अग्नी अस्त्र हा केवळ कीटकनाशक नसून, सेंद्रिय शेतीचा एक महत्त्वाचा आधार आहे. हे औषध फक्त एका विशिष्ट कीटकापुरते मर्यादित नाही. ते पाने, फुले, फळे आणि मुळे या सर्वांवर संरक्षण देते. बाजारात मिळणार्या औषधांच्या तुलनेत अग्नी अस्त्र फारच स्वस्त आहे. शेतकर्याच्या खिशाला परवडणारे आणि सहज तयार करता येणारे आहे.
भारतात पारंपरिक पद्धतीने शेती करण्याची परंपरा तशी प्राचीन आहे. शेतकरी आपल्या अनुभवातून आणि पारंपरिक ज्ञानातून पिकांचे संरक्षण करत होता. पण नंतर रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आणि मानवी आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम टाळण्यासाठी पुन्हा एकदा हे पारंपरिक उपाय नव्याने जाणून घेणे गरजेचे आहे. कारण रासायनिक औषधांच्या वापरामुळे मातीची सुपीकता कमी होते, पाण्याचे प्रदूषण वाढते, कीटक सहनशील बनतात आणि माणसांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. त्यामुळेच नैसर्गिक, सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक उपायांकडे पुन्हा लक्ष दिले जात आहे. अशाच उपायांपैकी एक प्रभावी जैविक कीटकनाशक म्हणजे ’अग्नी अस्त्र’ या औषधाचे नावच जणू काही त्याच्या प्रभावाचे वर्णन करते. ’अग्नी’ म्हणजे आग, आणि हे औषध फवारल्यावर कीटकांवर तीव्र परिणाम होतो, त्यामुळे त्याला हे नाव दिले गेले आहे. ’ अग्नी अस्त्र’ हे शंभर टक्के नैसर्गिक असून घरच्या घरी बनवता येते. अग्नी अस्त्र हा शेतकर्यांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय आहे.
अग्नी अस्त्र म्हणजे काय?
अग्नी अस्त्र हे एक पारंपरिक जैविक कीटकनाशक आहे, जे प्रामुख्याने लसूण, मिरच्या, कडुनिंब, तंबाखू आणि देशी गाईचे गोमूत्र यांचा वापर करून तयार केले जाते. या सगळ्या घटकांमध्ये कीटकांना त्रासदायक वाटणारे नैसर्गिक गुणधर्म असतात. हे औषध कीटकांच्या त्वचेवर, श्वसनप्रक्रियेवर आणि अन्नशोषणावर परिणाम करते, त्यामुळे कीटक मरतात किंवा निष्क्रिय होतात. अग्नी अस्त्र विविध भागांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. काही भागांमध्ये याला लमीत असेही नाव आहे.
फवारणीसाठी वापरण्याची पद्धत
अर्धा लीटर अग्नी अस्त्र 20 लीटर पाण्यात मिसळून वापरावे. जास्त प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव असल्यास अग्नी अस्त्राचे प्रमाण थोडे वाढवून घेतले तरी चालते. महत्त्वाचे म्हणजे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फवारणी केल्यास प्रभावी परिणाम दिसून येतात. ही फवारणी करताना शेतकरी बांधव किंवा मजुरांनी हातमोजे, मास्क वापरावेत. उघड्या त्वचेवर औषध लागू देऊ नये. तिखट गुणधर्म असल्यामुळे त्वचेचा दाह होतो. दर 7 ते 10 दिवसांनी फवारणी केल्यास चांगला परिणाम दिसतो आणि जैविक गुणधर्म असल्यामुळे त्याचा कुठलाही विपरीत परिणाम पीकावर होत नाही. हे औषध मातीतील गांडुळांसाठी घातक नाही. त्यामुळे गांडूळखताच्या शेतीमध्येही सुरक्षित वापर करता येतो. काही कीटक त्वचेवरून श्वास घेतात. अग्नी अस्त्रातील घटक त्यांच्या त्वचेवर बसल्यास ते श्वास घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे मरतात.
हे लक्षात घ्या
गोमूत्र देशी गाईचेच वापरावे, कारण त्याचे गुणधर्म उत्तम असतात. उकळवताना तापमान खूप वाढवू नये, नाहीतर उपयुक्त घटक नष्ट होतात. फवारणीनंतर काही वेळ थेट सूर्यप्रकाश टाळावा. औषधांची साठवण सावलीच्या ठिकाणी करावी. दर वेळेस तेच औषध वापरल्यास कीटकांना सहनशीलता येते. त्यामुळे 2-3 आठवड्यांनी दुसरे नैसर्गिक औषध (जसे की दशपर्णी अर्क) वापरावे.
उपयुक्तता
अग्नी अस्त्रमध्ये वापरले जाणारे घटक कीटकांच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. त्यामुळे रसशोषक कीटक, अळ्या, माश्या, यांच्यावर हे औषध चांगले परिणाम करते. याशिवाय कीटकांचा नायनाट झाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. फुलं अधिक लागतात, फळधारणा सुधारते, आणि अंतिम उत्पादनातही वाढ होते. फळांची चव, रंग, चमक यामध्ये फरक दिसून येतो. रासायनिक औषधांमुळे मातीतील जिवाणूंवर परिणाम होतो. पण अग्नी अस्त्र नैसर्गिक असल्यामुळे मातीची सुपीकता वाढते आणि पाण्याचे प्रदूषण होत नाही. हे औषध सेंद्रिय प्रमाणपत्रासाठी योग्य आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीस चालना मिळते.
सध्याच्या काळात अन्नसुरक्षा, पर्यावरण संरक्षण, मातीचे आरोग्य आणि शेतकर्याचा खर्च यावर विचार करणे गरजेचे आहे. अग्नी अस्त्र एकाच वेळी हे सगळे फायदे मिळवून देते. शेतकर्यांनी पारंपरिक उपायांवर विश्वास ठेवून अग्नी अस्त्रासारखे उपाय स्वीकारावेत. हे औषध केवळ एक उपचार नसून, ही एक चळवळ आहे, नैसर्गिक शेतीकडे परत जाण्याची चळवळ. रसायनांचा नकार आणि पर्यावरणपूरक उपायांचा स्वीकार यामुळेच भविष्यातील शेती सक्षम आणि शाश्वत बनू शकते. हे औषध शेतकर्यांसाठी एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. हे केवळ कीटक मारत नाही, तर शेतीला सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही बनवते. उत्पादनात वाढ, मातीचे आरोग्य आणि ग्राहकांपर्यंत पोहोचणारे रसायनमुक्त अन्न - हे सगळे फायदे अग्नी अस्त्र वापरल्याने मिळू शकतात. प्रत्येक शेतकर्याने या पारंपरिक आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करावा, कारण ही फक्त शेतीसाठी नव्हे, तर आपलं आरोग्य आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. भविष्यातील शेती संवर्धनासाठी नैसर्गिक साधनांचा वापर करून कीडनियंत्रण करणे ही काळाची गरज आहे.
- लेखिका येवला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत.