कार्बन न्युट्रल व्हिलेज बेला

22 Apr 2025 12:50:36
@शारदा गायधने-शेंडे

Village Bella
भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल प्रकारात देशातला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार (डिसेंबर 2024) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वृक्षारोपण, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, सौर पॅनल, ई-व्हेईकल आदी उपक्रमातून गावातील वातावरण शुद्ध ठेवण्यात यश आले आहे.
आज जगापुढे ‘ग्लोबल वार्मिंग‘ हे एक मोठे संकट उभे आहे. कार्बन उत्सर्जनामुळे हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कार्बन न्युट्रलची संकल्पना विकसित झाली आहे. पर्यावरणीय कामात खारीचा वाटा उचलला आहे, भंडारा शहरालगत असलेल्या बेला या गावाने. साधारणतः दहा हजार लोकसंख्येचे हे गाव. आठ महिला व सहा पुरुष सदस्य असलेल्या बेला ग्रामपंचायतीवर महिलाराज आहे. मी गावची विद्यमान सरपंच आहे. 2012-17 या काळात मला सरपंचपदाची संधी मिळाली. ग्रामपंचायत ‘आयएसओ‘ मानांकित आहे. गावाला स्मार्ट ग्राम योजना (2016), संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान (2023) अनुक्रमे 50 लाख आणि दहा लाख रूपयांचे पारितोषिक मिळवून देण्यात वाटा उचलला. त्यामुळे बेला गावाचा जिल्ह्यात नावलौकिक वाढला होता. आम्हाला फक्त एवढ्यापुरते थांबायचे नव्हते. पुढील कार्यदेखील अशाच प्रकारे दिशादर्शक आहे.
 
Village Bella
 
 
आमचे गाव भंडारा शहरालगत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करावा लागत असे. हवेचे संतुलन राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू लागलो. त्यासाठी निधीची आवश्यकता भासत होती. राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियानात‘ स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचा निश्चय केला. गावात अधिक ऑक्सिजन देणारी व कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी वड, पिंपळ, कडूनिंब, आवळा, जांभूळ, औदुंबर अशा विविध देशी वृक्षाची लागवड करून संवर्धित केले. वृक्ष लागवड प्रोत्साहन देण्यासाठी हळद-कुंकू कार्यक्रमात ‘वाण‘ म्हणून रोपे भेट दिली. गावात कुणाच्या घरी बाळाचा जन्म झाला किंवा कोणाचे निधन झाले तर त्याचे स्मरण म्हणून वृक्ष लागवडीवर भर दिला. या माध्यमातून सुमारे 90 हजार वृक्षाची संख्या झाली आहे. गावातल्या मोकळ्या जागेत तलावाच्या रस्त्यावर, शाळा, ग्रामपंचायत, पडीक भूखंडावर लावण्यात आलेले वृक्ष आज सावली देत आहेत. हवेतले प्रदूषण कमी करण्यासाठी प्लास्टीक बंदीचा ठराव घेतला. प्लास्टिक निर्मूलन करणे कसे आवश्यक आहेे, यासाठी जनजागृती केली. प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी वापरण्याचे नागरिकांना आवाहन केले. आज नागरिक भाजीपाला आणायचा असेल तर घरातून कापडी पिशवी घेऊन जातात. आज गावातला प्लास्टिकचा वापर कमी करण्यात आम्हाला यश आले आहे.
 
Village Bellaपर्यावरण पूरक (ई-व्हेईकल) वाहनास पसंती
 
गावात प्रत्येकाकडे दुचाकी गाडी आहे. यास प्रगती म्हणावे का? पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने एक प्रकारे हवेतल्या प्रदूषणाला साथ देतात. पेट्रोल-डिझेलच्या गाड्या कमी करण्याकरिता जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. पेट्रोल-डिझेल इंधनाला पर्याय म्हणून पर्यावरणीय ई-व्हेईकल वापरण्याचा निर्णय घेतला. ही सुरुवात ग्रामपंचायतीपासून केली. इंधनावर चालणार्‍या घंटागाड्या बाजूला सारून आम्ही इलेक्ट्रिल व्हेईकल गाड्या आणल्या. ग्रामपंचायतीत चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे. यामुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहनाचे महत्त्व समजले. आज गावात सुमारे दोनशे नागरिक इलेक्ट्रिक वाहने वापरतात. याखेरीज पारंपरिक वीजेच्या बचतीसाठी सौर पॅनलचा विचार पुढे आणला. कारण कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सौर पॅनल जगभरात एक महत्त्वाचे शस्त्र म्हणून वापरले जाते एकूणच सौर ऊर्जा हा आमच्यासाठी एक आशादायक मार्ग होता. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, अभ्यासिका सौर पॅनलवर चालतात. आज अनेक घरावर सौर पॅनल आहेत.
 
Village Bella 


vivek
बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल प्रकारात देशातला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान
 
घनकचरा व्यवस्थापनातले आमचेे कामदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, मानवी आरोग्याच्या कल्याणासाठी प्रत्येक व्यक्तीने कचरा होणार नाही यासाठी ओला व सुका कचरा संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. लोकांकडून यास मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांच्या घरात ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा असतो. शिवाय अनेकांनी जैविक विघटन न होणार्‍या रसायनांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे. घंटागाडीच्या माध्यमातून दररोज कचरा संकलन केले जाते. जैविक कचर्‍यापासून आम्ही खत तयार करतो. हे खत आम्ही झाडांना देतो. कचरा व्यवस्थापनामुळे कचर्‍याची दुर्गंधी दूर झाली आहे. अशाप्रकारे आम्ही वृक्षारोपण, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, सौर पॅनल, ई-व्हेईकल आदी उपक्रमांतून गावातील वातावरण शुद्ध ठेवण्यात यशस्वी झालो आणि माझी वसुंधरा अभियानात राज्यात दुसर्‍या क्रमाकांचे सव्वा कोटीचे बक्षीस मिळविले. याच बक्षिसाच्या पैशांतून गावात काही योजना राबविल्या. यामुळे गावातील प्रदूषण कमी होण्यास मदत झाली. या कामाचे फलित म्हणजे डिसेंबर 2024 या महिन्यात बेला ग्रामपंचायतीला ‘कार्बन न्युट्रल‘ प्रकारात देशातला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शहरातील प्रदूषित हवेपासून गावातील वातावरणातील उत्सर्जित होणारे दूषित कार्बन डायऑक्साईड वायू शोषून गावातील वातावरण शुद्ध कसे करता यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे बेला गाव देशाच्या नकाशावर आले. ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल कसे उभारता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गावतल्या महिलांना बचतगटाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी गावातल्या जिल्हापरिषद शाळेकडे आमचे लक्ष असते. शाळेची पटसंख्या साडेतीनशेच्या वर आहे. मुलांना नावीन्यपूर्ण शिक्षण दिले जाते. वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या शिवाय लोकसहभागातून होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना ग्रामपंचायतीमार्फत मोफत हवाई सफर घडवून आणली जाते.
एकूणच विदर्भासारख्या दुर्लक्षित भागातल्या बेला गावातून ग्रामोन्नती घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न सफल होताना दिसत आहे.
 
 
- लेखिका बेला गावाच्या विद्यमान सरपंच आहेत.
Powered By Sangraha 9.0