‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’द्वारे नुकतीच पुण्यातील नर्हे येथे आठवी युवा संसद पार पडली. राजकारणासंदर्भात तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी, हा या युवा संसद आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश होता. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटद्वारा आयोजित ‘युवा संसद’सारखा मूल्यवर्धित कार्यक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील दिशा देण्यासाठी पाथेय ठरणारा आहे.
ज्ञानाचा शोध ही सतत चालू असणारी एक प्रक्रिया आहे. या भूमिकेतून ‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ स्थापनेपासूनच कार्यरत आहे. ग्रामीण भागात वसलेले हे ‘ज्ञानकेंद्र’ महाविद्यालयीन तरुणांना यशस्वी व अनुभवसमृद्ध नागरिक म्हणून विकसित करण्यासाठी मूल्याधारित शिक्षण देते. ते देतानाच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रउभारणीच्या योगदानाची क्षमता निर्माण करणे हाही एक उद्देश आहे.
सतत बदलणार्या स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या टिकून राहण्यासाठी तसेच त्यांच्यात सक्षम, वचनबद्ध, सर्जनशीलता विकसित होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देते. अधिकाधिक गरजूंनी प्रवेश घ्यावा, यासाठी ‘फी सवलत’, ‘मोफत समुपदेशन’ यांसारख्या सुविधा ‘जाधवर इन्स्टिट्यूट’द्वारे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाजजाणीवा जागृत होण्यासाठी एनएसएस युनिटही कार्यरत आहे. मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्लेसमेंटची सुविधा ही संस्था प्रदान करते.
सुरुवातीपासूनच महाविद्यालयाने पायाभूत सुविधा, विस्तार आणि अभ्यासक्रम तसेच अभ्यासेेतर उपक्रमांत लक्षणीय वाढ केली आहे. याबरोबरच विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठीदेखील विविध उपक्रम आणि प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते.
‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ ही शिक्षण संस्था शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये ‘राजकारण’ या विषयासंदर्भात जागरूकता निर्माण करते. त्यासाठी संस्थेद्वारे युवा संसदेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जाधवर इन्स्टिट्यूटची आठवी युवा संसद नुकतीच पुण्यातील नर्हे इथल्या संस्थेच्या सभागृहात पार पडली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, ’जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या ’उडान’ या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी खासदार अरविंद सावंत यांना ‘आदर्श खासदार पुरस्कार’, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना ‘आदर्श आमदार पुरस्कार’, विठ्ठल काटे यांना ‘आदर्श नगरसेवक पुरस्कार’, सचिन शेलार यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’, अॅड. मंगेश ससाणे यांना ‘आदर्श युवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
युवा संसद आयोजनामागील उद्देश विशद करताना ‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल सुधाकरराव जाधवर म्हणाले,“यंदाचे वर्ष युवा संसदेचे आठवे वर्ष आहे. राजकारणासंदर्भात तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी, हा या युवा संसद आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश आहे. आजच्या तरुण पिढीच्या हातातच भविष्यातील भारत घडविण्याची जबाबदारी आहे. युवा संसेदला मिळणारा प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांचा सहभाग पाहता आमचा हा उद्देश निश्चितच सफल होत असल्याचे समाधान आणि जबाबदारीची जाणीवही आम्हाला आहे. या युवा संसदेतून प्रेरणा घेऊन उद्याचे चांगले नेतृत्व निर्माण झाले, तर सशक्त भारत निर्माण होण्यास जाधवर ग्रुप्सचा खारीचा वाटा असेल, असे आम्हाला वाटते.”
‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेस अनेक मान्यवरांनी भेट दिली. युवा संसदेच्या माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे युवा पिढीत सकारात्मक दृष्टीकोन जागृत होईल. त्याचा निश्चितच समाजाला आणि देशाला फायदा होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्य महत्त्वाचे असते. हेच सातत्य ‘जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूट’ने शैक्षणिक क्षेत्रामध्ये दाखवले आहे. ‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चा केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्येच नव्हे तर समाज व राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. अशी मते जाधवर इन्स्टिट्यूटच्या आठव्या युवा संसदेस आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली.
“जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ चांगले शिक्षण देत नाही तर एक समृद्ध पिढी घडवत आहे. या संस्थेने कायमच नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या माध्यमातून तरुण निर्माण केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार करत आहे आणि त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.” असे महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
“युवकांनी राजकारणामध्ये निश्चितच आले पाहिजे; परंतु येताना आपण कशासाठी राजकारणात येणार आहोत, हे डोळ्यांसमोर स्पष्ट हवे. अन्यथा केवळ पैसा आणि सत्तेसाठी राजकारणामध्ये आलात तर त्या ठिकाणी फार काळ टिकू शकत नाही,” असे मत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले.
जाधवर इन्स्टिट्यूट सातत्याने महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असते. याच अनुषंगाने ’राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग’ या विषयावर युवा संसदमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, अहिल्या फाऊंडेशनच्या अध्यक्ष रमाबाई लटपटे, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले. या आठव्या युवा संसदेत दुसर्या संसद कट्टाअंतर्गत छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत घेतली.
काळाच्या ओघात माध्यमांचे स्वरूप जरी बदलले असले तरी त्यांची भूमिका ही कायम समाजाप्रती सकारात्मकतेची असणे गरजेचे आहे. परंतु सध्या मात्र माध्यमांचा उपयोग राजकारण करण्यासाठी केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरुणांमध्ये राजकारणाची सकारात्मक बाजू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सकारात्मक राजकारण घडवून आणण्यासाठी सशक्त माध्यमांची गरज आहे. यासाठी ‘सकारात्मक राजकारणासाठी सशक्त माध्यमांची गरज’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.
‘विकासाचे राजकारणच देशाला महाशक्ती बनवू शकते’ या विषयावर चर्चा करताना धर्म, जात आणि पंथ यांच्यापलीकडे जाऊन जर विकासाचे राजकारण झाले तरच भारत खर्या अर्थाने महासत्ता बनू शकतो, असे मत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच एआय तंत्रज्ञानामुळे आव्हाने, संकटे आणि संधी यावरदेखील उहापोह झाला. ’व्हिजन भारत 2029’ हे लक्ष्य पूर्ण होण्यासाठी याच दिशेने वाटचाल करावी लागेल, हे यानिमित्ताने अधोरेखीत झाले.
“राजकारणात येण्याची तरुणांना स्वतःहून इच्छा होत नाही, कारण तरुणांचा आणि एक प्रकारे समाजाचाच राजकारणाप्रती असणारा दृष्टीकोन हा कलुषित झालेला आहे. याला बर्याच प्रमाणात राजकारणीही कारणीभूत आहेत. राजकारणाविषयी असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी तरुणांनी प्रथमतः राजकीयदृष्ट्या साक्षर झाले पाहिजे. राजकीयदृष्ट्या सजग आणि साक्षर असणारे तरुणच खर्या अर्थाने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात,” असे मत आठव्या युवा संसदेचा समारोप करताना आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार सत्यजित तांबे, कैलास पाटील यांना ‘आदर्श आमदार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. गजानन काळे आणि अजिंक्य सगरे यांना ‘आदर्श युवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर लिखित ‘मानवी कल्याणाचे शिल्पकार’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ हे एका आदर्श शिक्षण संस्थेचे उदाहरण आहे. इन्स्टिट्यूटद्वारा आयोजित ‘युवा संसद’सारखा मूल्यवर्धित कार्यक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील दिशा देण्यासाठी पाथेय ठरणारा आहे. 1995 मध्ये मुलींच्या शाळेपासून सुरू झालेला संस्थेचा प्रवास आता वेगवेगळ्या पंचावन्न शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचला आहे.
- विवेक प्रतिनिधी