प्रजेला कठोर निर्णय घ्यावा लागेल...

02 May 2025 17:54:10
 
Pahalgam
पहलगामची दुर्घटना ही राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेवर आघात आहे. लोकशाहीत सर्वसत्ताधीश प्रजा असते. या सर्वाभौम प्रजेने आता पाकिस्तानी मनोवृत्तीचे समर्थन करणार्‍या नेत्यांना धडा शिकविण्याची गरज आहे.
पहलगाम घटनेची माहिती सर्वांना आहे. जिहादी दहशतवाद्यांनी पुरुषांना त्यांचा धर्म विचारून ते हिंदू आहेत, याची खात्री करून त्यांना गोळ्या घातल्या. हे सर्व जगाला माहीत आहे, परंतु शरदराव पवार ते स्वीकारायला तयार नाहीत. ते म्हणाले, ‘दहशतवाद्यांनी धर्म विचारून केवळ हिंदूंना गोळ्या मारल्या, असं पिडित कुटुंबियांनी वारंवार सांगितलं, पण खरंच धर्म विचारून गोळीबार केला का?... या दहशतवाद्यांनी महिलांना काहीही केलं नाही, फक्त पुरुषांवर गोळ्या झाडल्या.’ शरदराव पवार यांच्या या वक्तव्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण हिंदूंच्या रक्षणाचा, हिंदूंच्या आस्थांचा विषय आला की, यापूर्वीदेखील शरदराव पवार असेच काही तरी बोललेले आहेत.
 

काही घटनांचा फक्त उल्लेख करतो. बाबरी ढांचा जमीनदोस्त झाल्यानंतर ते म्हणाले, ‘यांच्या ओठावर राम आहे, पोटात नथुराम आहे.’ ‘डॉ. बाबासाहेबांना अपमानित करण्यासाठी 6 डिसेंबर ही तारीख निवडली गेली’. ‘मला पगडी घालू नका, पागोटा घाला.’ ‘रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते.’ ‘महाराजांनी हिंदवी स्वराज्य नव्हे, तर रयतेचे स्वराज्य निर्माण केले’ इत्यादी, इत्यादी. रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरू होते, असे कोणताही इतिहासकार म्हणत नाही. महाराजांचे अनेक आध्यात्मिक गुरू होते म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शक होते, त्यातील एक समर्थ रामदास स्वामीदेखील होते. शरदराव पवार यांना अशी खोचक विधाने करण्याची कला उत्तम साधलेली आहे.
 
समाजातील एक वर्ग असा आहे की, त्याला हे आवडत नाही. त्याला संताप येतो आणि तो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला लागतो. त्याचा शरदरावांवर शून्य परिणाम होतो. ते जोपर्यंत राजकारणात सक्रिय आहेत तोपर्यंत हे असेच चालणार हे आपण गृहित धरले पाहिजे.
 
 
आज भगवान गौतम बुद्ध जर हयात असते तर त्यांनी शरदरावांच्या पूर्वजन्माची एखादी कथा सांगितली असती. भगवंतांच्या जातक कथांतील अनेक कथा विचित्र बोलणार्‍या, विचित्र वागणार्‍या, समाजात कलह माजविणार्‍या व्यक्तींसंबंधी आहेत. असा प्रसंग घडल्यानंतर भगवंत म्हणत, ‘हे असे आताच घडले आहे, असे नाही. मागच्या जन्मातही याचा व्यवहार असाच होता. मग ते कधी देवदत्तच्या पूर्वजन्माची कथा सांगत. याचा अर्थ एवढाच की, उफराटा विचार करण्याची बुद्धी जन्मोजन्माची असते आणि त्यात बदल करता येत नाही.’ फली नरिमन यांचे ‘बियाँड द कोर्टरूम’ या शीर्षकाचे पुस्तक आहे. सुंदर पुस्तक आहे, वाचकांनी वाचायला काही हरकत नाही. त्यातील पहिल्या प्रकरणाचे शीर्षक आहे, ‘द स्टेट ऑफ दी नेशन’. यात त्यांनी ब्रह्मदेवाची कथा सांगितली आहे. ब्रह्मदेवाकडे जगातील काही देश जातात आणि ते ब्रह्मदेवाकडे तक्रार करतात, ‘देवा तू भारताला भरपूर नद्या दिल्या आहेस, पर्वत दिले आहेस, सुपीक भूमी दिली आहेस, हजारो प्रकारच्या वनस्पती दिल्या आहेस, सुंदर प्राणीजीवन दिले आहेस, परंतु आम्हाला मात्र देताना तू कंजुषी केली आहेस.’ तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, ‘तुम्ही म्हणता ते पूर्ण सत्य नाही. मी भारताला सर्व काही दिलं आहे, परंतु या सर्वाचा दुरूपयोग करणारी प्रजा दिलेली आहे. तुम्हाला कमी दिलं आहे, पण सदुपयोग करणारी, बुद्धी असणारी माणसं दिली आहेत.’ हा जरी विनोद असला तरी, तो नेमका मर्मावर बोट ठेवतो. आमच्याच देशात स्वातंत्र्यानंतर लालू, ममता, मुलायम, शरद पवार, वडेट्टीवार, भजनलाल, चिमणलाल अशी राजकीय नेतृत्व करणारी मंडळी का उभी राहिली? ब्रह्मदेवाने तशा प्रकारची माणसं दिल्यामुळे झालेली आहे, हे या विनोदाचं उत्तर आहे.
 
 
राजकीय नेता हा शक्तिमान असतो. त्याच्या शक्तीचा उगम कुठे असतो? आपण फक्त लोकशाही राजवटीचा विचार करू. हुकूमशाही, राजेशाही, एकपक्षीय हुकूमशाहीचा विचार जरा बाजूला ठेवू. लोकशाहीत राजकीय नेत्याला शक्ती दोन कारणांमुळे प्राप्त होते. पहिले कारण त्याचे शील, समर्पण, त्याग, प्रामाणिकपणा, सत्यवादिता आणि या सर्वांसाठी वाटेल ती किंमत द्यायची तयारी. असे नेते स्वयंभू नेते असतात. ते चुकूनही लोकानुरंजन करीत नाहीत. गळा फाडून भाषणे देत नाहीत आणि कुत्सित भाषणेही देत नाहीत. भारताचा विचार करता लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महान नेत्यांचा समावेश करावा लागतो. ते त्यांच्या शील आणि समर्पणाने आपोआप लोकनेते झाले.
 
दुसर्‍या प्रकारचे नेतृत्व वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय उचापती करून, तडजोडी करून, सिद्धांत आणि विचारांना गटारात बुडवून, लोकांमध्ये चुकीच्या विचारांवर चेतना निर्माण करून, प्रचंड धन गोळा करून उभे राहतात. स्वातंत्र्य आंदोलन काळातील त्यागी, तपस्वी नेतृत्वाची पिढी लयाला गेली आणि त्याची जागा या दुसर्‍या प्रकारच्या नेतृत्वाने हळूहळू घेतली. त्याचे प्रतिबिंब अनेक चित्रपटांतून बघायला मिळतं. राजकारणी खलनायक यावर अनेक चित्रपट निघालेले आहेत.
 
लोकशाहीमध्ये या दुसर्‍या नेतृत्वाच्या शक्तीचा उदय हा प्रजा असतो. लोकशाही राजवटीत सर्व शक्तीचा उगम प्रजेतून होतो. ही संकल्पना सर्वप्रथम अमेरिकेने विकसित केली. थॉमस जेफर्सन यांचे डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स आणि अमेरिकेची राज्यघटना यात याचे अप्रतिम विवरण झालेले आहे. ही संकल्पना जशीच्या तशी आपल्या महान घटनाकारांनी स्वीकारलेली आहे.
 
 
या प्रजेविषयी जेफर्सनचं म्हणणं असं आहे की, जर प्रजा आपल्या हितासंबंधी जागरुक नसेल तर, प्रजेचे अकल्याण करणारेच राज्यकर्ते येतील आणि ते प्रजेतूनच येतील. यासाठी प्रजेच्या शिक्षणाला कोणताही पर्याय नाही. हा सिद्धांत जर स्वीकारला तर, शरदराव पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे असे नेते जे आज आपल्याला दिसतात त्यांच्या उदयाला स्वहिताविषयी झोपलेली प्रजा जबाबदार आहे. आणि ती जर अशीच झोपून राहिली तर, अशाच नेतृत्वाच्या पिढीमागून पिढ्या येत जातील.
 
 
राजकारण करणार्‍या नेत्यापुढे एक संकल्पना अत्यंत स्पष्ट असावी लागते. प्रजेचा पाठिंबा मिळवून राज्य मिळवायचे आहे, ते कशासाठी? अमेरिकेचे घटनाकार याचे उत्तर देतात की, जीवनमूल्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या कालोचित विकासाठी सत्ता हवी आहे. ही मूल्य कोणती आहेत? सर्वच देशांची मूल्ये सारखी नसतात. आपल्या देशापुरता विचार आपण करूया. आपल्या संविधानकारांनी जी मूल्ये आपल्यापुढे ठेवली आहेत, ती अशी आहेत-सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची प्रस्थापना, व्यक्तीची प्रतिष्ठा, सार्वत्रिक बंधुता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यातील कोणत्याही मूल्यावर जर आघात झाला, तर तो सहन करता कामा नये.
 
 
पहलगामची दुर्घटना ही राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेवर आघात आहे. प्रत्येक राज्याचा जीवनहेतू मूल्य रक्षण आणि प्रजेचे रक्षण हा असतो. पर्यटनातून आनंद मिळविण्यासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांना देशशत्रूंकडून मरावे लागले, त्या देशशत्रूंना रोखण्यात आपण कमी पडलो. मारणारे धर्मवेडे आहेत, धर्मवेड्यांनी पाकिस्तान निर्माण झालेला आहे, हे धर्मवेड तो सोडणार नाही. म्हणून आज ना उद्या आपल्या सर्वांना मिळून दुसरे महाभारत घडवावे लागेल.
 
 
महाभारतातील दुर्योधन, दु:शासन, शकुनी यांना विष्णूचा अवतार असलेला श्रीकृष्णही सुधारू शकला नाही. दुष्टपणा ही प्रवृत्ती असते. चंदनाचा गुणधर्म जसा सुगंध आहे, तसा दुर्जनांचा गुणधर्म हा देखील वाईट गुणांचा अवलंब करणे हा असतो. दुर्याधनाच्या दरबारात श्रीकृष्णाने आपले विराट रूप प्रकट केले. दुर्याधन, दु:शासन, शकुनीवर त्याचा शून्य परिणाम झाला. हीच गोष्ट पाकिस्तानी मनोवृत्तीची आहे. हीच गोष्ट या मनोवृत्तीचे समर्थन करणार्‍या सर्व राजनेत्यांची आहे. म्हणून प्रश्न फक्त एवढाच उरतो की, लोकशाहीत सर्वसत्ताधीश असणार्‍या प्रजेने असे पाकिस्तानी मनोवृत्तीचे समर्थन करणारे नेतृत्व किती दिवस आपल्या अंगाखांद्यावर मिरवायचे? याचा कठोर निर्णय करण्याची वेळ आता आली आहे, एवढे खरे.
 
 
Powered By Sangraha 9.0