतील घाटकोपर परिसरात झाला. त्या कार्यक्रमात भाषिक सहअस्तित्वाचा विषय मांडताना त्यांनी आपल्या भाषणातून मराठी आणि गुजराती भाषेचे, संवादाचे संदर्भ दिले. आणि लगेचच हंगामी डॅराव डॅराव करणारे अस्मिताधारक राजकीय संधिसाधू आपापल्या घरातून बाहेर आले. मराठी भाषा आणि मुंबई या दोन हुकुमी एक्क्यांच्या आधारावर वाटचाल करणारे हे पक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशन, आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कर्णकर्कश ओरडले नसते तर नवलच म्हणावे लागले असते. भैय्याजी जोशी यांच्या भाषणाचा सोयीचा अर्थ काढत, 'आता मराठी भाषेवर घाला येणार, मुंबई गुजरातला जोडणार' अशी ओरड त्यांनी सुरू केली आहे.
महाराष्ट्र हे मराठी भाषकांचे राज्य आहे. इथली राज्यभाषा मराठी आहे. इथे राहणाऱ्या सर्वांना मराठी भाषा बोलता लिहिता आली पाहिजे. याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारणच नाही. विधानसभेत हीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ही भूमिका घेताना, भैयाजी जोशीही माझ्या या मतांशी सहमत असतील, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. मात्र ज्यांना आपल्या अस्तित्वासाठी मराठी भाषा व मुंबई हा अस्मितेचा प्राणवायू लागतो, त्यांना हे कसे कळणार? त्यांनी कानावर आणि बुद्धीवर ओढलेले कातडे कोण काढणार?
वरळी विधानसभा मतदारसंघात 'केम छो वरली' चे फलक कुणी लावले होते? धारावीमध्ये उर्दू पत्रके कुणी वाटली होती? याचा त्यांना विसर पडला आहे.
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा आशय समजून न घेताच त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मराठी अस्मितेचा आधार घेत गळती लागलेला आपला पक्ष सावरण्याची त्यांना ही नामी संधी मिळाली. म्हणूनच ते व त्यांचे विश्वप्रवक्ते पावसाळी बेडकाप्रमाणे डॅराव डॅराव करू लागले. हा मराठी भाषेचा अपमान आहे, हा मुंबई तोडण्याचा डाव आहे, असा जुनाच राग पुन्हा नव्या जोमात आळवला. हे करताना वरळी विधानसभा मतदारसंघात 'केम छो वरली' चे फलक कुणी लावले होते? धारावीमध्ये उर्दू पत्रके कुणी वाटली होती? याचा त्यांना विसर पडला आहे.
मराठी भाषेचा विषय चालू आहे म्हणून एक मराठी म्हण इथे वापरण्याचा मोह आवरता येत नाही. 'आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून' अशी यांची स्थिती आहे. मराठी भाषेचा विकास व्हावा, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी यांनी व यांच्या पक्षाने काय योगदान दिले आहे? हा प्रश्न कधीतरी विचारला जाईल. याचे भान ठेवून भाष्य केले पाहिजे.
मराठी बांधवांसाठी तुम्ही काय केले? छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात जेव्हा मराठी भाषेच्या गळचेपीची प्रकरणे समोर आली, तेव्हा तुम्ही काय केले? याचा खुलासाही कधीतरी करावा लागेल, हे ध्यानात घ्या.
मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे. ते योग्यच आहे. याबद्दल दुमत नाही. पण त्या आग्रहाची सीमारेषा मुंबईपुरतीच का आखायची? याचेही उत्तर या मंडळींनी दिले पाहिजे. मराठी केवळ महाराष्ट्रात बोलली, लिहिली जाते असे नाही तर देशातील विविध महत्त्वाच्या शहरात आजही मराठी भाषक आहेत. ते मराठी भाषेचे संवर्धन करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या शाखा देशात आणि परदेशात विखुरलेल्या आहेत. या मराठी बांधवांसाठी तुम्ही काय केले? छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात जेव्हा मराठी भाषेच्या गळचेपीची प्रकरणे समोर आली, तेव्हा तुम्ही काय केले? याचा खुलासाही कधीतरी करावा लागेल, हे ध्यानात घ्या.
भैयाजी जोशी यांनी आपल्या भाषणात भाषिक सहअस्तित्वाच्या संदर्भात मांडणी केली. त्याचा विपर्यास करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी तत्परतेने पुढे आले. मात्र त्यांनी आपले व्यवसायिक भागीदार कोण आहेत? कोणती भाषा बोलतात ? आणि त्यापैकी काही पक्षाच्या प्रमुख पदावर का आहेत ? याचा विचार केला पाहिजे. मराठी, मराठीचा तोंडदेखला जप करताना आजवर किती अमराठी व्यक्तींना त्यांच्या पक्षाने संधी दिली हे ही तपासून पाहिले पाहिजे. ती संधी देण्यासाठी तुमच्याकडे मराठी व्यक्ती नव्हती की पडद्याआड वेगळे व्यवहार करण्यासाठी मराठी व्यक्ती सक्षम नव्हती?
शिवतीर्थ समोरच्या मैदानावर संघाची शाखा लागते. तेथे कधीतरी चक्कर मारली असती तर राज ठाकरे यांना संघ जोडतो की तोडतो हे कळले असते.
उद्धव ठाकरे यांनी अशी मराठी अस्मितेची आघाडी उघडल्यावर त्याचे चुलत बंधू राज ठाकरे गप्प कसे बसतील! आपलं राजकीय अस्तित्व दाखवण्याची संधी कशी सोडतील? ते इतके विद्वान आहेत की, भैयाजी जोशी यांच्या भाषणाचा आधार घेत त्यांनी मुंबई तोडण्याचा संघाचा डाव आहे असा दावा करून टाकला. ज्यांचे सामाजिक जीवन आपल्या वयाएवढे आहे त्यांचा एकेरी उल्लेख करत राज ठाकरे यांनी आपला सभ्यपणा जगजाहीर केला. आणि मराठीचा अभिमान दाखवण्यासाठी कोल्ड प्ले मध्ये बिदागीवर आलेल्या ख्रिस मार्टिनचा संदर्भ दिला. आपल्यालाच सर्व काही कळते हा अहंकार जपणाऱ्या राज ठाकरेंना मराठी सातासमुद्रापार नेणाऱ्या कुणाची आठवण झाली नाही. शिवतीर्थ समोरच्या मैदानावर संघाची शाखा लागते. तेथे कधीतरी चक्कर मारली असती तर राज ठाकरे यांना संघ जोडतो की तोडतो हे कळले असते. पण मराठीचा मीच तारणहार आहे, असे ज्यांना वाटते त्यांना भैय्याजी जोशी यांनी मांडलेला भाषिक सहअस्तित्वाचा विषय कसा कळणार?
'मराठी, मराठी' असा जपत करत मुंबई तोडणार, मुंबई तोडणार अशी भीती दाखवत आपली राजकीय वाटचाल करणारे हे पक्ष आता केवळ प्रतिक्रिया देण्यापुरते मर्यादित झाले आहे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जनतेच्या मनात आता त्यांच्याविषयी अजिबात सहानुभूती शिल्लक नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीतही हे स्पष्ट दिसून आले आहे. आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तीच स्थिती झाली तर सर्वच संपून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भैय्याजी जोशी यांच्या भाषणाचा मथितार्थ समजून न घेता पावसाळी बेडकाप्रमाणे यांचे डॅराव डॅराव करणे सुरू झाले आहे. तुम्ही असेच डॅराव डॅराव करा. मतदार कुछ भुलता नही.