@दत्ता पंचवाघ
सोलापूर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विक्रमादित्य शाखेतील जुन्या स्वयंसेवकांचे स्नेहमिलन पुण्यातील मोतीबाग कार्यालयात अलीकडेच संपन्न झाले. तीन-साडेतीन तासांच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व जण विक्रमादित्य शाखेच्या आठवणींमध्ये रंगून गेले. सर्वच कार्यकर्ते आता वयाने ज्येष्ठ असले तरी सर्वांचा उत्साह तरुणांना लाजवील असा होता, हे या निमित्ताने दिसून आले!
विक्रमादित्य शाखा ही सोलापुरातील एक जुनी शाखा. या शाखेत शिशु, बाल, अरुण, तरुण म्हणून त्या काळी येणारे अनेक स्वयंसेवक आज मोठ्या प्रमाणात पुणे शहर आणि परिसरात स्थायिक झाले आहेत. त्यातील अनेक संघकार्यात सक्रीय आहेत. अनेकांनी मोठा लौकिकही मिळविला आहे. विक्रमादित्य शाखेतील जुन्या स्वयंसेवकांचे एकत्रिकरण करावे, त्या निमित्ताने त्या काळातील आठवणींना उजाळा मिळावा यासाठी पुण्यात एकत्रिकरण करण्याचे ठरले. सध्या गुहागरजवळ पालशेत येथे राहत असलेले केशव भावे जानेवारी महिन्यात पुण्यात असणार होते. त्यांनी विक्रमादित्य शाखेत कार्य केलेल्या काही स्वयंसेवकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे स्नेहमिलनाच्या विचाराने गती घेतली आणि लगेच त्या दिशेने चक्रे फिरू लागली. पुणे, पिंपरी- चिंचवड, डोंबिवली, मुंबई, शिरूर, सोलापूर येथे वास्तव्यास असलेल्या अनेक स्वयंसेवकानी स्नेहमिलनास येण्याची तयारी दर्शविली. या स्नेहमिलनास अगदी 94 वर्षे वयाच्या स्वयंसेवकापासून सर्व ज्येष्ठ स्वयंसेवकांनी येण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. विक्रमादित्य शाखेचे स्वयंसेवक असलेले आणि बरीच वर्षे पुण्याच्या मोतीबाग कार्यालयाची व्यवस्था पाहत असलेल्या दत्ता जोशी यांच्या प्रयत्नाने 28 जानेवारी मोतीबाग कार्यालयातील माधव सभागृह आणि अन्य व्यवस्था उपलब्ध झाली.
स्नेहमिलन सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ठरविण्यात आले होते. माधव सभागृहात एकत्रित आलेले अनेक स्वयंसेवक कित्येक वर्षानंतर एकमेकांना भेटत होते. त्यामुळे जुन्या आठवणींना किती उजाळा देऊ आणि किती नको अशी सर्वांचीच अवस्था झाली होती. या स्नेहमिलन कार्यक्रमास संघाच्या अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य मा. सुहासराव हिरेमठ यांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. मा. सुहासराव हिरेमठ हे मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सर्व जुने स्वयंसेवक तसे परिचित होतेच. केंद्रीय अधिकारी असूनही माहेरचेच कार्य समजून ते सर्व व्यवस्था जातीने पाहत होते. विक्रमादित्य शाखेचे स्वयंसेवक आणि नंतर प्रचारक या नात्याने भारतीय मजदूर संघाचे कार्य करणारे मुकुंदराव गोरे, सोलापूरचे जिल्हा प्रचारक म्हणून कार्य केलेले आनंदराव भागवत, उदयराव उपाख्य तात्या जोगळेकर, शशिकांतराव उपाख्य भाऊराव क्षीरसागर या सर्वांच्या उपस्थितीमुळे स्नेहमिलनाने वेगळी उंची गाठली. सर्वश्री पुरुषोत्तम नारंग, मधु कलबुर्गे, अशोक हलसगीकर या विक्रमादित्यच्या स्वयंसेवकांची इच्छा असूनही या कार्यक्रमात ते सहभागी होऊ शकले नाहीत.
मा. सुहासराव हिरेमठ, आनंदराव भागवत आणि संस्कृत भारतीचे शिरीषराव भेडसगावकर
प्रारंभी प्रत्येकाने आपापला सविस्तर परिचय करून दिला. या कार्यक्रमास उपस्थित असलेले 94 वर्षांचे नरू पंचवाघ यांनी, पहिल्या संघबंदीच्या काळात फलटण येथे शालेय शिक्षण घेत असताना त्यांचे भाऊ पंढरीनाथ पंचवाघ आणि बबन काळे यांच्यासह पुण्यात येऊन सत्याग्रह केल्याची माहिती दिली. शालेय शिक्षण घेत असताना, संघ प्रथम हा विचार पुढे ठेऊन, घरच्या वडिलधार्या व्यक्तींना पत्ता लागू न देता बालवयात केलेला सत्याग्रह सर्वांना प्रेरणादायी ठरला. सध्या डोंबिवली शहरात स्थायिक असलेले बबन लोहोकरे हे डोंबिवलीला जितके जवळचे तितकेच त्यांचे प्रथम सोलापूरशी घनिष्ट नाते. त्यांचे वडील बाबुराव लोहोकरे सोलापूर जिल्हा कार्यवाह होते. विक्रमादित्य शाखा म्हणजे एक चैतन्य होते. या शाखेतून अनेक उत्तम कार्यकर्ते घडविण्यात बबन लोहोकरे यांचे मोठे योगदान होते. बरीच वर्षे या शाखेवर शंभर-सव्वाशे स्वयंसेवकांची उपस्थिती असे. बबन लोहोकरे डोंबिवलीत स्थायिक झाल्यानंतर संघ देईल ती जबाबदारी घेऊन ते सक्रीय राहिले. डोंबिवली शहराचे ते नगरसेवकही होते. भारतीय जनसंघ, रेल्वे प्रवासी संघ या संघटनांच्या कार्यात ते सक्रीय होते. वयाच्या 88 व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजविणारा आहे.
केशव भावे हे विक्रमादित्य शाखेतील असेच उत्साही व्यक्तिमत्त्व. ते त्यावेळी त्या शाखेचे मुख्य शिक्षक होते. ‘मिसा’मध्ये बंदी असलेल्या कार्यकर्त्यांना शासनाने मानधन सुरू केले होते. काही स्वयंसेवकानी ते स्वीकारण्यास नकार दिला. तर काहींनी त्याचा स्वीकार केला पण त्याद्वारे मिळालेली सर्व रक्कम संघ परिवाराशी संबंधित सामाजिक संस्थांना देऊन टाकली. केशव भावे हे त्यापैकी एक. आताही 88 व्या वर्षीही आपल्या पालशेत गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी एका प्रकल्पाचे प्रारूप तयार केले आहे. चंद्रकांत पटवर्धन हे असेच या वयातही सक्रीय असलेले उत्साही कार्यकर्ते. सोलापूरचे संघचालक मा. राजाभाऊ पटवर्धन यांचे चंद्रकांत आणि बाळ पटवर्धन हे दोघे पुत्र. या दोघा बंधूंनी अनेक कार्यकर्ते घडविले. घोष प्रमुख, उत्तम गीत गायक असलेले चंद्रकांत पटवर्धन यांनी, आपला आवाज वयाची ऐंशी वर्षे पार केली तरी अजूनही उत्तम असल्याचे संघाची प्रार्थना सांगून सिद्ध करून दाखविले.
स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थित (डावीकडून) बबन लोहोकरे, मा. सुहासराव हिरेमठ, नरू पंचवाघ
या स्नेहमिलन कार्यक्रमाची मूळ कल्पना शरद देव यांची. व्यवसायाने प्राध्यापक असलेले शरद देव निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले आहेत. कार्यक्रमास उपस्थित बरेच स्वयंसेवक त्यांचे समवयस्क. रमेश बर्वे, माधव मोकाशी, विनायक नाविंदगीकर, दत्ता जोशी, त्यांचे मोठे बंधू अनंत जोशी, त्यांचा मुलगा अजय अनंत जोशी, विक्रमादित्य शाखेतील माणकेश्वर बंधूंपैकी प्रकाश माणकेश्वर, सोलापूरच्या कार्यकर्ते बंधूंपैकी विलास कार्यकर्ते, पवार बंधूंपैकी विवेक पवार, गोगटे बंधूंपैकी विजय गोगटे, गोपाल शेट्ये, श्याम मसलेकर हे या कार्यक्रमास उपस्थित होते. साठे बंधूंपैकी विनायक साठे, वसंतराव साठे व मुकुंद साठे हे तिघेही संघकामात सक्रीय. त्यापैकी वसंत साठे हे पालघर जिल्ह्यातील देवबांध येथे गणेश संस्कार केंद्राचे आणि सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाचे कार्य वयाची नव्वदी पार झाली असतानाही उत्साहाने करीत आहेत. देवबांध येथे माघी गणेशोत्सव असल्याने ते या स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. विश्वास कुलकर्णी, शिरूर येथे स्थायिक झालेले सुधाकर पोटे, काशिनाथ करवंदे, नागेश कुलकर्णी, विवेक पंचवाघ अशा अनेक स्वयंसेवकांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. परिचयाच्या सत्रानंतर उपस्थितांना संघकार्य विस्ताराची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
केशव भावे यांच्या घरचा आमरस आणि कुमार ढोणसळे यांनी आणलेल्या श्रीखंडासह स्वादिष्ट भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या अखेरीस शाखा भरविण्यात आली. विनायक नाविंदगीकार यांनी संघगीत सादर केल्यानंतर आनंदराव भागवत यांनी सर्व उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला. प्रार्थना झाल्यानंतर कार्यक्रम संपला. पण त्या तीन-साडेतीन तासांच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व जण विक्रमादित्य शाखेच्या आठवणींमध्ये रंगून गेले. सर्वच कार्यकर्ते आता वयाने ज्येष्ठ असले तरी सर्वांचा उत्साह तरुणांना लाजवील असा होता, हे या निमित्ताने दिसून आले! वरचेवर असा कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा उपस्थित स्वयंसेवकांनी व्यक्त केली.
लेखक विक्रमादित्य शाखेचे स्वयंसेवक आहेत.