वैश्विक समर्थन, संपर्क व संवादाची सुसंधी

युनायटेड नेशन्स सीएसडबल्यू 69 परिषद 2025

विवेक मराठी    08-Apr-2025   
Total Views |
 
UNo 
न्यूयॉर्क येथे 10 ते 21 मार्च 2025 रोजी CSW69 परिषद संपन्न झाली. नवे प्रदेश, नवे प्रश्न या बद्दलची, यूएन वुमनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कामाची पद्धत, स्वतःचा अजेंडा रेटून नेण्यासाठी त्याचा केला जाणारा उपयोग, विविध देश व संस्था यामधले नेटवर्किंग, फंडिंगच्या शक्यता व त्यामागचे छुपे उद्देश, महिला व जेंडर या विषयांच्या राजकीय व धार्मिक भूमिका या बद्दलची महिती आणि या वैश्विक प्रश्नांचा धांडोळा घेताना, आगामी आव्हानांचा वेध घेताना धोरण म्हणून भारत सरकारकडे आग्रहाने मांडायचे विषय, अनुवर्तन यावर काम करावे लागेल. अभ्यास, संशोधन, जागतिक बदलांचे आकलन, डिप्लोमसी, नेटवर्किंग, लॉबींग, फंडिंग, आंतरराष्ट्रीय सहकार्य असे हे बहुआयामी काम आगामी काळात करावे लागेल.
सात मार्चच्या पहाटे आम्ही युनायटेड नेशन्सच्या कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमन -CSW69- या परिषदेत सामील व्हायला निघालो तेव्हा जगातले महिला प्रश्न व त्याबद्दलचे नवे दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. जगभरातल्या महिला कार्यकर्त्या कसा विचार करतात, कोणते प्रश्न समान आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत हे समजून घेण्याची उत्सुकताही होतीच, नवे विचार समजून घेण्याचे कुतूहलही होते.
 
 
युनायटेड नेशन्स ही आंतरराष्ट्रीय संस्था 1945 मध्ये स्थापन झाली. 193 देश तिचे सदस्य आहेत व जगात शांतता व सुरक्षा नांदावी, सलोख्याचे संबंध राहावेत यासाठी ती काम करते. तर कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमन -CSW व ECOSOC- युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सोशल काऊन्सिल या संस्था महिलांचे सक्षमीकरण, स्त्रीपुरुष समानता यासाठी काम करणारे दोन महत्त्वाचे भाग आहेत. तर यूएन वुमन ही संस्था संशोधन व सुसूत्रीकरणाचे काम करते.
 
 
10 ते 21 मार्च 2025 या प्रदीर्घ CSW69 परिषदेत सामील झाल्यानंतर नवे प्रदेश, नवे प्रश्न या बद्दलची, यूएन वुमनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कामाची पद्धत, स्वतःचा अजेंडा रेटून नेण्यासाठी त्याचा केला जाणारा उपयोग, विविध देश व संस्था यामधले नेटवर्किंग, फंडिंगच्या शक्यता व त्यामागचे छुपे उद्देश, महिला व जेंडर या विषयांच्या राजकीय व धार्मिक भूमिका या बद्दलची आमची दृष्टी विस्तारली आणि मुख्यत: या सर्व जागतिक व्यवहारांत भारताचे स्थान, प्रतिनिधित्व, सरकारी सहभाग कसा आहे हे समजून घेता आले. या जागतिक व्यवहारात आपल्या विचार परिवाराचा सहभाग अत्यल्प किंवा नगण्य आहे हे जाणवले, पण उपस्थित राहून, भारताबद्दलच माहिती देऊन, आपले मत मांडून, ‘भारत साक्षरता’ वाढवण्याची, ठसा उमटवता येण्याची मोठी शक्यता आहे याचेही आकलन आले!
 
women
 
CSW- कमिशन फॉर स्टेटस ऑफ वुमन परिषदेमध्ये सहभागी होण्याचे भारतीय स्त्रीशक्तीचे हे दुसरे वर्ष. CSW68 मध्ये भारतीय स्त्री शक्तीच्या सचिव वर्षा पवार तावडे व दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या सचिव अंजली देशपांडे सहभागी झाल्या होत्या. CSW 69 मध्ये एकूण भारतातून14 व अमेरिकेतून 3स्त्री शक्ती व समविचारी अन्य संस्थाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या परिषदेत सहभागी होण्यासाठी ECOSOC चे कन्सल्टेटिव्ह स्टेटस संस्थेकडे असावे लागते. स्त्री शक्तीचा अर्ज अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व बॅलेरिना इन्स्टिट्यूटच्या मार्फत नोंदणी केली होती.
 
 
CSW 69 मध्ये विविध पातळ्यांवर व विविध विषयांवर सत्रे आयोजित केली जातात. या परिषदेत NGO-CSW 69च्या आधिकाधिक समितीच्या कामकाजाची महत्त्वाची सत्रे, सरकारी पातळीवरची सुमारे 220 सत्रे व समांतर स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेली सत्रे व ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेली 700 च्या वर सत्रे एवढा प्रचंड विषय व देशांच्या सहभागाचा पसारा होता! या वेळी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. युनायटेड नेशन्स अत्यल्प फीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठीच्या सुविधा उदा. हॉल, माईक उपलब्ध करून देते. परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींना कोणतीही फी आकारली जात नाही व मात्र प्रवास, राहाणे, खाणे या व्यवस्था स्वखर्चाने कराव्या लागतात.
 
 
2025 हे वर्ष पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 8 मार्च 1975चे व पहिल्या मेक्सिकोमध्ये भरलेल्या परिषदेचे पन्नासावे वर्ष, बीजिंग येथे भरलेल्या चौथ्या जागतिक महिला परिषदेचे 30वे वर्ष व UNSC Resolutionयुनायटेड नेशन्स सिक्योरिटी काउन्सिल प्रस्तावाचे 25वे वर्ष आहे त्यामुळे ही परिषद विशेष होती. 5845 संस्था प्रतिनिधी, त्यात 90% महिला या परिषदेमध्ये सामील झाल्या, हा उपस्थितीचा नवा उच्चांक होता. BPFA म्हणजे बीजिंग प्लॅटफॉर्म फॉर ऍक्शनमधील जेंडर समानता व 12 मुद्द्यांवरील कृती आराखड्याचा आढावा या वेळी घेतला गेला. जगाने जरी SDG म्हणजे 17 विकास लक्ष्ये 2030 पर्यंत म्हणजे पाच वर्षात साध्य करण्याचे ठरवले असले तरीही लिंगभाव समानता अस्तित्वात यायला 134 वर्षे लागतील इतकी ही संथ व सतत चालणारी प्रक्रिया आहे. याबद्दल व त्यासाठी उपलब्ध निधीतल्या घटीबद्दल सर्वदूर चिंताच आहे. Financing for Development हा कळीचा मुद्दा या परिषदेत चर्चिला गेला. त्याविषयी एक जागतिक परिषद जूनमध्ये स्पेनमध्ये भरणार आहे.
 
 
या परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी 7 मार्चला युनायटेड नेशन्समध्ये ‘हंसा मेहता मेमोरियल लेक्चर’ आयोजित केले होते, त्यात व न्यूयॉर्क काउन्सिल जनरलच्या कार्यालयात आयोजित केलेल्या 8 मार्च कार्यक्रमात काही कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. भारतीय स्त्री शक्तीच्या प्रयत्नातून साकारलेल्या ‘शक्ति: वीमेन. जेंडर एंड सोसायटी इन इंडिया’ या पुस्तकाचा आशय, पुस्तकाच्या एक संपादक, डॉ. ज्योती चौथाईवाले यांनी प्रस्तुत केला. या निमित्ताने न्यूयॉर्क काउन्सिल जनरल यांचे कार्यालय, भारतीय दूतावास व पर्मेनेंट मिशनचे कार्यालय यांना भेट, आणि त्यांच्या भूमिका व कार्यपद्धतीचा जवळून परिचय झाला.
 
12 मार्च रोजी भारत सरकार, यू एन वुमन यांनी मिळून मंत्रीगट स्तरावरील एक सत्र आयोजित केले होते. विषय होते, 1. महिलांचे आर्थिक व तंत्रज्ञानाचे समावेशन व 2. महिलांच्या सशक्तीकरणासाठी निधीची उपलब्धता. या सत्रासाठी व अन्य सत्रे, द्विपक्षीय करार या मा. महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी उपस्थित होत्या. त्यांनी भारतातल्या स्त्रियांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या मंत्रीपरिषद पातळीवरील सत्रात, जी 20 वुमन टास्क फोर्स सदस्य व स्वयंसेवी संघटना प्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी मला मिळाली व जागतिक पातळीवर विचार परिवाराचे नेतृत्व करता आले. हा स्त्री शक्तीसाठी अभिमानाचा व माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. जी 20 दरम्यान भारताने Digital Public Infrastructure (DPI) च्या माध्यमातून साधलेल्या आर्थिक व डिजिटल समावेशनबद्दल मला बोलता आले, बचत गट चळवळ, ग्राम चेतना अशा उपक्रमातून ग्रामीण व शहरी वस्तीतल्या महिलांसाठी संघटना करत असलेल्या गाव पातळीवरील प्रयत्नांबद्दल माहिती देता आली. त्याबरोबरीने डिजिटल सुरक्षेचे आव्हान, स्त्रियांपासून अजून काहीशी दूर असलेल्या नागरीक समानता अशा विषयांकडे लक्ष वेधता आले. या दोन सत्रांत इंडोनेशिया, मोरोक्को ऑस्ट्रेलिया, कतार या देशांच्या मंत्री व यूएन वुमनच्या कार्यकारी संचालक सीमा बाहोस, उपसंचालक किर्सी मादी सहभागी होत्या.
 
 
आज भारताबरोबर मैत्री व सामंजस्य करार करण्यासाठी जगातले मोठे-छोटे देश उत्सुक आहेत, भारताच्या जी 20 परिषदेतली कामगिरी व भूमिकेबद्दल केवळ खूश नव्हे तर भारत जगाचे आशास्थान आहे याचा अनुभव आम्ही केवळ याच सत्रात नव्हे तर अनेक सत्रांत घेतला. विशेषत: भारताच्या सूचनेवरून दक्षिण आफ्रिकेचा समावेश या जी 20 समूहात झाला आहे, विमेन लेड डेव्हलपमेंटचा मंत्र भारताने सर्व जगाला दिला आहे याबद्दल जगाची कौतुकाची भूमिका आहे.
 

women 
 
युनायटेड नेशन्सच्या कामकाजाला समांतर व महिला संघटनाना सहभागी करून घेणारा मंच म्हणजे NGO-CSW. या मंचाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भारतीय स्त्रीशक्तीने पहिला आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केला होता. भारतीय स्त्री शक्तीची स्थापनेपासून भूमिका ही पुरुष प्रबोधन, पुरुष सहकार्य आणि परस्परपूरक समानतेची राहिली आहे. त्याला अनुसरून आणि आजच्या काळात स्त्रीपुरुष समानतेसाठी पूरक पुरुषांची भूमिका याला अनुसरून हा कार्यक्रम होता. Shifting Gears:From Women Empowerment to Educating Men for Change स्त्रीपुरुष समानतेच्या ध्येयासाठी महिलांच्या सक्षमीकरणाचा रोख पुरुषांच्या प्रबोधनाकडे, संवेदनशीलता वाढवण्याकडे वळवायला हवा, त्याची गती वाढवायला हवी, हे केवळ आमचे मत नाही तर जग आपल्या ध्येयधोरणांमध्ये त्यावर भर देऊ लागले आहे. हा कार्यक्रम 11 मार्चला सकाळी 10.30 वाजता आयोजित केला होता त्याचे त्वरित प्रक्षेपण यू ट्यूब चॅनेलवरूनही झाले. जागतिक समुदायातून श्रोते व प्रेक्षक सहभागी झाले. त्यांचे सकारात्मक अनुभव सांगितले, चर्चेत मुद्देही मांडले. आजपर्यंत सुमारे 1000 लोकांनी हा कार्यक्रम पाहिला आहे.
 
 
अशा जागतिक परिषदांचा उद्देश हा डिप्लोमसी, नेटवर्किंग, लॉबींग, फंडिंग, सहकार्य, असा विविध असू शकतो. विविध देशांची सरकारे वा संस्था आपले प्राधान्यक्रम, व भूमिका मांडतात. त्यात केवळ महिला, मुले वा सामाजिक हित असे विषय नव्हते तर इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्ष, युद्ध, युद्धजन्य भागातल्या स्त्रियांची स्थिती, सध्याच्या अमेरिकन सरकारच्या भूमिका, स्त्रियांचे संतती- गर्भपात विषयक हक्क आणि धार्मिक व राजकीय भूमिका यावर परस्परविरोधी मते व भूमिका मांडणे, काही देशांनी त्यांना समर्थन देणे वा काहींनी विरोध करणे हे घडते. ही महिला परिषद असली तरी इथेही नेहमी स्त्री हिताच्या भूमिकाच घेतल्या जातील असे नाही तर सत्ताकारणाच्या, धर्मकारणाच्या विविध पातळ्यांवर त्या घेतल्या, मांडल्या जातात. या भूमिका स्त्री-कुटुंब-समाज हिताच्या असाव्यात यासाठी स्त्रीचळवळीतल्या कार्यकर्त्या परिश्रमपूर्वक, अनेकदा स्व-खर्चाने तिथे पोचत असतात. आपल्या भूमिकेला समर्थन मिळवणे हा जसा सरकाराचा हेतू असतो तोच संघटनांचाही असतो. आपले प्राधान्य विषय, कार्यक्रम, लोकसमर्थन व जनमत तयार करणे, संस्था व देशांचा पाठिंबा मिळवणे, प्रभाव गट व दबाव गट उभे करणे, त्यासाठी आर्थिक स्रोत उभे करणे हे संस्थांचे उद्देश असतात. तिथल्या कार्यक्रमात सहभागी होताना आपल्या संस्कृतीची व देशाची ओळखचिन्हे घालणे, पारंपरिक वेशभूषा करणे हासुद्धा मुत्सदेगिरीचा भाग बनतो.
 
 
या दहा दिवसांच्या काळात सगळी सत्रे ऐकणे हे अशक्य असते पण वेगवेगळ्या सत्रांत उपस्थित राहून, मते जाणून घेणे, नवे विषय समजून घेणे हे करता आले, आपल्या देशातील महिलांची स्थिती, कर्तृत्व, भूमिका मांडता आल्या. समान आस्थेच्या मुद्द्यांवर स्त्रियांच्या एकत्रित ताकदीचा अनुभव घेता आला. महिला आणि पर्यावरणीय बदल व आव्हाने, शेतकरी महिला, ब्लू इकॉनॉमी म्हणजे महासागरांच्या भोवती केंद्रित स्त्रीजीवन व आव्हाने, पोर्नोग्राफी, ए आय व तंत्रज्ञानाने निर्माण केलेले प्रश्न, धार्मिक नेतृत्व करणार्‍या महिलांचे योगदान व आव्हाने, तृतीयपंथीयांचे प्रश्न, महिला व संविधान निर्मितीतले योगदान, कायदे व परराष्ट्रीय धोरण, पॉलिसी, अफगाणिस्तानमधल्या स्त्रियांची स्थिती, तालिबानी राजवटीचे दुष्परिणाम, गर्भपाताचा अधिकार, आंतरराष्ट्रीय शांतता, सहकार्य, महिला व मुलांची अनैतिक वाहतूक, लैंगिकतेचा जागतिक व्यापार, व्यसनाधीनता, घटता जन्मदर, असे अनेक नवे-जुने विषय चर्चिले गेले. काही विषयांवर जागतिक स्त्री नेत्या व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेता आल्या. ज्या सत्रात आम्ही उपस्थित राहिलो त्यातल्या चर्चेत व प्रश्नोत्तरांमध्ये सहभागी होता आले. आमचे अनुभव, आमची मते, भारतीय संस्कृतीचा विशिष्ट दृष्टिकोन, परंपरा, भारतातली स्त्रियांनी केलेली प्रगती व सध्याचे भारतातले प्रश्न हे सर्व तिथे मांडता आले. आपली उपस्थिती व भारत गौरव मांडण्याची इच्छा मात्र हवी!
 
 
परिषदेच्या अंतिम सत्रात CSW 70 व्या सेशनच्या अध्यक्ष म्हणून कोस्टारिकाच्या MaritzaChan-Valverde यांची निवड झाली आहे व नवी समितीही नियुक्त झाली आहे. या परिषदेत मुस्लीम महिलांचा सहभाग लक्षात येण्याजोगा होता. CSW 69 चे अध्यक्ष सौदी अरेबियाचे मा. अब्दुलअजीझ अल्वासिल होते. त्यामुळे त्या देशात महिलांना आत्ता आत्ता किंचित स्थान मिळू लागले.संधी, स्त्री हक्क, समानता हे मांडणारे त्या देशाचे दालन मात्र प्रचंड मोठे होते. उद्घाटन सत्रात एका सौदी तरुणीने बासरीवर एक धून वाजवली. मुत्सदेगिरीची संधी सोडली जात नाही हेच खरे !
 
 
भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, वाढत्या राजनैतिक प्रभावाच्या तुलनेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व फारच अत्यल्प, नगण्य म्हणावे असे होते. जाणार्‍या महिलांचे रजिस्ट्रेशन ECOSOC मान्यताप्राप्त संस्थांमार्फत होते त्यामुळे त्यांची एकत्रित माहिती संबंधित मंत्रालय वा दूतावास यांच्याकडे उपलब्ध नसते. ती झाल्यास (सरकार व जाणारे प्रतिनिधी यांच्यात मतभिन्नता असेल हे गृहीत धरूनही) काही सहमतीच्या मुद्द्यांवर देश म्हणून रेटा उत्पन्न करता येऊ शकेल. या संधीचा फायदा किती जणींनी भारताच्या योग्य अशा projectionसाठी, प्रतिमा संवर्धनासाठी केला असेल? आपली उपस्थिती दखलपात्र करायचा प्रयत्न जाणार्‍या प्रत्येकीने करायला हवा.
 
 
CSW 69 परिषदेला उपस्थित रहाणे हा वैयक्तिकदृष्ट्या संपन्न करणारा अनुभव होताच, पण संघटनदृष्ट्या पुढील काळात येणारी आव्हाने, व त्यांचा सामना करण्यासाठी सिद्ध होणे किती महत्त्वाचे आहे याची तीव्र जाणीव झाली. जागतिक संदर्भात केअर इकॉनॉमीसारख्या विषयांचे भारतावर होऊ शकणारे परिणाम, भारतीय कुटुंबव्यवस्थेची सध्याची स्थिती, आव्हाने हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जेन झीच्या आकांक्षा आणि सामाजिक मूल्यव्यवस्था, फॅमिली काउन्सेलिंग किंवा कुटुंबप्रबोधनासारख्या विषयांत वाढवण्याच्या नव्या व प्रासंगिक विषयांची आवश्यकता, मानवीय हिताचा विचार, यांची सांगड घालण्याचे आव्हान कसे पेलायचे यावर विचार केला पाहिजे. त्यात भारत देश व संस्कृतीचा ठसा कसा कायम राखता येईल की नवव्यापारवादाचा परिणाम व प्रभाव, माणसांचे वस्तुकरण, रोबोटीकरण यात आपण वाहवत जाऊ? माध्यमांनी तयार केलेल्या मूल्यहीन व्यक्ती व समाज जाणिवा, यांच्या वावटळीत तग कसा धरायचा? आपली ताकद कशी वाढवायची व या परिषदेसारख्या अन्य प्लॅटफॉर्म्सवर आपली ताकद कशी वाढवायची? याचे मंथन करावे लागेल. जेंडर स्केलवर अतिरेकी रॅडिकल विचार प्रक्रिया एका टोकाला व दुसर्‍या टोकाला युद्धजन्य देशातल्या महिलांचे प्रश्न, स्त्रियांचे जगणे ताब्यात ठेवणारे तालिबानसारखे प्रवाह, जगाचे प्राधान्यक्रम व स्त्रीप्रश्न यातील संतुलन साधण्याचे आव्हान आहे. जेंडर समानतेमध्ये पुरुष सत्ता, जगाचे राजकारण, स्पर्धा, व स्वार्थ, सत्तापीपासू व स्त्रियांचे प्रश्न व संघटनांची ताकद हे व्यस्त गुणोत्तर आहे. वैश्विक प्रश्नांचा धांडोळा घेताना, आगामी आव्हानांचा वेध घेताना धोरण म्हणून भारत सरकारकडे आग्रहाने मांडायचे विषय, अनुवर्तन यावर काम करावे लागेल. अभ्यास, संशोधन, जागतिक बदलांचे आकलन, डिप्लोमसी, नेटवर्किंग, लॉबींग, फंडिंग, आंतरराष्ट्रीय सहकार्य असे हे बहुआयामी काम आगामी काळात करावे लागेल.
 
nayanas63@gmail.com
लेखिका भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या
राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
 
 

नयना सहस्रबुध्दे

स्त्रीविषयक लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या नयना सहस्रबुध्दे या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नयना सहस्रबुध्दे या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदावर कार्यरत होत्या. सध्या महिला बँकेत डेप्युटेशनवर रुजू झाल्या आहेत. साप्ताहिक विवेकमध्ये स्त्रीभान या सदरातून त्या स्त्रीविषयक लेखन करत आहेत.