श्री रामसिद्धीविनायक अर्थात पुष्टिपति गणेशाचा जन्मोत्सव हा वार्षिकोत्सव वैशाख शुद्ध द्वादशी ते वैशाख वैद्य प्रतिपदा असा पाच दिवस अलिबाग येथे श्री क्षेत्र कनकेश्वर या पावन स्थळी नुकताच साजरा झाला. श्री रामसिद्धीविनायक देवस्थान पुढील वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. असा या दीर्घ परंपरा लाभलेल्या देवस्थानाचा संक्षिप्त परिचय.
’या वर्षीच्या उत्सवाला कोणतीही सबब न सांगता यायचं आहे!’ असे हे आग्रहाचे निमंत्रण सहा-एक महिन्यांपूर्वीच सा. विवेकचे हितचिंतक श्रीराम बापट यांनी दिले होते. त्याचबरोबर वरचेवर या निमंत्रणाची उजळणी होतच होती. मात्र जाण्याची तारीख ठरली त्याच दिवशी नेमके महत्त्वाचे काम आले आणि जाण्याचे रद्द झाले. ते काम आटोपून येण्यास उशीर झाला होताच, परंतु उद्या अलिबागला जायचंच हेही ठरवलं होतंच. पहिल्यांदाच जाणार असल्यामुळे थोडीफार माहिती घेतली होती.
त्यासाठी सकाळीच गेटवेवरून मांडवा (अलिबाग) बंदरावर जाणारी बोट पकडली. तासा-सव्वा तासात बंदरावर उतरून त्यांच्याच बसने चोंढी गावी गेले. तिथून रिक्षा घेतली ती मापगांवपर्यंत. रिक्षा कनकेश्वराच्या पायथ्याशी थांबली. तोपर्यंत सकाळचे दहा वाजले होते. रविराज डोईवर येण्याच्या तयारीतच होते, नेहमीपेक्षा ताप जास्त असणार हे गृहितच होते, महिनादेखील कडकडीत उन्हाचा; अर्थात मे महिना. आता आपला खरा प्रवास सुरू होणार, याने जरा धडकीच भरली होती. कारणही तसेच होते, पावलागणिक बस-रिक्षा-टॅक्सी-भरीस भर ओला-उबर अशा सगळ्या सुखकर प्रवासाची सवय असलेल्या मला डोंगराच्या 650 च्या वर पायर्या चढायच्या होत्या. अर्थात वर पोचून प्राचीन शंकर मंदिर, गणेश मंदिरासोबतच डोंगरशिखरावरून दिसणारा अथांग समुद्र, टुमदार गावे, आणि शेजारीच असलेल्या मुंबईचे दर्शन घेण्याचीही उत्सुकता होती.
श्री लंबोदरानंद स्वामी
दरमजल करत करत एकेक पायरी सर होत होती. आदल्या दिवशीच्या प्रवासाचा शीण उतरलेला नव्हताच, त्यामुळे कुठे कुठे तर पाऊल कसेबसे पुढे सरकत होते. रखरखत्या उन्हाचा तडाखा चढता चढता जाणवत होता. मध्येच कुठेतरी गडद झाडी निसर्गाशी असलेले तादात्म्य दर्शन देऊन सुखावत होती. कडक उन्हात इतकं आल्हाददायक कनकेश्वर हंगामात (पावसाळा आणि हिवाळा) निसर्गाच्या छटांचं मनमोहक दर्शन देत असेल हे जाणवलं. सोबतीला वानरराज कधी तुरळक तर कधी टोळीने साथ देत होते. कधी एकदा मंदिर दिसतंय असं वाटत होतं, पण दिसण्याचं काही लक्षण नव्हतं. तास-सव्वा तासाने चढण चढून गेल्यावर थोडी उतरंड उतरून मंदिराच्या आवारात पोहचले.
परिसर पाहताक्षणीच थकवा विरून गेला. स्वागताला मोठाली पुष्करणी सज्ज होती, पाहूनच शीतलता जाणवू लागली. तिथे थोडा विसावा घेतला आणि ज्या उत्सवासाठी आलो, त्या पुष्टिपति गणेश मंदिराकडे निघाले. खर्या अर्थाने निसर्गाच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र कनकेश्वराचा परिसर भेट द्यावी असाच आहे.
पुष्टिपति मंदिरात गेल्यावर समजलं की त्या दिवशी (दि. 12 मे 2025 रोजी) पुष्टिपति गणरायाचा जन्मोत्सव आहे. दैवी योजना आणखी काय असावी! कामानिमित्त आदल्या दिवशी येण्याचे रद्द होऊन नेमका जन्मोत्सवाचा दिवसच नक्की होणे, याचा मनस्वी आनंद झाला.
ओळखीपाळखी होतच होत्या, मंदिरात कीर्तन सुरू होते, कीर्तनकार होते प्रणव गोखले. त्यांच्या मधुरवाणीतील कीर्तन ऐकण्यास मंदिरात बसलोे असता कीर्तनातून पुष्टिपति गणरायाची रंजक जन्मकथा सांगितली. कीर्तन झाले, षोडशोपचार मानस आणि पार्थिव पूजा झाली, प्रत्यक्ष जन्मोत्सवाचा पाळणा पाहता आला. प्रसाद भोजनही झाले.
आता उत्सुकता होती इतक्या निर्जन आणि दुर्गम स्थळी पुष्टिपति गणरायाची स्थापना कशी झाली याची. मंदिराच्या छोटेखानी कार्यालयात बसून गप्पांच्या ओघात अनेक गोष्टी उलगडत गेल्या. बोरूने लिहिलेलं एक हस्तलिखित दाखवण्यात आलं. हे हस्तलिखित म्हणजे या देवस्थानची नियम पुस्तिका. ही पुस्तिका लिहिली ते श्री क्षेत्री गणरायाची स्थापना करणारे श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मीभूत श्री लंबोदरानंद स्वामी यांनी.
श्री लंबोदरानंद स्वामींनी ज्येष्ठ वद्य 4 शालिवाहन शके 1798 (जून 1876) स्थापित केलेली गणेशमूर्तीही मनमोहक अशीच आहे. सिद्धीबुद्धिलक्षलाभासहित असलेली ही मूर्ती संगमरवराची आहे. सिंहासनही साजेसेच आहे. ही गणेशमूर्ती बडोद्याचे नवकोट नारायण गोपाळराव मैराळ यांच्यामार्फत कनेकश्वरी आणली गेली. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक देवतांच्या मूर्ती आणि लंबोदरानंद स्वामींचे समाधीस्थळदेखील आहे. भक्तमंडळींसाठी निवासाची व्यवस्था, स्वयंपाकासाठी प्रशस्त दोन खोल्या, मधुर पाणी देणारी देवस्थानाची विहीर, असा हा परिसर आहे.
श्री लंबोदरानंद स्वामी संन्यस्त वृत्तीचे असले तरी व्यवहारदक्ष होते. जगाच्या व्यवहाराचे त्यांना सम्यक ज्ञान होते. रूढार्थाने स्वत:चा संसार केला नसला तरी प्रपंचाच्या संसाराची मेख ते जाणून होते. श्री रामसिद्धीविनायक देवस्थानाचे व्यवहार चोखपणे चालावेत या दृष्टीने त्यांनी संस्थेकरिता ‘नियमपुस्तिका’ तयार केली. त्यानुसार व्यवहार व्हावेत, यासाठी देवस्थानाविषयी नितांत श्रद्धा असणार्या व्यक्तींचे विश्वस्त मंडळ स्वामींनी स्वतः नेमले. देवस्थानाचा सहा वर्षे स्वतः कारभार करून विश्वस्त मंडळाला वस्तुपाठ घालून दिला. नियमपुस्तिकेवरून ओझरती नजर फिरवली तरी लक्षात येते, ती स्वामींची व्यवहारकुशलता आणि पारदर्शकता. ही पुस्तिका म्हणजे मार्गदर्शक पाथेयच म्हणावे लागेल. देवस्थानाचे पुढील वर्ष हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. देवस्थान दीर्घकाळ निर्विघ्नपणे मार्गक्रमण करीत आहे ते केवळ स्वामींच्या दूरदृष्टीचे फलित होय.
देवस्थानाच्या विश्वस्त मंडळात रामचंद्र विष्णू बापट; सातघर, भास्कर पांडुरंग दातार; किहीम, सदाशिव गणेश जोशी; सातघर, मोरो रामचंद्र देवल; झालखंड, गोविंद महादेव सहस्रबुद्धे; कनकेश्वर, बाबाभटजी वैशंपायन; कनकेश्वर, महादेव भिकाजी पिंपुटकर; उंबरगाव या विभूती होत्या. श्री लंबोदरानंद स्वामींच्या मार्गदर्शनाने आणि या विभूतींच्या परिश्रमाने श्री रामसिद्धीविनायक निर्जन स्थळी स्थापित करणे शक्य झाले. या विश्वस्त मंडळीपैकी रामचंद्र बापट हे सा. विवेकचे हितचिंतक श्रीराम बापट यांचे खापरपणजोबा. स्वामींच्या गणेश उपासनेने आणि आध्यात्मिक प्रभावामुळे पंचक्रोशीतील लोकदेखील कनकेश्वर स्थापित श्री रामसिद्धीविनायक मंदिराकडे भक्तिभावाने येऊ लागले. दिवसेंदिवस देवस्थानाची प्रचिती वाढू लागली.
कुठलेही दळवळणाचे साधन नसताना पायपीट करीत भक्त कनेकश्वराचा डोंगर चढून अजूनही येतात. अद्ययावत यंत्रणेच्या काळात डोंगर चढून गणरायाचे दर्शन घेणे ही साधना आहे, हाच भाव तेथील आलेल्या प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहर्यावर दिसत होता. श्री पुष्टिपति जन्मोत्सव हा देवस्थानाचा वार्षिकोत्सव असतो.
यंदा वार्षिकोत्सवानिमित्त वैशाख शुद्ध द्वादशी ते वैशाख वैद्य प्रतिपदा असा पाच दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. पौर्णिमेस पुष्टिपति गणरायाचा जन्मोत्सवाचा दिवस उत्सवाचे शिखर म्हणावा असाच होता. उत्सवादरम्यान असलेली दैनंदिनीही उसंत नसलेली. त्याचा क्रम अशा प्रकारे; पहाटे 4 वाजता काकडआरती, देवाचा पोशाख, द्वारयात्रा, भोजन, प्रवचन, मंत्रपुष्प, कीर्तन रात्री 11 वाजता शेजारतीने सांगता. जन्मोत्सवादिवशी कीर्तन मात्र दुपारी होते आणि रात्री पुष्टिपति गणरायाची पालखी मोठ्या उत्साहात निघते. शेवटच्या दिवशीचा क्रम; काकडआरती, आवरण पूजा, सहस्र मोदक हवन, प्रसाद भोजन, प्रवचन, मंत्रपुष्प, लळित, कीर्तन. रोज संध्याकाळी श्री रामसिद्धीविनायकाची दृष्टदेखील काढली जाते.
लेखात वर उल्लेख केलेल्या विश्वस्त मंडळापैकी काही मंडळींचे वारसदार या उत्सवास आवर्जून येत असतात. नाही म्हटलं तरी जन्मोत्सवाच्या दिवशी शंभरच्या वर लोक दर्शनास येतात. प्रत्येकास भोजनाचा प्रसाद असतो. कुठलेही साधन नसताना चढण चढणेच एक कसरत असताना एवढ्या भक्तांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे याची आपण केवळ कल्पना करू शकतो. यासाठीचे नियोजन काही महिने आधीपासूनच केलेले असते, म्हणून हा वार्षिकोत्सव असो की अन्य वर्षभरात होणारे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतात. गणेशकृपा आणि श्री लंबोदरानंद स्वामींची कृपादृष्टी यामुळेच कार्य निर्विघ्नपणे पार पडते असा विश्वास विश्वस्तांना आहे, हे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवलेे.