भारताच्या स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र सामर्थ्याने भारताचे स्थान कमालीचे उंचावले आहे. पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना अद्दल घडली हे तर खरेच आणि तोच प्रधान हेतू या लष्करी कारवाईमागे होता. पण भारताची स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि सामरिक प्रणाली यांच्या विश्वासार्हतेवर ऑपरेशन सिंदूरमध्ये शिक्कामोर्तब झाले. यामुळे देशाच्या सीमा आणि देशातील नागरिक सुरक्षित असायला हवेत याबद्दल दुमत नाही. त्यादृष्टीने ऑपरेशन सिंदूरने भारताची संरक्षण सिद्धता पुरेशी सिद्ध केली आहे. पाकिस्तानला धडकी भरेल अशी धडक भारताने मारली आहे. त्याचबरोबर चीन आणि तुर्कीलाही हदरा बसला आहे. त्यामुळे आपल्या सामर्थ्याचे विराट दर्शन घडविले आहे.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांच्या केलेल्या नृशंस हत्येनंतर भारताने 7 मे च्या पहाटे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर नेमका प्रतिहल्ला चढविला. त्यात शंभरेक अतिरेकी ठार झाले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न चिघळावा हा त्यामागील हेतू असावा किंवा आपल्या नागरिकांना तोंड दाखविता यावे यासाठीचा पाकचा अट्टाहास असावा. कारण काहीही असो; पाकिस्तानला ती आगळीक महागात पडली. भारताने 7 मे ते 10 मे या काळात पाकिस्तानचे सर्व हल्ले परतावून लावलेच; पण पाकिस्तानमधील हवाई दलाचे तळ, संरक्षण आस्थापना आणि संरक्षण प्रणाली यांना अक्षरश: भाजून काढले. 2016 सालचा उरी सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 साली बालाकोट येथील हवाई प्रतिहल्ला या दोन्हींच्या तुलनेत भारताने यावेळी राबविलेली मोहीम अतिशय भेदक अशी होती. भारताने आपल्या शस्त्रसामर्थ्याचे विराट दर्शन केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर जगाला घडविले. पाकिस्तानने अण्वस्त्रांच्या वापराच्या दिलेल्या धमक्यांच्या भारताने चिंधड्या करून टाकल्या. चीन, तुर्कस्तान यांच्या बळावर भारताशी आगळीक करणार्या पाकिस्तानला अद्दल घडविताना भारताने त्या दोन राष्ट्रांनी पाकिस्तानला पुरविलेली शस्त्रास्त्रे निष्प्रभ करून टाकली. भारताचे हे निर्विवाद वर्चस्व पाकिस्तानचा कणाच मोडून टाकणारे होते यात शंका नाही. मात्र अशातच 10 मे च्या संध्याकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला आणि भारतानेदेखील तो स्वीकारला.
त्यानंतर देशभरात उमटलेल्या प्रतिक्रिया या ‘भारताने हा प्रस्ताव का स्वीकारला’; ‘भारताला पाकिस्तानचे विभाजन करून थांबायला हवे होते’; ‘किमान पाकव्याप्त काश्मीर तरी हस्तगत करायला हवा होता’ अशा स्वरूपाच्या होत्या. त्या काही अंशी स्वाभाविक. याचे कारण राष्ट्राची युद्धभूमीत आगेकूच होत असते तेव्हा सामान्य नागरिकांमध्ये देखील चैतन्य निर्माण होते; त्यांचेही रक्त सळसळत असते. शत्रूला कायमची अद्दल घडवावी अशी त्यांची इच्छा आणि मानसिकता झालेली असते. तेव्हा त्यांतील स्वाभाविक आणि प्रामाणिक प्रतिक्रिया मान्य करता येतील. परंतु समाजमाध्यमांवर ‘राजापेक्षा राजनिष्ठ’ असे जे समाजमाध्यमवीर असतात त्यांनी सुरुवातीस उतावीळ, उथळ आणि उठवळ प्रतिक्रिया दिल्या. त्या केवळ अस्थानी नव्हत्या तर अप्रस्तुत होत्या. नंतर ही शस्त्रसंधी नसून लष्करी कारवाईला दिलेली स्थगिती आहे, असे सरकार आणि संरक्षण दलांतर्फे स्पष्ट करण्यात आले तेव्हा या भिंतीवीरांना उपरती झाली आणि त्यांनी मग दुसरे टोक गाठले. हे सगळेच इतके हास्यास्पद होते की, हे सर्व वावदूक मतप्रदर्शन युद्धसदृश गंभीर घटनेबद्दल चालले आहे की एखाद्या नाटक-चित्रपटातील प्रसंगाबद्दल असा प्रश्न पडावा. तेव्हा एकीकडे भारताने राबविलेल्या मोहिमेतील भव्य यशाची दखल घेतानाच थिल्लरपणाच्या पातळीवर जाणार्या वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमवीर यांचाही समाचार घेणे आवश्यक. प्रथम ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्या परिणामांविषयी.
भारताच्या शस्त्रसिद्धतेचे दर्शन
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे मोडले हे खरेच; पण त्यापेक्षाही काय साधले असेल तर ते म्हणजे दक्षिण आशियात भारताचे निर्विवाद सामरिक वर्चस्व सिद्ध केले. भारताने अन्य राष्ट्रांकडून खरेदी केलेली शस्त्रास्त्रे, काही राष्ट्रांबरोबर भागीदारीत विकसित केलेली शस्त्रास्त्रे व संरक्षण प्रणाली तसेच स्वदेशी शस्त्रास्त्रे या सर्वांचा केलेला नेमका आणि तरीही संयत वापर हे या मोहिमेचे वैशिष्ट्य. ‘डिफेन्स एक्स्पो’ किंवा एअरो इंडियासारख्या ठिकाणी भारतासह अनेक राष्ट्रे संरक्षण क्षेत्रातील आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवून जगाला दिपवून टाकत असतात. मात्र कोणतेही शस्त्र असो व तंत्रज्ञान; त्याची खरी कसोटी असते ती प्रत्यक्ष मैदानात. येथे तर रणमैदान होते आणि भारताच्या सामरिक सिद्धतेने भारतीयांना अभिमानाचा अनुभव दिला. दहशतवाद्यांच्या तळांवर नेमका प्रतिहल्ला चढविताना भारताच्या हवाई दलाने राफेल विमानांचा; स्कॅल्प आणि हॅमर या क्षेपणास्त्रांचा वापर केला. पाकिस्तानने हा प्रश्न चिघळू दिला नसता तर भारताची लष्करी कारवाई 7 मे रोजीच थांबली असती. आपण केलेली कारवाई ही मर्यादित आहे असे भारताने स्पष्ट केले होते. शिवाय पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठिकाणांवर किंवा नागरी वसाहतींवर हल्ला करण्याचे भारताने कटाक्षाने टाळले होते. पण पाकिस्तानला खुमखुमी नडली.
7 ते 9 मे या काळात पाकिस्तानने भारताच्या 36 शहरांवर ड्रोन डागले; क्षेपणास्त्रांचा मारा केला. ते भारतात पोचले असते तर भारतात हाहाकार उडाला असता. पण एस-400 या प्रणालीने पाकिस्तानच्या केवळ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनाच रोखले आणि नष्ट केले असे नाही; तर पाकिस्तानचे कुटिल मनसुबे उधळून लावले. शस्त्रे, संरक्षण प्रणाली कोणत्या सर्वाधिक प्रभावी इत्यादी बाबी ठरविणे हे काम संरक्षण दलांचे; तेव्हा ही प्रणाली निवडण्याचे श्रेय त्यांचे. परंतु अखेरीस हे करार करणे हे सरकारचे काम. केंद्रातील सरकारने गेल्या दहा वर्षांत संरक्षणविषयक जे निर्णय घेतले ते किती योग्य आणि नेमके होते याचा प्रत्यय ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या निर्विवाद वर्चस्वाने दिला. भारताचे कमीतकमी नुकसान होताना पाकिस्तानला मात्र पूर्ण तडाखा देण्याची किमया या शस्त्रास्त्रप्रणालींनी करून दाखविली. एस-400 प्रणाली रशियाकडून खरेदी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी 2018 साली 35 हजार कोटी रुपयांच्या कराराला अंतिम रूप दिले होते. पहिली खेप डिसेंबर 2021 मध्य भारताला मिळाली. ही प्रणाली इतकी प्रभावी आहे की नाटो राष्ट्रेदेखील त्यास बिचकून असतात. पण हा करार सहज झालेला नाही. त्या करारात खोडा घालण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला होता. रशियाशी हा करार केला तर अमेरिकेच्या एका कायद्यान्वये भारतावर निर्बंध घालण्याचीही तयारी झाली होती. मात्र भाजप सरकारने देशहिताचा हा करार रद्दही केला नाही आणि अमेरिकेलादेखील विश्वासात घेतले. एकीकडे मुत्सद्देगिरी करून अमेरिकी काँग्रेस सदस्य रो खन्ना यांच्याकरवी संबंधित कायद्यातून भारताला वगळावे असा प्रस्ताव संमत करून घेतला तर दुसरीकडे अमेरिकेशी अपाचे हेलिकॉप्टर खरेदीचा करारदेखील केला. अमेरिकेशी भारताने हा 60 कोटी डॉलरचा करार 2020 साली केला. हा समतोल आंतरराष्ट्रीय स्तरावर साधणे वाटते तितके सोपे नसते. तेथे मुत्सद्देगिरी पणाला लावावी लागते. मात्र त्याचे परिणाम किती देशहिताचे असतात हे आता एस 400 प्रणालीने केलेल्या कामगिरीने अधोरेखित केले आहे. एस 400 प्रणालीचा विशेष हा की, सहाशे किलोमीटर अंतरावरील लक्ष्य ते टिपू शकते आणि चारशे किलोमीटरवरील हल्ला परतवून लावू शकते. भारताकडे आता या प्रणालीच्या तीन स्क्वाड्रन आहेत.
स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचे सामर्थ्य
मात्र ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र प्रणालींची किमया जगाला स्तिमित करून गेली. आकाश क्षेपणास्त्र हे भारताने विकसित केलेले. भारताचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम 1980 च्या सुमारास सुरू झाला. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत डायनॅमिक्स यांच्या भागीदारीत आकाश विकसित केले आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र साडेचार ते 25 किलोमीटपर्यंत मारा करू शकते. इस्रायल-भारत भागीदारीत विकसित झालेले बाराक-8 क्षेपणास्त्र भारताने वापरले. त्याने पाकिस्तानच्या फतेह-2 क्षेपणास्त्राची धूळधाण उडविली. ड्रोन रोधक डी -4 प्रणाली असो किंवा नागास्त्र असो अथवा, मूळचे इस्रायलचे पण आता भारतात उत्पादन होणारे हॅरोप ड्रोन असो; अथवा आकाशतीर प्रणाली असो या सगळ्या शस्त्रास्त्रांच्या अचूक वापराने भारताच्या सामरिक सज्जतेची नवी ओळख जगाला झाली. पण या सगळ्यावर कळस चढविला ब्राह्मोस क्षेपणास्त्राने. 1998 साली डीआरडीओचे तत्कालीन प्रमुख डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रशियाचे संरक्षण मंत्री मिखिआलोव यांनी द्विपक्षीय भागीदारीत क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या करारावर स्वाक्षर्या केल्या होत्या. त्यानंतर चारच वर्षांत म्हणजे 2001 साली चांदीपूर येथे त्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी झाली होती. (योगायोग असा की त्यावेळीही केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडीचे सरकार सत्तेत होते). हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलात 2005 साली तर हवाई दलात 2007 साली दाखल झाले. मात्र प्रत्यक्ष सुखोई विमानातून क्षेपणास्त्राच्या लक्ष्यभेदाची चाचणी 2017 साली बंगालच्या उपसागरात झाली. ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेग असलेले हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यभेद करते. प्रचंड वेगामुळे शत्रूच्या मार्यात ते येणे कठीणच असते पण शत्रूचा मात्र नि:पात ते करू शकते. आताही सुखोईमधूनच पाकिस्तानच्या हवाई दल तळांवर ते डागण्यात आले. पाकिस्तानचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले. उपग्रहांनी टिपलेल्या चित्रांत रावळपिंडी येथील नूर खान, भोलारी, सरगोधा येथील पाकिस्तानी हवाई दलाचे तळ आणि जाकोबाबाद येथील तळ यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे. किंबहुना पाकिस्तानने अण्वस्त्रे जेथे दडवून ठेवली आहेत असे म्हटले जाते तो परिसरही भारतीय प्रतिहल्ल्याने भाजून काढला आहे.

भारताच्या स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र सामर्थ्याने भारताचे स्थान कमालीचे उंचावले आहे. पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना अद्दल घडली हे तर खरेच आणि तोच प्रधान हेतू या लष्करी कारवाईमागे होता. पण भारताची स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि सामरिक प्रणाली यांच्या विश्वासार्हतेवर ऑपरेशन सिंदूरमध्ये शिक्कामोर्तब झाले. आता फिलिपिन्स आणि इंडोनेशियाने ब्राह्मोस खरेदी करण्यासाठीचे करार भारताशी केले असले तरी जगभरातील 19 राष्ट्रांनी ब्राह्मोस खरेदी करण्यासाठीची इच्छा दर्शविली आहे. संरक्षण क्षेत्रात भारत हे आयातदार राष्ट्र राहिलेले नसून निर्यातदार राष्ट्र झाले आहे. 2013 साली भारताने संरक्षण क्षेत्रात केलेली निर्यात सुमारे 686 कोटी रुपयांची होती. 2024 साली ती 24 हजार कोटींपर्यंत पोचली आहे. त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारा टक्के वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रातील खासगी उत्पादक कंपन्यांबरोबरच सरकारी कंपन्यांचाही यात मोठा वाटा आहे. किंबहुना सरकारी कंपन्यांनी केलेल्या निर्यातीत यंदा तब्बल 43 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारत सध्या ऐंशी देशांना संरक्षण क्षेत्रातील निर्यात करतो आणि 2029 पर्यंत निर्यातीचे लक्ष्य 50 हजार कोटींचे ठेवण्यात आले आहे. या दूरदृष्टीचे श्रेय निखालस राजकीय व्यवस्थेचे.
संरक्षण दलाच्या तिन्ही दलांच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एअर मार्शल ए. के. भारती यांनी याचा स्पष्ट उल्लेख केला. भारताची हवाई दल क्षमता इतकी उच्चकोटीची होण्याचे कारण गेल्या दशकभरात सरकारने दिलेले धोरणात्मक आणि अंदाजपत्रकीय पाठबळ हे होय असे त्यांनी सांगितले. तसेच स्वदेशी बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्राने असामान्य कामगिरी केली असेही त्यांनी सांगितले. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झाल्याची माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानच्या कांगाव्यातील हवा काढून घेतली. त्यांतील एक विधान अतिशय महत्त्वाचे. भारताने पाकिस्तानमधील मशिदींना लक्ष्य केले असा कांगावा पाकिस्तानने केला होता. मात्र त्यात कोणत्याही तथ्यांश नाही हे सांगताना या दोन रणरागिणींनी पाकिस्तानला दिलेला संदेश भेदक आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे; येथे सर्व धर्मांचा एकसारखा आदर केला जातो आणि भारतीय संरक्षण दलांमध्ये घटनात्मक मूल्यांचेच प्रतिबिंब पडले आहे असे सांगितले. एकीकडे पाकिस्तानला पुरते घायाळ करून टाकणार्या भारतीय संरक्षण दलांचा हा संयम वाखाणण्यासारखाच होता आणि आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र हेही खरे की देशातील वावदुकांसाठी तो संदेशही आहे.
वास्तविक पाकिस्तानला नामोहरम करण्याची सर्व क्षमता भारतापाशी आहे. ज्या चिनी व तुर्की शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानची भिस्त होती तीही भारताने निष्प्रभ करून टाकली होती. पण सामर्थ्य आहे म्हणून संयम सोडणे ही खुमखुमी झाली. भारत एकीकडे संरक्षण क्षेत्रातील निर्यातदार राष्ट्र म्हणून आपले स्थान बळकट करत असतानाच एक जबाबदार राष्ट्र म्हणूनही देशाची प्रतिमा तयार होणे आवश्यक. सुरुवातीलाच पंतप्रधानांनी दहशतवादी आणि त्यांना पोसणारे यांना कल्पनेच्या पलीकडील तडाखा देण्यात येईल असे सूतोवाच केले होते. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केला नाही. याचा अर्थ स्पष्ट होता. भारताचे लक्ष्य मर्यादित पण दूरगामी परिणाम करणारे होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पुतीन यांना हे युग युद्धाचे नाही असा सल्लाही दिला होता. असे असताना मोदी येथे पाकिस्तानशी युद्ध छेडतील हा अंदाजही चुकीचा होता. पाकिस्तानने भारतावर चौफेर हल्ला चढविल्यानंतर भारताने त्यास चोख प्रत्त्युत्तर दिले आणि आताही शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर जशास तसे प्रत्त्युत्तर देण्यात येईल असा इशारा मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात दिला आहे. शस्त्रविराम करणे ही कोणत्याही प्रकारे माघार ठरत नाही; पराभव तर नाहीच नाही.
अमेरिकेचे निवृत्त लष्करी अधिकारी जॉन स्पेन्सर यांचीही मते विचारात घेत कूपरने असे स्पष्टपणे म्हटले आहे की, पाकिस्तानविरोधातील मोहिमेत भारताचा निर्विवाद विजय (क्लियरकट व्हिक्टरी) झाला आहे, एवढेच नव्हे तर, युद्धात कसोटीला उतरलेल्या स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणालींमुळे आशियात दरारा असणारी एक शक्ती म्हणून भारताचा उदय झाला आहे.
येथे ऑस्ट्रेलियाचा विख्यात संरक्षण विश्लेषक टॉम कूपरने व्यक्त केलेला अभिप्राय नमूद करणे प्रस्तुत ठरेल. अमेरिकेचे निवृत्त लष्करी अधिकारी जॉन स्पेन्सर यांचीही मते विचारात घेत कूपरने असे स्पष्टपणे म्हटले आहे की, पाकिस्तानविरोधातील मोहिमेत भारताचा निर्विवाद विजय (क्लियरकट व्हिक्टरी) झाला आहे, एवढेच नव्हे तर, युद्धात कसोटीला उतरलेल्या स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणालींमुळे आशियात दरारा असणारी एक शक्ती म्हणून भारताचा उदय झाला आहे. जो शस्त्रविराम झाला तो अमेरिकेच्या मध्यस्थीने झाला असे म्हटले जात असले तरी भारताने त्याचे खंडन केले आहे आणि मुख्य म्हणजे यापुढे पाकिस्तानशी वाटाघाटी व्हायच्या तर केवळ दोन मुद्द्यांवर होतील- दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर हेही मोदींनी ठणकावून सांगितले आहे. अशावेळी माध्यमे आणि उतावीळ समाजमाध्यमवीरांनी अकारण व्यक्त केलेली निराशा निव्वळ पोरकट ठरते. आपल्याला हे पटले नाही इत्यादी अभिप्राय तर केवळ थिल्लर. याचे कारण त्या अभिप्रायात ना अभ्यास ना चिंतन. केवळ देशभक्तीच्या आपल्याच फूटपट्ट्या तयार करण्याचा किंवा सरकारला धारेवर धरण्याचा अगोचरपणा.
बेताल माध्यमे अन् वावदूक समाजमाध्यमवीर
मुळात भारत आता युद्ध छेडणार हे वातावरण बेजाबदार माध्यमे आणि अगोचर समाजमाध्यमवीर यांनीच तयार केले होते. त्याला ना काही आधार होता ना सरकार किंवा संरक्षण दलांनी तसे काही संकेत दिले होते. परंतु देशभक्तीच्या आपल्याच फूटपट्ट्या तयार करायच्या आणि आपण सोडून सगळे नेभळट असली स्वप्रतिमाधन्यता मानायची याचा परिणाम शस्त्रविरामानंतर अकारण वातावरण कलुषित होण्यात झाला. एरिक मारिया रेमार्कची ‘ऑल क्वायेट ऑन दि वेस्टर्न फ्रंट’ नावाची गाजलेली कादंबरी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात पॉल नावाचा या कादंबरीचा नायक जर्मनीच्या सैन्यात सामील होतो. त्याला कोणीही सक्ती केलेली नसते. पण देशभक्तीच्या भावनेने तो सैन्यात सामील होतो. युद्ध, शत्रूचा नि:पात इत्यादींविषयीचा स्वप्नाळूपणा आणि आदर्शवाद यांमुळे तो सैन्यात सामील झालेला असतो. पण जेव्हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर तो जातो तेव्हा युद्धाचे भयावह रूप त्याला पाहायला-अनुभवायला मिळते आणि त्याला युद्धातील वैयर्थता जाणवते. युद्धात अखेरीस पॉल मृत्युमुखी पडतो; आणि नेमक्या त्याच दिवशी जर्मन सैन्याच्या त्या दिवशीच्या अहवालात लिहिलेले असते: ‘ऑल क्वायेट ऑन दि वेस्टर्न फ्रंट’.
दरम्यानच्या काळात एकदा सुटीवर तो आपल्या गावी येतो तेव्हा युद्धभूमीपासून कोसो अंतर दूर असणारे त्याचे नातेवाईक त्याला युद्धनीती; व्यूहनीती याविषयी सल्ल्े देतात; तेव्हा या लोकांना युद्धाच्या भीषणतेविषयी कोणतीच कल्पना नसल्याचे त्याच्या ध्यानात येते. युद्धभूमीपासून दूर अंतरावरून युद्धाच्या वल्गना करणारे समाजाध्यमवीर काय किंवा माध्यमे काय; त्यांची वृत्ती त्यापेक्षा निराळी नाही. भारताला जगात मोठी झेप घ्यायची आहे. विकासाचे मानदंड उभे करायचे आहेत. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था गाठण्याचे भारताचे लक्ष्य आहे. ते गाठण्यावर भारताने लक्ष्य केंद्रित करायचे की खुमखुमी असल्यासारखे युद्ध करायचे हा प्रश्न मूलभूत आहे. देशाच्या सीमा आणि देशातील नागरिक सुरक्षित असायला हवेत याबद्दल दुमत नाही. त्यादृष्टीने ऑपरेशन सिंदूरने भारताची संरक्षण सिद्धता पुरेशी सिद्ध केली आहे. पाकिस्तानला धडकी भरेल अशी धडक भारताने मारली आहे. आपल्या सामर्थ्याचे विराट दर्शन घडविले आहे. भारतीयांना अभिमान आणि आश्वस्त वाटेल अशीच ही कामगिरी आहे. त्याला उथळांनी अकारण गालबोट लावू नये.