@डॉ. मयुर गाडेकर - 75488617963
लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होईल. बर्याच वेळा शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले धान्य बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरतात. परंतु असे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांची भेसळ, रोगट बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते. असे बियाणे पेरणीसाठी वापरल्यास त्याची उगवण चांगली होत नाही. परिणामी, पेरणीचा हंगामसुद्धा वाया जाण्याची शक्यता असते. नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी प्रथम बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
शेतीच्या उत्पादनातील महत्त्वाचे घटक म्हणजे जमीन, हवामान, बियाणे, पेरणी, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, काढणी, मळणी व विक्री हे होय. या पैकी ’बियाणे’ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी - असे संत तुकाराम महाराज सांगतात. ज्याचे बीजच शुद्ध आहे. अशा बीजातून निर्माण होणारे प्रत्येक नवीन रोपटे हे अतिशय शुद्ध असणार आहे. त्यांची फळेसुद्धा रसाळ असतील, असे शुद्ध बीजाचे तात्पर्य आहे.
आजकाल पेरणीसाठी वापरण्यात येणारे शुद्ध बियाणे मिळणे कठीण झाले आहे. दरवर्षी शेतकर्यांना कमी प्रतीच्या बियाण्यांबाबत हजारो तक्रारी असतात. शेतकर्यांना चांगले बियाणे न मिळाल्यामुळे त्यांनी केलेल्या कष्टाचा खर्च व केलेल्या पैशाचा त्यांना पुरेपूर मोबदला मिळत नाही. त्यामुळेच बीजोत्पादनातच नव्हे तर कृषी उत्पादनामध्ये सुद्धा बीजप्रक्रिया हा एक महत्त्वाचा घटक बनत चालला आहे. तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांना जमिनीतून व बियांपासून होणार्या रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाण्यास बीजप्रक्रिया न करताच पेरणी केल्यास, बियाण्याची उगवण होते, परंतु उगवणीच्या वेळेस आणि उगवणीनंतर बियाणावरील आणि जमिनीतील वेगवेगळ्या बुरशीमुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन उगवणार्या रोपांची संख्या कमी होते किंवा उगवल्यानंतर झाडांची मर होण्याची शक्यता असते. अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी प्रत्येक पिकांत प्रति हेक्टरी निर्धारित केलेली रोपांची संख्या राखणे आवश्यक असते. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया ही एक महत्त्वाची बाब आहे.
बीजप्रक्रिया म्हणजे काय ?
बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाण्याची शेतातील उगवण वाढविण्यासाठी आणि जोमदार रोपे येण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक कीटकनाशकांची व संवर्धकांची प्रक्रिया केली जाते. याला बीजप्रक्रिया असे म्हणतात.
जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया
250 ग्रॅम जिवाणू संवर्धनाचे पाकिट 10 ते 15 किलो बियाण्यास वापरावे. यासाठी 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यावे. यानंतर द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जिवाणू संवर्धन टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जिवाणू संवर्धकाचा लेप बियाणावर समप्रमाणात बसेल व बियाणाचा पृष्ठभाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी किंवा बियाणे ओलसर करून जिवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्यास लावावे. त्यानंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदांवर सुकवावे, अशी बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. (24 तासांच्या आत पेरणी करावी.) यामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत नाही. बियाण्याची उगवणक्षमता वाढते, बियाणांद्वारे उद्भवणारे रोग टाळता येतात, रोपांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो, त्यामुळे रोपे जोमदार व निरोगी वाढतात.
रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया
बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवावे. प्रथमतः 100 किलो बियाणे 1 लिटर पाणी या प्रमाणात भांड्यात 1 मिनिटभर घोळावे. नंतर त्यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणे 5 मिनिटांपर्यंत लाकडी दांडा अथवा उलथने वापरून चांगले पोळावे, बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळवण्याची प्रक्रिया चालू ठेवावी, मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल, त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावेत. तदनंतर बियाण्यास बुरशीनाशकाची भुकटी (पावडर) चोळणे. बियाणे प्रक्रिया शिफारशीमध्ये दिलेल्या शिफारशीनुसार 1 किलो बियाण्यास लागणार्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावे, त्यापूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओले करून घ्यावे, अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत.
बुरशीनाशकाच्या घट्टसर द्रावणाची प्रक्रिया
प्रथमतः 100 किलो बियाणे 1 लिटर पाणी या प्रमाणात बीजप्रक्रिया ड्रममध्ये घ्यावे. नंतर त्यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात बीजप्रक्रिया ड्रममध्ये टाकून 30 ते 40 वेळा फिरवावे, बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळवण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडी फार वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात चिकटेल, त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.
खरीप ज्वारी बीजप्रक्रिया
अ) 3 किलो मीठ 10 लिटर पाण्यात मिसळावे. (230 टक्के मिठाचे द्रावण) या द्रावणात बी ओतावे व उकळावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळावे. तळाला राहिलेले बी काढून 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे.
ब) गंधक 300 मेश 4 ग्रॅम किंवा थायरम (बुरशीनाशक) 75 टक्के 3 ग्रॅम / किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
क) 200 ग्रॅम कार्बोसल्फान (कीटकनाशक) (25 एसडी) /1 किलो बियाण्यात चांगले मिसळावे. हे मिश्रण चांगले हलवून पेरणीसाठी वापरावे.
ड) अॅझोटोबॅक्टर (जैविक खत) व स्फुरद विरघळविणारे जिवाणू नत्र (पी.एस.बी.) प्रत्येकी 250 ग्रॅम/10 किलो बियाणे या प्रमाणात बियाणांस चोळावे व अर्धा तास सावलीत सुकवावे. ही बीजप्रक्रिया जरगड, काणी, खोडमाशी रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
भात बीजप्रक्रिया
अ) 300 ग्रॅम मीठ 10 लि. पाण्यात विरघळावे व या द्रावणात बी ओतावे आणि ढवळावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळावे. तळाला राहिलेले बी काढून 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे.
ब) वरील प्रक्रिया पूर्ण केलेल्या बियाण्यास 3 ग्रॅम घायरम किंवा कार्बेन्डॅझिम (कीड प्रतिबंधक) 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळून पेरणी करावी.
क) भात बियाणे 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन ( बुरशीनाशक व करपा रोग नियंत्रक) 10 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात 2 तास भिजवावे.
ड) बियाण्यास 50 टक्के तीव्रतेचे कार्बेन्डॅझिम आणि ग्रेन थायरम 50 टक्के प्रत्येकी 2 ग्रॅम/किलो बियाण्यास संयुक्त बीजप्रक्रिया करावी.
इ) मॅन्कोझेब (बुरशीनाशक ) 75 टक्के पाण्यात मिसळावे, अधिक कार्बेन्डॅझिम 50 टक्के प्रत्येकी 2 ग्रॅम/किलो बियाण्यास संयुक्त बीजप्रक्रिया करावी.
ई) 0.2 टक्के मोनोक्रोटोफॉसच्या (कीटकनाशक) द्रावणात 6 तास बियाणे भिजत ठेवावे. अंझोटोबॅक्टरचे स्फुरद विरघळविणारे जिवाणू नत्र प्रत्येकी 250 ग्रॅम / 10 किलो बियाणे या प्रमाणात बियाणास चोळावे व अर्धा तास सावलीत सुकवावे. अशी बीजप्रक्रिया कडा, करपा, पिंगट, ठिपके आदी रोगांवर गुणकारी ठरते.
अशी करा बाजरी बीजप्रक्रिया
अ) 2 किलो मीठ 10 लिटर पाण्यात मिसळावे. (20 टक्के मिठाचे द्रावण) या द्रावणात बी ओतावे व ढवळावे, द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळावे. तळाला राहिलेले बी काढून 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे.
ब) मेटॅलॅक्झील (बुरशीनाशक)35 टक्के एस.डी. 6 ग्रॅम/किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
क) शेवटी अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे नत्र जिवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम/10 किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यावर बीजप्रक्रिया करून बियाणे अर्धा तास सावलीत सुकवावे व पेरणी करावी.
सोयाबीन बीजप्रक्रिया
अ) 20 ग्रॅम थायरम 75 टक्के पाण्यात मिसळावे. प्रति 10 किलो बियाण्यावर चोळावे.
ब) रायझोबियम (जैविक खत) 125 ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे नत्र जिवाणू 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा (बुरशीनाशक) 40 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी, बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी. (प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. नंतर रायझोबियम व इतरची प्रक्रिया करावी.)
तूर, मूग व उडीद बीजप्रक्रिया
अ) थायरम 75 टक्के 20 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात चोळून पेरणी करावी.
ब) रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येकी 250 गम्र व ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम प्रती 10 किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी.
कापूस बीजप्रक्रिया
अ) 1 लिटर सल्फ्युरिक अॅसिड (खनिज आम्ल) 10 किलो बियाण्यावर वापरून बियाण्यावरील कापसाचे धागे पूर्णपणे काढून टाकवेत व बियाणे दोन व वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे. सदरचे काम तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावे.
ब) अॅल्युमिनियम फॉस्फॉईड (कीटकनाशक) 100 घ.मी. ला 500 ग्रॅम या प्रमाणात 24 तास धुरी द्यावी. सदरचे काम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
क) कॅप्टन (बुरशीनाशक) 80 टक्के पा.मि. 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी किंवा थायरम 75टक्के पा.मि. 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी किंवा कार्बेन्डॅझिम 50 टक्के पा.मि. 1.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी किंवा कार्बोक्झिन 75 टक्के पा.मि. 1.0 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात मिसळून बीजप्रक्रिया करावी.
ड) वरील बुरशीनाशकात इमिडाक्लोप्रिड (कीटकनाशक)70 टक्के पाण्यात मिसळावे. 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
इ) अंझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू नत्र प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी. अशाप्रकारे बीजप्रक्रिया केल्यास गुलाबी बोंडअळी, मावा, तुडतुडे व फुलकिडे रोगांवर नियंत्रण मिळण्यास मदत होते.
बीजप्रक्रियेचे फायदे
बीजप्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. यामध्ये जमिनीतून व बियाण्यांपासून पसरणार्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, बियाणांची शेतात उगवण्याची क्षमता वाढते, रोपांची निरोगी व जोमदार वाढ होते, तसेच रोगट झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पीकांच्या उत्पादनात वाढ होते. रोग व किड नियंत्रणावरील खर्चात बचत होण्यास मोठी मदत होते. या प्रक्रियेसाठी कमी खर्च होतो, हे सर्वात महत्त्वाचे आहे.
आधुनिक शेती पद्धतीत शुद्ध व चांगले गुणधर्म असलेल्या बियाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
- लेखक नाशिक येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषि महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.