@बागेश्री पारनेरकर
कुणाल कामराच्या विनोदाचे स्वरूप केवळ राजकीय व्यंगापुरते मर्यादित नसून, तो सातत्याने एक विशिष्ट अराजकतावादी ‘नरेटिव्ह’(विमर्श) पुढे रेटतो हे त्याने आजवर केलेल्या टीकेतून लक्षात येतं. तो केवळ सरकारविरोधी वक्तव्ये करत नाही, तर समाजात द्वेष आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कामराच्या विनोदाची पद्धत आणि त्याच्या कृती ठरावीक राजकीय विचारसरणी पुढे नेण्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे तो एका विशिष्ट विचारधारेचा, पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचं त्याच्या सादरीकरणातून स्पष्ट होतं.
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गीतांमुळे स्टँड अप कॉमेडी आणि राजकीय टीका हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विनोद हा निखळ, मनोरंजन करणारा, हसवणारा आणि काही वेळा आरसा दाखवणारा असला पाहिजे. पण हल्ली विनोदाचे स्वरूप आणि दर्जा बदलला आहे. राजकीय टीका, वैयक्तिक टीका, व्यंगात्मक विनोद, कमरेखालचे विनोद असे त्याचे स्वरूप होत चालले आहे. त्यामुळे अर्थातच विनोदाचा दर्जा खालावत चालला आहे. राजकीय प्रहसने पूर्वीही व्हायची, पण त्यात एक जबाबदारीचे भान असे, मर्यादा असे. दादा कोंडके यांच्या नाटक, चित्रपटांमधूनही त्यावेळच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे मोठे व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते टीका करायचे. शरद पवारांवर ते कायम टीका करत असत पण तरीही त्यांचे व्यक्तिगत चांगले संबंध होते.
काही वर्षांपूर्वी झी मराठीवर ’घडलंय बिघडलंय’ हा विनोदी कार्यक्रम प्रसारित होत असे. मराठीतील आताचे अनेक आघाडीचे कलाकार त्यात होते. त्यातून अनेक कलाकार पुढे आले. त्या कार्यक्रमात विनोदाच्या माध्यमातून राजकीय टीका किंवा त्यावेळच्या परिस्थितीवर भाष्य केलं जायचं. यातून कधी गोंधळ निर्माण झाला नाही. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार नव्हता किंवा कोणीतरी राजकीय विनोदाची सुपारी दिली नव्हती. पण हल्ली अशा सुपार्या देऊन विनोदाची झालर लावत राजकीय टीका करण्याची पद्धत रूढ होते आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अराजकता पसरवण्याचा हा प्रकार आहे. कामराच्या विनोदाचे स्वरूप केवळ राजकीय व्यंगापुरते मर्यादित नसून, तो सातत्याने एक विशिष्ट अराजकतावादी ‘नरेटिव्ह’ (विमर्श) पुढे रेटतो हे त्याने आजवर केलेल्या टीकेतून लक्षात येतं.
स्टँड अप कॉमेडी हा विषय निर्भेळ विनोदासाठी आणि मनोरंजनासाठी राहिलेला नाही. काही वर्षांपासून स्टँड अप कॉमेडीच्या आडून अश्लील भाषा वापरत थिल्लरपणा, काहीतरी अचकट विचकट विनोद, कमरेखालचे विनोद, आईवडिलांवर विनोद असं त्याच एकंदरीत स्वरूप आहे. रणवीर अलाहाबादिया प्रकरणावरून हे दिसून आले आहे. ‘स्टँड अप कॉमेडी’ हा विनोदाचा एक प्रभावी प्रकार असला तरी, त्याचा वापर अराजकता पसरवण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलं आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे कुणाल कामरा. आता काही जण म्हणतील आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अराजकता पसरवण्याचा हा प्रकार आहे. कामराच्या विनोदाचे स्वरूप केवळ राजकीय व्यंगापुरते मर्यादित नसून, तो सातत्याने एक विशिष्ट अराजकतावादी ‘नरेटिव्ह’ (विमर्श) पुढे रेटतो हे त्याने आजवर केलेल्या टीकेतून लक्षात येतं. तो केवळ सरकारविरोधी वक्तव्ये करत नाही, तर समाजात द्वेष आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कामराच्या विनोदाची पद्धत आणि त्याच्या कृती ठरावीक राजकीय विचारसरणी पुढे नेण्यासाठी वापरल्या जातात.
कुणाल कामरा आणि वाद
कुणाल कामरा हा एक स्टँड अप कॉमेडियन आहे. जाहिरात क्षेत्रात अकरा वर्षे काम केल्यानंतर कुणाल कामरा स्टँड अप कॉमेडीकडे वळला. 2017 मध्ये त्याने रमित वर्माच्या साथीने एक पॉडकास्ट सुरू केलं होतं. या कार्यक्रमात कुणाल कामरा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसंच प्रसिद्ध व्यक्तींशी अनौपचारिक गप्पा मारत असे. त्यानंतर तो स्टँड अप करू लागला. त्यानंतर वाद आणि कुणाल कामरा असं समीकरणच होऊन बसलं. सोशल मीडियावरच्या त्याच्या काही पोस्टमुळे वादही निर्माण झाले. मुस्लीम, शीख आणि मदर तेरेसा यांच्यावरील काही पोस्टमुळे कुणाल कामराला त्याचं अकाउंट डिलीट करावं लागलं होतं आणि मुंबईतलं घरही सोडावं लागलं होतं. 2019 मध्ये त्याला दोन शो रद्द करावे लागले होते.
सोशल मीडियावरच्या त्याच्या काही पोस्टमुळे वादही निर्माण झाले. मुस्लीम, शीख आणि मदर तेरेसा यांच्यावरील काही पोस्टमुळे कुणाल कामराला त्याचं अकाउंट डिलीट करावं लागलं होतं आणि मुंबईतलं घरही सोडावं लागलं होतं. 2019 मध्ये त्याला दोन शो रद्द करावे लागले होते.
कुणाल कामरा हा कायमच पंतप्रधान मोदी, भाजप, संघ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात टीका करत असतो. त्यामुळे तो एका विशिष्ट विचारधारेचा, पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचं त्याच्या सादरीकरणातून स्पष्ट होतं. 2019 मध्ये भाजपाला लोकसभा निवडणुकीत जो विजय मिळवला होता त्यावरूनही त्याने भाजपाची खिल्ली उडवली होती. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुकेश अंबानी यांचीही खिल्ली उडवली होती. कुणाल कामरा हा एक एक ’हॅबिच्युअल ऑफेंडर’ आहे. तो वारंवार जाणूनबुजून वादग्रस्त वक्तव्ये आणि कृती करतो, जेणेकरून प्रसिद्धी मिळवता येईल. त्याच्या शोमध्ये विनोदाच्या नावाखाली राजकीय चिथावणी आणि द्वेष याचा भरणा असतो. स्वतःला तटस्थ म्हणवून घेताना त्यांनी केलेले विनोद हे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले दिसतात. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतही तो सहभागी झाला होता हे नजरेआडून करून चालणार नाही.
स्टँड अप कॉमेडी म्हणजे काय?
स्टँड अप कॉमेडी हा प्रकार 18 व्या शतकात अमेरिकेत जन्माला आला. तिथून तो भारतात आला. चार्ल्स ब्राऊन यांना अमेरिकेचे पहिले स्टँड अप कॉमेडियन मानलं जातं. 1911 मध्ये नेली पेरियर नावाच्या महिलेने स्टँड अप कॉमेडी करण्यासाठी स्टेज म्हणजेच मंचाचा वापर केला होता. महाराष्ट्रात पु.ल. देशपांडे, व. पु. काळे, शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांनीही अशा प्रकारचे स्टँड अप कार्यक्रम केले. मात्र त्याला त्यावेळी कथाकथन म्हटलं जाई. हिंदीत जॉनी लिव्हरने विविध ऑर्केस्ट्रा, शोज, स्टेज शो यामधून स्टँड अप कॉमेडी हा प्रकार रूजवला आणि मोठा केला. त्याची परंपरा पुढे राजू श्रीवास्तव, नवीन प्रभाकर, सुनील पाल यांसारख्या कलाकारांनी सुरू ठेवली. मराठीत हास्यसम्राट नावाचा एक कार्यक्रम होता त्यातूनही अनेक कलाकार घडले.
अलीकडेच, त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणारी विडंबनात्मक कविता सादर केली. त्याने थेट नाव घेतले नसले तरी अतिशय अपमानास्पद पद्धतीने त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कामराच्या शोसाठी जुहूमधील एक हॉटेल उद्धव ठाकरे गटाकडून आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे ठाकरे गटाने दिलेली ‘स्क्रिप्ट’ कामराने आपल्या कार्यक्रमात वापरली असं म्हटलं जात आहे. या सगळ्या वादानंतर ठाकरे गटाने त्याची वारंवार पाठराखण केली. इतकेच नाही तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्याला बाहेरून, भारतविरोधी कारवाया करणार्या गटांकडून, काही परदेशी संस्थांकडून पैसे मिळत असल्याचे पुरावे दिले आहेत. स्टँड अप कॉमेडीच्या नावाखाली पैसे घेऊन तो एक विशिष्ट राजकीय विचारसरणी पुढे नेत असल्याचं दिसत आहे.
कोणतीही कला ही समाजभान आणि समाजमन घडवत असते. म्हणूनच कलेला समाजाचा आरसा म्हणतात. मात्र त्याचा उपयोग एक विशिष्ट विचारसरणी रेटण्यासाठी आणि त्यातून समाजाची दिशाभूल करण्यासाठी होत असेल तर ते धोकादायक आहे. चला हवा येऊ द्या, कपिल शर्मा शो यातूनही अनेकदा राजकीय टीका करण्यात आली आहे, अनेकदा वादही झाले. पण कुणाल कामराचा हेतू आणि मांडणी वेगळी आहे. विनोद म्हणताना कुचेष्टेवर आणि चिथावणीवर भर आहे. मविआ सरकारच्या काळात केतकी चितळे, कंगना राणावत, आर जे मलिष्का यांच्यावर कारवाई झाली किंवा रिटायर्ड वृद्ध नेव्ही अधिकार्याला उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं एक कार्टून शेअर केलं म्हणून भर रस्त्यात मारहाण केली, तेव्हा कामराने उद्धव ठाकरेंवर विडंबनात्मक कविता सादर केली होती का? असे प्रश्न आता निर्माण होतात.
राजकारणात कोणतीही घटना ही योगायोगाने किंवा अचानक घडत नसते. नीट विचार केला तर लक्षात येईल, दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत होती. या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी कुणाल कामराला कामाला लावलं गेल्याचं अनुमान अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावरच्या कवितेनंतर वादंग झाल्यानंतरही माफी मागणार नाही असं कामराने उद्दामपणे सांगितलं. एवढंच नाही तर हातात संविधानाची प्रत घेऊन एक पोस्ट टाकली. ही छोटी घटना नाही. त्यामागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचे लक्षात येते. अशा प्रकारे राजकीय हेतूने विनोदाचा वापर हत्यारासारखा केला जात असेल तर सावध होणे गरजेचे आहे.