सकळ जनसखा तू स्वामी माझा

12 May 2025 16:02:36
Karunastake
मनातील माया, मोह, प्रपंचात गुंतवणारे विकार विचार यांचा त्याग मलाच करायचा आहे. स्वामी म्हणतात, मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. विषम काळी मी घरदार, नातेवाईक, सवंगडी या सुहृदांचा त्याग करून तुझ्या साक्षात्कारासाठी इथवर आले आहे. मागील सर्व मायापाश मी तोडून टाकले आहेत. मला कसलेही आकर्षण उरले नाही. मी परत जांबगावी जाऊन माझे नातेवाईक व सवंगडी यांना भेटेन की नाही ते मला माहीत नाही. आता तूच माझा जीवलग, सखा सर्वस्वी आहेस. तुझ्याशिवाय दुसरा कोणी माझा स्वामी नाही. तुझ्या दर्शनाची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे.
या पूर्वीच्या श्लोकात समर्थ म्हणाले की, लेकराला मायबापाची माया समजत नाही, त्याप्रमाणे भक्ताला देव किती दयाळू आहे, ते लवकर समजत नाही. भक्ताच्या ठिकाणी असलेला अहंकार, त्याची देहबुद्धी, गर्वताठा नाहीसा व्हावा म्हणून देव भक्ताला संकटांचा सामना करू देतो. संकटांचे त्वरित निवारण करण्याऐवजी भक्ताला संकटांशी झगडू देण्यात परमेश्वर भक्ताचे हित पाहात असतो. भक्ताने संसारात येणारे दुःख, कष्ट, संकटे यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे असे समर्थांना सांगायचे आहे. श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्र ज्यांनी वाचले असेल किंवा ज्यांना ते माहीत असेल, त्यांना आठवेल की, महाराज बालवयातच गुरू शोधार्थ घराबाहेर पडले. अनेक संकटांशी सामना करीत महाराजांनी गुरू तुकामाईंची भेट घेतली. त्यांची सेवा करीत ते गुरुजवळ राहिले. गुरू तुकामाईंनी या बालशिष्याला व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत कठोर वागणूक दिली- एकप्रकारे त्यांनी महाराजांचा छळ केला, परंतु तसे वागण्यामागे गुरुंचा उद्देश असा होता की, महाराजांची देहबुद्धी, अहंकार, मीपणाची भावना नष्ट करावी. त्याप्रमाणे महाराजांची देहबुद्धी, मीपणा, अहंभाव नष्ट झाला याची खात्री पटल्यावर तुकामाई गुरुंनी त्यांना अत्यंत मायेने वागवले. महाराजांची रामभक्तीची तळमळ पाहिल्यावर गुरुंनी महाराजांना रामभक्ती,
 
रामनामाचे प्रेम, ज्ञान आणि वैराग्य यांचे मुक्तपणे भरभरून दान केले. तुकामाईंनी महाराजांना अध्यात्म क्षेत्रातील महंताची योग्यता प्राप्त करून दिली. दीक्षा देण्याचा अधिकार दिला.
 
भक्तिमार्गात देवाविषयी आतुरता, तळमळ महत्त्वाची असते. ती समजावी यासाठी समर्थांनी निश्चयी अशा चातक, चकोर पक्ष्यांचे दाखले मागील श्लोकात दिल्याचे आपण पाहिले, तोच उत्कंठतेचा भाव पुढे चालू ठेवून समर्थांनी यापुढील श्लोक लिहिला आहे. रामदर्शनाशिवाय माझी स्थिती तशीच झाली आहे, असे ते पुढील श्लोकात सांगत आहेत.
 
तुजविण मज तैसें जाहलें रामराया।
विलग विषम काळी सांडिती सर्व माया ।
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
विषय वमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥10॥
 
(हे देवराया, तुझ्याशिवाय माझे मन (चातक, चकोर पक्ष्यांप्रमाणे) तसे (आतुर) झाले आहे. अत्यंत बिकट प्रतिकूल काळ आला असता सर्व माया सोडावी लागते. आता तूच माझा सर्वस्वी (आई, वडील, नातलग) जीवलग सखा आहेस. हे स्वामी (मला) तुझ्याशिवाय दुसरे कोणी नाही. (माया, मोह, जीवलग) तसेच माझ्या मनातील (वासना विकार) या (घाणीचा) मी ओकारी काढावी तसा सर्वस्वी त्याग केला आहे.)
 
 
भक्त म्हणतो, भगवंताविषयी आतुरता, तळमळ माझ्या मनात उत्पन्न झाल्यामुळे, चातकपक्षी ज्या आतुरतेने तहान भागवण्यासाठी आकाशातून पडणार्‍या पावसाच्या थेंबाची चोच पसरून वाट पाहातो किंवा चंद्राचे चांदणे पिऊन जगणारा चकोर पक्षी ज्या तळमळीने चंद्राची व चांदण्याची वाट पाहातो, तसे माझे झाले आहे. मनातील तळमळ, आतुरता, निश्चय, उत्कंठा या भावनांनी भक्त जेव्हा मनापासून देवाची आळवणी करतो तेव्हा भगवंत जवळ येतो. भगवंताचे सतत स्मरण होऊ लागते. त्याच्या नामस्मरणाशिवाय भक्ताला चैन पडत नाही. अर्थातच त्यामुळे भक्त आणि भगवंत यांच्यातील अंतर कमी होते. हे साधण्यासाठी त्यामधील अडथळ्यांचा विचार करून ते अडथळे कसे दूर करता येतील हे पाहिले पाहिजे. तरच भगवंताचे अस्तित्व निकट असल्याचा प्रत्यय येईल.
 

SWAMI SAMARTH  
 
यासाठी समर्थांनी प्रथम आजूबाजूच्या कठीण परिस्थितीचा विचार केला आहे. बाह्य परिस्थिती प्रतिकूल असेल तर ती बदलणे आपल्या हातात नसते. समर्थांनी त्यासाठी या शोकात ’विषम काळी’ असा शब्दप्रयोग केला आहे. तो अर्थपूर्ण आहे. विषम काळात जीवलगही विचारत नाहीत. आता समर्थकालीन बाह्य परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊ.
 
 
समर्थांचा काळ जाणून घेण्यासाठी सुमारे चारशे वर्षांपूर्वीची राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थिती जाणून घ्यावी लागेल. तो काळ सर्वदृष्ट्या मोठा कठीण होता. त्यावेळी म्लेंच्छांची दुराचारी राजवट होती. राजकीय सत्ता मुसलमानांच्या हाती होती. दिल्लीच्या औरंगजेबापासून खालपर्यंतचे मुस्लीम सरदार व अधिकारी मूर्तिभंजक, हिंदूधर्मद्वेष्टे, जुलमी होते. याचे पुरावे देता येतात. शंकरराव देव यांनी त्यांच्या ’समर्थवतार’ या ग्रंथात लिहिले आहे की, गावच्या गावे जाळण्याची या जहांगीराला लहर येत असे. हे राजे प्रजेचे रक्षक नसून भक्षक होते. शहाजहानच्या एका हुकुमाने काशीतील 75 मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. सरदार नुसरतखानाने सोरटी सोमनाथ येथील देवांच्या मूर्तीचे तुकडे करून ते तो दिल्लीला घेऊन गेला. त्यांचा उपयोग त्याने मशिदीच्या पायाभरणीसाठी केल्याचे सांगितले जाते. समर्थांनी दासबोधातील 6.6.35 या ओवीत असा उल्लेख केला आहे की, ’येक
 
देव नेऊनि घातिला । पायातळी॥’
 
तो बहुदा नुसरतखानाच्या दुष्कृत्याचा असावा. या अशा मूर्तिभंजक, हिंदूधर्मविध्वंसक बातम्या नाशिकपर्यंत येत होत्या. एकंदरीत हिंदू समाज सामाजिक, धार्मिक बाबतीत भयभीत झाला होता. यातून लोकांना सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा करून हिंदू धर्म व संस्कृती सावरली, पण तत्पूर्वीचा काळ एकंदरीत कठीण होता. त्याच काळाचा उल्लेख समर्थ ’विषम काळ’ असा करतात. याच अत्याचाराच्या हकिगती तत्कालीन परदेशी प्रवासी मनुची, ट्रॅवरनियर, मंडेल स्लो यांनी लिहून ठेवल्या आहेत, त्या वाचताना अंगावर शहारे येतात. असल्या वातावरणात देवाचे भजनपूजन कसे करता येणार? सर्व माया सोडून जातात.
अशा या संकटकाळाचा सामना करण्यासाठी श्रीराम व हनुमान यांच्या पराक्रमांपासून प्रेरणा घेतली पाहिजे असा समर्थांचा विचार होता. तथापि रामाला प्राप्त करून घेण्यासाठी अंतरंगातील शत्रूंचे काय करायचे? मनातील माया, मोह, प्रपंचात गुंतवणारे विकार विचार यांचा त्याग मलाच करायचा आहे. स्वामी म्हणतात, मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. विषम काळी मी घरदार, नातेवाईक, सवंगडी या सुहृदांचा त्याग करून तुझ्या साक्षात्कारासाठी इथवर आले आहे. मागील सर्व मायापाश मी तोडून टाकले आहेत. मला कसलेही आकर्षण उरले नाही. मी परत जांबगावी जाऊन माझे नातेवाईक व सवंगडी यांना भेटेन की नाही ते मला माहीत नाही. आता तूच माझा जीवलग, सखा सर्वस्वी आहेस. तुझ्याशिवाय दुसरा कोणी माझा स्वामी नाही. तुझ्या दर्शनाची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. मी सर्वस्वाचा त्याग केला आहेच, पण मला त्रास देणारे विषय, विकार, वासना यांनाही मी मनातून काढून टाकले आहे. हे विकार, वासना, वमन करावे तसे मी काढून टाकते. आयुर्वेदात शरीरशुद्धीसाठी वमन क्रिया सांगितली आहे. या वमन क्रियेद्वारा पोटातील साचलेली घाण ओकारी करून बाहेर काढून टाकतात. त्या पद्धतीने माझ्या मनातील विकार, वासनादी घाण निघाल्याने माझे अंतःकरण स्वच्छ, आरोग्यपूर्ण झाले आहे. आता मी तुझ्या भेटीची उत्कंठेने वाट पाहात आहे.
Powered By Sangraha 9.0