@विवेक कवठेकर - 9423133930
संघटन विस्तार व दृढीकरण यासाठी रामदासजींनी अक्षरशः अकराही जिल्हे पिंजून काढले. बैठका, अभ्यासवर्ग, अधिवेशनांचे आयोजन, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण एकापाठोपाठ एक सारखे सुरू असायचे. अशा असंख्य छोट्या-छोट्या प्रयोगातून कार्यकर्त्यांचे एकजिनसी विदर्भव्यापी जाळे विणण्यात रामदासजी यशस्वी झाले.
तो 1988-89 चा काळ असेल. यवतमाळ अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे त्यावेळी यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयात शिक्षक होते. दहिवलकर प्लॉटमध्ये घर भाड्याने घेऊन राहात असत. त्यांच्याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत संघटनमंत्री आले आहेत आणि त्यांनी भेटायला बोलावले आहे असा निरोप मला मिळाला.
उत्सुकता म्हणून मी तिथे पोचलो. जेमतेम चार-पाच जण सतरंजीवर वर्तुळ करून बसले होते. अभाविपचे प्रांत अधिवेशन यशस्वीपणे संपन्न करून एक टीम नुकतीच यवतमाळच्या कामातून ’थांबलेली’ होती. ’फ्लोटिंग पॉप्युलेशन’चा परिणाम असेल पण कार्यकर्त्यांची एक अख्खी चमू बाजूला झालेली आणि जेमतेम चार-पाच जण उरलेले. मी अधिवेशनानंतर परिषद कार्यकर्त्यांच्या संपर्कात आलेलो. त्यामुळे छात्रसंघटन वगैरे काहीही माहीत नव्हतं. बैठकीत पोचताच परिचय करून देण्यात आला. ’हे डॉ. रामदास आंबटकर, आपले विदर्भ प्रांत संघटनमंत्री आहेत.’ ती नियोजन बैठक होती आणि प्रत्येकाचं मत विचारलं जात होतं. मी खेड्यावर, कलगावला असताना संघाचा बालस्वयंसेवक होतो पण अभाविपचा ’अ’ सुद्धा माहिती नव्हता. इतका नवखा असूनही इतरांप्रमाणेच मलादेखील ’तुला काय वाटतं? तुझं मत काय’? असं म्हणून रामदासजी अधूनमधून विचारीत.
त्यांच्या बोलण्यात सहजता होती. शब्दागणिक आत्मीयता, जिव्हाळा जाणवत होता. का कुणास ठाऊक पण या माणसाशी आपलं खूप जुनं नातं असावं असं वाटायला लागलं. ही त्यांची व माझी पहिली भेट. नंतर कळलं की ते इथे, यवतमाळातच बीएएमएस झालेले आहेत. मूळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातल्या वडनेरचे. घरी संघसंस्कार. परंतु अभाविपचा पहिल्यांदा संबंध आला तो 1979 साली, यवतमाळातच आणि इतका घट्ट जुळला की आयुर्वेद पदवी पूर्ण होईतो परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर वडनेरला त्यांनी आपला दवाखाना थाटावा अशी घरच्यांसहित सर्वांची इच्छा होती; मात्र दत्ताजी डिडोळकर यांच्या आग्रहावरून आधी विस्तारक आणि नंतर विद्यार्थी परिषदेचे ’पूर्णवेळ कार्यकर्ते’ म्हणून ते ’निघाले’.
वर्ष 1985. रामदासजींचं पूर्णवेळ म्हणून पहिलं केंद्र होतं अमरावती महानगर. कार्यकर्त्याला पूर्णवेळ म्हणून ’काढायचं’ असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. आधी त्याच्या मानसिकतेची चाचपणी केली जाते. नंतर घरून परवानगी घेतली जाते. त्यासाठी वडीलधारी जबाबदार व्यक्ती घरी संपर्क करून, कौटुंबिक परिस्थिती बघून ’रीतसर बोलणे’ करते.
रामदाजींच्या बाबतीत घरून तशी चिंता नव्हती. त्यांचे वडील भगवानजी आंबटकर मूळचे संघाचे आणि संघाने सांगितल्यामुळे जनसंघाचे कार्यकर्ते. निवडणूक काळात घरून फुटाणे- मुरमुर्याच्या पुड्या बांधून घेऊन गावोगावी निवडणुकीचा प्रचार केलेले. प्रचारासाठी जाताना आपला उमेदवार निवडून येतो किंवा किती मते मिळतील यापेक्षा या निमित्ताने आपल्या विचारांचा, पक्षाचा प्रचार-प्रसार करता येतो हा भाग अधिक महत्त्वाचा असे समजण्याचा तो काळ होता. राजकीय पक्ष म्हणून फार अपेक्षा नसायच्या नि पक्षांतर्गत स्पर्धा असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भगवानजी हेच भाजपाचे अनेक वर्षे वर्धा जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्याकडून रामदासजींना पूर्णवेळ म्हणून परवानगी मिळवण्यात दत्ताजी डिडोळकरांना फार कष्ट गेले नाहीत.
परिषदेचा ’पूर्णवेळ कार्यकर्ता’ म्हणून काम करणे हे मात्र त्यावेळी कष्टप्रद होते. आजच्यासारखी अनेकांगी अनुकूलता नव्हती. दळणवळणाची साधने अपुरी होती. संपर्काकरिता मोबाईलच काय, घरोघरी फोनही नसायचा. जिल्ह्यात, प्रांतात प्रवास करायचा म्हणजे आधी पत्र पाठवावे लागे. कधी कधी सूचनेशिवायही जावे लागायचे. नवीन संपर्कित कार्यकर्त्याकडे ’जेवायला येतो’ म्हणून कसे म्हणायचे असा संकोच वाटायचा. त्यामुळे कधी दोन्ही वेळ उत्तम जेवण तर कधी दोन्ही वेळचा कडकडीत उपवास घडायचा. रामदासजी या सार्या अनुभवांतून गेले. त्यांच्यातला ’प्रवासी कार्यकर्ता’ मात्र कधी कोमेजलेला अथवा निराश झालेला दिसला नाही.
कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन, त्यांची आवडनिवड पाहून गप्पा मारणे, सलगी करणे, कुटुंबीयांशी एकरूप होणे यातून विदर्भातली असंख्य घरे त्यांनी आपलीशी केली, अभाविपशी जोडली. बहुतेक प्रवास मुक्कामी असायचा. अशावेळी रात्री एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी मैफल जमायची. रामदासजींचा आवाज मुळातच गोड. यवतमाळला पनके सरांकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेले. त्यामुळे मैफल सजलीय आणि रामदासजींना गाण्याचा आग्रह झाला नाही, असे होत नसे. परिषद गीतांपासून सुरू झालेली ही मैफल कधी भीमसेन जोशींच्या अभंगांकडे किंवा गुलाम अलींच्या गजलांपर्यंत पोचायची. अभंगवाणीतील आर्त स्वर ऐकून एखादा ’समज असलेला’ कार्यकर्ता समजून जायचा. आज बहुदा रामदाजींना उपवास घडलेला दिसतो. त्याने तसे विचारताच उत्तर मिळायचे, अमुक एका ठिकाणावरून येतानाच जेवून आलो. प्रत्यक्षात, त्या दिवशी त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नसायचा.
आपल्या व्यक्तिगत अडचणींची फारशी चर्चा न करता, कार्यकर्त्याच्या सुखदुःखात मात्र ते समरसून सहभागी होत. कोणाचे दुखले-खुपले की जणू त्या वेदना त्यांनाच होताहेत इतक्या तत्परतेने ते उपायांसाठी धडपडत. 1994 मध्ये मला किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला. त्याच्या भयंकर वेदना जाणवायला लागल्या तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या वैद्यांशी, डॉक्टरांशी संपर्क करून काय करता येईल यासाठी प्रयत्न केले. नागपूरला डॉ. विक्रम मारवाह यांच्याकडे अॅडमिटही ठेवले. त्यांच्या पायाला सारखी भिंगरी लागलेली असायची. सतत कोणाच्यातरी भेटीगाठी, त्यांच्याशी परिषदेच्या कामाबाबत बोलणे सुरू असायचे. पण या सर्व कामाच्या धबडग्यात कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत अडचणींकडे बारीक लक्ष असायचे. ’घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ याचे प्रत्यक्ष उदाहरण रामदाजींमध्ये पहायला मिळायचे.
स्वर्गीय सैदाजी रेड्डी यांच्यानंतर ते विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री झाले. संघटन विस्तार व दृढीकरण यासाठी अक्षरशः अकराही जिल्हे पिंजून काढले. बैठका, अभ्यासवर्ग, अधिवेशनांचे आयोजन, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण एकापाठोपाठ एक सारखे सुरू असायचे. सदाशिवराव देवधर, बाळासाहेब दीक्षित यांच्या मार्गदर्शनात कोणाला कोणत्या जिल्ह्यात पाठवायचे याबाबत कार्यकर्त्यांची योजना करीत.
बहुतेक प्रवास एसटी बसने असायचा. बसस्थानकावर गाडीची वाट पाहत आम्ही तासन्तास उभे असायचो. अनौपचारिक गप्पा रंगत. खरे तर कुठल्याही गोष्टीची प्रतीक्षा नेहमीच कंटाळवाणी असते. इथे मात्र बस येऊच नये असे वाटे. सहजच्या गप्पांमधले बोलणे व्यक्तिगत आणि संघटनात्मक, दोन्ही दृष्टीने उपयोगी ठरायचे.
एकदा यवतमाळच्या बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना वेगवेगळ्या गावांना जाणार्या गाड्यांच्या बाजूने उभे राहून ’रामकृष्णहरी, रामकृष्णहरी’ असं म्हणून एकजण प्रवाशांच्या पुढे हात पसरीत होता. त्याच्याकडे बघून रामदासजी म्हणाले,‘याचा जप किती होत असेल? त्यामुळे किती पुण्य प्राप्त होत असेल?’ आणि मग ती चर्चा धर्म-अध्यात्माकडे वळायची. नामस्मरणामागचा हेतू काय, इथपर्यंत ती पोचायची. पुढचा प्रश्न असायचा, आपण दिवसरात्र इतकी मरमर करतो, असे म्हणतो. या धडपडीमागचा हेतू काय?
रामदासजींचे आवडते गीत होते, ’पूज्य मां की अर्चना का एक छोटा उपकरण हूं.’ ते गीत गाताना त्यांची अक्षरशः समाधी लागायची. भारतमातेची पूजा करणारे हे ’उपकरण’ स्वच्छ कसे राहील? परमेश्वराची पूजा करायला पळी-पंचपात्र घासूनपुसून स्वच्छ केलेले हवे, तसेच हेही. शरीराचे ठीक, मनाच्या स्वच्छतेचे काय? त्यासाठी अभ्यासवर्गातील प्रभातचिंतन, विचारपुष्प, रात्रीची मुक्तचर्चा असे विषय असत. अभाविप म्हणजे तरुण मुलामुलींचं काम. विचारांची स्पष्टता, व्यवहारातील सहजता यांच्या जोडीला निकोप वातावरण कसे राहील याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. अभ्यासवर्गातील रात्रीचे एक सत्र स्वतंत्रपणे सदाशिवराव, बाळासाहेब वा तत्सम ज्येष्ठांनी घ्यावे. तरुणांच्या डोक्यातली असली-नसली जळमटं दूर करावीत हा हेतू असे. सैद्धांतिक भूमिका, कार्यकर्ता, कार्यपद्धती, अभाविप वाटचाल इ. वर्गातील विषय कोणी मांडावे, मुद्दे, उदाहरणे कोणती असावीत याबाबत बोलत असत.
अशा असंख्य छोट्या-छोट्या प्रयोगांतून कार्यकर्त्यांचे एकजिनसी विदर्भव्यापी जाळे विणण्यात रामदासजी यशस्वी झाले. त्या भरवशावर विद्यापीठ निवडणुकीपासून सिनेटपर्यंत अन् नागपूर पदवीधर मतदारसंघात नितीनजी गडकरी यांच्यासाठी केलेल्या मोठ्या प्रमाणातील नोंदणीपासून अमरावती पदवीधर मतदारसंघातून सतत सहा वेळा निवडून आलेल्या बी.टी. देशमुखांसारखा तगडा उमेदवार हरवण्यासाठी डॉ. रणजीत पाटील यांच्यासाठी केलेली पाच जिल्ह्यांतील पायपीट असो, या यशामागे रामदासजींचे परिश्रम व त्यांनी उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांवरील विश्वास हेच होते.
पूर्णवेळ म्हणून थांबल्यानंतर पुढे ते भाजपामध्ये गेले. पश्चिम विदर्भ संघटनमंत्री झाले. पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीसही बनले. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडले गेले. एक हाडाचा कार्यकर्ता राजकीय क्षेत्रात यशस्वी नेतृत्व करताना पाहून त्यांच्या संपर्कातील सर्वांना आनंद झाला. रामदासजी आमदार झाले तरी त्यांच्यातला कार्यकर्ता संपला नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी ’तू माझा सांगाती’ या शीर्षकांतर्गत रामदास आंबटकर यांच्या परिषद काळातील मित्रमंडळींनी अनेक ठिकाणी एकत्रिकरणे घेत परस्परांना जोडून ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले.
सतत संपर्क, प्रवास, बैठकी आणि दिलेल्या कामासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी यामुळे इतरांसाठी धावपळ करणार्या रामदासजींची स्वतःच्या तब्येतीची मात्र आबाळ झाली. परिणामी मधुमेह आणि किडनी विकार बळावला. आपल्या शेवटच्या काळात भेटीला येणार्या प्रत्येकाजवळ ’आता आपण काही करू शकत नाही’ याची खंत ते साश्रू नेत्रांनी बोलून दाखवत. प्रकृती अधिकच बिघडली तेव्हा चेन्नई येथे नेण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न देता अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. अंगावर घेऊन काम करणार्या हाडाच्या कार्यकर्त्याची जेमतेम पासष्टाव्या वर्षीच एक्झिट झाली.
त्यांनी आणि त्यांच्यासारख्या स्वत:ला जमिनीत गाडून घेतलेल्या एकेका दाण्यामुळे, त्यांनी केलेल्या ’माती’च्या मशागतीमुळे आज संघविचारांचं पीक शिवारात बर्यापैकी फुललेलं, डवरलेलं दिसतं. रामदासजीसारख्या निष्ठावान, समर्पित कार्यकर्त्याच्या अवेळी निधनाने होणारे नुकसान मात्र केवळ त्यांच्या कुटुंबाचे किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे असत नाही, तर ते त्या विचारांनी चालणार्या संघटनेचे व एकूण समाजाचे असते. डॉ. रामदास आंबटकर नावाच्या जीव लावणार्या संघसमर्पित कार्यकर्त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!