संमेलनाच्या त्रिसूत्रीने महिला माध्यमविश्वाला दाखवली नवी वाट

विवेक मराठी    17-May-2025
Total Views |
Vishwa Samvad Kendra
‘बदलते प्रवाह-नवी दृष्टी, नवी दिशा’ अशी त्रिसूत्री असलेल्या महिला माध्यमकर्मी संमेलनात महिला पत्रकारितेच्या क्षेत्रात होत असलेल्या सखोल आणि सकारात्मक बदलांची जाणीव ठळकपणे जाणवली. संमेलनाने महिला माध्यमविश्वाला मानवी मूल्यांची, न्यायाची आणि समतेची नववाट दाखवली आहे. ही वाटचाल केवळ प्रेरणादायीच नाही, तर नव्या युगाच्या पत्रकारितेसाठी आवश्यकही आहे.
विश्व संवाद केंद्रातर्फे पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील महिला माध्यमकर्मींचे संमेलन नुकतेच पार पडले. माहितीचा अखंड ओघ, सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान, विविध विचारधारांचा प्रभाव आणि सद्यस्थितीत आव्हानात्मक परिस्थिती सर्व क्षेत्रांत आहे. ती स्वीकारत वास्तवाला विवेकाची जोड देत सातत्याने समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी माध्यमातील ‘ती’ जाणून घेण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. महिला माध्यमकर्मी बदलता प्रवाह : नवी दृष्टी, नवी दिशा ही संमेलनाची संकल्पना होती. विविध क्षेत्रांप्रमाणेच पत्रकारिता प्रामुख्याने पुरुषप्रधान क्षेत्र मानले जात होते. त्यात महिलांचा सहभाग दुर्मीळ असायचा. त्यात सौंदर्य, पाककृती, फॅशन किंवा कुटुंबविषयक पानांपुरता मर्यादित सहभाग असणे हा एक काळ होता. मात्र गेल्या तीन दशकांत हा प्रवाह झपाट्याने बदलला आहे. आज महिला पत्रकार प्रिंट, टेलिव्हिजन, रेडिओ, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियामध्ये प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यांनी राजकारण, अर्थकारण, गुन्हेगारी, आरोग्य, सुरक्षा, क्रीडा, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. या सर्वांचे एकत्रीकरण होऊन त्यांचा प्रवास जाणून एक वैचारिक मंथन या संमेलनात घडले.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
झी 24 तासचे माजी मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यांनी माध्यम क्षेत्रातील आव्हाने, बदलत जाणारे प्रवाह याबाबत मत व्यक्त केले. महिला पत्रकारांसाठी असणारी आव्हाने विशद करताना,‘स्वतःची शैली विकसित करत आपण माध्यमात वावरताना स्वतःचा प्रेक्षक वर्ग सुद्धा तयार करायला हवा. स्टोरी टेलर या भूमिकेतून बाहेर पडत स्टोरी चेंजर व्हा’, असा मौलिक सल्ला त्यांनी महिला माध्यमकर्मींना दिला. स्वतःच्या क्षमता ओळखून आत्मविश्वासाने या क्षेत्रात वावरा असेही ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय तज्ज्ञ) आणि महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेतील प्राध्यापिका डॉ. प्रांजली देशपांडे यांनी ‘एआय’मधील संधी आणि गरज माध्यम क्षेत्राला पूरक असून आपण त्यातील सकारात्मकता वेचायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली ‘एआय’मधील संभाव्य धोके लक्षात घेऊन चॅटजीपीटीसारखी टूल्स वापरायला हवीत. तंत्रज्ञानात होणारे बदल स्वीकारत आपण त्याचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. मात्र ते वापरण्याचे प्रशिक्षणसुद्धा आवश्यक असल्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
 
Vishwa Samvad Kendra 
‘माध्यमातील मी’ या परिसंवादाने या संमेलनाचे शिखर गाठले. या परिसंवादाचे संचालन साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी (कविता) मयेकर यांनी केले. रानडे इन्स्टिट्यूटच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आणि आरजे शोनाली या परिसंवादात सहभागी झाल्या होत्या. माध्यमकर्मी म्हणून काम करताना महिला-पुरुष हा भेद नाही. कधी सोय म्हणून कधी अपघाताने किंवा कधी काहीही नाही जमले तर इकडे वळणार्‍या वाटा असा अनेकांचा प्रवास असतो. दैनंदिन काम करतानाचा प्रवास उलगडताना येणारे अनुभव, गमतीजमती, कसोटीचे क्षण, समयसूचकता कशी अंगीकारायला हवी, दहशतवाद्यांशी, त्यांच्या संघटनेशी आलेल्या संपर्कातून मिळणार्‍या बातम्या, महिला म्हणून काही असणार्‍या मर्यादा आणि त्यावर सचोटीने केलेली मात अशा अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा होत परिसंवाद रंगला. त्यांचे अनुभव सर्वांना प्रेरणादायी ठरले. माध्यमात काम करताना काय नक्की करायला हवे यासाठी मार्गदर्शन मिळाल्याच्या प्रतिक्रिया युवा महिला माध्यमकर्मींनी दिल्या. काळाच्या ओघात मात्र अपघात किंवा सोय म्हणून माध्यम क्षेत्रात न जाता करिअर म्हणून महत्त्वाकांक्षेने आता महिला या क्षेत्राकडे वळत आहेत. त्यात आपले पाय रोवत आहेत आणि यशाची विविध शिखरे पादाक्रांत करत आहेत याचा खूप आनंद आहे असा सूर परिसंवादातून उमटला.
 
Vishwa Samvad Kendra 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या संबोधनाने संमेलनाचा समारोप झाला. त्यांनी महिला पत्रकार समाजाकडे एका वेगळ्या संवेदनशीलतेने पाहतात. त्यांच्या दृष्टिकोनात माणुसकी, समता, समजून घेण्याची वृत्ती मूलतः असते. संवेदनशीलता हा महिलांचा स्थायीभाव असून त्यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांच्या कथा समोर आणण्यात त्यांनी पुढाकार घेत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. महिला पत्रकारांनी लैंगिक अत्याचार, बालविवाह, स्त्रीशिक्षण, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या विषयांना मुख्य प्रवाहात आणून देण्याचे कार्य अजून जोमाने, सजगतेने करावे, असे आवाहन त्यांनी केले. निर्णयक्षमता आणि सर्वव्यापी काम महिला सहज करतात. महिला माध्यमकर्मी आता केवळ वृत्तसंकलनापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्या संपादक, मीडिया हेड, स्टार्टअप फाउंडर, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, मीडिया ट्रेनर अशा विविध भूमिकांमध्ये काम करत आहेत. डिजिटल युगात त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत पत्रकारितेला नवसंजीवनी दिली आहे. आज अनेक महिला स्वतःचे यूट्यूब चॅनल, पॉडकास्ट आणि वेब पोर्टल्सद्वारे समाजाशी थेट संवाद साधत आहेत. त्यांनी त्यासाठी स्वतः पुढाकार घेत प्रसंगी ब्रँड होत नेतृत्व करावे. माध्यमांना अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि जाणीवसंपन्न बनवावे अशी अपेक्षा रहाटकर यांनी यावेळी व्यक्त केली. महिला माध्यमकर्मी यांनी लेखन आणि मांडणी ही एका वेगळ्या संवेदनशीलतेने केलेली असते. त्यांनी समाजातील दुर्लक्षित घटक-बालकामगार, स्त्रियांची सुरक्षितता, आदिवासींच्या समस्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्या अनेक सामाजिक समस्यांची चिकित्सा करतात. केवळ बातमी नाही तर त्या बातमीमागील माणुसकीची कहाणी अधोरेखित करण्याची ताकद यातून ठळकपणे दिसते. संमेलनाच्या निमित्ताने आजच्या माहितीच्या युगात माध्यमांची भूमिका केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून, ती समाजमन घडवते. या प्रभावशाली क्षेत्रात महिला माध्यमकर्मींची उपस्थिती आणि भूमिका दिवसेंदिवस अधिक सशक्त होत आहे.
Vishwa Samvad Kendra 
भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेच्या आपल्या कर्तव्याप्रती न्यूज 18च्या सुप्रसिद्ध अँकर आणि रिपोर्टर रूबिका लियाकत यांना कार्यक्रमास उपस्थितीत राहता आले नाही. म्हणून त्यांनी व्हिडिओ संदेश पाठविला होता. आपल्या व्हिडिओतून त्यांनी महिला पत्रकारांशी संवाद साधला तसेच विश्व संवाद केंद्र पुणे यांनी अशा प्रकारचे भविष्यात कार्यक्रम करावेत अशी आशा व्यक्त केली.
‘बदलते प्रवाह-नवी दृष्टी, नवी दिशा’ अशी त्रिसूत्री असलेल्या संमेलनात महिला पत्रकारितेच्या क्षेत्रात होत असलेल्या सखोल आणि सकारात्मक बदलांची जाणीव ठळकपणे जाणवली. संमेलनाने महिला माध्यमविश्वाला मानवी मूल्यांची, न्यायाची आणि समतेची नववाट दाखवली आहे. ही वाटचाल केवळ प्रेरणादायीच नाही, तर नव्या युगाच्या पत्रकारितेसाठी आवश्यकही आहे.
 
लेखिका विश्व संवाद केंद्र, पुणे येथे संपादक म्हणून कार्यरत आहेत.