रघुपतिविण चित्त कोठे न राहे।

23 May 2025 15:58:47
Karunastake
स्वार्थी, अहंकारी, गर्विष्ट इतर जन विषयविकारात आनंद मानणारे असल्याने मेल्यावरही त्यांची सुटका होत नाही. मरताना ते आपले विषय विकार बरोबर नेतात व त्यासाठी पुन्हा जन्म घेतात. अशांच्या संगतीत मी राहिलो तर मीही तसाच वागेन, या जन्ममृत्यूच्या चक्रतून सुटणार नाही. तेव्हा हे रामा, मला तुझ्याशिवाय कोणाची संगती नको. तुझ्याजवळ मला आश्रय देऊन या विषयविकारांच्या संगतीपासून वाचव. चित्त तुझ्या ठिकाणी लागणे हीच खरी मुक्ती आहे. ती तू मला प्रदान कर. त्यामुळे माझ्या जीवनाचे सार्थक होईल.
समर्थ रामदासस्वामींचे मानवी स्वभावाचे निरीक्षण, अवलोकन सूक्ष्म असल्याने या पूर्वीच्या श्लोक क्रमांक 10 मध्ये स्वामी सहजपणे लिहून जातात की, ’विलग विषम काळीं सांडिती सर्व माया’ आणि ते खरे आहे. मानवी जीवनात येणारा हा सर्वसामान्य अनुभव आहे. मायेची समजली जाणारी माणसेसुद्धा एखाद्याचा प्रतिकूल काळ आला की त्याला विचारीत नाहीत. त्याचा अव्हेेर करतात. या संदर्भात संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र पाहण्यासारखे आहे. संत तुकाराम महाराजांचा वाईट काळ सुरू झाला तेव्हा त्यांना त्यांचे आप्तस्वकीय कोणीही विचारीना. दुष्काळात त्यांची पहिली बायको, आणि मुले मरण पावली. कुटुंबाची वाताहत झाली. धंदा बुडाला, गावात कोणी कर्ज देईना. जो तो त्यांना टाळू लागला. एका विठ्ठलाशिवाय आता तरणोपाय नाही हे कळून चुकल्यावर ते विठ्ठलभक्तीत हरवून गेले, विठ्ठलाशी एकरूप झाले. त्यांच्या एकनिष्ठ भक्तीने तुकोबांचे अंतःकरण शुद्ध झाले, त्यांची प्रतिभा जागृत झाली, त्यांना वाणी अनावर झाल्याने त्यांच्या मुखातून भक्तिप्रेमाची अनुभवसिद्ध अभंगवाणी बाहेर पडली. त्या अभंगवाणीत मानवी जीवनाला, साधकांना उपयुक्त अशी तत्त्वे सहजपणे सांगितली गेली असल्याने आज चारशे वर्षांनंतरही त्यातील गोडी कमी झालेली नाही. स्वामींनीही अशाच भक्तिप्रेमाचा, रामविरहाचा पाठपुरावा करुणाष्टकात केला आहे, असे दिसून येते. करुणाष्टकातील काव्य उपदेशपर नाही. ते भावप्रधान काव्य आहे. असे मत ल. रा. पांगारकर यांनी व्यक्त केले आहे आणि ते योग्य आहे.
 
 
स्वामींनी या पुढील श्लोकातून सर्वसामान्य लोकांची वागण्याची तर्‍हा कशी असते ते सांगितले आहे. तो ’अनुदिनी अनुतापे’ या करुणाष्टकातला पुढील श्लोक असा आहे.

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।

रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे।

जिवलग जिव घेती प्रेत सांडोनि देती।
 
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ 11 ॥
(माझे नातेवाईक, लोक, धन यापासून मला (अजिबात) आनंद नाही. आता रामाशिवाय माझे अंतःकरण कोठे (स्थिर) राहात नाही. (कारण) लोक असे आहेत की, जिवलग असले तरी (एखाद्याचा) जीव घेतात आणि प्रेत सोडून देतात. (ही माणसे मेल्यावर) सर्व विषय, वासना कामना (बरोबर) नेतात, (विषयोपभोग, वासना जीवाला) पुन्हा जन्म देतात.)
समर्थ लहान वयात आपले जांब गाव सोडून रामासाठी नाशिकला येऊन राहिले. रामोपासना आणि रामसाक्षात्कार हे त्यांचे ध्येय असले तरी त्यांची दृष्टी चौफेर होती-दासबोधात स्वामींनी म्हटले आहे की सामान्य माणूस ’एकदेशी’ म्हणजे एकच दृष्टिकोन ठेवून वागतो. परंतु चतुरमनुष्य मान सदा चौफेर अवलोकन करीत असतो. स्वामी असे चतुरस्र होते. त्यांचे अवलोकन सर्व दिशांना सूक्ष्म होते, प्रस्तुत श्लोकाच्या,‘स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे‘ या पहिल्या ओळीत अर्थाच्या दोन छटा जाणवतात. सर्वसामान्यांच्या मानसिकतेतून बघितले तर त्यांना आपले नातेवाईक, आपली ओळखीची माणसे, आपली धनदौलत याचा गर्व असतो. त्यांना त्यांत खूप आनंद असतो. त्यातच ही माणसे गुरफटली असल्याने त्या पलिकडे त्यांची समज जात नाही. अशी माणसे सामान्यतः स्वार्थी, अहंकारी, आपमतलबी असतात. त्यामुळे हे माझे, ते माझे असे करीत आपल्या अहंभावाचे पोषण करीत असतात. त्यात त्यांना आनंद मिळतो. तथापि या अशाश्वत भौतिक आनंदापलिकडे भगवद्प्रेमाचे, भक्तीचे शाश्वत सुख आहे याची त्यांना जाणीव नसते. भौतिकाच्या अशाश्वततेत ही मंडळी आनंद शोधत असतात. या शोधकार्यात देहबुद्धी, स्वार्थ, अहंकार या अवगुणांनी प्रेरित झाल्यामुळे रामाच्या भक्तिप्रेमातून मिळणारा शाश्वत आनंद कसा असतो, याची ते कल्पनाही करू शकत नाहीत. देहबुद्धीत वावरणारी ही मंडळी आपल्यासारखीच संगती शोधत असतात. ती संगत अहितकारी असली तरी त्याची गोडी या मंडळींना असते. मनाच्या श्लोकात स्वामी म्हणतात -
जयाचेनि संगे समाधान भंगे।

अहंता अकस्मात येऊनि लागे ।

तये संगतीची जनीं कोण गोडी ।

जये संगतीने मती राम सोडी ॥ 45
स्वार्थ, देहबुद्धी, अहंकार इत्यादी अवगुणांनी युक्त असलेल्या माणसाला अशा संगतीची विशेष आवड असते. पण त्या संगतीने अतिअहंभाव येऊन चिकटतो. ती संगती आपल्याला रामापासून अर्थात सद्गुणांपासून दूर नेते. तरीही अहंकारी, स्वार्थी, गर्विष्ट इ. अवगुणधारी माणसाला या संगतीत आनंद असतो. अगदी तसलाच प्रकार स्वजन, जन, धन या संगतीचा आहे, असे स्वामींना म्हणायचे आहे. असल्या संगतीत ‘कोण संतोष आहे’ म्हणजे खूप आनंद आहे. अर्थात हा संतोष फसवा असून माणसाने अहित करणारा आहे, त्यामुळे माझे दैवत रघुपती शिवाय, माझे चित्त दुसरा विचार करीत नाही. रघुपती शिवाय दुसरीकडे चित्त रमत नाही, असे स्वामी म्हणतात.
’स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे’ ही स्वामींची या श्लोकातील रचना प्रश्नार्थक दृष्टीने वाचली तर त्यातील वेगळी अर्थछटा प्रत्ययास येते. या रचनेत शेवटी प्रश्नार्थक चिन्ह टाकले तर स्वजन, इतरजन आणि धनदौलत या गोष्टीत कोणाला संतोष आहे? असे वाचल्यास त्यात संतोष नाही असे उत्तर मिळते. पूर्वीच्या काळी पद्य रचनांतून स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्हे, उद्गार चिन्हे ही विरामचिन्हे सहसा आढळत नाहीत. आधुनिक गद्य वाङ्मयात आपण ती वापरतो. पूर्वीच्या काळी पाठांतरावर विशेष भर असल्याने श्लोक कसा म्हणावा त्या पद्धतीत विरामचिन्हांचा परिचय होत असे. उच्चारणावरून विरामचिन्हे ठरत असल्याने ती चिन्ह स्वरूपात दाखवण्याची आवश्यकता नसे. असो, प्रस्तुत ओळीत ‘...कोण संतोष आहे?’ या मागील भाव ‘संतोष कुठे आहे का?’ असा प्रतित होतो. म्हणजेच स्वजन, जन, धन यांच्यात मला आनंद दिसत नाही, असा घेता येतो. त्यामुळे रघुपतीशिवाय माझे मन कोठे लागत नाही असे स्वामींनी दुसर्‍या ओळीत स्पष्ट केले आहे. स्वामी म्हणतात,‘रामभक्तीत मला संतोष आहे. तो आनंद शाश्वत आहे, कायम टिकणारा आहे.’ स्वजन-जन-धन यातून मिळणारा आनंद क्षणभंगुर, अशाश्वत आहे. तो आनंद निर्भेळ नाही. त्यासोबत येणारे दुःखही सहन करावे लागते, हे स्वजन-जन असे आहेत की,“जिवलग जीव घेती, प्रेत सांडोनि देती.” भोवतालचे लोक एवढे स्वार्थी आणि आत्मकेंद्रित आहेत की जिवलग म्हणवून घेत असताना एखाद्याचा प्राणही घेतात आणि प्रेत तसेच सोडून निघून जातात. स्वामींचे हे विधान चारशे वर्षांपूर्वीचे असले तरी आजही या स्वरूपाच्या बातम्या पहायला, ऐकायला मिळतात. सुहृदाला ठार मारून, प्रेमाचे तुकडे खाडीत किंवा निर्जन ठिकाणी टाकून त्यांची आठवणही पुसून टाकणारे गुन्हेगार आहेत. काही लोक आप्तस्वकीयाच्या प्रेतयात्रेलासुद्धा जाण्याचे टाळतात. अशांबद्दल कुणाला प्रेम वाटणार? म्हणून हे रामा, तुझ्याशिवाय माझे चित्त दुसरीकडे जाणार नाही.
 
हे सर्व स्वार्थी, अहंकारी, गर्विष्ट इतर जन विषयविकारात आनंद मानणारे असल्याने मेल्यावरही त्यांची सुटका होत नाही. मरताना ते आपले विषय विकार बरोबर नेतात व त्यासाठी पुन्हा जन्म घेतात. अशांच्या संगतीत मी राहिलो तर मीही तसाच वागेन, या जन्ममृत्यूच्या चक्रतून सुटणार नाही. तेव्हा हे रामा, मला तुझ्याशिवाय कोणाची संगती नको. तुझ्याजवळ मला आश्रय देऊन या विषयविकारांच्या संगतीपासून वाचव. चित्त तुझ्या ठिकाणी लागणे हीच खरी मुक्ती आहे. ती तू मला प्रदान कर. त्यामुळे माझ्या जीवनाचे सार्थक होईल.
Powered By Sangraha 9.0