दिव्य देसम् बद्दल जाणून घेताना आपण बारा आळवार, त्यांनी निश्चित केलेली 108 मंदिरे, नाथमुनी, यमुनाचार्य, श्रीरामानुजाचार्य, जियर परंपरेबाबत जाणून घेतले. आता आपण एकंदरीतच श्रीरंगम्विषयी जाणून घेऊयात.
श्रीरंगम्... दाक्षिणात्य वैष्णवांचे नामानिधान. त्यांच्यासाठी हे नाव किती महत्त्वपूर्ण आहे याचा आपण विचारही करू शकत नाही. दिव्य देसम् म्हणजेच श्रीरंगम् आणि श्रीरंगम् म्हणजेच दिव्य देसम् इतकं हे एकमेकांना पूरक आहे. ह्या लेखमालेच्या पहिल्या भागात मी कर्मधर्मसंयोगाने वैकुंठ एकादशीच्या दिवशी श्रीरंगम्च्या श्रीरंगनाथस्वामी मंदिरात दर्शनाला गेल्याचा उल्लेख केला होता. दक्षिणेतील मंदिरांची ’ट्रिप’ करायला निघालेली मी, श्रीरंगम्कडे ओढले गेले. त्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यावेसे वाटायला लागले. आपल्या धर्माच्या गूढतेकडे माझे लक्ष गेले. आज जे काही मी लिहिते यासाठी माझी वैकुंठ एकादशीला झालेली श्रीरंगम्शी ओळख कारणीभूत आहे.
मला अजूनही आठवतेय, 2023 या वर्षाचा पहिला दिवस होता तो. तंजावूरचे ’बृहदिश्वर’ आणि गंगैकोंडचोळपुरमचे ’बृहदिश्वर’ अशी चोळ साम्राज्याला ललामभूत ठरलेली मंदिरे पाहून आम्ही तिरूचिरापल्लीला आलो. इथे आम्हांला श्रीरंगम्चे श्रीरंगनाथन, जंबुकेश्वर मंदिर व उच्ची पिल्लीयर (विनायक रॉक टेंपल) ही मंदिरे बघायची होती. जंबुकेश्वराचे दर्शन घेतल्यावर आमची ’पंचमहाभूत मंदिरांची’ यात्रा संपन्न होणार होती. दक्षिणेत पंचमहाभूतांची मंदिरे आहेत. श्रीकालहस्ती येथे श्रीकालहस्तीश्वर-’वायुतत्त्व’, कांचीपुरम येथे एकाम्रेश्वर-’पृथ्वीतत्त्व’, चिदंबरम येथे थिलई नटराजन- ’आकाशतत्त्व’, तिरूवन्नमलई येथे अरुणाचलेश्वर-’अग्नितत्त्व’ व श्रीरंगम् येथे जंबुकेश्वर-’जलतत्त्व’ अशी ही पाच मंदिरे होत. ही पाचही मंदिरे बघणे हा माझ्यासाठी एक असामान्य अनुभव होता. श्रीरंगम् येथे ज्याप्रमाणे श्रीविष्णूचे महान स्थान आहे, तद्वतच शिवाचे जे अतिप्राचीन मंदिर आहे ते म्हणजे जंबुकेश्वर व येथेच एकावन्न शक्तिपीठांपैकी एक असे ’अखिलेंदेश्वरीचे’ मंदिर आहे. जंबुकेश्वराचे दर्शन करून आम्ही श्रीरंगनाथ मंदिरात जाण्यासाठी निघालो. पण त्या दिवशी रस्त्यावरची रहदारी बदलली होती. गुगल मॅपची दिशाभूल झाली आणि कसेबसे आम्ही मंदिरात पोहोचलो. पाहिलं तर, तिथे पोलीस बंदोबस्त होता आणि अलोट गर्दी झाली होती. मुसंडी मारून आत गेल्यावर पाहिलं तर जणू काही भाविक मंदिरात मुक्कामाला आलेत अशी गर्दी होती. मी विचार करत होते की, ‘नक्की काय चाललंय इथे? कोणी व्हीआयपी आलेत का?’ हे मंदिर जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे आणि इथे आपण चेपून निघण्याइतकी गर्दी कशी काय आहे? विचारांच्या आवर्तनात जरा चौकशी केल्यावर कळलं की, मुख्य मूर्तीचं दर्शन आता बंद झालंय. पण उत्सवमूर्ती डोक्यावर घेऊन, वाजंत्री वाजत काही उत्सव सुरू होता. ते स्वर्गीय सूर, तो भक्तिभाव आणि ती उत्सवमूर्ती मनात कसली तरी अनुभूती निर्माण करत होती. पण मूलवरम्चे दर्शन न झाल्याने मनाला वाईट वाटले होते. मी, आई आणि मुलीने एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले होते. या गर्दीत मंदिर किंवा मंदिराचे कोरीवकाम बघून होणार नव्हतेच. मग आम्ही तिथून निघायचा बेत केला. कसेबसे बाहेर आल्यावर पहिल्यांदा भरभरून श्वास घेतला आणि तिथे असलेल्या पोलिसाला विचारल्यावर कळलं की, वैकुंठ एकादशी असल्याने उद्या पहाटे वैकुंठद्वार उघडणार आहे. त्यासाठी इतकी गर्दी आहे. हा सगळा प्रकार मला अतिशय स्तिमित करून गेला. इतर वेळी कधीही गर्दीच्या ठिकाणी न जाणारी मी कसल्या अनुभूतीने तिथे खेचले गेले, हे मला आजतागायत पडलेलं कोडं आहे. आजही मी तिथे असणार्या सकारात्मक वाईब्स अनुभवू शकते. ते भक्तिमय, भारावलेलं आणि मंत्रमुग्ध करणारे वातावरण माझ्या लिखाणातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेन का याबाबतीत माझ्या मनात साशंकता आहे. या भक्तिरसात रंगून जाण्यासाठी तो अनुभव ’याची देही याची डोळा’ घ्यावा लागेल. ही माझी श्रीरंगम्शी, माझ्या आराध्यदैवत असलेल्या श्रीरंगनाथाची आणि दिव्य देसम्बरोबर झालेली पहिली ओळख.
हे मंदिर दिव्य देसम्च्या एकशे आठ मंदिरांपैकी सगळ्यांत पहिल्या क्रमांकाचे मंदिर आहे, तसेच 155 एकर क्षेत्रफळाचे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. मत्स्य व विष्णू पुराणात या मंदिराचे उल्लेख आहेत. श्रीरंगम् पौराणिकदृष्ट्या अतिप्राचीन म्हणजे त्रेतायुगापासून अस्तित्वात असलेले मंदिर आहे. इथे श्रीविष्णू म्हणजेच पेरूमाळ शयन अवस्थेत आहे. जो पेरूमाळ शयन अवस्थेत असतो त्याला ’रंगनाथन’ किंवा प्रेमाने ’रंगा’ असे संबोधले जाते. हे मंदिर इथे वसण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागला तो म्हणजे दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाणार्या कावेरी नदीचा. प्राचीन काळापासूनच संस्कृती नदीच्या काठी फुलली, फळली. तामिळनाडूची प्राचीन संस्कृती कावेरीच्या तीरावर फुलली. कोडूगुत उगम पावलेली नदी दक्षिण कर्नाटक व तामिळनाडूचे पोषण करून बंगालच्या उपसागरला मिळते. ह्या नदीच्या दोन्ही तीरांवर असलेली मंदिरांची संख्या प्रचंड आणि अभूतपूर्व म्हणावी अशी आहे. या नदीची महत्त्वाची उपनदी म्हणजे कोल्लिडम. या दोन नंद्याचा प्रवाह तिरूचिरापल्ली येथून वाहतो. त्यामुळे शहराच्या अगदी जवळ या दोन नद्यांमुळे एक मोठे बेट तयार झालेय. हेच बेट म्हणजे अतिशय पवित्र असे ’श्रीरंगम्’ होय. इथल्या श्रीरंगनाथस्वामीला ’भूलोकीचे वैकुंठ’ म्हणतात. कारण हा श्रीविष्णूचा विग्रह स्वयंभू आहे. श्रीरंगाचे मुख दक्षिण दिशेला आहे. हा श्रीरंगा, श्रीरंगम्चा स्वामी आहे. मंदिराच्या बाजूला तामिळ वैष्णवांची घरे आहेत. ही वैष्णवांची सर्वात प्राचीन वस्ती आहे. ज्याप्रमाणे वाराणसीला जगातील प्राचीन लोकवस्ती होती, तद्वतच श्रीरंगम्ला अतिशय जुनी लोकवस्ती होती. अतिप्राचीन भारतातील भक्तीचे हे मंदिर एक केंद्र होते. या मंदिराला ’पेरियकोविल’ म्हणजे ’मोठे मंदिर’ म्हणतात. जुन्या तामिळ वाङ्मयामध्ये ’तिरूवरंगम’ मध्ये मंदिराचा उल्लेख आहे. तामिळ वैष्णव म्हणजे अय्यंगार तर तामिळ शैव म्हणजे अय्यर. अय्यर कपाळावर त्रिपुंड आखतात तर अय्यंगार इंग्लिश ण प्रमाणे गंध लावतात. दिव्य देसम् मंदिरे ही श्रीरामानुजाचार्यांच्या परंपरेने चालत असल्यामुळे इथे एकाच प्रकारचे गंधलेपन होते. वैष्णवांच्या घरावर एकत्र शंख, चक्र व गंध कोरलेले असतात. आधी सांगितले तसे 155 एकर इतक्या प्रचंड मोठ्या जागेवर मंदिर असल्याने जणू काही एक गावच इथे वसले आहे. इथे सर्व काही भव्यदिव्यच आहे. ह्या मंदिरात 7 प्राकारम् म्हणजे वेगवेगळे विभाग आहेत. त्यांत 50 लहानमोठी देवळे आहेत. 9 पुष्करणी आहेत. दक्षिणेच्या प्रत्येक मोठ्या मंदिरात असतात तसे सहस्त्रस्तंभ मंडपम् आहे. मंदिराची भौमितीय बांधकामशैली बघून युरपियन वास्तुरचनाकारांनी तोंडात बोटे घातली होती. ह्या मंदिरात 21 गोपुरम् आहेत. इथे दक्षिण दिशेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मंदिराचे दक्षिणेचे गोपुरम् म्हणजेच ’राजगोपुरम्’ आशियातील सगळ्यांत उंच (239.5 फूट) आहे. हे गोपुरम् विजयनगरच्या ’अच्युतदेवरायाने’ बांधले आहे.

श्रीरंगम्च्या मंदिराबद्दल असंख्य कथा, आख्यायिका, लोकश्रुती सांगितल्या जातात. पुराणाप्रमाणे जरी हे मंदिर त्रेतायुगातील असले तरीही आता असलेले मंदिर अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी बांधलेले आहे. दक्षिणेतील इतर मंदिरांप्रमाणे हे मंदिर सुद्धा परत परत त्याच जागी बांधले व वाढवले गेले आहे. वेगवेगळ्या साम्राज्यांनी मंदिरनिर्मितीमध्ये भर घातली आहे. हे मंदिर ’धर्मावर्मा’ ह्या चोळ राजाने बांधले अशी कथा सांगितली जाते. ही चोळ राजांची प्राचीन पिढी होती. हा पेरूमाळचा विग्रह अनेक वर्ष अयोध्येच्या ’ईक्ष्वाकु’ वंशाकडे होता. मग हा विग्रह श्रीरंगम्ला कसा बरं आला? तर हे आपण पुढच्या लेखात पाहूयात.