हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत - शतकभराचा आढावा

23 May 2025 15:42:26
rss and communist party of india
rss and communist party of india 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पक्ष असे दोन्ही वैचारिक परिवार शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असताना विजय आपटे यांचे ’हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे. या दोन्ही संघटनांचा जन्मकाळ 1925 हे साल असल्यामुळे आपटे यांनी 1925 ते 2024 या शतकातील राजकीय घटनांचा धावता इतिहासच आपल्या पुस्तकातून कथन केलेला आहे.
‘हिं दुत्व, मार्क्सवाद आणि भारत’ या पुस्तकामागची पूर्वपीठिका विशद करताना आपटे सांगतात की, हे दोन्ही विषय त्यांच्या लहानपणापासून कुतूहलाचे विषय होते. तथाकथित बुद्धिवाद्यांचे नेहमी हिंदूंना झोडपत राहणे हे त्यांच्या मनात सलत होते. त्यामुळे हिंदुत्व आणि मार्क्सवाद/समाजवाद या विषयांवरील मतमतांतरे ते जाणून घेत असत. त्यांच्या मते, हिंदुत्व व मार्क्सवाद आणि पर्यायाने संघ परिवार आणि मार्क्सवादी परिवार हे भारतीय समाजकारण आणि राजकारणातील दोन ध्रुव आहेत आणि गेली शंभर वर्षे हे या दोन धु्रवांच्या मध्ये फिरते आहे. हे पुस्तक या दोन ध्रुवांच्या मध्ये फिरलेल्या गेल्या शंभर-दीडशे वर्षांतील भारतीय राजकारण आणि समाजकारणाचा इतिहास आहे. साहजिक या काळात घडलेल्या सर्वच महत्त्वाच्या घटनांची चर्चा या पुस्तकात होणे स्वाभाविकच आहे.
 
 
स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर काँग्रेस परिवार देशाच्या राजकारणात वैचारिक कोलांटउड्या मारत राहिला. काळाच्या ओघात काही पक्ष नाहीसे झाले, काहींचे अस्तित्व मर्यादित राहिले, अनेक चांगल्या संघटना आणि संस्था डबघाईला आल्या किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले. पण हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार यांनी त्यांची तत्त्वे आणि त्यांची कॅडर यांच्या बळावर ठाम उभे राहून सत्ता हातात असताना आणि नसतानाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. हे दोन परिवार आणि भारत यांच्या राजकीय वाटचालीचा मागोवा विजय आपटे यांनी घेतलेला आहे.
 
 
 
हिंदुत्व हा संघपरिवाराचा पाया आहे आणि मार्क्सवाद हा मार्क्सवादी परिवाराचा पाया आहे. त्यामुळे या दोन्ही परिवारांच्या अनुषंगाने घडलेल्या घटना समजून घ्यायच्या असतील तर प्रथम हिंदुत्व आणि मार्क्सवाद या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून या दोन्ही संकल्पनांवर लेखकाने या पुस्तकात स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत. हे दोन्ही परिवार शंभरीच्या वळणावर उभे असताना त्यांच्या भूतकाळाबरोबर त्यांच्या भविष्याचा वेध घेण्याचाही लेखकाने प्रयत्न केला आहे.
 
 
अनेक ऐतिहासिक तथ्यांशी सर्वसाधारण मनुष्य परिचित नसतो त्यामुळे त्याचे एखाद्या गोष्टीचे आकलन सदोष आणि अपुरे असतेच असते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही इंग्रजांनीच केलेली आहे. हिंदू महासभा याच काँग्रेसच्या छायेत कार्यरत होती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे सुद्धा एक काँग्रेस कार्यकर्ते होते अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण कोणतीही गोष्ट एकाच स्थितीत अडकून बसलेली नसते. इंग्रजांनी स्थापन केलेली काँग्रेस पुढे लोकमान्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करू लागली व लोकमान्यांच्या निधनानंतर ती महात्मा गांधीच्या एकहाती वर्चस्वाखाली आली. त्याचप्रमाणे सावरकरांचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर काँग्रेस व हिंदू महासभा यांची फारकत झाली. त्यामुळे या एकंदर वाटचालीतील काँग्रेस अथवा हिंदू महासभा ही एकाच स्वरूपाची मानता येणार नाही व तसे मानून कोणतीही टीकाटीप्पणीही करता येणार नाही. एकंदर इतिहासाचे अध्ययन आणि आकलन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे या पुस्तकाच्या अवलोकनातून स्पष्ट होते.
 
 
नमस्कार सुहृदहो !
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
 
 
या पुस्तकात हे वास्तवसुद्धा अधोरेखित केलेले आहे की, जगभरातील कम्युनिस्ट पक्षांनी आपल्या नावात देशाचे नाव शेवटी ठेवावे असे धोरण ठरले आहे आणि त्यामुळे इंडियन कम्युनिस्ट पार्टी याऐवजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हे नाव बहुमताने निश्चित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने राष्ट्र प्रथम ही भूमिका घेतली आहे त्याचा आपण कसा विचार करतो? मार्क्सवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये दास कॅपिटल या मार्क्सलिखित ग्रंथाचा बंगाली भाषेतील अनुवाद 1984 साली प्रकाशित झाला. त्यापूर्वीच बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्ष सत्तेवरही आलेला होता. त्यामुळे कोणी मार्क्सचा मूलगामी विचार समजून मार्क्सवादी होत नसतो, हे वास्तव या पुस्तकातून अधोरेखित होते. प्रसिद्ध मार्क्सवादी नेते ए. के. गोपालन यांनीही आपण मार्क्स वाचलेला नाही याची कबुली दिलेली होती हे आपणांस या पुस्तकातून लक्षात येते. मूलगामी अभ्यासाबद्दल सार्वत्रिक उदासीनता अशा प्रकारची असते. मूळ ग्रंथ न अभ्यासता त्याचे समर्थन अथवा विरोध करण्याची जी चढाओढ लागलेली असते त्याचेही हेच कारण होय. राजकीय जीवनात याचे कुणालाही वावडे वाटत नाही.
 
 
आपली पाठ्यपुस्तके ही एका विशिष्ट दृष्टिकोनातूनच लिहिली गेली, हे आपटे यांचे मत अत्यंत स्वीकारार्ह वाटते की, हा दृष्टिकोन तथाकथित पुरोगामी विचारवंतांचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अर्धं पान आणि मुगल बादशहा अकबरासाठी तीनचार पाने खर्ची पाडणे अशामुळे बर्‍याच पिढ्यांच्या विचारसरणीवर त्याचा नको तितका प्रभाव पडलेला आहे. ’हिंदुत्व’ या प्रकरणात अत्यंत बोधप्रद चर्चा घडून आलेली आहे.
 
 
मार्क्सवादाची चर्चा करताना आदिम काळात जेव्हा माणूस टोळी करून राहत होता आणि अन्न गोळा करून गुजराण करीत होता तेव्हा खर्‍या अर्थाने समाजवादी समाजरचना अस्तित्वात होती, हे आपटे यांनी नमूद केलेले वाक्य अत्यंत सूचक आहे. आताच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेच्या काळात अशी समाजरचना अस्तित्वात येऊ शकत नाही. समाजवादाचे भव्य चित्र रेखाटणार्‍या प्रणेत्यांनीही ते प्रत्यक्षात आणण्याचा शास्त्रशुद्ध मार्ग सांगितला नाही म्हणून हा युटोपियन समाजवादच होय. उलट असा प्रभाव असलेल्या कविवरांनीही ‘मुकुट रंकास दे करटी भूपाप्रति‘ अशा काव्यरचना करून असलेली व्यवस्थेची उतरंडच केवळ उलट करून क्रांतीची स्वप्ने पाहिली व मांडली, जिने वास्तवात कोणतेच परिवर्तन येत नसते, केवळ शोषक आणि शोषित वर्गाची अदलाबदल होऊ शकते.
 
 
’भूमिकेच्या शोधात’ या प्रकरणात संजय गांधी यांच्या मृत्यूच्या कालखंडापासून ते राजीव गांधी यांचा पंतप्रधानपदाचा कालखंड आणि त्यांची दुर्दैवी हत्या या घटनेपर्यंत अनेक घटनांचा आढावा घेण्यात आलेला आहे. याच कालखंडात रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची जन्मशताब्दी येते. तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने पुन: संघपरिवारात डॉक्टरांची प्रेरणा जागवून नवचैतन्य निर्माण केले व सेवा आणि समरसता या विषयांना संघात महत्त्व दिले, त्या कार्यकर्तृत्वावरही भाष्य केले आहे.
 
 
 
’पुनश्च हरि ओम’ या प्रकरणात, बंदीतून बाहेर आल्यानंतर संघटना पुन्हा उभी करण्यासाठी कंबर कसणार्‍या रा. स्व. संघ आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या प्रयत्नांची चर्चा आहे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीपासून या प्रकरणाची सुरुवात होते आणि हे प्रकरण पंडित नेहरूंच्या पंतप्रधान पदाच्या काळातील घटनांबाबत अधिक माहिती देते.
 
 
 
’उदारीकरणाचे आव्हान’ या प्रकरणात नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी या दोन पंतप्रधानांच्या कालखंडात घडलेल्या विविध महत्त्वाच्या घटना आपल्याला वाचायला मिळतात.
 
 
डाव्यांचा वरचश्मा या प्रकरणात डाव्या उग्रवादी चळवळीची माहिती येते, पण त्याचबरोबर निर्भया प्रकरण आणि अण्णा हजारेंचे आंदोलन असे सामाजिक-राजकीय विषयही येतात. पुढे मोदींच्या प्रतिमानिर्मितीचे विश्लेषण करून शेवटी मनमोहनसिंग यांच्या यशापयशावरही भाष्य केलेले आहे.
 
 
’मोदींचा झंझावात’ हे प्रकरणही महत्त्वाचे आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्ष, मार्क्सवादी पक्ष आणि काँग्रेसमधील खांदेपालट यावर समर्पक भाष्य केले आहे. त्याचबरोबर नोटबंदीचा निर्णय आणि कोविडकाळातील कामगिरी याबद्दलची थोडक्यात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. अठराव्या लोकसभेच्या निवडणूक निकालांवर भाष्य करून हे प्रकरण संपते.
’विचार करा, गाफील राहू नका’ या शेवटच्या प्रकरणात आपल्या विचारमंथनातून काढलेला निष्कर्षच लेखक मांडतात - कोणतीही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संस्था या पृथ्वीतलावर कधीही स्वर्ग निर्माण करू शकणार नाही. इतिहास साक्षी आहे की, माणसाला त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमीच खडतर संघर्ष करावा लागला आहे आणि भविष्यातसुद्धा ती परिस्थिती कायम राहणार आहे... भविष्यातील आव्हानांचा विचार करता, जगणेसुद्धा दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. त्यामुळे माणसाला गाफील राहून चालणार नाही. त्याला विचारपूर्वक कृती कराव्या लागतील.
 
 
खरे पाहता शतकभरातील विविध घटनांचा पट केवळ 709 पानांच्या मर्यादेत एकूण 14 प्रकरणांतून चितारणे हे अवघड कामच म्हणावे लागेल. तरीसुद्धा महत्त्वाच्या घटनांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयास लेखकाने सफलपणे केलेला आहे. सरतेशेवटी लेखकांनी आपल्या मनोगतात असे म्हटले आहे की, पुस्तकांपेक्षा इंटरनेटवर या विषयांची जास्त माहिती उपलब्ध आहे. या पुस्तकासाठी अभ्यासपूर्ण लेखन करताना लेखकाने सात वर्षे वेचली आहेत. त्यामुळे हे पुस्तक ’गागर में सागर’ अशा उक्तीला सर्वथैव पात्र आहे. सर्वांना आपल्या अभ्यासासाठी इतका काळ हाताशी असणे अवघड आहे, तेव्हा विश्वसनीय माहितीच्या आधारे केलेले लेखन हे वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होणार्‍या लोकांसाठी मार्गदर्शक ठरते हे निश्चित. त्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व एक संदर्भग्रंथ म्हणून फार मोठे आहे.
 
Powered By Sangraha 9.0