नैसर्गिक शुद्ध मध आरोग्यासाठी सर्वोत्तम

17 May 2025 12:00:00
@डॉ. धनंजय वाखले
89288 21334
krushivivek
नैसर्गिक मधामुळे रोगप्रतिकारशक्ती अगदी खात्रीने वाढवता येते. खरेतर, क्वचितच कोणाला मधाविषयी शास्त्रीय व सत्य माहिती असेलच असे नाही. नैसर्गिक शुद्ध ’मध’ आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम का? व कसा? आहे ते थोडक्यात समजावून घेऊ.
मधमाशा आपले अन्न म्हणून फुलांतून पराग, शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांचे स्रोत (12-16% प्रथिने व इतर घटक) व मकरंद, उर्जेचा स्रोत म्हणून गोळा करतात. फुलांतील पराग कण मधमाशा आपल्या पायाच्या पिशवीत एकत्रित करून पोळ्यात आणून साठवतात. तसेच तोंडाच्या सोंडेतून मकरंद (90%पाणी व 10% शर्करा) गोळा करतात. आपल्या तोंडातून मकरंदात पाचक द्रव (एन्झाईम) मिसळून सुक्रोज साखरेचे इन्व्हर्शन करून ग्लुकोज व फ्रुक्टोज करतात, अतिरिक्त पाण्याचे इव्हापोरेशन व रिगार्गीटेशनच्या विशिष्ट पद्धतीने हजारो कामकरी मधमाशांच्या साहाय्याने मधात रूपांतर करतात. तो मध मेणाच्या पोळ्याच्या कोशात साठवतात व मध पूर्ण पक्व झाल्यावर (20% पाणी) मेणाचाच पातळ थर देऊन बंद करतात. असा हा मध कधीही खराब होत नाही. एकमेव नैसर्गिक शुद्ध ’मध’ प्रिडायजेस्टेड म्हणजे पूर्व प्रक्रिया पदार्थ केलेला असल्यामुळे आपण खाल्ल्यावर सरळ आपल्या रक्तात मिसळतो. त्यामुळे त्यातील सर्व घटकांचे फायदे मिळतात.
 
शुद्ध मधाचे नैसर्गिक गुणधर्म
 
मधात प्रामुख्याने पाणी, फ्रुक्टोज, ग्लुकोज, व सर्वसामान्य सुक्रोज साखरेचे प्रमाण नगण्य असल्याने शुगर फ्री तसेच फॅट फ्री असतो. याशिवाय प्रमुख म्हणजे क्षार, आम्ल जीवनसत्वे, प्रथिने, एन्झाइम्स, अमिनो ऍसिड्स, व्हिटॅमिन्स इ. अनेक पौष्टिक तत्त्वे थोड्याफार प्रमाणात मधात असतात.
 
वातावरणातील बदल व साठवणीच्या स्थितीनुसार मधाच्या नैसर्गिक घटकात थोडेफार बदल होतात. मधाचे स्फटिकीकरण होऊन तो भाग तळाशी किंवा बाजूला एकत्रित होतो व द्रव मध वेगळा होतो. यालाच ग्रानुलेशेन म्हणतात. हे मधात साखर जमा झाल्यासारखे दिसते. त्यामुळे बर्‍याचदा असा गैरसमज होतो की मधात भेसळ झाली आहे किंवा मध अशुद्ध आहे. उलट हीच खरी मधाच्या शुद्धतेची खात्रीशीर परीक्षा आहे. मध वातावरणातील आर्द्रता शोषून घेतो, यालाच हायग्रोस्कॉपिक म्हणतात. त्यामुळे त्यातील ईस्टमुळे किणवन होते. मध आंबल्यामुळे आंबट चव होते व खराब होतो.
 

krushivivek 
मधाचे प्रकार आणि उपयोग
 
जांभळाचा मध : दाट तांबड्या रंगाचा, जांभळासारखीच तुरट- गोड चव, स्फटिकीभवन होत नाही. रक्तशुद्धीकरण व जखमेवर इ. साठी उत्तम, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो त्यामुळे मधुमेहासाठी उपयुक्त. तसेच अति तहान लागणे व लघवी यावर नियंत्रण ठेवतो.
 
लिचीचा मध : फिक्कट रंगाचा, सुमधुर वास व सुगंध असलेला, अल्सर इ. पोटाच्या विकारांवर उत्तम. मुख्यत्वे करून बी-6, के, नायसिन, रायबोफ्लेवीन ही जीवनसत्वे तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगॅनीज इ. क्षारयुक्त आहे.
सूर्यफुलाचा मध : सोनेरी पिवळसर रंगाचा, गुळचट गोड चव, शरीरातील चरबी व वजन कमी करण्यास तसेच केसांच्या आरोग्यासाठी उत्तम.
बरसीमचा मध : फिक्कट केशरी रंगाचा, मधुर चव, रक्तातील हिमोग्लोबिन व प्रतिकारशक्ती वाढविण्यास उत्तम .
बाभळीचा मध : फिक्कट पिवळसर रंगाचा, सुमधुर चव, फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्फटिकीभवन होत नाही. यकृत व आतड्याचे कार्य सुरळीत ठेवते. तसेच फुफ्फुसांचे विकार दूर पळविते. शरीरातील हाडांना बळकटी देतो. तसेच पोटाचे विकार, मूत्रविकार व मधुमेह इ.साठी उत्तम.
निलगिरीचा मध : फिक्कट रंगाचा, सुगंध व मधुर वासाचा, सर्दी, खोकला, घशाचे, श्वसनाचे विकार व दमा इ.साठी उत्तम. रोगप्रतिकारशक्ती वाढवतो व संसर्गांपासून बचाव करतो.
कडुलिंबाचा मध : दाहविरोधी, सर्दी-खोकलाविरोधी, पूर्तीनाशक, त्वचेचे विकार (पुरळ इ.) दूर करतो, दातदुखी दूर करतो, उच्च रक्तदाबावर उपयुक्त तसेच संसर्ग रोगांपासून संरक्षण करतो.
तुळशीचा मध : फिक्कट हिरवट रंगाचा, सुगंध, सुमधुर चव, उत्तम अँटी ऑक्सिडेन्ट, अँटी बायोटिक व रोगप्रतिकारशक्ती वाढवितो उत्तम. घशाचे विकार दूर करतो तसेच सर्दी-खोकला यावर उत्तम गुणकारी.
ओव्याचा मध : गडद चॉकलेटी रंगाचा, ओव्याचा सुगंधी वास व मधुर चव, स्फटिकीभवन होत नाही. या मधात मुबलक ओमेगा 6- फॅटी अ‍ॅसिड मिळतात. त्यामुळे पित्त, अपचन, यापासून आराम मिळतो. दातदुखी, सर्दी, ताप बरा करतो. जखमा कमी करतो. मधुमेही लोकांसाठी उपयुक्त.
 

krushivivek 
 
शिसमचा मध : नैसर्गिक डिटॉक्सीफायर म्हणून ओळखला जातो. ऊर्जा निर्माण करतो व पचनशक्ती वाढवतो.
कारवीचा मध : दाट तांबड्या रंगाचा, सुमधुर चव, संधिवात, मधुमेह, रोगप्रतिकारशक्ती, शरीराची सर्वांगीण वाढ इ.साठी उत्तम.
मध एक पूरक पदार्थ
गुलकंदाची चव मधामुळे द्विगुणित होते. उत्तम मुखवास. उन्हाळ्यातील उष्णतेचे विकारांवर गुणकारी. पित्तशामक आहे.
मध आवळा कँडी : व्हिटॅमिन ’सी’ भरपूर प्रमाणात मिळते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पचनशक्ती वाढवते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. शरीरातील विषारी पदार्थ मलाद्वारे दूर करते व शरीराची ऊर्जा वाढवते व तंदुरुस्त ठेवते.
हनी जॅम : सकाळच्या न्याहारीत मधाचे उपयोगी पौष्टिक तत्त्वे जॅमबरोबर मिळतात. त्यामुळे विशेषकरून लहान मुलांना अत्यंत उपयुक्त. स्ट्रॉबेरी, मँगो, संत्रे, इ. सारख्या विविध फळांच्या जॅममुळे मन प्रसन्न होते.
हनी चॉकलेट्स : मधाचे नैसर्गिक वैशिष्ट्यपूर्ण चवदार चॉकलेट मुले आवडीने खातात. शरीरास आवश्यक पौष्टिक तत्त्वे मिळतात. थकवा दूर होऊन प्रसन्न व ताजेतवाने वाटते.
लोशन : मध आणि विविध तेलांचा वापर करून केशतेलांचे तसेच लोशनचे उत्पादन करतात. यांच्या वापराने डोक्यावरील केसांना व त्वचेला नैसर्गिक पोषण देते व निरोगी ठेवते.
हनी लिप बाम : ओठ मुलायम, चमकदार व भेगामुक्त करतो. नियमित वापर केल्यास उत्तम परिणाम दिसून येतात.
भारतात प्राचीन काळापासून मधाचे सेवन पौष्टिक अन्न व औषध म्हणून वापर होत आला आहे. अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांनादेखील सर्वसाधारण सर्दी म्हणून, खोकला, अन्नपचन, तसेच शरीरावरील दुखापत, भाजणे, कापणे इ.वर रामबाण औषध म्हणून उपयोग करतात. विज्ञानयुगातदेखील सिद्ध झाले आहे की, मध आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास चांगली मदत करतो.
- निवृत्त सहाय्यक निर्देशक, केंद्रीय मधमाशा संशोधन आणि प्रशिक्षण संस्थान, पुणे
Powered By Sangraha 9.0