कोणत्याही प्रकारचा भेदभावविरहित समरस, एकरस हिंदू समाजजीवन निर्माण करणे हेच संघाचे ध्येय आहे. या अवस्थेलाच संघ ‘हिंदू संघटन’ म्हणतो.
अत्यंत प्राचीन काळापासून एक प्रगत व सुसंस्कृत समाज म्हणून आपण या भूमीत राहत आलो आहोत. सभ्य व सुसंस्कृत समाजजीवन सर्वप्रथम येथे विकसित झाले. त्याला येथील भूगोलदेखील कारणीभूत आहे. उत्तरेकडे हिमालय व दक्षिणेकडे सागराने या भूमीचे रक्षण होते. वनस्पतींची विविधता, नद्यांची विपुलता या भूमीत होती. शेतीला पुष्कळ जमीन उपलब्ध होती. समाजजीवन सरळ, सुरक्षित व शांत असावे. त्यामुळे अध्ययन, चिंतन, संशोधन, प्रयोग करण्यास वातावरण अत्यंत अनुकूल होते. प्राचीन ‘प्रज्ञा प्रवाह’ गतिमान असला पाहिजे. ज्ञानाच्या अनेक शाखांचा जन्म या भूमीत झाला आहे. मी कोण? हे अस्तित्व म्हणजे काय? माझा व या अस्तित्वाचा काही संबंध आहे का? माझ्या जन्माचे प्रयोजन काय? जन्म-मृत्यू काय आहेत? असे प्रश्न कुठल्याही मानवसमूहामध्ये उभे राहाणे स्वाभाविक आहे. आपल्या पूर्वजांनी याची जी उत्तरे हजारो वर्षांपूर्वी शोधून काढली ती विज्ञानाच्या कसोटीवर आजही खरी उतरली आहेत.
1. अस्तित्वाची रचना अखंड मंडलाकार आहे. (अखंड मंडलाकारम् व्याप्त सर्व चराचरम्)
2. मानव-मी म्हणजे शरीर, मन, बुद्धी, आत्मा.
3. अखिल अस्तित्व एकाच चैतन्याचा आविष्कार आहे. (सर्वम् खलु इदं ब्रह्म)
4. मानवदेखील त्या अस्तित्वाचा अविभाज्य अंग आहे. (तत् त्वम् असि.)
मानवी मन व बुद्धीची धारणाशक्ती इतकी आश्चर्यकारक आहे की मनुष्य या तत्त्वांची अनुभूती घेऊ शकतो. त्यातच मनुष्य जीवनाचे सार्थक आहे.
आपल्या संविधानाच्या मूळ प्रतिमध्ये चोवीस चित्रांचा समावेश केला आहे. मोहंजोदडो उत्खननात सापडलेल्या धष्टपष्ुट नंदीबैलाचे पहिले चित्र आहे. दुसरे चित्र प्राचीन श्री गुरुकुलाचे आहे. आपला देश कृषीप्रधान आणि ऋषीप्रधान आहे. कृषी म्हणजे शेती. ॠषी म्हणजे ज्ञान; ज्ञान म्हणजे सत्याचे ज्ञान!
मानवाला मी म्हणजे केवळ शरीर नाही हे कळले पाहिजे. एकच चैतन्य तत्त्व सर्वत्र विराजमान आहे हे कळले पाहिजे. आपल्याला भूक लागते तशी दुसर्याला पण भूक लागत असली पाहिजे हे त्याला कळले पाहिजे. ‘इंटर’ला शिकत असताना उपनिषदातील एक कथा वाचनात आली होती. श्री गुरुकुलातील शिक्षण संपवून दोन भाऊ घराकडे जाणार होते. वाटेत जेवण्यासाठी भाकरी-भाजीची शिदोरी गुरुकुलातून बांधून दिली होती. दुपारी जेवणाच्या हेतूने शिदोरी घेऊन बसले. इतक्यात एक याचक भाकरी मिळेल या हेतूने त्यांच्या जवळ आला. धाकट्या भावाने त्यास भाकरी देण्यास नकार दिला. आम्हालाच पुरणार नाही आणि तुला कुठून द्यायची? मोठ्याने धाकट्याला एक धपाटा मारला व म्हणाला, “बारा वर्षे विद्या शिकून ‘तत् त्वम असि’ हे सत्य विसरलास काय? तुझ्यातील चैतन्य व त्याच्यातील चैतन्य एकच आहे. त्याला जर भाकरी नाकारलीस तर तुला देखील या भाकरीला हात लावण्याचा काही अधिकार नाही.” त्या कथेचे नावच ‘तत्त्वमसि’ होते.
1. सर्वम् खलु इदम् ब्रह्म 2. तत्त्वमसि अशा वैश्विक शाश्वत सत्यावर आधारित येथील जीवनशैलीचा विकास झाला. त्याला ‘आध्यात्मिक जीवनशैली’ म्हणतात.
आध्यात्मिक जीवनशैली सर्वकल्याणकारी, पर्यावरणप्रेमी, दीर्घकाल उपयोगी, मानवतावादी जीवनशैली आहे. आध्यात्मिक विचार ‘तत्त्वमसि’ या सत्यावर आधारित असल्यामुळे ‘मैं नहीं तू ही’ हा विचार व्यवहारात सर्व सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्रिया-कलापांमध्ये प्रभावी होता. विषमता, उच्चनीचता, भेदभाव याला स्वाभाविकच स्थान नव्हते. सुख, समृद्धी, ज्ञान, आनंद देणारे जीवन असले पाहिजे. शांत, समरस, सुरळीत चालणारे, आपपर भाव नसलेले समाजजीवन हजारो वर्ष चालले असावे.
सध्या आपल्या देशातील समाजाची स्थिती पाहिली की, सर्वकल्याणकारी, भेदभावरहित, समरस समाजजीवन येथे कधीकाळी होते. यावर विश्वासच बसत नाही! समरसतेची सरस्वती लुप्त केव्हा आणि कशी झाली? हे कळलेच नाही! ‘मैं नहीं तू ही’ या निरहंकारी जीवनशैलीचा लोप झाला. अहंकार वाढवणारी जीवनशैली प्रभावी झाली. शिक्षणाचा, संपत्तीचा, कुटुंबाचा, आपल्या गटाचा अहंकार, धंद्याचा, भाषेचा, वेशाचा इ. कशाचाही अहंकार हा येथील व्यक्तीचा स्वभाव झाला. ‘मी आणि माझे’ हा विचार प्रभावी होत गेला. माणसा-माणसांतील दुरी वाढली. परचक्रापुढे देश टिकला नाही. सुमारे हजार वर्ष देश गुलामीत राहिला. वंश-श्रेष्ठता, उच्च-नीचता, स्पृृश्यास्पृश्यता, अनैतिकता अशा अनेक रोगांनी हिंदू समाजात घर केले. स्वामी विवेेकानंद, महर्षी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आांबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, नारायणगुरू आदि पूजनीय महापुरुषांनी या रोगातून आपला समाज मुक्त व्हावा म्हणून प्रयत्न केले. या रोगांनी घेतलेली समाजमनाची पकड थोडी ढिली झाली आहे खरी; पण रोगच इतका जुनाट आहे, हाडीमांसी खिळलेला आहे की, केवळ काही महापुरुषांच्या प्रयत्नांनी समाज रोगमुक्त होणार नाही. मनोरोगांनी पीडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या रोगातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा झाली पाहिजे. “जाती तोडा, अहंकार सोडा” अशा घोषणांनी व आंदोलनांनी रोग संपूर्ण समाजातून जाणार नाही. रोग जुनाट असल्यामुळे उपाय जालीम करावा लागेल. रोगमुक्त व बंधुत्वाच्या नात्याने भारलेला एकसंध समाज निर्माण होईपर्यंत धैर्याने दीर्घकाळ औषध घ्यावे लागेल. आपण कोणत्या असाध्य रोगावर औषध घेत आहोत असे वाटता कामा नये. होेमिओपॅथीमधील औषधाप्रमाणे उपचार असावा. साबुदाणा एवढ्या साखरेच्या गोळ्या खात असताना आपण औषध घेत आहोत असे वाटत पण नाही.
संघनिर्माता पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी समाजाच्या विघटीत अवस्थेचे व पराभवाचे सखोल चिंतन केले होते. उच्च-नीचता व अस्पश्ृयता याच्या गाठी समाजाच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झाल्यामुळे एकमकेांपासून दूर जाण्याचा त्याचा स्वभाव झाला आहे. वर्णश्रेष्ठत्वाचा भार तर आहेच, जाती-उपजातीचे पण अभिनिवेश भरलेले आहेत. मुंबईतील धारावी वस्ती सर्व परिचित आहे. मेलेल्या जनावराचे चामडे बाजूला करणारे एक कुटुंब व त्या चामड्याच्या चपला तयार करणारे दुसरे कुटुंब! पण दोघेही एकमेकांकडे जाणार नाहीत, तेथे पाणी पिणार नाहीत. रोटी व्यवहारच नाही तर बेटी व्यवहार दूरच! भेदाभेद शोधायला जावे तर पाय चिखलामध्ये खोल-खोल रुततच जाईल.
डॉक्टरांचे निरिक्षण, विश्लेषण, निष्कर्ष सर्वांपेक्षा वेगळे व सर्वांना पटणारे होते. ‘समाजबांधवांचा एकमेकांपासून दूर जाण्याचा स्वभाव बनला आहे’ असा कोणता विषय आहे की, भेदाभेदांच्या वर उठून एकत्र येण्याची प्रेरणा मिळेल. भारत आपली माता आहे. आपण सर्व तिचे संतान आहोत. भारतमातेला वैभवशाली बनवणे हे आपले कर्तव्य आहे. हा विचार कायम पिढी दर पिढी प्रेरणा देत राहील. डॉक्टरांनी प्रयोग म्हणून संघशाखा प्रारंभ केली.
डॉक्टरांनी अजून एक प्रेरणा सूत्र शाखेला जोडले. ते म्हणजे “तू हिंदू-मी हिंदू, आपण दोघे बंधू-बंधू” जातीचा-वर्णाचा विचारच नाही. एक तासाच्या शाखेत खेळाला फार महत्त्व आहे. बाल, किशोर, तरुण, खेळाच्या आकर्षणामुळे संघशाखेत जमा होऊ लागले. खेळामध्ये कबड्डीला जास्त महत्त्व आहे. कबड्डीमध्ये बाद झालेला खेळाडू परत जिवंत होतो. ‘अमरत्वाचा संदेश देणारा खेळ’. अस्पृश्यता कुठल्या कुठे पळून जाते! मनात विचारच येत नाही. कबड्डी म्हणजे समरसतेचा धबधबा! संघ शाखा म्हणजे होमिओपॅथीची साखरेची गोळी.
‘तत्त्वमसि’ या शाश्वत सत्याच्या प्रकाशात शाखा चालते. ‘दुसर्याची चिंता करणे’ ही शाखेच्या यशाची गुरुकिल्ली आहे. ‘भाऊ म्हणून एकमेकांकडे सहज जायचे.’ अडी-अडचणींमध्ये मदत करायची. कोणी आजारी असेल तर विशेष काळजी करायची. स्वयंपाकघरापर्यंत स्वयंसेवकाचा संपर्क हवा. संघ शाखा म्हणजे समरसतेचा व्यवहार! ‘मैं नहीं तू ही’ याचे आचरण म्हणजे शाखा.
शरीरामध्ये रक्ताभिसरणाचे जे महत्त्व आहे. तेवढेच समाजामध्ये सामाजिक अभिसरणाचे-सामाजिक समरसतेचे महत्त्व आहे. रक्तवाहिन्यांमध्ये कुठे ‘ब्लॉकेज’ झाले तर सर्व कामे चालू असताना देखील एन्जिओप्लास्टी अथवा बायपास करून ‘ब्लॉकेज’ काढावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बायपास सर्जरी करून बौद्ध धम्माचा मार्ग प्रशस्त केला आहे. ‘समरसतेची सरस्वती’ पुन्हा प्रवाहित करून छोटे-मोठे अवरोध जे कुठे असतील ते‘सरस्वती’च्या महानदामुळे दूर करावे लागतील. बंधुभावनेचा ‘तत्त्वमसि’ हा धार्मिेक आधार जागा करावा लागेल. शाश्वत व वैश्विक सत्यावर आधारित (आध्यात्मिक सत्यावर आधारित) समाजजीवनाची पुनर्रचना करावी लागेल.
कोणत्याही प्रकारचा भेदभावविरहित समरस, एकरस हिंदू समाजजीवन निर्माण करणे हेच संघाचे ध्येय आहे. या अवस्थेलाच संघ ‘हिंदू संघटन’ म्हणतो.
सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार, श्रीगुरुजी व बाळासाहेब देवरस हे प्रारंभापासूनचे सहकारी राहिलेले स्वयंसेवक आहेत. 1925 पासून 1994 पर्यंत म्हणजे संघाच्या सुरुवातीपासून सुमारे 70 वर्षे हेच तीन स्वयंसेवक एकानंतर एक परम पूजनीय सरसंघचालक पदावर राहिलेले आहेत. संघस्वयंसेवकांना त्यांनी केलेले मार्गदर्शन नमुना म्हणून थोडक्यात त्यांच्याच शब्दात पाहू.
आपले कार्य सार्या हिंदू समाजाचे असल्याने त्याच्या कोणत्याच अंगाची उपेक्षा करून चालणार नाही. सार्या हिंदू बांधवांशी आपल व्यवहार स्नेहाचा हवा. कोणाही हिंदूला हीन समजून दूर ढकलणे पाप आहे. संघस्वयंसेवकांच्या मनात अशा प्रकारच्या संकुचित भावनेला थारा मिळता काम नये. हिंदुस्तान देशावर प्रेम करणार्या प्रत्येक व्यक्तीशी आपला व्यवहार बंधुतेचा असला पाहिजे. लोक आपल्याविषयी काय म्हणतात याला काही अर्थ नाही. आमचा व्यवहार जर आदर्श असेल तर सारे हिंदू आमच्याकडे आकर्षित होतील.
संघटनशास्त्र स्पृश्यास्पृश्यता ओळखत नाही. मग तो ब्राह्मण असो वा महार असो. गरीब-श्रीमंत हा भेद संघटनेला ठाऊक नाही. ब्राह्मण किंवा महार, श्रीमंत किंवा दरिद्री, विद्वान किंवा अविद्वान अशा सर्वांना संघात प्रवेश आहे. मग तो नागपूरला जन्मलेला असो किंवा गंगोत्रीला जन्माला आलेला असो... संघात प्रत्येक हिंदूला प्रवेश आहे.
‘जात-पात, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण असा कोणताही भेद न मानता हिंदू बांधव एकत्र येऊ शकतात’, याचा प्रत्यय शाखा कार्यपद्धतीमुळे स्वयंसेवकांना येऊ लागला होता. 1934 साली वर्धा येथील झालेल्या संघशिबिरामध्ये सर्व जाती-जमातीचे स्वयंसेवक पाहून व सर्वांची निवास, भोजन, पिण्याच्या पाण्याची एकत्र व्यवस्था पाहून महात्मा गांधीही प्रभावित झाले होते. 1940ला नागपूरला झालेल्या संघ शिक्षा वर्गामध्ये देशभरातून आलेले सुमारे दीड हजार स्वयंसेवक भावंडांप्रमाणे चाळीस दिवस एकत्र राहिले. प.पू. डॉक्टरजी, श्रीगुरुजी व बाळासाहेब देवरस आदी सर्वचजण अत्यंत आनंदित झाले. भेदभावरहित समरस, एकरस हिंदू समाजाचे दृश्य रूप ते अनुभवत होते.
समरसतेच्या सरस्वतीचा लुप्त झालेला प्रवाह डॉ. हेडगेवारांच्या ‘यज्ञाहुती’मुळे पुन्हा प्रवाहीत झाला होता. श्रीगुरुजींनी त्याची गतीही वाढविली व तो प्रवाह भारतभर प्रवाहीत केला. 700 शाखांच्या 11,000 शाखा झाल्या. असेच संघकार्य वाढत गेले असते तर एकरस, समरस समाजाचे चित्र केव्हाच सर्वांना अनभुवता आले असते.
नियतीच्या मनात संघ शाखांच्या समरस समाज निर्माण करण्याच्या कार्यपद्धतीची कठोर कसोटी पाहण्याची इच्छा का झाली? ते कळत नाही. महात्मा गांधींच्या हत्येचा भयंकर खोटा आरोप स्वतंत्र भारताच्या सरकारनेच संघावर ठेवला. संघावर प्रतिबंध लादला. शाखा बंद झाल्या. प्रवाह आटला. ‘संघ हिंसावादी आहे. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे, ब्राह्मण्यवादी आहे,‘ असे विष जनमानसात कालवले गेले.
न्यायालयाने संघ दोषी नाही हा निर्णय दिला. तरीपण बंदी हटावी म्हणून सत्याग्रह करावा लागला. बंदी उठली; संघ शाखा कार्य पुन्हा प्रारंभ झाले. एकरस, समरस समाजाच्या निर्मितीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवूनच संघशाखा कार्यरत झाल्या. परंतु पूर्वग्रह व गैरसमज यामुळे समाज व संघ यांमधील दरी वाढली. समरसतेच्या वाहत्या प्रवाहाऐवजी जागोजागी साचलेल्या पाण्यासारखी स्थिती उत्पन्न झाली.
अशा कठीण काळामध्ये डॉ. हेडगेवार यांनी निवडलेले माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) परम पूजनीय सरसंघचालक पदी होते. आध्यात्मिक साधनेने ‘एकच चैतन्य सर्वत्र विराजमान आहे’ याची अनुभूती घेतलेले त्यांचे जीवन होते. तुरुंगातून बाहेर आल्यावर पहिल्याच प्रवासात त्यांनी स्वयंसेवकांना केलेले मार्गदर्शन पाहा.
1. गेली दीड वर्ष थांबलेले कार्य आपण पुन्हा उत्साहाने सुरू करू या. मात्र आपण कोणाहीबद्दल द्वेषबुद्धी बाळगू नये. शुद्ध व पवित्र मनाने, धैर्याने परंतु वेगाने काम करून संघबंदीच्या काळातील कसर भरून काढावयाची आहे. आपल्याच समाजबांधवांविषयी द्वेषाची व घृणेची भावना ठेवणे आपल्याला शोभून दिसत नाही. आपलेच दात व आपलीच जीभ. जीभ दाताखाली चावली गेली म्हणून कोणी दात पाडत नाही. झाले गेलेले विसरून जा.
2. सर्वांना एकत्र आणून पंथ, जाती आदींच्या आधारावर नव्हे तर समाज, राष्ट्र हा चिरंतन आधार घेऊन एक सुसूत्र, एकरस, संघटित समाज उभा करावयाचा आहे. कोणतेही भेद राहू द्यावयाचे नाहीत, हाच संघाचा विचार आहे.
3. अस्पृश्यता सवर्णांच्या संकुचित मनातील रोग आहे. अस्पृश्यता नाहीशी करणे म्हणजे सवर्णाच्या संकुचित मानसिकतेत परिवर्तन करणे. ‘अस्पृश्यता हे धर्माचे अंग आहे आणि धर्माचे उल्लंघन हे महत्पाप आहे’ अशी समाजातील बहुसंख्य सामान्य जनांची समजूत आहे. स्वतःला उच्चवर्णीय मानणारे लोक तथाकथित अस्पृश्याला आपल्याबरोबरीने वागवण्यास तयार नाहीत. राजस्थानात एका हरिजन युवकाने मिशा ठेवल्या. या कारणास्तव त्याला बेदम झोडपून ठार मारल्याचे अलीकडेच वृत्त वाचले का? तर ‘मिशा ठेवणे’ हा केवळ क्षत्रियांचा अधिकार आहे. कोणी धर्माचार्याने या घटनेचा ‘निषेध’ केला नाही.
4. ‘अस्पृश्यता धर्मास मान्य नाही’ असे धर्माचार्यांनी घोषित करावे, असा प्रयत्न श्रीगुरुजींनी केला. 1969च्या उडुपी येथील विश्व हिंदू परिषदेच्या अधिवेशनात उपस्थित सर्व धर्माचार्यांनी सर्वानुमते अस्पृश्यतेला कोणत्याही धार्मिक अनुष्ठानात स्थान नाही अशा अर्थाचा प्रस्ताव मान्य केला. “हिंदवः सोदरा सर्वे” हा मंत्र समाजाला दिला.
5. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बनारस हिंदू विद्यापीठात मी शिकत होतो. तेव्हा एका हरिजन विद्यार्थ्याने आपल्या भोजनाची अडचण असल्याचे सांगितले. मी मित्रांबरोबर बोललो. सर्वांनी त्या विद्यार्थ्यांची आपल्याबरोबर भोजनाची विनाशुल्क व्यवस्था करण्याचे मान्य केले. ही व्यवस्था दोन वर्षे चालली.
6. जीर्ण-शीर्ण झालेली जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था मोडून एक वर्ग निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. त्यातूनच नवीन समाजरचना निर्माण होईल.
7. कोणतीही प्राचीन व्यवस्था जात असेल तर अश्रू गाळण्याची आवश्यकता नाही आणि नवी रचना येत असेल तर पुढे होऊन स्वागत करावे. समाजाची एकता कायम राहावी हे महत्त्वाचे आहे.
पूजनीय बाळासाहेब देवरस म्हणतात -
“संपूर्ण हिंदू समाजाच्या हितासाठी, संपूर्ण हिंदू समाजाला एकात्म, चारित्र्यसंपन्न, स्वाभिमानपूर्ण आणि पराक्रमी व पुरुषार्थप्रवण बनविण्यासाठी संघाचे कार्य चालू आहे. एखाद्या जातीपुरता तो मर्यादित राहूच शकत नाही, सर्वांना अनुभवाने हे कळून चुकले आहे की आम्ही जातपात मानत नाही स्पर्शास्पर्श मानीत नाही. चातुर्वर्ण्य आम्हाला मान्य नाही. संपूर्ण हिंदू समाज एक आहे, समान आहे, ही आमची प्रारंभापासूनची धारणा आहे आणि आम्ही आमच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने जातीगत दुर्भावना समाप्त करीत आलो आहोत. मी अभिमानाने सांगू इच्छितो की, जाती-जाती, संप्रदाय-संप्रदाय, भाषा-भाषा यांच्यात जेवढे सामंजस्य आणि सौहार्द संघात आहे, तेवढे अन्यत्र कुठेही नाही.”
”सामाजिक विषमतेचा एक अविष्कार अस्पृश्यता हा आहे. आपल्या समाजातील हा अत्यंत दुःखदायक व दुर्दैवी प्रकार आहे. अस्पृश्यता ही चूक आहे. अस्पृश्यता जर पाप नसेल तर जगात काहीच पाप नाही. it must go lock stock and barrel! या देशाच्या उद्धाराकरिता हिंदुसंघटन आवश्यक आहे आणि हिंदुसंघटन होण्याकरिता सामाजिक समता आवश्यक आहे.
ज्यांना समाजाचे परिवर्तन अभिप्रेत आहे, त्यांना स्त्रीजीवनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समाजाचे अर्धांग स्त्री आहे. समाजाचा हा भाग दुबळा राहून चालणार नाही.
उत्पादनातून होणारा फायदा सर्व ठिकाणी अशा तर्हेने पोहोचला पाहिजे की, ज्यामुळे सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावेल.
आजच्या संघाचे स्वरूप पहिल्या तीन सरसंघचालकांच्या मार्गदर्शनानुसार तयार झालेले आहे. समाजाच्या अनेक क्षेत्रांमध्ये स्वयंसेवकांनी संस्थागत कामे उभी केली आहेत. संस्थागत कामांमध्ये महिलांचा सहभाग वाढतो आहे. कामाचा प्रकार कोणताही असो समरसता व एकरसता साध्य करणे, हे महत्त्वाचे मानले जाते. आंतरजातीय विवाहाला संघाचा मुळीच विरोध नाही. अनेक स्वयंसेवकांनी तसे केले आहे; पण त्याची प्रसिद्धी करणे म्हणजे जात न विसरणे असे होईल. प. पू. श्रीगुरुजी व बाळासाहेब देवरस अशा विवाहांना उपस्थित राहिले आहेत.
आपत्काळामध्ये (आणीबाणी) संघावर प्रतिबंध घातला होता. नियतीचा खेळ अनुभवायला मिळाला. 1948च्या बंदीमुळे संघकार्याची खूप पीछेहाट झाली होती. (म. गांधीच्या हत्येचा धादांत खोटा आरोप सरकारने संघावर ठेवला होता.). 1975-76च्या बंदीमुळे संघाच्या कामाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला. कार्य दुप्पट वेगाने वाढू लागले. सध्या 80 हजार संघ शाखा आहेत. समरसतेच्या सरस्वतीचा प्रवाह प्रत्येक गावात पोहोचावा या हेतूने प्रयत्न चालू आहेत.
स्वामी विवेकानंदांचे वचन लवकरच साकार होईल असे वाटते. ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यायलेले, दीन-दलितांबद्दल अपार करुणा असलेले, सहस्रो युवक-युवती हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत संचार करतील. मुक्ती, सेवा, सामाजिक उत्थानाचे सर्व प्रकारच्या समानतेचे ते आवाहन करतील व हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल असा मला विश्वास वाटतो.
’तत्त्वमसि’ हे वैश्विक सत्यच सामाजिक समरसतेचा, बंधुभावनेचा, समतापूर्ण व्यवहाराचा आधार होऊ शकते. ‘मैं नहीं, तू ही’ अशी आचरणाची दिशा राहिली तर कोणत्याही प्रकारचा भेदभाव शिल्लकच राहणार नाही. ’बहिष्कृत भारत’च्या एका अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की, ‘हिंदू धर्माचा सिद्धांत ख्रिस्ती व मोहम्मदी धर्माच्या सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीने समतेच्या सिद्धांताला पोषक आहे. माणसे ही ईश्वराची लेकरे आहेत. एवढ्यावरच न थांबता ती ईश्वराची रूपेच आहेत. असे मोठ्या निर्भीडपणे हिंदूधर्म सांगत आहे. जिथे सारीच ईश्वराची रूपे आहेत. तेथे कोणी उच्च, कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही. हे हिंदू धर्माचे महान ओजस्वी तत्त्व आहे. समानतेचे साम्राज्य स्थापन होण्यास यापेक्षा मोठा आधार सापडणे कठीण आहे.’
’तत्त्वमसि’ या आध्यात्मिक सत्याबद्दल राष्ट्रव्यापी समाज प्रबोधन करावे लागेल. जे शाखेत आहे; ते समाजात यावे, या हेतूने ‘समरसता गतिविधी’ असा स्वतंत्र विभाग संघाने प्रारंभ केला आहे. साधुसंत, धर्माचार्य, आध्यात्मिक प्रबोधन करू शकतात. untouchability should go lock, stock and barrel ही ’राष्ट्रीय महेच्छा’ झाली पाहिजे.