अक्षरांचा किमयागार

विवेक मराठी    08-Mar-2025
Total Views |
@मयूरेश गद्रे 9930977746
गेली पंचवीस-तीस वर्षं अच्युत पालव यांचे सुलेखनातले अनेक प्रयोग अव्याहतपणे सुरू आहेत. आता वयाची साठी उलटून गेली असली तरी अक्षरलेखनाचा प्रवास आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. अखंड क्रियाशील, वेगवेगळे प्रयोग करून बघण्याचं धाडस, आपल्यासारखे अनेक सुलेखनकार तयार व्हावेत यासाठी चालू असलेली धडपड, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भरणारी प्रदर्शनं हे गेली अनेक वर्षे सुरू आहे.
Achyut palav
 
एखाद्या कला महाविद्यालयाचा हॉल. जमिनीवर पाच फूट रुंदीचा तीस-चाळीस फूट लांब ड्रॉईंग पेपरचा रोल पसरलेला असतो. शेजारी कॅलिग्राफीची म्हणजेच सुलेखनाची वेगवेगळी साधनं... ब्रश, रंगांचे मोठे डबे, बाऊल्समध्ये रंगाच्या इंक्स असं सगळं मांडलेलं असतं. शेकडो मुलंमुली उत्सुकतेनं उभी असतात. मग जेमतेम पाच सव्वापाच फूट उंचीची एक व्यक्ती तिथे अवतीर्ण होते. तोंडाने जोरात ’टॉक्क’ असा आवाज काढून सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. आणि तिथे टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरते! मोबाईलचे कॅमेरे सरसावतात. वेगवेगळी टूल्स, इंक्स, रंग यांच्या माध्यमातून भराभर एकापुढे एक अक्षरांची मालिका कागदावर साकारते. शेवटी रोमन लिपीत एक लफ्फेदार सही उमटते .....अच्युत पालव !
 
 
चाळीस फुटांचा रोल काही मिनिटांत एका कलाकृतीत रूपांतरित होतो. त्यानंतर उपस्थितांचे असंख्य चित्कार, शिट्या, टाळ्यांनी सभागृह निनादून जाते.
 

Achyut palav 
 
पालव सरांची अनेक प्रात्यक्षिकं आयोजित केली, त्या प्रत्येक वेळी हे रोमांचकारी दृश्य मी पाहिलं आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा अशीच ती अनुभूती असते. अक्षरांच्या या जादूगाराचा हा कलाप्रवास गेली पन्नासेक वर्षं अव्याहत सुरू आहे.
लालबागच्या शिरोडकर हायस्कूलमधून नाबर सरांच्या प्रोत्साहनातून या प्रवासाची सुरुवात झाली. घरापासून शाळेत जाण्याच्या वाटेवर असणार्‍या धुरू साइनबोर्ड पेंटिंगच्या दुकानापाशी रेंगाळताना अक्षरांशी मैत्री झाली. जेमतेम सातवी-आठवीत असणारा हा मुलगा शाळेत रोज फलक लेखन करायला लागला. दहावीला नापास झाला; मात्र आई-वडील समजूतदार असल्याने उमेद टिकवून राहिली. यथावकाश 1977 मध्ये ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस’ला प्रवेश मिळाला.
 
 
तिथे विख्यात सुलेखनकार र. कृ. जोशी सर भेटले. ते त्यावेळी जे.जे.मध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून यायचे. कॉलेज युवक असलेला अच्युत त्यांचं काम बघून भारावून गेला. आपण इतकी वर्षं जे करतोय त्या कामाचं मोठ्ठं स्वरूप र.कृं.च्या कामाच्या रूपानं लक्षात आलं. त्यामुळे ‘टायपो’ हा अभ्यासाचा मुख्य विषय झाला. जे.जे.च्या अंतिम वर्षात या विषयात राज्यातून सर्वप्रथम म्हणून पारितोषिक मिळालं. अशोक परब हा पालव सरांचा जवळचा मित्र. त्याला कलेचा आणि अक्षरांचा जबरदस्त सेन्स होता. दहा-दहा वेळा काम केलं तरी त्याचं कायम म्हणणं असायचं,‘तू करतोयस ते छान होतंय ...पण अजून चांगलं करायचा प्रयत्न कर!’ हा सल्ला आणि प्रोत्साहन पुढे अनेक प्रोजेक्टसमध्ये सोबत होते.
 

Achyut palav 
 
या पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे व्हर्नन इनायडर यांची भेट! र.कृ.जोशींनी मुंबई आय.आय.टी.त आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये त्यांची ओळख झाली. हा जर्मन माणूस पालवांचं काम, त्यातली अचूकता बघून खूपच प्रभावित झाला. या माणसाने अच्युत पालव या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर उभं रहायला मदत केली. या संपूर्ण काळाबद्दल पालव सर आजही भारावून बोलतात.
 
 
सरांची सुलेखनविषयक व्यावसायिक कारकीर्द सुरू झालेली होती. व्यावसायिक कामं करून अर्थार्जन होत होते. पण त्यांच्यातल्या कलाकाराची ऊर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग विजया राजाध्यक्ष यांच्याशी गप्पा मारताना ‘संत तुकाराम‘ हाती लागला. त्यातून संत तुकारामांच्या अभंगांना अक्षरांचा साज चढवला. मग विंदा करून झाले. तो वेगळा अनुभव होता. पं.जसराज यांच्याबरोबर मांडुक्य उपनिषदावर काम झालं. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’च्या उद्घाटनाला गुलजार आले. अच्युत पालव नावाच्या मराठी माणसानं उर्दू कॅलिग्राफीमध्ये इतकं उत्तम काम केलंय यावर त्यांचा विश्वास बसेना! नमस्कार करण्यासाठी वाकलेल्या पालव सरांना त्यांनी चक्क मिठी मारली... अजून काय हवं?
 

Achyut palav 
 
भारतात अनेक भाषा आणि बोलीभाषा आहेत. अनेक लिपी आहेत. जमिला या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार, हा ठेवा समजून घेण्यासाठी सर भारतभर फिरले. या उपक्रमाचं नावच होतं उरश्रश्रळसीरहिू ठेरवुरूी तीन-साडेतीन महिने भारतात अनेक ठिकाणी जाऊन, तिथल्या लिपींची समृद्धी समजून घेण्याचा, त्याचं दस्तावेजीकरण करण्याचा तो एक अभिनव प्रयोग होता.
 
 
सरांच्या कार्यशाळेत देवनागरी शिकवताना त्यांनी निश्चित केलेलं अक्षरांचं प्रमाण ते शिकवतात. अक्षरांवरची आडवी रेघ आपण कट-निबने काढतो. त्या रेषेची जाडी एक भाग मानली तर त्याच्या सहापट एकूण अक्षराची उंची, वेलांटी, मात्रा यासाठी अडीच भाग आणि खाली असलेल्या उकारासाठी अडीच भाग हे ते प्रमाण आहे.ही त्यांनी शोधून काढलेली प्रमाणबद्धता अत्यंत मूलगामी स्वरूपाची आहे. कारण त्यातून अक्षरांचं माप आणि त्यातून प्रकटणारं सौंदर्य या दोन्ही गोष्टींची उत्तम सांगड घातली गेली आहे.
 
 
गेली पंचवीस-तीस वर्षं असे अनेक प्रयोग अव्याहतपणे सुरू आहेत. पालव सरांची आता साठी उलटून गेली आहे. तरीही अक्षरलेखनाचा प्रवास आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. अखंड क्रियाशील, वेगवेगळे प्रयोग करून बघण्याचं धाडस, आपल्यासारखे अनेक सुलेखनकार तयार व्हावेत यासाठी चालू असलेली धडपड, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भरणारी प्रदर्शनं हे गेली अनेक वर्षे सुरू आहे.
 

Achyut palav 
 
सरांची देवनागरी, रोमन चान्सेरी आणि इतर भारतीय लिपी यातील सुलेखनाचा वेध घेणारी उत्तमोत्तम सात पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या असंख्य कार्यशाळा, शिबिरं यातून अक्षरांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन अनेकांना मिळाला आहे. केंद्र शासनाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराने पालव सरांच्या या प्रदीर्घ वाटचालीवर राजमान्यतेची मोहोर उमटली. तरीही त्यांच्या उत्फुल्ल अशा जगन्मित्र वृत्तीमध्ये अजिबात फरक पडलेला नाही. 26 जानेवारीला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जहांगीरला त्यांचं विद्यार्थ्यांसोबत प्रदर्शन सुरू होतं. भेटायला गेल्यावर सरांना आनंदाने मिठी मारली. त्यांच्या नेहेमीच्या स्टाईलने आमच्या खांद्यावर हात टाकून त्यांनी गप्पा मारल्या. धमाल केली.
 
 
सरांशी गप्पा मारणं हा कायमच समृद्ध करणारा अनुभव असतोे. ते नेहमी म्हणत असतात, “दोन रेषांमध्ये आपण अंतर ठेवतो. दोन काने काढताना त्यात अंतर ठेवतो. दोन अक्षरांत असलेलं अंतर आणि दोन शब्दांत असलेलं हे अंतर नीट कळलं की एखाद्या माणसाशी बोलताना आपण किती अंतर ठेवावं हे तुम्हाला आपोआपच कळायला लागतं.” शब्द वरकरणी सोपे आहेत; पण त्यातला आशय खूप मोठा आहे.
 
 
मोठी माणसं उगीच मोठी होत नसतात याचा अनुभव देणारा एक वैयक्तिक अनुभव या लेखाच्या निमित्ताने जरूर सांगावासा वाटतो. देवनागरी सुलेखनाचं स्वाध्याय पुस्तक (वर्कबुक) असलेल्या त्यांच्या ‘काना मात्रा वेलांटी’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती पटकन संपली, पण त्यात व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या काही क्षुल्लक चुका राहून गेल्या होत्या. नवीन आवृत्तीची तयारी सुरू असताना आमचा फोन झाला. मी सरांना त्या चुकांची आठवण करून दिली. सरांनी लगेच सांगितलं,‘दोन दिवसांत मला ते सुधारून दे.’ त्याप्रमाणे मी सुधारणा करून दिल्या. दुसरी आवृत्ती व्यवस्थित झाली. मोठ्या माणसांचं मोठेपण अशा छोट्या गोष्टीतून अधोरेखित होत असतं.
 
 
पद्मश्री पुरस्काराच्या निमित्ताने पालव सरांचं मनःपूर्वक अभिनंदन!