आपण सारे भारतमातेचे पुत्र आहोत, इथे कुणी परका अथवा अनाथ नाही. या नात्याने प्रत्येकामध्ये नैसर्गिक भावंडभाव असणे ही पूर्वअट आहे. हाच भाव समाजात वावरताना संघस्वयंसेवकांनी जपला आणि चुकीच्या पायंड्याने पडलेल्या सामाजिक भेदरेषा पुसण्याचे कार्य केले. हे काम करताना अन्य समाज आणि भटके विमुक्त समाजात पडलेली भेदरेषा जास्त ठळक जाणवली. ‘हा समाजदेखील आपलाच आहे, त्यामुळे या समाजाचे उत्थान करणे हे आपले कर्तव्य आहे’, या कर्तव्यभावनेतून शिक्षण, सुरक्षा, स्वाभिमान आणि सन्मान या चतु:सूत्रीच्या आधारे काही संस्थांच्या माध्यमातून काम चालू आहे.
सज्जनशक्तीच्या संघटनेने अशी अनेक नंदनवने फुलवली. अनेकांच्या रक्ताच्या पाण्याचा शिडकाव झाला. विवेकच्या सुजाण वाचकांमुळे आणि समाजातील अन्य सज्जनशक्तीच्या दातृत्वामुळे, या नंदनवनातील मुले आज जीवनाच्या विविध क्षेत्रांत आपली योग्यता, क्षमता सिद्ध करत आहेत. यमगरवाडी, गुरूकुल आणि सेवाभावी
अन्य संस्थांमधून घडत असलेल्या मुलांची यशोगाथा सांगणारी ‘रवी उद्याचे’ ही लेखमाला.
संघ कार्यकर्ते, प्रचारक, यमगरवाडी, गुरुकुल, महाविद्यालयातील शिक्षक यांच्या शिकवणीने आणि भावंडांचे अपार प्रेम यातून घडलेला अर्जुन. पारधी समाजातील पहिला डॉक्टर तर झालाच, पण एक संवेदनशील माणूसही आहे हे त्याच्याशी संवाद साधल्यावर लक्षात आले.
अर्जुन जनाबाई महादू चव्हाण पारधी समाजातील पहिला डॉक्टर, ही बातमी वाचून 2005 साली अर्जुनसोबत त्याची भावंडे यमगरवाडीत कशी आली याची आठवण झाली. खरं तर ही भावंडे आली नाहीत तर त्यांना आणलं गेलं, ते आपलेपणा या मायेच्या धाग्याने. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अंबाडी तांडा या गावात राहणार्या या चार भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अजाण वयातच आईवडिलांंचे छत्र हरपले आणि पोरं पोरकी झाली. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेल्या पारधी समाजात जन्मलेल्या मुलांना नातेवाईक तरी कसे सांभाळणार होते. खेळण्याबागडण्याच्या वयात आयुष्यच खेळाचा पट झाला. भिक्षा मागून जगण्याची वेळ आली. हीच दुर्बलता हेरून ख्रिश्चन मिशनर्यांनी कैकयी प्रेमाचे भरते आणून नंतर छळाबळाचा वापर करून आपले धर्मांतराचे प्यादे बाहेर काढले.
याची खबर तेथील संघाचे धर्मजागरण विभाग प्रमुख गोवर्धन मुंडे आणि संघ विभाग प्रचारक गिरीश कुबेर यांना कळताच त्यांनी पाद्र्यांच्या तावडीतून या भावंडांची सुटका केली. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून यमगरवाडीतील कार्यकर्ते रमेश पवार आणि भावंडाची मावशी अशा तिघाजणांनी त्यांना यमगरवाडीत प्रकल्पात आणले. समाजातील सद्विचारी संघकार्यकर्त्यांच्या समाजजाणीवेने चव्हाण भावंडांच्या काळोख्या वाटणार्या आयुष्याच्या पटावर आशेचा किरण चमकू लागला. या भावंडांच्या पूर्वायुष्याची कहाणी सांगण्याचे प्रयोजन म्हणजे या भावंडांपैकी अर्जुननेेनुकताच आयुर्वेद वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवून पारधी समाजातील पहिला डॉक्टर होण्याचा मान पटकवला. या भावंडांच्या आनंदात कितीतरी कुटुंबं सहभागी झाली, अनेक घरांत गोडाधोडाचा स्वयंपाक झाला. याचे कारण काय? याचे कारण एकच भावंडभाव.
अर्जुन यमगरवाडीत आला तो अवघ्या चार वर्षांचा असताना. ताईलाच आपली माय समजत होता, ताई जिथे जाईल तिथे तिच्या मागे मागे जात असतं, विवेकमध्ये तुझ्या कर्तृत्वाविषयी लेख लिहायचा आहे, तुझ्याशी बोलायचं आहे असं मी सांगितल्यावरदेखील आधी रेखाताईशी बोला असं सांगणार्या अर्जुनशी बोलताना जाणवले ते त्याच्यात नात्याचा जिव्हाळा आणि समाजाविषयीची कणव किती खोलवर रूजली आहे.
अर्जुनचं आठवीपर्यंतच शिक्षण यमगरवाडीत झालं. लहानपणापासून शिकण्याची जिद्द आणि खेळात तरबेज असलेला अर्जुन प्रकल्पातील सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असे. क्रीडाक्षेत्रात मल्लखांब आणि रायफल शूटींग या दोन्ही खेळातील विशेष प्राविण्यामुळे त्याने दोन वेळेस जिल्हा स्तरावर यश संपादित केले होते. शालेय अभ्यासक्रमासोबत असलेल्या या उपक्रमांमुळे स्टेज डेअरिंग, आत्मविश्वास, अडचणींवर मात कशी करायची याचे जीवनधडे मिळत गेले असे अर्जुन आवर्जून सांगत होता. याच शिवाय वर्गशिक्षक असलेले हरिश मगदूम यांनी एक चांगला माणूस घडविण्यासाठी जे जे आवश्यक होते ते ते सर्वकाही केल्याचेही तो सांगतो. मगदूम सरांमुळेच पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली. यमगरवाडीत असतानाच भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचले होते. बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि बाबासाहेबांचे संघर्षमय यशस्वी जीवन याने आपणही जीवनातच पुढे जाऊ शकतो ही प्रेरणा जागृत झाली. त्या दरम्यान आणखी एक पुस्तक वाचनात आलं ‘एक होता कार्व्हर’ त्या पुस्तकाची कहाणी माझ्या आयुष्याशी साधर्म्य असलेली होती आणि जागृत झालेल्या प्रेरणेला स्फुरण चढले.
यमगरवाडीत असताना डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, आणि पायाला भिंगरी अशा पद्धतीने जीवन जगणार्या अनेक प्रचारकांना जवळून पाहता आले. अशा संघकार्यकर्त्यांच्या आचरणामुळेच संघसंस्कार घडत गेले. यमगरवाडीतील सर्व शिक्षकांच्या शिकविण्याच्या आत्मियतेमुळे अभ्यासाशी गट्टी जमत गेली. विज्ञान हा विषय आवडीचा झाला त्याचे कारणही विज्ञानाचे शिक्षक दयानंद भडंगे सरांमुळे. विज्ञानविषयक पुस्तकांचे वाचन, वेगवेगळे व्हिडिओ आणि सरांनी सांगितलेल्या विज्ञानाच्या सुस्पष्ट संकल्पना. या सार्यामुळे आपण शास्त्रज्ञ व्हावं असं सुरुवातीला वाटलं होतं.
शास्त्रज्ञ न होता डॉक्टर होण्याची वाटचाल कशी झाली, यावर अर्जुनचं उत्तर हृदय हेलावणारं होत. तो म्हणाला की, ‘एकदा एका पालावर गेलो होतो. प्रसूतिवेदना होणार्या बाईवर कुठल्याही साधनाशिवाय सुईण मरणासन्न वेदना होतील अशा प्रकारे पोटावर दाब देत होती. या प्रकारात बाळ आणि बाळंतीण दगावण्याची शक्यताच जास्त होती. या एका प्रसंगाने मन गहिवरून आलं.
माझ्या आईचं निधन कशामुळे झालं हेदेखील मला माहीत नव्हतं. पण आईच्या दुधावर भूक भागवल्या जाणार्या तान्ह्या वयात माझा लहान भाऊ रामकृष्ण त्याला मुकला. त्याचे परिणाम म्हणून त्याला मुडदूस झाला, मरणाच्या दाढेतून तो बाहेर आलेला आम्ही पाहिलंय. रेखाताई, शीतलताई, आणि मलाही वरचेवर काहीतरी आजार होतच असायचे. यावरून डॉक्टर होण्याचा माझा निर्णय पक्का होत गेला.
यमगरवाडी प्रकल्प हेच आमचं घर आणि यमरवाडीतील कार्यकर्ते म्हणजे आमचे गणगोत झाले होते. जीवनात टिकाव लागायचा असेल तर बाहेरील जगाची ओळख व्हायला हवी या उद्देशाने अर्जुनशी बोलून आणि संघ-यमगरवाडीतील कार्यकर्त्यांशी बोलून पुढील शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील डोमरी येथील सोनदरा गुरुकुलात त्याला पाठवण्यात आलं. संघविचारांच्या गुरुकुलात वैचारिक जडणघडणीबरोबरच पौंगडावस्थेतील होणार्या शारीरिक-मानसिक भावभावना काबूत ठेवून योग्य दिशेने जाण्याचे आयुष्यात पुरतील एवढे धडे संस्थासंचालक सुदामकाका भोंडवे आणि अनेक संघकार्यकर्त्यांनी दिले. बाहेरील आकर्षणाला बळी पडू नये अशीच व्यग्र दिनचर्या गुरुकुलात होती. अवांतर वाचनाची सवय इथेच लागली. गुरुकुलात ‘हिंदी आणि इंग्लिश डे’ अशा उपक्रमांमुळे त्या भाषांशीही मैत्री झाली. यमगरवाडी आणि गुरुकुलातील साम्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी असलेले कौटुंबिक वातावरण. गुरूकुलातील शिक्षण सेमी इंग्लिश होते, मराठी माध्यमातून शिकलेल्या अर्जुनला शिक्षकांनी पूर्ण सहकार्य केलेच, त्यासोबच शिकण्याच्या अनेक क्लृप्त्या अर्जुनने विकसित केल्या. दहावीत चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन कल चाचणीत विज्ञान शाखेकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
विज्ञान शाखेतील प्रवेश आणि त्यासाठी लागणारा खर्च अफाट होता, पण ते साध्य झाले कारण असंख्य मदतीचे हात पुढे आल्यामुळे. रावसाहेब कुलकर्णी आणि संजय अग्रवाल यांनी अर्जुनचे पालकत्व स्वीकारले आणि डॉ. चंद्रभानू सोनावणे ज्युनिअर कॉलेजने दत्तक घेतल्यामुळे शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. सेमी इंग्लिश करत पुढे आलेली गाडी इंग्लिशच्या प्लॅटफॉर्मवर येऊन अडकली. पण अर्जुनने माघार न घेता त्यावरही मात केली. पुढे शिकायचे आहे तर येणारे अडथळे आपणच दूर केले पाहिजेत हे मनाशी पक्क त्याने केलं होतं. नाही म्हटलं तरी नैराश्य यायचं अशा वेळी भगवद्गीतेचे वाचन त्याला बळ देतं.
शिक्षणाची जिद्द पाहून कॉलेजमधील शिक्षकांनी NEET परीक्षा देण्याचा सल्ला दिला. पहिल्या खेपेस कमी गुण आले, तेव्हा दुसर्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मधल्या वेळेत डॉ. अभय शहापूरकर आणि रावसाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने डॉ. अभय यांच्या हॉस्पिटलमध्ये कामही केले. त्यातूनच जमवलेल्या पैशाने नीटच्या परीक्षेची फी भरली. अर्जुनमध्ये कष्ट करण्याची वृत्ती निर्माण व्हावी आणि जीवन संघर्षात टिकून रहावे याचा धडाच शहापूरकरांनी या माध्यमातून दिला याबद्दल कायम त्यांचा ऋणी राहू इच्छितो असे अर्जुन सांगतो. गोवधर्र्न मुंडे, रावसाहेब कुलकर्णी आणि यमगरवाडीतील कार्यकर्त्यांनी परीक्षेसाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भरपूर सहकार्य केले.
दुसर्यांदा दिलेल्या नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे आणि संघ रचनेतून श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे प्रवेश मिळाला. आयुर्वेद शिकायचे आहे तर संस्कृत भाषेला पर्याय नाही, हे स्वीकारलं. पाटी-पेन्सिल या साधनाचा वापर करून सराव करीत संस्कृतवर अर्जुनने पकड बसविली. संघप्रचारक विजयराव पुराणिक यांनी अर्जुनच्या पालकत्वाची जबाबदारी मिलिंद देशपांडे यांच्याकडे दिली. अर्जुनच्या आर्थिक भाराबरोबरच मानसिक आधार देशपांडे यांनी दिला. त्याचसोबत मानसिक व वैचारिक बैठक पक्की केली ती, डॉ. सचिन देवरे यांनी. अशी असंख्य निःस्वार्थी माणसे आयुष्यात आली, म्हणूनच त्याच्या आयुष्याची गाडी योग्य वळणावर आहे, हे अर्जुन अभिमानाने सांगत होता.
सप्तशृंगी कॉलेजच्या दुसर्या वर्षाला संपर्क आला तो सेवांकुरशी. वैद्यकीय नैतिकता, समाजदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास या त्रिसूत्रीवर वैद्यकीय शिक्षण घेत असणार्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे काम सेवांकुरमार्फत चालते. आलेल्या रुग्णाला चिकित्सा करीत असताना राइट पेशंट, राइट मेडीसिन, राइट डोस या त्रिसूत्रीचा अवलंब कसा करावा याचे ज्ञान विकसित होत गेले. वन वीक फॉर नेशन या उपक्रमातून समाजदर्शन घडते आणि समाजाविषयी ममत्व भाव जागृत होतो.
अर्जुनने आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे, यमगरवाडी मित्र मंडळामार्फत राजू गिजरे आम्हा यमगरवाडीतील मुलांना सुट्ट्यांमध्ये पुण्यात कुटुंबांत वस्तीला घेऊन जात असतं. कुटुंबातील पोषक वातावरण आणि नात्यांतील ऊबेचा अनुभव त्यामुळे झाला. नि:स्वार्थ प्रेमाची पखरण यामुळे आमच्यावर झाली. कुटुंबव्यवस्था हे आपल्या देशाचे बलस्थान आहे, याचे दर्शन या उपक्रमामुळे झाले.
‘शिक्षण पूर्ण होईपर्यंत खूप भ्रमंती झाली तरी रेखाताई, यमगरवाडी, संघकार्यकर्ते या सगळ्यांचं माझ्याकडे पूर्ण लक्ष असायचं. संघ संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरेल अशीच आहे. रूढार्थाने अनाथ असलो तरी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, आम्हाला हजारो आईवडील आहेत.’ पुढील ध्येयाविषयी विचारले असता, अर्जुनचं म्हणणं असं की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजसेवीरुग्णालयात सेवा देण्याचा मानस आहे.
संघसंस्कार, समाजाविषयी कणव आणि जिद्द या गुणांच्या जोरावर अर्जुनच्या आयुष्यातील स्वप्न साकार होतील, अशी खात्री आहे.