भारतीय ज्ञानपरंपरा हे 2020 मध्ये आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणातील एक महत्त्वाचे अंग आहे. त्यात नेमकं काय आहे? त्याची दिशा नेमकी काय असायला हवी आणि त्यातून काय साध्य होऊ शकतं? हे आपण डॉ. भूषण पटवर्धन यांच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. डॉ. भूषण पटवर्धन हे शिक्षणतज्ज्ञ, बायोमेडिकल विषयातले शास्त्रज्ञ असून यू.जी.सी.चे माजी उपाध्यक्ष तसेच नॅकच्या कार्यकारी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या ते आयुष प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
जेव्हा 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची ओळख झाली, तेव्हा अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानपरंपरा आणण्यामागे काही उद्देश होता का?
जेव्हा नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या चर्चा सुरू होत्या, तेव्हा शिक्षणामध्ये आज कुठल्या प्रकारचे बदल व्हायला हवे यासंबंधी बोललं जायचं. म्हणजे नवीन धोरण हे भारताचं धोरण असायला हवं, असा उद्देश होता. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट असणार्या काही बाबी पूर्वीच्या धोरणांमध्येही होत्या. परंतु, त्यांची अंमलबजावणी झाली नाही. या संदर्भात चर्चा करताना सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे जुनी शिक्षणपद्धती ही ब्रिटिशकालीन प्रभावाखाली राबवली जात होती. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपलं विज्ञान याची माहिती अजूनही दिली जात नाही आणि त्यातून भारतीय ज्ञानपरंपरा अंमलात आणण्याचा विचार समोर आला. नवीन शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. कारण, बहुतांश वेळेला विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांची मानसिक जडणघडण तयार झालेली असते. मूलभूत शिक्षणापासूनच आपली संस्कृती, आपल्या परंपरा त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्या नसल्याकारणाने त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. त्याला ‘मोनोकल्चरल डॉमिनन्स’, तसंच ‘वेस्टर्न डॉमिनन्स’ असंही म्हटलं जातं. वेस्टर्न डॉमिनन्स म्हणजे कलोनिअल डॉमिनन्स म्हणजेच आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर कमी करण्याच्या दृष्टीने शिक्षणाची मांडणी केली गेली, असे वाटते आणि हे शैक्षणिक नुकसान पिढ्यान्पिढ्या चालत आलेले आहे. हे शिक्षणाने झालेलं नुकसान शिक्षणानेच भरून काढावं लागेल. त्यामुळेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ‘आय.के.एस.’चा समावेश केला. या निर्णयाला चांगला प्रतिसादही मिळाला. अर्थातच त्या निर्णयाला अपेक्षित असा विरोधही झाला. परंतु, एकमत घडवून आणण्यामध्ये डॉ. कस्तुरीरंगन यांच्यासारखे तज्ज्ञ असल्याकारणाने त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यामध्ये त्यांना यश आलं.
‘आय.के.एस.’च्या अंमलबजावणीला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा ‘आय.के.एस.’मध्ये ‘आय’ आणावा का असा प्रश्न उपस्थित झाला. आय.के.एस. म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टिम. ही इंडियन नॉलेज सिस्टीम पूर्वापार चालत आलेली आहे, पण सध्याच्या काळात आपण जेव्हा इंडिया म्हणतो तेव्हा लोकांच्या मनात स्वातंत्र्यानंतरच्या भारताची प्रतिमा उभी राहते. इंडिया ही संकल्पना ईस्ट इंडिया कंपनी तथा ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेली संकल्पना आहे. गुलामगिरी चालू राहावी अशा उद्देशाने आणलेली ती संकल्पना होती. पण ती इतकी प्रचलित आहे की आज ते नाव जर आपण बाजूला ठेवलं तर लोक त्याच्याशी जोडले जातील का, अशी एक शंका होती. त्यामुळे या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ‘आय.के.एस.’ मध्ये आय ठेवला गेला.
अभ्यासक्रमात आपल्याकडच्या प्राचीन विज्ञानाचा समावेश केला पाहिजे, तसा आणखी कोणत्या बाबींचा समावेश असावा असं वाटतं?
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आय.के.एस. हे संक्षिप्त रूपामध्ये शिकवू नये. अभ्यासक्रमातील कोणताही विषय असो त्यामध्ये आपल्या प्राचीन ज्ञानरूपांचा समावेश असायलाच हवा. मग तो विषय तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित असो किंवा उच्च शिक्षणामधले जीवशास्त्र, भौतिकशास्त्र असो. आज जगभरामध्ये पाणिनीचं भाषाशास्त्र वापरलं जातं, परंतु आपण विद्यार्थ्यांना पाणिनी कोण आहे हेच शिकवत नाही. तर दुसरीकडे माध्यमिक वयोगटातील मुलांना चॉम्स्कीविषयी शिकवलं जातं. त्याचं एक वेगळं स्थान आहेच, पण चॉम्स्कीला पाणिनीविषयी खूप आदर होता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. माझे स्नेही मोहनन एम.आय.टी.चे प्रोफेसर होते आणि चॉम्स्कीचे विद्यार्थी होते. ‘आयसर’नी त्यांना बोलावलं म्हणून ते भारतात आले. त्यांनी सांगितलं की, त्यांना भारतामध्ये पाणिनीवर आधारित असलेला अभ्यासक्रम पाहिजे होता. त्यासाठी भारतातील प्रत्येक विद्यापीठामध्ये त्यांनी संपर्क साधला. परंतु त्यांना पाणिनीविषयीचा सर्वोत्तम अभ्यासक्रम फक्त एम.आय.टी.मध्ये शिकवला जातो असे लक्षात आले. परिणामी, शालेय अभ्यासक्रमामध्ये तर पाणिनीचा उल्लेख असायलाच हवा. परंतु एम.ए.सारख्या अभ्यासक्रमांमध्ये पाणिनीच्या भाषाशास्त्राचा समावेश करायला हवा. दुसरं उदाहरण म्हणजे पतंजलीचं. आपण आपल्या मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये पतंजलीचा उल्लेखच करत नाही आहोत. आधुनिक मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये पतंजलीचा अंतर्भाव केला नाही तर ती अपुरी आहे. पतंजलीची प्रगल्भता आधुनिक अभ्यासक्रमामध्ये दिसून येत नाही. त्याचा अंतर्भाव करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला ‘आय.के.एस.’चा अंतर्भाव करावा लागेल, तरच आपण आपले प्राचीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो.
अभ्यासक्रमाच्या बरोबरीने इतर कोणत्या माध्यमातून भारतीय ज्ञानपरंपरा जोपासली पाहिजे?
हे करताना आपल्याला दोन्ही दिशेने काम केलं पाहिजे. तातडीने आपल्याला बालवर्गापासून याची सुरुवात करायला लागेल. मग त्या वयोगटाला कोणत्या प्रकारचं शिक्षण आपल्याला देता येईल याची मॉडेल्स तयार केली पाहिजेत. त्याच्या काही मॉडेल्सवर काम करणं मी सुरू केलं आहे. एम.के. श्रीधर यांच्याशी बोलून मी त्यामध्ये जे बदल अपेक्षित आहेत तेही करतो आहे. इयत्ता 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांसमोर कशा पद्धतीने ही मॉडेल्स सादर करता येतील, याचा विचार करावा लागेल. त्यानंतर इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना निरीक्षणे, प्रयोगशीलता अशा तत्त्वांवर काय देता येईल, याचाही विचार सुरू आहे. शालेय पातळीवर हा अभ्यासक्रम शिकवून पुढे त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी ही महाविद्यालयीन शिक्षणावर असेल. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणावरही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. माझ्या दृष्टीने आज महाविद्यालयीन शिक्षणामध्ये ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ या विषयावरती स्पेशलायझेशन सुरू करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ‘बी.ए. इन आय.के.एस.’ असा अभ्यासक्रम अजूनही आपल्याकडे सुरू झालेला नाही. ‘बी.ए. इन आय.के.एस.’ म्हणताना विद्यार्थ्यांना आपण फक्त वेद आणि संस्कृत नाही शिकवणार. त्याला आधुनिक विज्ञान तसंच परकीय भाषांचा अभ्यासही आपण शिकवायला हवा. असा भारतीय विचारधारेवर आधारित अभ्यासक्रम शिकून जो विद्यार्थी तयार होईल तो खर्या अर्थाने ग्लोबल सिटिझन असेल. जसं डिफेन्सच्या मुशीतून जो विद्यार्थी तयार होतो तो कुठेही जाऊन उभा राहू शकतो, कुठल्याही वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो तसाच ‘आय.के.एस.’च्या अभ्यासक्रम शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी कोणत्याही विषयावर प्रावीण्य मिळवू शकतो.
मध्यंतरी सगळी पुस्तकं जी आहेत ती त्या त्या प्रदेशातल्या बोलीभाषांमधली असावीत, असा एक मतप्रवाह होता, तर विविध प्रदेशांमधल्या बोलीभाषेचा, वातावरणाचा, प्रथा-परंपरा तसंच काही समजुती असतील तर त्याचा समावेश आपल्याला यामध्ये करता येईल का?
...अर्थातच करता येतो. म्हणजे बोलीभाषेपेक्षा मी म्हणेन मातृभाषा. जी कोणती मातृभाषा असेल त्या भाषेमधून शिक्षण देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. त्यामध्ये अडचणी येणार असल्या तरीही त्या सोडवणं अशक्य आहेत असं मी म्हणणार नाही. मला नुकतंच असं कळलं की, अनेक महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम हा प्रादेशिक बोलीभाषांमध्ये शिकवायला सुरुवात झालेलीच आहे. म्हणजे इंजिनिअर होण्यासाठी इंग्लिश भाषा यायलाच हवी असं नाही ना... तसंच इंग्लिश भाषेमधून शिकूनच डॉक्टर व्हायला हवं असा हट्ट का आहे? जर डॉक्टरकीचं ज्ञान बोलीभाषेतून दिलं तरीही तो चांगला डॉक्टर होणारच ना. उलट ते डॉक्टर्स त्यांच्याच गावात राहून तिथेच सेवा देऊ शकतील, ही त्यातली सकारात्मक बाब आहे. तिथल्या लोकांशी त्यांचा कनेक्ट अजून दृढ होईल. जगामध्ये 16 देश असे आहेत जिथे मेडिकलचा अभ्यासक्रम हा तिथल्या भाषेमध्ये शिकवला जातो. मग आपल्याकडे का नाही होऊ शकत. कारण, आपल्या मनावर असं बिंबवलं गेलं आहे की इंग्लिशशिवाय आपलं काहीच चालू शकत नाही. परंतु, वस्तुस्थिती अशी नाही. याचंच उदाहरण म्हणजे आता आपण ए.आय. तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करू शकतो. कारण, आजच्या घडीला कोणत्याही साहित्याचं भाषांतर ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही.
दुसरीकडे परंपरांबाबत मानववंशशास्त्रज्ञांकडून आम्ही जे शिकलो त्यावरून मी असं म्हणेन की वैदिक, बुद्धीस्ट किंवा जैन या ग्रेट ट्रेडिशन असं जर आपण म्हणालो तर त्या त्या भागांमधल्या ज्या प्रथा आहेत त्या आहेत. म्हणजे परंपरागत वैदू आणि वैद्य यांच्यामध्ये एक समान धागा आहे आणि त्यांच्यामध्ये ज्ञानाचं आदानप्रदानही होत असतं. यामध्ये कमी दर्जाचं आणि उच्च दर्जाचं असं काही नाही. त्यामुळे स्थानिक संस्कृती, स्थानिक परंपरांना मान देऊन, त्यांचा अंतर्भाव ठेवून हे सगळे अभ्यासक्रम तिथे राबवता येऊ शकतात. 80 टक्के अभ्यासक्रम हा सार्वजनिक पद्धतीचा ठेवायला हवा तर 20 टक्के अभ्यासक्रम स्थानिकीकृत करायला हवा. उलट त्या त्या लोकपरंपरांमधून काही भाग घेऊन पहिल्या 80 टक्के भागामध्ये घेता येईल. हे आदानप्रदान चालू राहायला पाहिजे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर, चरक हे आयुर्वेदामधले क्रांतिकारी चिकित्सक म्हणून ओळखले जातात. ते वैद्यांना सांगायचे की, तुम्हाला एखाद्या वनस्पतीबद्दल काही शंका आली तर सरळ जाऊन मेंढपाळाला विचारा. ही आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे, जी आपण नष्ट करून टाकली आहे. तर मी परत मागील मुद्द्याशी जोडून असं सांगेन की, मेकॉले हा अतिशय बुद्धिमान माणूस होता. त्याला निश्चित माहीत होतं हा देश तोडायचा तर काय करायचं. यांचा आत्मविश्वास घालवला पाहिजे, यांची संस्कृती मोडायला पाहिजे, यांच्या भाषा संपवायला पाहिजेत.
दोन पद्धतीची जीवनसूत्रे आपल्याकडे आहेत. एक भारतीय आणि एक जागतिक. या दोन्ही सूत्रांमध्ये समन्वय कसा साधू शकतो?
त्याचा बदल हा शिक्षणामधूनच व्हायला हवा. एक उदाहरण सांगतो. आम्ही एक छोटी कार्यशाळा घेतली. आम्ही कार्यशाळा का घेतली? तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यापीठांना असं सांगितलं गेलंय की, विद्यापीठाकडून समाजासोबतची नाळ परत एकदा जोडायला हवी. तर आम्ही असा विचार केला की, आपण इथे आयुर्वेदावर संशोधन करतो तर हे बाहेर कसं नेता येईल. तर इथे शिक्षकांसाठी एक छोटी कार्यशाळा घेतली. कारण मुळात शिक्षकांना प्रशिक्षित केलं तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील. तर त्यासाठी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं स्वास्थ्य कसं राखाल, असं सांगणारा तो विषय होता. पूर्वी याचं शिक्षण घरातूनच व्हायचं. हा सगळा आपल्या संस्कृतीचा भाग होता. जो आपण विसरलो आहोत. तर त्या कार्यशाळेमध्ये आपल्या परिसरातील औषधी वनस्पती कशा ओळखायच्या, घरातील साधनांचा वापर करून स्वास्थ्य कसं राखू शकता, कोणत्या ऋतूमध्ये काय खावं, याची एक पुस्तिका तयार केली. तो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही केला. कार्यशाळेसाठी आलेल्या 14 पैकी 7 शिक्षकांनी त्या प्रकल्पाची अंमलबजावणी देखील केली. तर असे प्रयोग छोटे असले तरी त्यातल्या सहभागींची संख्या मोठी असायला हवी. तर मी शासनाला असं सांगू इच्छितो की ‘आय.के.एस.’बाबत जागरूकता आता झालेली आहे. आता प्रत्यक्ष कामाला लागण्याची गरज आहे.
एन.सी.ई.आर.टी. त्यांच्या पद्धतीने अभ्यासक्रम राबवते आहे, पण आपल्या प्रत्येक शाळांमध्ये, प्रत्येक विद्यापीठांमध्ये आपण काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आठवड्यातले दोन तास अशा वेगवेगळ्या विषयांची ओळख करून देणारी सत्रे आयोजित केली पाहिजेत. अभ्यासक्रमाचा भाग अशासाठी की विद्यार्थ्यांना त्यांचं क्रेडीट मिळालं पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार करायला पाहिजे. त्यांचं काळजीपूर्वक प्रशिक्षण आपण केलं पाहिजे.
भारतीय ज्ञान परंपरा हा येत्या काळात भारतीय शिक्षण प्रणालीतला महत्त्वाचा घटक ठरणार आहे. या घटकाकडे शासन, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण आणि एकंदर शैक्षणिक परिसंस्थेने गांभीर्याने पाहण्याचे गरज निर्माण झालेली आहे, असं भूषण पटवर्धन यांच्या या मुलाखतीचं सूत्र म्हणता येईल.