-अमोल तपासे
डॉ. रामदासजी आंबटकर म्हणजे राजकारणातील अजातशत्रू होते. पक्षकार्य सांभाळतांना राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर दिला. विदर्भातील कार्यकर्त्यांचा आधारवड असलेले डॉ. रामदासजी आपल्याला सोडून वैकुंठाला गेले. त्यांचे जाणे मनाला चटका देणारे आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी त्यांनी देह त्याग केला. डॉ. रामदासजींचे राष्ट्रकार्य कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहिल. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत 'मातृमंदिर का समर्पित दीप मै', हे वैयक्तिक गीत डॉ. रामदासजी गात होते. कार्यालयात बैठक असल्याने बैठकीस अपेक्षित कार्यकर्ते उपस्थित होते आणि बैठकीस अपेक्षित नसणारे कार्यकर्ते दुस-या खोलीत होते. डॉ. रामदासजींनी गीत गायनास प्रारंभ केल्याने दुस-या खोलीतले कार्यकर्ते ते ऐकण्याकरिता बैठकीत येऊन बसले होते. गीत गायन करताना रामदासजी भावविभोर झाले होते. गीतामधील प्रत्येक ओळीतील उत्कटता समोरच्यांच्या अंतःकरणापर्यंत पोचत होती. डॉ. रामदासजींच्या भावपूर्ण गायनातून अनेकांना प्रेरणा मिळत होती. भारतमातेच्या परमवैभवासाठी कार्य करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते निर्माण करणा-या डॉ. रामदासजींचे स्मरण सदैव होत राहिल.
डॉ. रामदासजी बालपणापासूनच संघ स्वयंसेवक होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय रूग्णालयात रूजू झाल्याने या तरूण संघ स्वयंसेवकाशी स्व. दत्ताजी डिडोळकरांचा वडनेर गावी विजयादशमी संघ उत्सवात संबंध आला. दत्ताजींच्या परिसस्पर्शाने डॉ. रामदासजींनी आपले संपूर्ण जीवनकार्य संघपरिवाराला समर्पित केले. संघटनेचा आदेश शिरोधार्य समजून लाखो किलोमीटर प्रवास करून संघटनेचे कार्य प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात पोहचविले. डॉ. रामदासजींचे कार्य सर्वस्पर्शी होते. अनेक वर्ष अभाविपचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असतांना, अनेक दायित्व सांभाळत असतांना त्यांनी संपर्कात आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा संघटनेचा प्राण आहे या भावनेने जपला होता. नागपूर विद्यापीठातील कित्येक सिनेटच्या निवडणुकीत विजयी झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांचा पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात राष्ट्रीय विचारांच्या चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली. त्यामुळे आज संघटनेचे, पक्षाचे विदर्भात सर्वदूर जाळे पसरले आहे त्यात रामदासजींचा सिंहाचा वाटा आहे.
एक महिना अगोदर आजाराने रूग्णालयातून सुटटी घेऊन घरी परतले होते तेव्हा रामदासजींची घरी भेट झाली. त्यांना मी सांगितले की,'माझे काव्यसंग्रहाचे प्रकाशन करावयाचे आहे. त्यांनी संग्रह पाहिला व सुनीलजींच्या हस्ते प्रकाशन करू',असे म्हणाले. माझे काव्य तरूण भारतमध्ये प्रसिद्ध झाल्यावर दूरध्वनी करून ते माझे कौतुक करायचे. त्यांनी घरी असलेल्या संवादिनीवर संपूर्ण वंदेमातरम् गीत गायन रेकार्ड केले. ते रामदासजींचे शेवटचे गीत गायन होते.
संघ शताब्दी वर्षात संघ गीते संवादिनीवर स्वर लावून ते मोबाईलमध्ये रेकार्ड करून कार्यकर्त्यांना पाठवणार असा उपक्रम त्यांनी बोलून दाखविला होता. तो त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे अपूर्णच राहिला.
डॉ. रामदासजींचे राहणीमान अत्यंत साधे होते आणि त्याला राष्ट्रचिंतनाची जोड होती. पक्षाने विधान परिषदेवर पाठविल्याने त्यांनी अनेक गोरगरीब जनतेच्या, शेतक-यांच्या, शैक्षणिक समस्या विधीमंडळाच्या पटलावर मांडल्या. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांत विकासकामे केली. समाजातील वंचित घटकांना मदत केली.
डॉ. रामदासजीं म्हणजे राजकारणातील अजातशत्रू होते. पक्षकार्य सांभाळतांना राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर दिला. विदर्भातील कार्यकर्त्यांचा आधारवड असलेले डॉ. रामदासजी आपल्याला सोडून वैकुंठाला गेले. त्यांचे जाणे मनाला चटका देणारे आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी त्यांनी देह त्याग केला. डॉ. रामदासजींचे राष्ट्रकार्य कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहिल. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
-अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर
९९६०६७३७८९