प्रगटोनी नासावे, हे बरे नोहे

22 Apr 2025 14:56:57
 @नीतीन केळकर - 9967764468
 
जोवर आरोप सिद्ध होत नाही तोवर कोणावरही गुन्हेगाराचा शिक्का मारू नये हे कायद्यातील महत्त्वाचे तत्त्व. हे अलीकडच्या अनेक पत्रकारांच्या/वार्ताहरांच्या गावीही नसावे असे त्यांचे वर्तन असते. पत्रकार या नात्याने समोरच्या व्यक्तीला अभ्यासपूर्ण आणि संयत भाषेत प्रश्न विचारण्याऐवजी उलटतपासणीच्या आवेशात प्रश्न विचारणे योग्य नाही, हे शोभा देत नाही. त्यातून पत्रकारितेच्या खालावलेल्या पातळीचेच दर्शन घडते. जे चिंताजनकही आहे आणि धोकादायकही.

media
 
ज्यांच्या वर्तनात खरोखरच व्यवस्थेस योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य अपेक्षित आहे, जे समाजव्यवस्थेला काहीतरी रचनात्मक शिस्त लावतील अशी अपेक्षा असते, अशा लोकांचे स्वत:च भरकटत जाणे अस्वस्थ करते. आजचे प्रसारमाध्यमांचे वागणे म्हणूनच अस्वस्थ करणारे आहे. ही प्रसारमाध्यमे स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवतात पण आजकाल पी.आर. नावाचा एक पाचवा स्तंभ आहे, तो लोकशाहीच्या चार स्तंभांकडून आपल्याला हवे ते करवून घेतो असे म्हणतात. त्यातच टि.आर.पी. हा वृत्तवाहिन्यांचा प्राणवायू आहे. त्याच्यासाठी सर्व मूल्ये सोयीने खुंटीला टांगून ठेवली जातात. म्हणूनच बहुधा ’प्युअर इन्फर्मेशन फॉर शुअर डेमॉक्रसी’ या उक्तीनुसार नागरिकास सत्य, निर्भेळ, निष्पक्ष व संतुलित माहिती मिळणे आवश्यक आहे हे आज चौथ्या स्तंभाच्या गावीही नसावे.
 
आजकाल पी.आर. नावाचा एक पाचवा स्तंभ आहे, तो लोकशाहीच्या चार स्तंभांकडून आपल्याला हवे ते करवून घेतो असे म्हणतात. त्यातच टि.आर.पी. हा वृत्तवाहिन्यांचा प्राणवायू आहे. त्याच्यासाठी सर्व मूल्ये सोयीने खुंटीला टांगून ठेवली जातात. 
 
ज्या राज्यघटनेने दिलेल्या भाषा व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माध्यमांचा डोलारा उभा आहे, त्याच राज्यघटनेने व्यक्तीची प्रतिष्ठा व त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी दिली आहे. माध्यमांचा डोलारा हा घटनेच्या कलम 19 (1)(अ) अन्वये दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित आहे. सामान्य माणसाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तेच माध्यमांना आहे, वेगळे असे माध्यम स्वातंत्र्य नाही. याच कलमाच्या उपकलम (2) अन्वये या स्वातंत्र्यावर रास्त बंधने घालण्याची सरकारला मुभाही आहे. मात्र तशी बंधने घातली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला अशी ओरड हीच माध्यमे सुरू करतील.
 
 
खरे म्हणजे माहिती मिळवण्याचा अधिकार हा सुद्धा सामान्य माणसाला राज्यघटनेनेच दिलेला अधिकार आहे. त्या माहितीची माध्यमे ही विश्वस्त आहेत पण प्रत्यक्षात वागतात मात्र मालक असल्यासारखी. त्यामुळे माहिती सोयीस्कर पद्धतीने, सोयीस्कर वेळी देतात, माहितीला आपल्याला हवा तो रंग चढवतात, ब्रेकिंग न्यूजच्या नादात खातरजमा न करताच बातमी प्रसिद्ध करतात. हा खरे तर राज्यघटनेने सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या माहितीच्या अधिकाराचा, त्या माहितीचे केवळ वाहक असलेल्या माध्यमांनी केलेला अधिक्षेपच आहे.
 
 
1992 सालापर्यंत भारतात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्राला स्थान नव्हते. केवळ सरकारी चौकटीतील माध्यमेच उपलब्ध होती. ती सरकारचीच तळी उचलतात म्हणून ती स्वायत्त असावीत अशी मागणी होत असे. तशी ती स्वायत्त झालीही पण त्यामुळे बदल काय घडला? बरे पाठोपाठ खाजगी माध्यमेही आली. सरकारी चौकटी बाहेरच्या या माध्यमांचे उत्साहाने स्वागतही झाले. मात्र आता त्यांच्या बेताल वागण्याने या माध्यमांसाठी काहीच आचारसंहिता नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
 
खरे म्हणजे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात प्रसारमाध्यमांसाठीची नीतीमूल्ये शिकवली जातात. त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वेही अस्तित्वात आहेत. मग ती पाळली का जात नाहीत? कठोर कायदे करून ती पाळायला लावण्याचे परिणाम काय होतील? मुळात कायदा केला की सारे काही आलबेल होईल असे मानणे चुकीचे ठरेल. माध्यमांनीच स्वयंशिस्त पाळली तर कदाचित काही फरक पडू शकेल पण निहित स्वार्थासाठी माध्यम क्षेत्रावर वर्चस्व गाजवणार्‍या व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या हाती माध्यमांच्या धोरणात्मक नाड्या असल्याने माध्यमे तसे करतील असे वाटत नाही. ही माध्यमे आता आपल्या वाचक, प्रेक्षक श्रोत्यांना ग्राहक मानतात. तसे माध्यमांतील काही धुरिणांनी जाहीरपणे सांगितलेही आहे. त्यामुळे या माध्यमांचे ग्राहक माध्यम साक्षर होऊन आपल्या ग्राहक हक्कांसाठी उभे ठाकले तरच माध्यमांच्या आजच्या स्थितीत काही सुधारणा शक्य आहे.
 
 
दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात खाजगी वाहिन्यांचे आगमन झाले तेव्हा या वाहिन्यांचे स्वागत करणार्‍यांच्या भाऊगर्दीमध्ये,‘’ज्या देशात वाचनसंस्कृतीच अजून रूजलेली नाही त्या देशात या माध्यमाच्या अनिर्बंध विस्ताराने फक्त बघे निर्माण होतील‘’ अशी टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक शामलाल यांनी व्यक्त केलेली भीती गांभीर्याने घेतलीच गेली नाही. आता तरी घ्यायला हवी. कारण सुजाण वाचक, श्रोते, आणि प्रेक्षकांतच परिस्थिती बदलण्याची क्षमता आहे. माध्यमे स्वतःहून बदलणार नाहीत आणि कायदे कितीही केले तरी पळवाटाच शोधल्या जातील.
 
 ‘’ज्या देशात वाचनसंस्कृतीच अजून रूजलेली नाही त्या देशात या माध्यमाच्या अनिर्बंध विस्ताराने फक्त बघे निर्माण होतील‘’ अशी टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक शामलाल यांनी व्यक्त केलेली भीती गांभीर्याने घेतलीच गेली नाही.
 
माध्यम क्षेत्रासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वातील ज्या तत्त्वाचे आज प्रामुख्याने उल्लंघन होताना दिसते आणि ज्या तत्त्वाचे उल्लंघन समाजासाठी अत्यंत घातक ठरू शकते ते म्हणजे,“अनावश्यक रितीने कोणाच्याही जात, धर्म, वर्ण, राष्ट्रीयत्व, व्यवसाय, आणि राजकीय संलग्नेचा उल्लेख टाळावा”. मात्र आजकाल या उल्लेखांशिवाय बातमी लोकांना आकर्षक वाटणारच नाही अशी काहीशी कल्पना माध्यमांनी करून घेतलेली दिसते. त्यामुळे आपण समाजात दुहीची बीजे पेरीत आहोत याची कल्पनाही त्यांना नसेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. जाणूनबुजून अशी दुहीची बीजे पेरण्यामागची कारणे शोधून त्यासाठी कारक ठरणार्‍या प्रवृत्तींचा पर्दाफाश करायला हवा. माहितीतले नाविन्य लोकांना आकर्षित करते पण ते शोधायचे श्रम घेण्यास आता माध्यमांना वेळ नाही किंवा त्यांची इच्छा वा कुवत नाही. त्यामुळेच मन मानेल तशी फोडणी देऊन बातमी चटकदार बनवणे त्यांना सोयीचे वाटते.
 
 
सार्वजनिक हितासाठी आवश्यक नसेल तर कोणाच्याही खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नये या मार्गदर्शक तत्त्वाचेही उल्लंघन आजकाल सर्रास होताना दिसते. त्यामुळे अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. केवळ व्यावसायिक फायद्याचे गणित मांडून वाटचाल करणार्‍या माध्यमांचे हे गणित मोडीत काढण्याची ताकदही केवळ त्यांच्या ग्राहकांनी माध्यम साक्षर होण्यातच आहे. दृश्यसंकलन करताना ती अशा पद्धतीने जोडू नयेत की ज्यामुळे लोकांची दिशाभूल होईल किंवा वस्तुस्थितीचा विपर्यास होईल, असाही एक संकेत आहे. त्याचेही पालन होताना दिसत नाही. काही ठोस माहिती देण्याची कुवतच नसल्याने तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना भ्रमित करण्याचे काम ही माध्यमे करीत आहेत. आपल्या कुवतीची झाकली मूठ कायम राखण्यासाठी नैतिकतेचे अनेक संकेत आज माध्यमांनी मोडीत काढलेले दिसतात.
 
 
आज समाजातही संयम फार कमी आढळून येतो. कुणी काही विचार व्यक्त केले की, त्यावर अभ्यास तर सोडा परंतु योग्य विचार न करता ताबडतोब व्यक्त होण्याची परंपरा सुरू आहे. योग्य विचार करण्यासाठी वाचनाबरोबरच योग्य श्रवण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी लक्षपूर्वक ऐकण्याची आवश्यकता मांडली आहे. ती महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
 
 
अवधान एकले देईजे। मग सर्व सुखासी पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझे। उघड आईक॥
 
व्यक्त होणे ही माणसाची स्वाभाविक गरज असली तरी त्या व्यक्ततेला काही मर्यादा हव्यात. परंतु आजच्या माध्यमांमध्ये व्यक्त होणारे बहुतेक जण असा कोणताही विधिनिषेध पाळत नाहीत. विविध मिम्स, कोट्या, माध्यमावरील विविध पोस्ट यातून अशा मनोविकृत, बोचर्‍या क्रिया-प्रतिक्रियांची रेलचेल दिसते. यातून जी जातीय, वंशीय, धार्मिक, भावनिक तेढ निर्माण होतेय त्यातून सामाजिक असहिष्णुता वाढण्याची शक्यता असते. हे या माध्यमावरील प्रतिक्रियावादींना कोणी सांगावे? म्हणूनच द्वेष, मत्सर, असूया, मनातील विकार- विकृती, स्टंटबाजी यासारखी अविवेकाची काजळी झटकून या माध्यमात व्यक्त होण्याची काळजी घेतली तरच सत्याचा, ज्ञानाच्या उजेडात ही माध्यमे लखलखीत होतील.
 
 
अलीकडच्या काळात अनेक महनीय व्यक्तींबद्दल या माध्यमातून ज्या मिम्स, विचार, प्रतिक्रिया प्रकट झाल्या त्या खेदजनकच होत्या. जोवर आरोप सिद्ध होत नाही तोवर कोणावरही गुन्हेगाराचा शिक्का मारू नये हे कायद्यातील महत्त्वाचे तत्त्व. हे अलीकडच्या अनेक पत्रकारांच्या/वार्ताहरांच्या गावीही नसावे असे त्यांचे वर्तन असते. एखाद्या पत्रकार परिषदेत प्रश्न कसे विचारावेत याचे प्रशिक्षण पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात दिलेले असते. पण आजच्या अनेक वार्ताहरांचे वर्तन बघता हे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असेच वाटते. आक्रस्ताळेपणा करणे, समोरच्या व्यक्तीवर सतत शाब्दीक हल्ला चढवणे यालाच पत्रकार परिषद समजले जाते. पत्रकार या नात्याने समोरच्या व्यक्तीला अभ्यासपूर्ण आणि संयत भाषेत प्रश्न विचारण्याऐवजी उलटतपासणीच्या आवेशात प्रश्न विचारणे योग्य नाही, हे शोभा देत नाही. त्यातून पत्रकारितेच्या खालावलेल्या पातळीचेच दर्शन घडते. जे चिंताजनकही आहे आणि धोकादायकही.
 
 
याला आता जोड मिळाली आहे समाजमाध्यमांची. या माध्यमातून सवंगतेने व्यक्त होणे म्हणजे समाजमन कलुषित करणे याचे भान ठेवायला हवे. म्हणूनच कोणत्याही माध्यमावर जन प्रबोधन वा जनजागृतीच्या हेतूनेही व्यक्त होताना आपली सुसंस्कृतपणाची, शालीनतेची पातळी सुटायला नको. या व्यक्त होणार्‍यांमध्ये टोकाचे कर्मठ, प्रतिगामी आणि टोकाचे तथाकथित पुरोगामी यांच्यातील द्वंद्व तर आज धुमाकूळ घालताना दिसतेय. यातून सर्वसामान्यांची होत असलेली दिशाभूल व बुद्धीभ्रम समाजाचे अतोनात नुकसान करणार आहे. हे सगळे पाहणारी, समन्वयवादी आणि मानवता मूल्याला प्राधान्य देणारी माणसे मात्र हा संघर्ष पाहून व्याकुळ होत आहेत. पण काळाची आणि माध्यमांची गती इतकी तीव्र आहे की याला आवर तरी कसा घालणार आणि कोण? व्यक्तीची विवेकशीलता हाच निकोप लोकमानसाच्या सुदृढतेचा पाया असतो. तोच बळकट करायला हवा. आणि या विवेकी माणसांनीच माध्यमांना समर्थ रामदासांच्या शब्दात ठणकावून सांगायला हवे..
 
अभ्यासोनी प्रगटावे, नाहीतरी झाकोनी असावे.
प्रगटोनी नासावे, हे बरे नोहे.
Powered By Sangraha 9.0