तिचे एक घर

विवेक मराठी    08-Mar-2025
Total Views |
@स्मिता कुलकर्णी 9822752056
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे संचलित नोकरी करणार्‍या महिलांसाठी नव्या सोयीसुविधांनी सज्ज असे ‘गार्गी’ हे वसतिगृह डेक्कन कॉर्नर, पुणे येथे 1 मार्च 2025 पासून सुरू झाले आहे. या नव्या वसतिगृहाविषयीच्या या लेखाच्या निमित्ताने संस्थेच्या इतिहासाचा व आजवरच्या सामाजिक कार्याचाही थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे.
vivek
 
’शिक्षणातून स्त्रियांचे सक्षमीकरण’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांनी आपले संपूर्ण जीवन, स्त्रीशिक्षणाकरिता सर्मपित केले. मुळात अण्णा हे सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने स्त्रीजीवनाकडे बघत असत. आपल्या समाजातील अनिष्ट रुढीपरंपरा व त्याचा स्त्रियांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम यावर सतत चिंतन-मनन करणार्‍या अण्णांनी प्रथम कार्य हाती घेतले ते, बालविधवांना शिक्षणाची कवाडे उघडून देण्याचे. अर्थातच त्या काळी या कार्यास समाजातून मोठा विरोध झाला; मात्र स्वतःवरील विश्वास, हाती घेतलेल्या कामावरील निष्ठा व दुर्बल तसेच दुर्लक्षित स्त्रियांच्या जीवनाला एक अर्थ देण्याच्या हेतूने अण्णांनी 128 वर्षांपूर्वी हिंगणे माळरानावर छोट्याशा झोपडीत चार बालविधवांसह मुलींची शाळा सुरू केली. हा प्रवास स्त्रियांकरिता स्वतंत्र विद्यापीठाच्या स्थापनेपर्यंत निरंतर सुरू राहिला.
 
 
विधायक, विकासात्मक, रचनात्मक व संघर्षात्मक अंगाने हाती घेतलेले अनेक उपक्रम हे अण्णांच्या स्त्रीजीवनकेंद्रीत व वैविध्यपूर्ण कार्याची वैशिष्ट्ये ठरतात. मुख्य म्हणजे हे कार्य उभे करीत असताना, त्या-त्या दशकातील आव्हाने, अडचणी अण्णांनी अत्यंत सहज व संयम राखत, प्रगल्भतेने पेलल्या असे अनेक दस्तऐवजांतून दिसून येते. आज संस्थेच्या 75 शाखा पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर व कामशेत येथे आहेत. या शाखांमधून 30,000 हून अधिक मुली-स्त्रिया विविध प्रकारचे शिक्षण (प्रामुख्याने कौशल्याधारित) घेत आहेत.
 
 
vivek 
 
वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांसाठी
गार्गी वर्किंग वुमन हॉस्टेल
संपर्क - श्रीमती मंजुषा दौंडकर - 8626025057
administratormaharshikarve.org
 
याच दरम्यान हळूहळू सामाजिक व कौटुंबिक स्तरावरील विचारप्रवाह व मानसिकतादेखील स्त्रियांपुढील आव्हानांचा/समस्यांचा सहानुभूतीने विचार करू लागली होती. स्त्रियांनी नोकरी केल्यास, त्यांना होणारा विरोधही हळूहळू मावळू लागला होता. म्हणूनच 1960च्या दशकात स्त्रिया उंबरठा ओलांडून अर्थार्जनाकरिता बाहेर पडल्या. मात्र, नोकरीकरिता खेड्यापाड्यांतून, वस्त्यांवरून येणार्‍या स्त्रियांनी नोकरीच्या ठिकाणी रहायचे कुठे, हा एक मोठा प्रश्न आ वासून समस्त नोकरी करू इच्छिणार्‍या स्त्रिया व त्यांच्या पालकांसमोर उभा राहिला. तसेच या काळात संस्थेच्या बाल अध्यापन मंदिरात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या स्त्रियांची संख्याही वाढू लागली होती. त्यांच्या सुरक्षित निवासाचा प्रश्न संस्थेसमोर होताच. नातेवाईक, मित्र-परिवार नोकरीच्या ठिकाणी असतीलच अशी शक्यता नसे. तसेच त्या काळी स्त्रीने एकटीने खोली घेऊन राहाणे, ही देखील फारशी रूचणारी कल्पना नव्हती.
 
 
स्त्रीच्या शिक्षणातला वा अर्थाजर्र्नातला हा मोठा अडथळा ठरू शकतो हे दूरदर्शी अण्णांनी हेरले. त्यावर उपाय म्हणून नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या निवासाची सोय करण्यासाठी प्रथम 1953 साली पुण्यातील डेक्कन कॉर्नर येथे ’महिला निवास’ या नावाने वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. प्रथम झोपडीवजा इमारतीत काही स्त्रियांची व्यवस्था करण्यात आली. पुढे 1960 मध्ये याच जागेत सर्व सोयींनी युक्त अशी चार मजली सुंदर इमारत लोकवर्गणीतून बांधण्यात आली. एकूण 60 स्त्रियांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था येथे करण्यात आली होती. आता ‘गार्गी’ या नावाने, नवीन इमारतीत हेच वसतिगृह नव्याने सुरू होत आहे. या वसतिगृहात प्रवेश देताना, प्राधान्यक्रम हा नेहमीच गरजू व होतकरू स्त्रियांना दिला जात असे. पुढे नोकरी करणार्‍या स्त्रियांची संख्या वाढू लागताच 1981 मध्ये पुण्यात शुक्रवार पेठेतील महिला निवासाची एक शाखा नातूबागेत सुरू करण्यात आली. या दोन्ही महिला निवासांमुळे पुण्याबाहेरून आलेल्या नोकरी करणार्‍या महिलांची माफक दरात आणि सुरक्षित वातावरणात सोय करण्यात येई. मुख्य म्हणजे आजही नोकरी करणार्‍या स्त्रियांना, वसतिगृहात प्रवेश देताना, गरजू, गरीब कुटुंबातील स्त्रियांचा प्राधान्यक्रमाने विचार केला जातो.
 
 
आज पुण्यात नोकरीनिमित्ताने मोठ्या संख्येेने स्त्रिया येत असतात. त्यांना सुरक्षित व सर्व सुविधांयुक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरिता संस्थेमार्फत ‘मैत्रेयी’, ‘महिला निवास-नातूबाग’ ंआणि आता ‘गार्गी’ ही तीन वसतिगृह सज्ज आहेत.
 
 
पुण्यात एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी किंवा नोकरी करणार्‍या महिलांसाठी राहण्याची उत्तम सोय, सुरक्षितता, सुसज्ज अशी अंतर्गत सजावट, खोलीत संलग्न स्वच्छतागृह, भोजनाची व्यवस्था, पार्किंग अशा सर्व सुखसोयींनी युक्त असे हे ‘गार्गी’ वसतिगृह आहे.
 
 
दि. 1 मार्च 2025 पासून या वसतिगृहात प्रवेश दिला जात आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेले हे वसतिगृह स्त्रियांसाठी अनेक दृष्टीने सोयीचे व सुरक्षित असे तिच्या घरापासून लांब असे दुसरे घरच आहे.
 
लेखिका महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत.