केशवाय नमः

दिव्य देसम् - 2

विवेक मराठी    08-Mar-2025   
Total Views |
@अनुष्का आशिष

vivek
‘दिव्य देसम्’मधील 108 पैकी जी 106 मंदिरे पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत, त्यामध्ये काही धागा असेल का? हीच मंदिरे आळ्वारांनी का बरं निवडली असतील? या मंदिरांमध्ये असं काय खास आहे? या गोष्टींचा आढावा या लेखात घेतला आहे.
’दिव्य देसम्’ नामक अनुभूतीची जाणीव श्रीरंगम्च्या श्रीरंगनाथस्वामी मंदिरात झाली. दक्षिणेतील वैष्णवांसाठी ’श्रीरंगम्’ हे नाव किती अलौकिक आहे, जिव्हाळ्याचे आहे, याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. ’श्रीरंगम्’ हे 108 मंदिरांपैकी पहिले दिव्य देसम् आहे. मात्र, ’श्रीरंगम्’वर लिहिण्याआधी अजून काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकणे मला आवश्यक वाटतेय. या मंदिरांचा विचार करताना मला बरेच प्रश्न पडायचे. या पृथ्वीतलावर जी 108 पैकी 106 मंदिरे अस्तित्वात आहेत, त्यांमध्ये काही धागा असेल का? हीच मंदिरे आळ्वारांनी का बरं निवडली असतील? या मंदिरांमध्ये असं काय खास आहे? भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास तामिळनाडू- केरळ- आंध्रप्रदेशच्या मंदिरांना, आळ्वरांनी भेटी देणे त्यामानाने सोपे होते. मात्र, पाचव्या-सहाव्या शतकांत भारताच्या उत्तरेकडील ती मंदिरे आळ्वारांना माहीत होती. अर्थात उत्तरेची मंदिरे अतिप्राचीन काळापासून विख्यात होतीच. याचा सरळ अर्थ असा आहे की, दक्षिण-उत्तर असा फार मोठा भेद तेव्हा नव्हताच. भले संस्कृती वेगळी असेल; पण दक्षिण-उत्तरेला एकत्र करणारा ’सनातन’ किंवा ’हिंदू’ धर्माचा धागा मात्र चिवट व बळकट होता.
 

Divya Desam  
 
रामायण-महाभारत ही आपली महान इतिहासरूपी काव्यं आहेत. आज आसेतुहिमालय मंदिरांवर रामायण आणि महाभारतातल्या कथा कोरल्या आहेत. इतक्या विशाल भारतातील मंदिरांवर कोरलेल्या कथांमध्ये अविश्वसनीय वाटावी इतकी समानता आहे. चालू परिस्थितीचा विचार करता ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. प्राचीन काळापासून आपल्या भारतवर्षात अतिशय श्रेष्ठ संस्कृती नांदली, याचा नक्कीच अभिमान वाटतो. दळणवळणाच्या सोयी नसतानाही, संपर्काची कोणतीही साधने नसतानाही आळ्वारांनी इतका दूर प्रवास केला होता. या स्थानांमध्ये नेपाळमधील ’मुक्तिनाथाचा’ समावेश असल्याचे पाहून तर मला अतीव आश्चर्य वाटले होते. नेपाळ-तिबेटच्या सीमेवर ट्रान्स हिमालयातील मुश्तांग पर्वतराजीतील मुक्तिनाथाला जाणे आजही कठीण आहे. मग पंधराशे वर्षांपूर्वी आळ्वार कसे गेले असतील? कोण जाणे...
----------------------------------------------- 
 
हे पण वाचा...

दिव्य देसम् - वैष्णव परंपरेचे वैशिष्ट्य 

https://www.evivek.com//Encyc/2025/2/8/The-Sacred-108-Divya-Desam-Temples-of-India-article-1.html
 
 -------------------------------
’दिव्य देसम्’ मंदिरांचा बारकाईने विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात आली. महाराष्ट्रात आणि उत्तरेत श्रीविष्णूची, ’श्रीविष्णू’ रूपातील मंदिरे फार थोडी आहेत. आपल्याकडे श्रीविष्णूच्या अवतारांची, त्यांतही राम-कृष्णाची मंदिरे जास्त आहेत. दक्षिणेत मात्र श्रीविष्णूचे मूळ रूप म्हणजे ’पेरुमाळ’ची मंदिरे आहेत. दशावतारातील ’मत्स्य’, ’कूर्म’, ’वराह’, ’नरसिंह’, ’वामन’ यांची मंदिरे मी दक्षिणेतच जास्त पाहिली. याचा अर्थ असा नाही की, राम-कृष्णाची मंदिरे तिथे नाहीत. कुंभकोणम् इथल्या रामास्वामी मंदिराला ’दक्षिणेची अयोध्या’ म्हटले जाते, तर केरळमधील अतिशय लोकप्रिय असलेल्या ’गुरुवायूर’ मंदिराला ’दक्षिणेची द्वारका’ म्हणतात. उडुपीतील श्रीकृष्ण मठाला मध्वाचार्यांची प्राचीन थोर परंपरा आहे. दशावतारांसारखीच श्रीविष्णूची चोवीस रूपे आहेत. उदा., ’केशव’, ’नारायण’, ’अच्युत’, ’गोविंद’, ’वासुदेव’, ’माधव’, ’हृषीकेश’, ’प्रद्युम्न’, ’मधुसूदन’ इ. ही फक्त नामे किंवा रूपे नाहीत; तर या मूर्तीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. या मूर्तींंचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे श्रीविष्णूच्या चार हातांत चक्र व गदा ही आयुधे आणि शंख, पद्म ही लांच्छने असतात. या आयुध व लांच्छनांचा जो क्रम असतो त्यावरून श्रीविष्णूचे कोणते रूप आहे ते ठरते.
 

vivek 
कर्नाटकातील बेलूर येथील
चेन्नकेशवा मंदिरातील नरसिंह
 
माझ्या वाचनानुसार, श्रीविष्णूच्या या रूपांचा विचार होयसळ सम्राटांनी जेवढा केला तेवढा कोणी केला नाही. नाही म्हणायला गुजरातच्या पाटण येथील ’रानी की वाव’ मध्ये यांपैकी पंधरा मूर्ती कोरल्या आहेत. मात्र होयसळ राजांनी अशी मुख्य मूर्ती असलेली मंदिरे बांधून घेतली. कर्नाटकातील बेलूरच्या ’चेन्नकेशवा’ मंदिराभोवती चोवीस नामांपैकी नऊ मूर्ती कोरल्या आहेत. गाभार्‍यात केशवाची मूर्ती आहे. या दहाही मूर्तींचा, त्यांनी धारण केलेल्या आयुधांचा क्रम बदललेला आहे. होयसळ मंदिरांत श्रीविष्णूच्या अजून एका रूपाचे दर्शन घडते ते म्हणजे अतिशय मोहक, देखणा असा ’वेणुगोपाळ’. होयसळ मंदिरांतील मूर्ती व कोरीवकाम हा अतिशय अलौकिक विषय आहे.
 
कोकणात मात्र श्रीविष्णूच्या मूळ स्वरूपातील मंदिरे बघावयास मिळतात. दिवेआगरचा ’सुंदरनारायण’ व ’रूपनारायण, आसूदचा ’केशवराज’, कोळीसरे व बिवलीचा ’लक्ष्मीकेशव’ ही होत. ’वामन’, ’त्रिविक्रम’, ’नरसिंह’ व ’कृष्ण’ ही नामे चोवीस नामांत येतात. वामन अवतारात, बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात धाडणार्‍या श्रीविष्णूंच्या भव्य-दिव्य रुपांची मूर्ती मंदिरे दक्षिणेत आहेत. मूर्तिशास्त्रात ज्या श्रीविष्णूचा पाय उंचावलेला असतो, त्या मूर्तीला ’त्रिविक्रम’ किंवा ’थिरूविक्रम’ म्हणतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ’वामन’ आणि ’त्रिविक्रम’ या दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या आहेत.
 

vivek 
आपल्या भारतात स्वयंभू महादेवाची अनेक मंदिरे आहेत. मात्र, श्रीविष्णूची स्वयंभू स्थाने फक्त आठ आहेत. ’बद्रिनाथ’, ’तिरुपती’, ’मुक्तिनाथ’, ’नैमिषारण्य’, ’पुष्कर’, ’श्रीरंगम’, ’श्रीमुष्णम’ व ’नानगुणेरी वनमामलई’. यांपैकी ’पुष्कर’ व ’श्रीमुष्णम’ सोडले तर उरलेली मंदिरे ही ’दिव्य देसम्’मधील 108 मंदिरांत येतात.
 
’नालयिरा दिव्य प्रबंधम्’ या प्राचीन ग्रंथातील वर्णनाप्रमाणे, ’दिव्य देसम्’ मंदिरांतील ’मूळावरम्’ म्हणजे मुख्य श्रीविष्णूची मूर्ती या उभ्या अवस्थेत (निंद्रा थिरूकोलम) बसलेल्या अवस्थेत (वित्रिरुंध थिरूकोलम) व शयन अवस्थेत (किदांता थिरूकोलम) आहेत. 108 मंदिरांपैकी उभ्या मूर्ती (60), बसलेल्या मूर्ती (21) तर शयन अवस्थेत (27) मूर्ती आहेत. किदांता थिरुकोलम विग्रहांना ’रंगनाथन’ किंवा प्रेमाने ’रंगा’ असे संबोधले जाते. पूर्व दिशेकडे मुख असलेले ‘मूळावरम्’ (79), पश्चिम दिशेला (19), उत्तरेकडे (3) तर दक्षिणेकडे मुख असलेल्या (7) मूर्ती आहेत. या मंदिरांमध्ये ’थेनकलई’ व ’वदकलई’ अशा दोन पद्धतीने पूजा चालतात.
 
तामिळनाडूच्या अतिदक्षिणेच्या भागात ‘थेनकलई’ व तामिळनाडूच्या उत्तर भागात ‘वदकलई’ची पूजा पद्धत अंगीकारली जाते. थेनकलई पद्धतीत फक्त तामिळ भाषेचा उपयोग होतो तर वदकलई पद्धत तामिळबरोबरच संस्कृतशी नाते सांगते. प्रत्येक मंदिरात पेरुमाळची मूर्ती व लक्ष्मीदेवीची (थायर/ नच्चियार) व ज्या आळवरांनी पेरुमाळचे स्तुतिस्तोत्र गायले, त्यांच्या मूर्ती असतात. याशिवाय ’दिव्य देसम्’ मंदिरातील पेरुमाळचे व थायरचे नाव वेगवेगळे असते. आपण मंदिरात गेल्यावर त्याच नावाने प्रार्थना करणे अपेक्षित असते. तसेच प्रत्येक मंदिराशी निगडीत कथा असतात. त्या स्थळपुराणात वर्णन केलेल्या मूर्ती गाभार्‍यात असतात. पेरुमाळच्या अतिशय सुंदर आणि भव्यदिव्य मूर्ती बघणे हा एक आनंददायक अनुभव असतो. दक्षिणेतल्या मंदिरांचे गाभारे अंधारलेले असतात. तिथे तेला-तुपाच्या दिव्यांचा मंद प्रकाश असतो. त्यामुळे ही मंदिरे, त्यांची गर्भगृहे अतिशय गूढ व रहस्यमयी वाटतात.
 
आताच्या तामिळनाडूमध्ये सगळ्यांत जास्त म्हणजे (84) मंदिरे आहेत, तर केरळ (11), आंध्र प्रदेश (2), गुजरात (1), उत्तरप्रदेश (4), उत्तराखंड (3) तर नेपाळमध्ये (1) मंदिर आहे. प्राचीन काळी ही मंदिरे चोळ नाडू, पल्लव नाडू, वद नाडू इ. नावांमध्ये विभागली होती. बहुतकरून ही स्थाने पेरुमाळच्या चोवीस नामांपैकी एका नामाशी तरी निगडीत असतात. जसे आंध्रातील ’अहोबिळम’ स्थान ’नरसिंहाशी’ तर द्वारका हे ’कृष्णाशी’ संबंधित आहे. केरळ व तामिळनाडू सोडले तर उर्वरित ही स्थाने वदनाडूत येतात. दक्षिण भारतात असलेले ’गुरुवायूर’ चे महत्त्व बघता मला नेहमी असा प्रश्न पडत असे की, या मंदिराचा समावेश आळ्वारांनी का केला नसेल. मात्र आळ्वारांनी अशीच मंदिरे निवडली ज्यात पेरुमाळबरोबर थायरची पूजा होतेय, असा संदर्भ मला मिळाला. मला हे महत्त्वाचे वाटतेय. उडुपी मठालासुद्धा हाच नियम लागू होतो तसेच ते फार नंतरच्या काळातील मंदिर आहे.
यापुढच्या भागात आपण पाचव्या शतकात आळ्वार संतांची परंपरा कशी चालू झाली ते पाहू.

अनुष्का आशिष

 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंगमधे शिक्षण झाले असून, IT क्षेत्रात कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्र व साप्ताहिकात पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहेत. प्रवासाची अतिशय आवड व त्यासंबंधित लेखन. देशभरातील प्राचीन मंदिरे पाहण्याची व त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे.