जपूया, आंब्यातील जैवविविधतेचा ठेवा

16 May 2025 18:20:38
@अमित गद्रे 

mango
श्रावण्या, दगड्या, चपट्या, काला पहाड, सफेद मालुदा, करेल, अखजा... ही नावे आहेत. आपल्या शेतकर्‍यांच्या बांधावरील रायवळ अर्थात गावरान आंब्याची... चव, रंग, आकार, गुणवैशिष्ट्य आणि बोलीभाषेनुसार या जाती ओळखल्या जातात. काळाच्या ओघात या जातींकडे दुर्लक्ष झाल्याने ही जैवविविधता संपत चालली आहे. परंतु हवामान बदलाच्या काळात आणि नवी जातींच्या संशोधनाच्या दृष्टीने रायवळ जाती महत्त्वाच्या ठरणार आहेत.
पश्चिम घाटातील विविध बहुपयोगी वनस्पती आणि रायवळ आंबा जाती दुर्मीळ होत चालल्या आहेत. या गावरान जातींची ठिकाणानुसार स्वाद, आकार, चव, रंग अशी वेगवेगळी वैशिष्ट्येे मिळतात. त्यामुळे हा नैसर्गिक ठेवा जपणे फार महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने पुण्यातील पर्यावरण शिक्षण केंद्राने ग्रामीण भागातील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या परिसरातील गावरान आंबा जातींची त्यांच्या वैशिष्ट्यांसह माहिती गोळा करण्याचे नियोजन केले होते. यासाठी पर्यावरण शिक्षण केंद्राने ‘पश्चिम घाट स्पेशल इको क्लब’ योजना तयार केली. ही योजना सह्याद्री पटट्यात असणार्‍या 239 शाळांच्या माध्यमातून राबविण्यात आली. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्गातील शाळांनी चांगला सहभाग नोंदविला.
 
 
आंब्यातील जैवविविधता नोंदविण्यासाठी गावातील वयस्क तसेच शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. माहिती नोंदीसाठी विशिष्ट फॉर्म तयार केला. यामध्ये आंबा जातीचे स्थानिक नाव, गावाचे नाव, झाडाचे ठिकाण, मालकाचे नाव, जातीची वैशिष्ट्ये, झाडाचा आकार, फळ आणि पानांचा आकार, सालीची जाडी, फळातील केसराचे प्रमाण, फळ कच्चे आणि पक्के झाल्यानंतरचा रंग, वजन, चव, सुगंध अशी विविध निरीक्षणे नोंदविण्यात आली. शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमात चांगला सहभाग नोंदविला. या प्रकल्पातून आंब्याच्या 203 गावरान जातींची नोंद केली. पर्यावरण शिक्षण केंद्रातील तज्ज्ञांनी आंबा जातींची छायाचित्रे आणि माहितीचे शास्त्रीय पद्धतीने संकलन केले आहे.
 
नमस्कार सुहृदहो !
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
 
 
रंग, चव, आकारावरून नावे
 
बहुतेक गावातील आंबा जातींना फळाचा रंग, चव, आकारावरून नाव देण्यात आली आहेत. उदाहरण द्यायचे झाले, जास्त चिकाचा चिकुळा आंबा, चिकाला शेपूसारखा वास असेल तर शेप्या आंबा. कोकणातील एका गावात दरवर्षी भरपूर आंबा फळे देणारे झाड दिसून आले. लोकांनी या जातीला वताचा आंबा असे नाव दिले. याचे कारण म्हणजे या झाडाला भरपूर फळे लागतात. आंबा फळाच्या आकारानुसार भोपळी, नारळी, मोग्या अशी नावेदेखील दिसतात. पुणे येथील आयसर या संशोधन संस्थेमध्ये चाळीस आंब्याच्या गावरान जातींचा वेगळेपणा ओळखण्यासाठी त्यांच्या जनुकांची तपासणी करण्यात येत आहे. या माध्यमातून गावरान जातीमधील वेगळेपण शास्त्रीय पद्धतीने सर्वांच्यासमोर आणणे शक्य होणार आहे.
 
काही गावांमध्ये गावरान बिटकी जातीच्या आंब्याची झाडे टिकून आहेत. या फळाला हापूसच्या तोडीची चव आहे. परंतु दुर्लक्षामुळे ही जात सह्याद्री पट्ट्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आंबा जाती नष्ट झाल्याने त्यांची चव, गुण वैशिष्ट्ये संपतात, त्याचबरोबरीने ही वैशिष्ट्ये असलेली जनुकेही नष्ट होताहेत. या झाडांवरील दुर्मीळ ऑर्किडदेखील संपत आहेत. काही ऑर्किड ही दुर्मीळ फुलपाखरांचे ‘होस्ट प्लान्ट’ आहेत. जंगलातील पक्षी, माकडांचा खाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे गावरान आंबा. अशी ही जैवविविधतेची साखळी टिकवण्यासाठी गावरान आंबा जाती टिकविणे आणि वाढविणे आवश्यक आहे.
 
आंब्याची जैवविविधता : भविष्यासाठी मौलिक ठेवा
देशपातळीवर आंब्याच्या हजारांहून अधिक जातींची जैवविविधता पाहावयास मिळते. यातील चाळीस जाती व्यावसायिकदृष्ट्या लागवडीखाली आहेत. रायवळ गटामध्ये प्रदेशनिहाय विविधता आढळते. फळांचा लाग, चव, रंग, आकार अशी वैशिष्ट्ये दिसतात. खोबर्‍या, गोटी, बिटक्या, करेल अशा स्थानिक नावाने या जाती परिचित आहेत. खोबर्‍या सॅलडसाठी, बिटक्या रायत्यासाठी आणि करेल, राजापुरी, कासवजी पटेल या स्थानिक जाती लोणच्यासाठी प्रसिद्ध आहेत. वनराज या जातीचे फळ मोठे आहे. दूधपेढा जातीचा आंबा चवीला अत्यंत गोड आहे. आपल्या देशात प्रदेशनिहाय ग्राहकांची विविध आंबा जातींना पसंती आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, महाराष्ट्रात हापूस, पायरी, केसरला चांगली मागणी असते. गोवा राज्यात मानकुराद, गुजरातमध्ये केसर, उत्तर भारतामध्ये दशहरी, लंगडा, आंध्रप्रदेशात बैंगनपल्ली, कर्नाटकात बदामी आंब्याला पहिली पसंती दिली जाते. प्रदेशनिहाय रायवळ जातींमध्ये विविध गुणवैशिष्ट्येे असल्याने नवीन जातींच्या संशोधनासाठी त्यांचे संवर्धन महत्त्वाचे ठरले आहे. आंबा लागवड करताना व्यावसायिक जातींच्या बरोबरीने वीस टक्के इतर जातींच्या लागवडीची विद्यापीठाने शिफारस केली आहे. यामुळे परागीकरणास फायदा होतो. फळांचे उत्पादनही चांगले मिळते. महत्त्वाचे म्हणजे बागेमध्ये जैवविविधता जपली जाते. यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या शेती बांधावर असलेल्या रायवळ जातींचे संवर्धन केले पाहिजे.
 
दोनशेहून अधिक जातींचा संग्रह
 
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. या प्रक्षेत्रावर आंब्याच्या 270 जाती पाहावयास मिळतात. प्रक्षेत्रावर हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा, पायरी, आम्रपाली, वनराजा, दशहरी, मल्लिका, बैंगनपल्ली या सारख्या विविध व्यावसायिक जाती आहेत. याचबरोबरीने कलमीकरणासाठी खुंट म्हणून उपयोगी पडणारी वेलई कोलंबन, गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद, फर्नांडिन पहावयास मिळते. संशोधनाच्या दृष्टीने परदेशातील पामर, हेडन, केंट, कीट, टॉमी टकिन्स, माया या जातींची लागवड आहे. हा ठेवा संशोधनासाठी उपयुक्त ठरला आहे.
 
मराठवाड्याचे वैभव
 
मराठवाड्यातील प्रयोगशील शेतकर्‍यांनी शेती बांधावर रायवळ आंब्याचे संवर्धन केले आहे. मात्र दुर्लक्षामुळे या जाती नामशेष होत आहेत. हे लक्षात घेऊन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी गावरान जातींची नोंद घेतली आहे. मराठवाडा विभागाला आंबा लागवडीची पुरातन परंपरा आहे. गुलाब खरा, सफेद मालुदा यासारख्या रायवळ जाती शेतकर्‍यांच्या बांधावर दिसतात. हवामान बदलाच्या काळात या जाती संशोधनासाठी महत्त्वाच्या आहेत. या जातींना विशिष्ट चव, सुगंध आहे, गुणवैशिष्ट्ये आहेत. विद्यापीठातील तज्ज्ञांनी गुलाब खरा, काला पहाड, सफेद मालुदा, दुधपेढा या स्थानिक जातींची नोंद घेतली आहे. संशोधन प्रक्षेत्रावर रायवळ आंबा जातींसोबत केसर, हापूस, दशहरी, तोतापुरी, बानेशान, लंगडा, पायरी, निरंजन या जाती पाहायला मिळतात.
 
 
विदर्भात ढोबर्‍या, अखजाची दरवळ
 
विदर्भातील आंब्याच्या विविध जातींचे संवर्धन आणि संशोधन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन प्रक्षेत्रावर केले जाते. येथील तज्ज्ञांनी ढोबर्‍या, शेपू, पहाड्या, गळू, श्रावण्या, शेंद्रया, दगड्या, चपट्या, पिंजारी, खोबर्‍या, अखजा, हिरा, खार्‍या, गोट्या, कामत्या, आमत्या, कासी या रायवळ जातींची नोंद केली आहे. या फळांचा आकार, सुगंध आणि चव प्रदेशनिहाय वेगवेगळी आहे.
 
 
स्वाद, रंगामध्ये विविधता
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर राज्य, परराज्यातील स्थानिक जाती तसेच विविध राज्यातील कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या आंबा जातींची लागवड आहे. याठिकाणी पायरी, केसर, रत्ना, हापूस, सिंधू, निलम, बदामी, दशहरी, तोतापुरी, लंगडा, साई सुगंध आणि फुले अभिरुची याचबरोबरीने हूर, कलाकंद, मलगोवा, सफेदा, जहांगीर, दिलपसंद या सारख्या लुप्त होणार्‍या राज्य, परराज्यातील स्थानिक जाती पाहावयास मिळतात. यातील काही जातींचा रंग आकर्षक आहे. गराचे प्रमाण चांगले आहे. काही जाती प्रक्रियेसाठी तर काही जाती रस, लोणच्यासाठी ओळखल्या जातात.
 
लेखक दैनिक अ‍ॅग्रोवन, पुणे येथे मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0