सेंद्रिय शेतीचे उत्कृष्ट मॉडेल - गोयल ग्रामीण विकास संस्थान

विवेक मराठी    17-May-2025
Total Views |
@प्रमोद क्षीरसागर 9892263969
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘जनकल्याण समिती’तर्फे दिला जाणारा यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी’ पुरस्कार राजस्थानमधील कोटा येथील ताराचंदजी गोयल यांच्या ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ला 1 मार्च 2025 रोजी पुणे येथे प्रदान करण्यात आला. या संस्थेचा गो-आधारित सेंद्रिय/जैविक शेतीचा प्रयोग महत्त्वपूर्ण ठरला आहे. शिवाय देशातील पहिले सेंद्रिय शेती संशोधन केंद्र या संस्थेने सुरू केले आहे.

krushivivek
 
कृषी, गोपालन व शेतीपूरक व्यवसायामुळे भारत हा हजारो वर्षापासून सुखी व संपन्न होता. मोगलांचे आक्रमण व इंग्रजी सत्तेमुळे भारतीय शेती व गोपालनाचा मोठा फटका बसला. परिणामी, भारतीय शेती परावलंबी व परकीय बनली. लोप पावत असलेल्या गोपालन व सेंद्रिय/जैविक शेतीला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचे कार्य राजस्थानमधील समाजशील उद्योजक ताराचंद गोयल करत आहेत.
 
 
गोयल परिवाराने आपली सामाजिक जाणीव नेहमीच जपली आहे. गोयल कुटुंबातील ताराचंद हे कृषी, ग्रामीण विकास व सामाजिक उपक्रमांत नेहमीच उत्साहाने सहभागी होतात. त्यासाठी त्यांनी 2016 साली जोखाटा (जि. कोटा) ’गोयल ग्रामीण विकास संस्थान’ अंतर्गत देशातील पहिले गो-आधारित ’श्रीरामशान्ताय सेंद्रिय शेती कृषी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले. 25 जणांची सल्लागर समिती आणि भारत सरकारच्या संशोधन संस्थांचे वैज्ञानिक साहाय्य, कृषी विद्यापीठ, महाविद्यालयाचे विशेषतज्ञांचे मार्गदर्शन मिळणे यामुळे त्यांच्या कामात सातत्य आले आणि अनेक मोठे उपक्रम त्यांच्या हातून घडले. केंद्राच्यावतीने प्राचीन, पारंपरिक व आधुनिक शेतीची योग्य सांगड घालून संशोधन केले जाते. 16 एकरांवर विस्तारलेल्या या केंद्रात शेतकरी प्रशिक्षण, माती व पाणी परीक्षण, बीजप्रक्रिया, देशी बियाणे बँक, रोग व कीटक तपासणी प्रयोगशाळा, औषधी वनस्पती प्रदर्शन, पोषणवाटिका नमुना मॉडेल, स्वस्तिक आकाराची गोशाळा, सेंद्रिय/जैविक शेतीचे प्रयोग, जैविक खत निर्मितीचे उत्कृष्ट मॉडेल्स तयार झाले आहे.
 

krushivivek 
 
सेंद्रिय शेतीचा अवलंब
 
सकस भूमी, सकस अन्न, निरोगी शरीर आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास भारतीय गोवंश पूर्णतः समर्थ आहे, यावर गोयल ग्रामीण विकास संस्थानचा विश्वास आहे. ’शुद्ध आहार - स्वस्थ परिवार’ हे संस्थेचे ध्येय वाक्य आहे. सेंद्रिय शेतीसाठी संस्थेकडे सध्या 40 गीर (देशी गोवंश) गायी आहेत. यामाध्यमातून जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, लसूण मिरची अर्क, अग्निहोत्र तयार करून संस्थेच्या शेतीसाठी वापरले जाते.
 
नैसर्गिक कीटकनाशकांमुळे रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यास संस्थेला यश आले आहे. यातून निर्माण होणारा भाजीपाला, तृणधान्ये, गळीत धान्ये, फळपिके अशा प्रकारची दर्जेदार उत्पादनांची निर्मिती व विक्री केली जाते. स्थानिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळावेत, यासाठी माती परीक्षणाची सोय करण्यात आली आहे. शिवाय तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत संस्थेला 20 हजार पाचशे शेतकरी जोडले गेले आहेत. यातील शेकडो शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत.
 

krushivivek 
 
बहुस्तरीय व पोषणवाटिकेचे मॉडेल
 
कमी उत्पादनखर्च, अधिक नफा व जागतिक तापमानवाढीला मुकाबला करू शकेल, अशा बहुस्तरीय व पोषणवाटिकेचे मॉडेल विकसित केले आहे. बहुस्तरीय शेती म्हणजे एकाच वेळी, एकाच जमिनीवर एक किंवा अधिक पिकांचे उत्पादन घेणे होय. संस्थेच्या एकाच जमिनीवर फळबागा व इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. लोकांना घरच्या घरी विशेषतः छोट्या जागेत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व फळ घेता यावे यासाठी संस्थेने एक बिघा म्हणजे 1620 वर्ग मीटरचे (132 फूट) पोषणवाटिकेचे (किचन गार्डन) मॉडेल तयार केले आहे. या माध्यमातून कुटुंबातील सहा व्यक्तींना पुरेल इतका भाजीपाला पिकवता येतो. याशिवाय शेतकर्‍यांना अनोख्या पद्धतीने शेती करावी यासाठी उंच बेड मॉडेल (ऑरेंज गार्डन), माधव मॉडेल (बांबू रोपवाटिका), केशव मॉडेल (बांबू पासून बनविलेले सौर वाळवण यंत्र) विकसित केले आहेत.
 
 
धन्वंतरी वाटिका
 
 
कृषी क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यातच आयुर्वेदिक औषधांना आलेले महत्त्व लक्षात घेऊन संस्थेने ’धन्वंतरी वाटिका’ विकसित केली आहे. हे कोटा परिसरातील एकमेव आयुर्वेदिक वाटिका आहे. या वाटिकेत अश्वगंधा, शतावरी, हरडा, बेहडा, आवळा, कडुनिंब, तुळस, कापूर, जंगली लसूण, लवंग, सर्पगंधा, अडुळसा, अर्जून, रामफळ, हनुमान फळ, दालचिनी, कदंब, ओवा अशी अनेक दुर्मीळ औषधी प्रजाती, वनस्पती शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. रोपांच्या वाढीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. औषधी वनस्पतीची माहिती शेतकर्‍यांना मिळावी व त्यांच्या गुणांचा लाभ गरजूंना व्हावा याकरीता भविष्यात अनेक प्रकारची वृक्ष व जास्तीत जास्त औषधी वनस्पतींची लागवड तसेच रोपवाटिकेत रोपे तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे.
 
शेतमाल विक्रीसाठी ‘स्वास्थ रक्षक’ हा ब्रँड विकसित
 
सेंद्रिय व आयुर्वेदिक शेतीचा शास्त्रीय पद्धतींचा प्रसार, शेतमाल उत्पादन, विपणन व्यवस्था, शेतमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उत्पादने व विक्रीव्यवस्था अशी साखळी उभी केली आहे. संस्थेच्या उत्पादन विक्रीसाठी ‘स्वास्थ्यरक्षक’ हा ब्रँड विकसित केला आहे. त्यांची ’मोरिंगा पावडर’, ’तुलसी पाचक’, ’गुळवेल पावडर’, ’टोमॅटो चिप्स’, ’मशरुम पावडर’, ’मिरची पावडर’ ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी, आकर्षक पॅकिंग, अन्नसुरक्षा अशा सर्व बाबी त्यात समाविष्ट केल्या आहेत.
 
 
अन्य वैशिष्ट्यपूर्ण कार्य
 
संस्थेने विविध दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण अशा 250हून अधिक देशी पीक वाणांचे जतन केले आहे. यामध्ये तृणधान्ये, कडधान्ये, तेलवर्गीय पिके, कंदवर्गीय, वेलवर्गीय, पालेभाज्या इत्यादींचे बियाणांचे संकलन केले आहे. यासह सेंद्रिय शेतीला चालना देत ही संस्था देशी बियाणांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. शेतकर्‍यांना शेतीविषयक योजना, ग्राम चौपाल व नवीन उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी दर महिन्याच्या प्रत्येक 15 तारखेला एकदिवसीय विनाशुल्क शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.
याशिवाय ही संस्था पाणी, ऊर्जा, ग्रामविकास, पर्यावरण, गोपालन, कंपोस्ट खतनिर्मिती, जैविक कीटकनाशक निर्मिती, मधमाशीपालन व्यवसाय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.
 
 
राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी गोयल ग्रामीण विकास संस्थानने उचललेले पाऊल आगामी काळात निश्चितच दिशादर्शक ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.
संपर्क
गोयल ग्रामीण विकास संस्थान
जाखोड़ा, कैथून-सांगोद मार्ग, कोटा - 325001 (राजस्थान)
 88759 95439