1947 साली पाकिस्तान नावाचा नवा देश जन्माला आला. पाकिस्तानची जन्मतः ओळख कोणती? तर पराकोटीचा हिंदूद्वेष ही त्याची ओळख. पाकिस्तानच्या अस्तित्त्वाचे कारण कोणते, हिंदूंना समाप्त करणे हे त्याच्या अस्तित्वाचे कारण आहे. खरं तर पाकिस्तानातील लोक हे 90 ते 95 टक्के बाटलेले हिंदू आहेत. याचा अर्थ बाटलेला हिंदू न बाटलेल्या हिंदूविरूद्ध संघर्षासाठी उभा राहिलेला आहे. आता पाकिस्तानी जनतेलाच विचार करायचा आहे की, आम्ही कोण आहोत? अरबी मुसलमान आहोत की तुर्की मुसलमान आहोत की हिंदू मुसलमान आहोत? त्यांच्या योग्य निर्णयावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहील.
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी तूर्तास थांबवले गेले. ऑपरेशन सिंदूर म्हणजे पाकिस्तानशी युद्ध नव्हे. ऑपरेशन सिंदूरचा हेतू मर्यादित आणि स्पष्ट होता. पाकिस्तानातील दहशतवादी तळ उदध्वस्त करणे आणि दहशतवादी ठार करणे या एकमेव उद्देशाने हे ऑपरेशन झाले. त्यात भारताला मर्यादित काळात लक्षणीय यश मिळाले आहे. सगळेच दहशतवादी मारले गेले किंवा त्यांचे म्होरके मारले गेले असे झालेले नाही, हे जरी खरे असले तरी ‘भारतीय भूमीवरील पाकिस्तानी दहशतवादी हल्ला खपवून घेतला जाणार नाही. त्याचा बदला घेतला जाईल.’ हा संदेश पाकिस्तानला मिळालेला आहे.
हे युद्ध नसून मर्यादित उद्दिष्टांसाठी केलेली कारवाई आहे, हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. दहशतवादाविरूद्ध सर्व जग आहे. पाकिस्तानची जाहीर भूमिकादेखील दहशतवादाविरूद्धाची आहे. परंतु पाकिस्तानचे दोन चेहरे आहेत. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही पाकिस्तानची स्थिती आहे. पाकिस्तान जर दहशतवादाविरूद्ध लढणारा देश असता तर दहशतवादाविरूद्धच्या कारवाईत त्याने भारताला साथ दिली असती. असे करण्याऐवजी त्याने भारतीय लष्करी तळांवर, मंदिर आणि गुरुद्वारांवर नागरी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानावर क्षेपणास्त्रे सोडून पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा, रडार यंत्रणा उदध्वस्त करून टाकली.
सध्या एका बातमीची गंभीर चर्चा चालू आहे. भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यांना जबरदस्त इजा झालेली आहे. अशी ही बातमी आहे की, त्यामुळे किरणोत्सर्ग सुरू झालेला आहे. ही बातमी खरी असेल तर पाकिस्तानी जनतेवर त्याचे फार गंभीर परिणाम होतील आणि ते दीर्घकाळ भोगावे लागतील. या घटनेमुळे अमेरिकेने हस्तक्षेप करून पाकिस्तानला युद्धविराम करण्यास भाग पाडले आहे. पाकिस्तान संदर्भात एक वाक्य जगात प्रसिद्ध आहे. ते वाक्य असे की, अल्ला, आर्मी आणि अमेरिका हे तीन ‘ए‘ पाकिस्तान चालवितात. अल्लाविषयी हिंदीत गाणं आहे, ‘आसमाँ पर है खुदा और जमीं पर हम, आजकल इधर को वो देखता है कम’ पाकिस्तानकडे बघायला अल्लाला वेळ नसावा, पाकिस्तानची आर्मी घमेंडीत बुडाली आहे, आणि शेवटी अमेरिकेने कान पिरगळेला आहे. पाकिस्तानचे अणुबॉम्ब पाकिस्तानातच फुटले तर...अमेरिकेचे 51वे राज्य लयाला जाईल.
पाकिस्तानशी युद्ध करणे हा भारताचा हेतू नसल्यामुळे भारताने युद्ध कारवाईस तूर्तास स्थगिती दिली. त्याची उलटसुलट चर्चा चालू आहे. तथाकथित संरक्षणतज्ज्ञ म्हणू लागले की, भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायला हवा होता, हीच संधी होती. सकाळचा नऊचा बांगेकरी म्हणाला की, डोनाल्ड ट्र्म्प युद्धबंदी करा सांगणारे कोण? ज्यांना आपला पक्ष साबूत ठेवता आला नाही, त्याने नको ती वक्तव्ये करू नयेत. मुंगीने हत्तीला विचारावे की तुझी औकात काय, असले हे हास्यास्पद विधान आहे. झपाट्याने विश्वासार्हता गमावत चाललेला मीडिया असली ही विधाने छापतो. दोघेही धन्य आहेत.
ऑपरेशन सिंदूर चालू असताना विरोधी पक्षाने राजकारण केले नाही, हे राजकारणाचे भाग्य समजायचे. पण ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर राजकारण्याच्या सोड्याची बाटली वरील झाकण काढल्यामुळे फसफसू लागली आहे. युद्धविराम का केला, अमेरिकेच्या सांगण्यावरून का केला, आपली सेना विजयी होत असताना माघार का घेतली, श्रीमती इंदिरा गांधी कशा ठाम राहिल्या, वगैरे वगैरे चर्चा चालू आहेत. श्रीमती इंदिरा गांधींनी युद्ध पुकारले होते आणि ऑपरेशन सिंदूर ही मर्यादित लष्करी कारवाई होती, हे ज्यांच्या डोक्यात घुसत नाही, त्यांची वक्तव्ये बालबुद्धीची म्हणून सोडून द्यायला हवीत. आताचे युद्ध हे पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्याचे असंख्य पदर असतात. प्रत्यक्षात युद्धात न लढणार्या सर्व नागरिकांना त्याची झळ सहन करावी लागते. युद्धाचे तडाखे फार भयानक असतात. युद्धाशिवाय आपला हेतू साध्य करण्याची कला आणि हिम्मत ज्या राजकीय नेतृत्वाकडे असते, त्याचे नाव नरेंद्र मोदी आहे. सामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. राजकारणी आणि अतिज्ञानी याची तोंडे आपण बंद करू शकत नाही.
दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे. जर्मनीच्या माजी चान्सेलर अँजेला मेर्कल यांचे 18 फेबु्रवारी 2017 रोजी म्युनिच येथे 125 देशांच्या सुरक्षा परिषदेपुढे भाषण झाले. या भाषणात त्यांनी युरोप आणि जगापुढील वेगवेगळ्या आव्हांनाची चर्चा केली आहे. इस्लामी दहशतवाद हा शब्द त्यांनी वापरला. 11 सप्टेंबर 2001च्या अमेरिकेवरील इस्लामी टेरेरिझमचा उल्लेख त्यांनी केला. त्या म्हणाल्या,“माझा ठाम विश्वास आहे की, जगासमोर आजचे असलेले आव्हान कोणताही एक देश पेलू शकत नाही. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. यामुळे माझा असा विश्वास आहे की, आजच्या घडीला बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय रचनेची आवश्यकता आहे.”
अँजेला मेर्कल यांनी इस्लामी दहशतवाद ही जागतिक समस्या असून तिचा सामना सर्वांनी केला पाहिजे, ही गोष्ट अधोरेखित केली आहे. पाकिस्तान, सिरिया, इराक, अफगाणिस्तान, पॅलेस्टाइन, इराण ही या सर्व दहशतवादाची भूमी झालेली आहे. दहशतवादाचा अवलंब करणारे मुसलमान आहेत. ते इस्लामचा आधार घेतात. इस्लामचा आधार घेऊन ते इस्लामचे महत्त्व वाढवीत नसून ते इस्लामची बदनामी करीत आहेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या भाषणात अँजेला मेर्कल यांनी इस्लामी धर्मपंडितांना आवाहन करून दहशतवादासाठी इस्लाम धर्माच्या वापर करण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानात दहशतवादी कारखाने चालविणारे स्वतःला इस्लामचे धर्मज्ञ म्हणतात ही शोकांतिका आहे.
पाकिस्तान का निर्माण झाले? त्याच्या निर्मितीचा इतिहास कोणता? याची आताच्या तरुण पिढीला योग्य प्रकारची माहिती असेल असे नाही. ‘आम्ही हिंदूंबरोबर राहू शकत नाही, म्हणून आम्हाला स्वतंत्र देश हवा’ अशी मागणी मोहम्मद अली जिना यांनी केली, इंग्रजांनी ती उचलून धरली. महात्मा गांधींनी ती स्वीकारली आणि देशाचे विभाजन झाले. 1947साली पाकिस्तान नावाचा नवा देश जन्माला आला. मूल जेव्हा जन्माला येत तेव्हा जन्मतः ते काही ओळखी घेऊन येते. ज्या घरात जन्म झाला, त्या घराण्याची ओळख. ज्या धर्मात जन्म झाला, त्या धर्माची ओळख. ज्या देशात जन्म झाला, त्या देशाची ओळख त्याला जन्मजात प्राप्त होते. पाकिस्तानची जन्मतः ओळख कोणती? पराकोटीचा हिंदूद्वेष ही त्याची जन्मखूण झाली. पाकिस्तान का निर्माण झाले, हिंदूद्वेषासाठी निर्माण झाले. पाकिस्तानच्या अस्तित्त्वाचे कारण कोणते, हिंदूंना समाप्त करणे हे त्याच्या अस्तित्वाचे कारण आहे.
हे पाकिस्तानी आहेत कोण? 90 ते 95 टक्के बाटलेले हिंदू आहेत. याचा अर्थ बाटलेला हिंदू न बाटलेल्या हिंदूविरूद्ध संघर्षासाठी उभा राहिलेला आहे. पाकिस्ताननिर्मितीची ही शोकांतिका आहे. आपण बाटलेले हिंदू आहोत, हे पाकिस्तान स्वीकारायला तयार नाही. जनरल झियाने पाकिस्तानची ओळख अरबी मुसलमान अशी करायला सुरुवात केली, त्याला अरबीकरण असे म्हटले गेले. अरबांनी आपला वहाबी इस्लाम पाठवून दिला. पण पाकिस्तान्यांना सच्चे मुसलमान म्हणून स्वीकारले नाही. त्यांच्या दृष्टीने पाकिस्तानी मुसलमान दुय्यम दर्जाचा मुसलमान आहे.
इम्रान खानने पाकिस्तानची ओळख तुर्की मुसलमानाशी करायला सुरुवात केली. तुर्की मुसलमानांनी तुर्कस्तानामधून अरबी संस्कृती हद्दपार केली होती. ते अर्धे युरोपियन आणि अर्धे आशियाई आहेत. इम्रान खानचा हा प्रयत्नदेखील वाया गेला.
पाकिस्तान हा भारताचाच भाग होता, त्यामुळे भारताप्रमाणे पाकिस्तानात बहुभाषिकत्व आहे. भाषिक अस्मिता तीव्र आहेत, प्रादेशिक ओळखी वेगवेगळ्या आहेत, रितीरिवाज वेगवेगळे आहेत, पाकिस्तानात सिंधी आहेत, पंजाबी आहेत, बलुची आहेत, पठाण आहेत, पण पाकिस्तानी कुणी नाही. ही पाकिस्तानची ओळख आहे.
भारताचे विभाजन अनैसर्गिक आहे आणि ते लवकरात लवकर संपले पाहिजे, असे योगी अरविंद यांचे मत होते. ते म्हणत, भारत केवळ जमिनीचा तुकडा नसून भारत आदिशक्तीचे रूप आहे. भारत ही जैविक संकल्पना आहे. तिचे तुकडे ही अनैसर्गिक गोष्ट आहे. ईश्वरी संकेताच्या विरूद्ध आहे, म्हणून ती टिकणार नाही. कोणत्याही उपायाने आणि कोणत्याही पद्धतीने हे विभाजन संपलेच पाहिजे. ऐक्य अत्यावश्यक आहे. आपण हिंदू आहोत आणि आपली अशी श्रद्धा आहे की, ऋषींचे वचने कधीही असत्य ठरत नाहीत. योगी अरविंद आधुनिक काळातील ऋषीच होते. पाकिस्तानविषयक त्यांची भविष्यवाणी आज न उद्या सत्यात आल्याशिवाय राहणार नाही. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान खिळखिळा करून टाकला आहे. आता पाकिस्तानी जनतेलाच विचार करायचा आहे की, आम्ही कोण आहोत? अरबी मुसलमान आहोत की तुर्की मुसलमान आहोत की हिंदू मुसलमान आहोत? त्यांच्या योग्य निर्णयावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहील.