तुर्की, अझरबैजान आणि बांगलादेश या देशांना अडचणीच्या वेळी कोणताही भेदभाव न करता मानवतेच्या शुद्ध भूमिकेतून भारताने नेहमीच तात्काळ आणि सर्वप्रकारची मदत पुरवली आहे. एवढे करूनही भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीदरम्यान तुर्की आणि अझरबैजान हे देश सैनिकी आयुधांसह पाकिस्तानच्या मदतीस सज्ज झाले. बांगलादेशही काहीतरी कुरघोड्या करीतच असते. यावरून एवढे नक्की की, ही कृतघ्न राष्ट्रे आहेत.
‘ज्या दोन देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करतात, ते दोन देश परस्परांचे नैसर्गिक शत्रू असतात’, असे एक वचन आहे. सीमा या परमेश्वरनिर्मित नसून त्या मानवनिर्मित, परंपरेने चालत आलेल्या व ज्याच्या मनगटात जोर त्याच्या म्हणण्यानुसार बदलणार्या असतात. तुर्कीये (क्षेत्रफळ 783562 चौ.कि.मी. म्हणजे उत्तर प्रदेशच्या तिपटीपेक्षा थोडा मोठा, लोकसंख्या 8.6 कोटी); अझरबैजान (क्षेत्रफळ 86600 चौ.कि.मी. म्हणजे पश्चिम बंगालपेक्षा थोडा लहान व लोकसंख्या 1 कोटी); बांगलादेश (क्षेत्रफळ 148,460 चौ.कि.मी. म्हणजे ओरिसापेक्षा थोडा लहान व लोकसंख्या 16 कोटी) असा तपशील आहे. बांगलादेश वगळला तर इतर दोन देशांच्या सीमा भारताच्या सीमेला लागून नाहीत. त्यामुळे या देशांचे भारताशी शत्रुत्वसम संबंध निर्माण होण्याचे कारण नव्हते. बांगलादेशात बंड झाले नसते तर शेख हसीना यांच्या आधिपत्याखालील बांगलादेश भारताशी कृतज्ञभाव ठेवूनच आजही दिसला असता. भारत आणि मुक्तिवाहिनी यांनी पाकिस्तानच्या कचाट्यातून मुक्त केलेल्या बांगलादेशाची 17 कोटीच्या जवळपास असलेली लोकसंख्या बहुतांशी इस्लामधर्मीय होती/आहे. पाकिस्तानही इस्लामधर्मीय राष्ट्र आहे. बांगलादेशाला त्याच्यापासूनच मुक्ती हवी होती. धर्म एक असूनही पंजाबींचे वर्चस्व असलेल्या पाकिस्तानच्या एका भागाने पूर्व पाकिस्तानातील बांगलाभाषी लोकांची अक्षरश: ससेहोलपट केली. इस्लामधर्मीय पण बांगलाभाषींना निम्नस्तराचे म्हणून मानत आणि वागवत. भारताच्या साह्याने मुक्त झालेला बांगलादेश काही कालखंड वगळला तर भारताशी कृतज्ञभाव बाळगूनच वावरला. गेल्या 50 वर्षात त्याने साध्य केलेली प्रगती काहींच्या मते नेत्रदापक नसेलही पण ती आश्वासक आणि अपेक्षा वाढविणारी नक्कीच होती आणि भारताला आपले परिश्रम सार्थकी लागल्याचे समाधान देणारी तर होतीच होती. शेख हसीना यांच्या विरोधातील बंडखोरांना कोणी मदत केली, सत्तापालट करण्यात कोणती परकीय राष्ट्रे सहभागी होती, देशांतर्गतही दुही कशी माजली होती, तिच्या मुळाशी शेख हसीना यांचे काही निर्णयही कसे कारणीभूत ठरले हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण बांगलादेशात सध्या पाकधार्जिणा गट सत्तेवर असून पाकिस्तानप्रमाणेच तोही हिंदूविरोधी व भारतविरोधी कारवाया करू लागला आहे. पण शेख हसीना यांना मानणारा एक मोठा गट आजही बांगलादेशात आहे. भविष्यात बांगलादेशात ठरल्याप्रमाणे निवडणुका झाल्या तर त्यायोगे जनमताचा अंदाज येऊ शकेल.
तुर्कीयेचे आणि अझरबैजानचे असे नाही. या भागात गेल्या काही वर्षांत भूकंपाचे पाच रिश्टरपेक्षा अधिक तीव्रतेचे धक्के जाणवले नव्हते. काही वर्षांपूर्वी भूकंपाचा एक मोठ्या तीव्रतेचा धक्का बसला होता. या भूकंपामुळे इमारती मोठ्या प्रमाणात पडल्या. त्यात हजारो लोक ढिगार्यात दबून मेले आणि कितीतरी जखमी झाले. इमारतींच्या खाली ढिगार्यात माणसे दबल्यामुळे बचावकार्य अवघड आणि वेळखाऊ झाले होते. सर्वत्र दुर्गंध पसरला होता. भूकंपानंतर तुर्कीये आणि अझरबैजान यांना आणि अन्यांनाही भारतासह संपूर्ण जगभरातून तत्परतेने मदत मिळाली. या भागातील भूकंपाची माहिती मिळताच भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ आयोजित करून तिथे तातडीने सैन्यदलाची वैद्यकीय चमू रवाना केली. हा तोच तुर्कीये आहे की जो काश्मीरप्रश्नी पाकिस्तानची सतत कड घेत असे! पण तिकडे दुर्लक्ष करीत भारताने नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फोर्स (एनडीआरएफ) च्या तुकड्या आणि वैद्यकीय मदत पाठवली. याशिवाय क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट टीम, ऑर्थोपियाडिक सर्जिकल टीम, जनरल सर्जिकल टीम, मेडिकल स्पेशालिस्ट टीम आणि इतर मेडिकल टीम्स पाठविल्या. नोंद घ्यावी अशी बाब ही आहे की, या सर्वांना नेणार्या विमानांना तुर्कीयेचा दोस्त असलेल्या पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून पुढे जाऊ दिले नाही. भारताची मदत तर पाकिस्तानच्या मित्राला म्हणजे तुर्कीयेला होत होती तरीही! असा व्यवहार पाकिस्ताननेच करावा!! त्यामुळे पाकिस्तानला वळसा घालूनच भारतीय विमानांना तुर्कीयेच्या हद्दीत दाखल होणे शक्य झाले!!!.
भारताने अशा प्रकारे तात्काळ आणि सर्व प्रकारची मदत पुरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुर्की, अझरबैजान आणि सीरिया यांसारख्या इतर अनेक देशांनाही भारताने मदत केली आहे. अडचणीच्या वेळी कोणताही भेदभाव न करता मानवतेच्या शुद्ध भूमिकेतून मदत करणारा देश अशी भारताची प्रतिमा जगात निर्माण झाली आहे. कोविडची लस पुरविणे किंवा औषधे पाठविणे ही तर आत्ताची उदाहरणे आहेत.
तुर्कीयेतील आणि अझरबैजानमधील प्रलयंकारी भूकंपातील बळींची संख्या कित्येक हजारांवर गेली होती. हजारो नागरिक बेपत्ता होते, तर हजारोंवर जखमी उपचार घेत होते. भारतीय मदत चमूतील घटकांनी कर्तव्यभावनेने मदतकार्यात स्वत:ला झोकून दिले होते. तुर्कीयेचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांनी आणि अझरबैजानचे राजदूत एलचीन हुसेयनली यांनी मदतीबद्दल तेव्हा भारताचे आभार मानले होते. ‘गरजेच्या वेळी मित्रच धावून येतो,’ या शब्दांत त्यांनी तेव्हा भारताचे आभार मानले होते. खर्या मित्राची या निमित्ताने या दोन देशांना झालेली ओळख पुढेही कायम राहील, असे वाटत होते. कठीण समय येता कामास आले होते ‘ऑपरेशन दोस्त’! पण सिंदूर ऑपरेशन सुरू होताच तुर्कीयेचे अध्यक्ष एद्रोगन आणि अझरबैजानचे दीर्घकालापासून अध्यक्ष असलेले इल्हाम हैदर ओग्लु अलियेव हे सर्व सैनिकी आयुधांसह पाकिस्तानच्या मदतीला धावून गेले. भूकंपाच्या निमित्ताने भारताने केलेली औषधांची व उपकरणांची मदत, वैद्यकीय चमूंची निरपेक्ष आणि निरलस आरोग्यसेवा मातीमोल झाली. ही कृतघ्नतेची कमाल म्हटली पाहिजे. यानंतर या दोन देशांशी संबंधविच्छेद करण्यावाचून भारताच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि व्यापारी जगतासमोर दुसरा पर्याय उरला नाही. याचा परिणाम असा की, तुर्कीयेचे 200 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होणार आहे.
पर्यटन हा तुर्कीयेचा मुख्य व्यवसाय आहे. गेल्या वर्षी एकूण पर्यटकांच्या तुलनेत भारतीय पर्यटकांचे प्रमाण 2% होते. 291.6 मिलियन डॉलर एवढी आर्थिक उलाढाल या व्यवसायातून भारतीय पर्यटकांमुळे झाली आहे. एकूण आर्थिक उलाढालीच्या तुलनेत हे प्रमाण 0.48% इतके आहे. तुर्कीयेची फळेही भारतीय बाजारात यापुढे फारशी दिसणार नाहीत. यामुळे तुर्कीये तसेच अझरबैजान यांचे आज फारसे बिघडणार नसले तरी यावरील बहिष्कारामुळे एक प्रचंड मोठी बाजारपेठ या दोन देशांसाठी नेहमीकरता बंद होईल. तसेच भारताच्या बहिष्काराचा जगातील इतर देशांच्या प्रतिसादावरही होणारा परिणाम दुर्लक्षिण्यासारखा असणार नाही.
भारताने तुर्कीयेला मदत केल्याचे एक उदाहरण तर खूप जुने आहे. तेव्हा काँग्रेसने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली तुर्कीयेमधील खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. असा पाठिंबा देणे योग्य होते किंवा कसे, याची चर्चा या लेखात करण्याची आवश्यकता नाही. पण तुर्कीयेला या घटनेचा विसर पडला हे महत्त्वाचे आहे.
पुढे प्रगतीपथावरील तुर्कीयेत घड्याळाचे काटे उलटे फिरले. कारण रेसिप एद्रोगन नावाचा एक सनातनी, धर्मपिसाट आणि माथेफिरू आता तुर्कीयेवर राज्य करतो आहे. प्रगत विचाराची, शांततावादी, भारतस्नेही जनता धर्मांध व क्रूरकर्मा रेसिप एद्रोगन यांच्या जुलमी राजवटीत पिचली जात आहे. तुर्कीयेत बरीचशी स्थिरपद झालेली ही जुलमी राजवट लोकशाही मार्गाने या अवस्थेप्रत पोचली आहे, हा या देशाचा केवढा दैवदुर्विलास?
आजचा तुर्कीये हा ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) या 57 मुस्लीम देशांच्या संघटनेचा एक सदस्य आहे. इस्लामिक जगताचा आवाज बुलंद करून इस्लामी जनतेच्या हितसंबंधांची जपणूक करताना जागतिक शांतता व सुव्यवस्था यांनाही हातभार लावण्याचे लिखित उद्दिष्ट समोर ठेवून ही संघटना 1969 पासून कार्यरत आहे. इतर अनेक देशात नाहीत एवढे इस्लामधर्मी भारतात राहतात म्हणून आपल्यालाही या संघटनेचे सदस्य करून घ्यावे, असा भारताचा प्रयत्न आहे. या संघटनेतील अनेक देश भारताच्या या संघटनेतील प्रवेशाला अनुकूल आहेत. पण तुर्कीयेची चाल भारताच्या संबंधात नेहमीच विरोधी राहिलेली आहे. तुर्कीये एनएसजीचाही (न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप) सदस्य आहे. ही आण्विक उपकरणांच्या निर्यातदार देशांची संघटना आहे. अण्वस्त्रे निर्माण करता येतील अशी खनिजे, यंत्रसामग्री व तंत्रज्ञान यांच्या निर्यातीवर या संघटनेचे नियंत्रण असते. भारताने 1974 साली पहिला अणुस्फोट केला व 1975 साली ही संघटना स्थापन झाली. अण्वस्त्रांचा आणखी प्रसार होऊ नये, असा या संघटनेचा एक प्रमुख उद्देश आहे. आजमितीला या संघटनेचे 48 सदस्य आहेत. यापैकी प्रामुख्याने चीन, न्यूझिलंड, आयर्लंड, तुर्कीये व ऑस्ट्रिया या राष्ट्रांचा भारताला या संघटनेचा सदस्य करून घेण्यास विरोध आहे. चीन वगळता बाकीच्या देशांचे जागतिक संदर्भात फारसे महत्त्व नाही. पण प्रवेशाच्या चाव्या त्यांच्याही हाती आहेत ना! त्यामुळे त्यांना प्रवेशासाठी अनुकूल करून घेण्याचा भारताचा प्रयत्न चालू असतो. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, रशिया या बड्या मंडळींची भारताला सदस्यत्व देण्यास अनुकूलता आहे. पण चीन, न्यूझिलंड, आयर्लंड, तुर्कीये व ऑस्ट्रिया यांच्या विरोधामुळे भारताचा प्रवेश अडला आहे. सगळ्यांचीच संमती हवी अशी मानभावीपणाची भूमिका घेऊन व भारत पुरेसा जबाबदार देश नाही, असे म्हणत चीनचा भारताच्या प्रवेशाला विरोध आहे. तुर्कीयेची भूमिका तर आजवर भारताविरुद्ध पाकिस्तानला सर्वच बाबतीत पाठिंबा देण्याची राहिलेली आहे. भारताला जर सदस्यत्व द्यायचे झाले तर पाकिस्तानला का नको? तुर्कीयेची ही भूमिका इतर अनेकांना (त्यात भारतही आला) मान्य नाही. कारण जग पाकिस्तानला जबाबदार देश मानत नाही. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे चीन व तुर्कीये वगळता इतर सर्व देश भारताच्या प्रवेशाला अनुकूल झाले आहेत.
तुर्कीयेचे अध्यक्ष रेसिप एद्रोगन यांनी काश्मीरबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे ते असे की, काश्मीरप्रश्नी बहुराष्ट्रीय चर्चा व्हावी. सिमला करारानुसार काश्मीरचा प्रश्न फक्त भारत व पाकिस्तान यांनीच आपापसात चर्चा करून सोडवावा, असे ठरले असून सर्व बड्या राष्ट्रांना ही भूमिका मान्य आहे. पण बहुपक्षीय चर्चेचे पिल्लू सोडून रेसिप एद्रोगन यांनी पाकिस्तानला अनुकूल भूमिका जाहीरपणे मांडली आहे. यावर टिप्पणी करण्याची आवश्यकता नसावी.
तुर्कीयेमध्ये एमरम इमामोग्लू (वय वर्ष 54) या नावाचे एक नेते पर्यायी नेते म्हणून समोर येण्यास प्रारंभ झाला आहे. या भारतस्नेही नेत्याने भरपूर परिश्रम आणि वैध प्रचार करून तुर्कीयेतील सर्वांत मोठ्या आणि प्रसिद्ध इस्तंबूल शहराचे महापौरपद प्राप्त केले. त्यांच्या नेतृत्वाचे दुसरे वैशिष्ट्य हे की, त्यांच्या नेतृत्वात सीएचपीने तुर्कस्तानमधील 36 प्रांतातील स्थानिक निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केले. या निमित्ताने इमामोग्लू यांच्या सीएचपीने एद्रोगन यांच्या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्षाचा (एकेपी) सर्व महत्त्वाच्या मतदारसंघात निर्णायक पराभव केला आहे. निवडणुका झाल्यास आणि सत्तापरिवर्तन झाले तर तुर्कीयेची भूमिका बदलेल. अझरबैजानमधील निवडणुका योग्य प्रकारे होत नाहीत. त्यामुळे त्यानंतर जनमताचा खरा अंदाज येणार नाही. मात्र त्यावर सध्यातरी उपाय दिसत नाही.