संस्कार म्हणजे काय?

03 May 2025 15:26:44
 
vivek
आजही अबाधित असलेले हिंदू जीवनपद्धतीतील सोळा संस्कारांचे महत्त्व आणि आजच्या काळात असलेली त्यांची गरज अधोरेखित करणारी, हिंदू संस्कृती अभ्यासक दीपाली पाटवदकर यांची नवीन पाक्षिक लेखमाला - संस्कारगाथा
”हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी?” वासुदेवाचा खणखणीत स्वर कानी आला. सकाळची वेळ होती. अजून पहिला चहापण झाला नव्हता. पाण्याला आधण आल्यावर चहाची पूड घातली आणि पातेल्यावर झाकणी ठेवली. पटकन हातात एक शंभराची नोट घेतली आणि वासुदेवाला द्यायला खाली गेले. त्याच्याकडे पैसे दिले, आशीर्वाद घेतले आणि वळले. इतक्यात, शेजारच्या इमारतीत गाडी पुसायचे काम करणारे काका आले. अस्ताव्यस्त वाढलेले पांढरे केस, अंगात जुना सदरा, मळकट विजार, पायात झिजून गेलेल्या चपला. त्यांनी खिशातून दोनचार नाणी काढली आणि वासुदेवाच्या हातावर ठेवली. वासुदेवाने मला आशीर्वाद दिला तसाच त्या काकांनापण दिला आणि मग ”देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या...” म्हणत त्याची स्वारी पुढच्या घरी निघाली.
 
 
sanskar
 
वासुदेवाने वाहत्या झर्‍यातील पाणी ओंजळीत घेऊन प्यावे तितक्या सहजतेने दिलेले पैसे घेतले होते. ते कमी आहेत की जास्त आहेत याचा विचार न करता आम्हा दोघांनाही सारखाच आशीर्वाद दिला होता. देणारा कर्तव्य म्हणून देत होता आणि घेणारा प्रसाद म्हणून घेत होता. देणार्‍याच्या मनात अहंकार नव्हता आणि घेणार्‍याच्या मनात न्यून नव्हते. या व्यवहारात एक नैसर्गिक सहजता होती.
 
नमस्कार सुहृदहो !
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!
वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
 
 
मी घरी येतांना विचार करत आले - आपण किती पैसे दान दिले हे महत्त्वाचे नव्हते, पण आपल्याकडे जे काही आहे, त्यातील थोडे काढून देणे महत्त्वाचे होते. दान करायची बुद्धी मला आणि त्या काकांना कोणी दिली होती? मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मला आणि एका गरीब कुटुंबातून आलेल्या त्या काकांना एकच शिकवण मिळाली होती, आम्ही दोघांनी एकच धडा गिरवला होता... त्या धड्याचे नाव होते - संस्कार.
 
 
प्रत्येक व्यक्तीचे विचार, उच्चार आणि आचार चांगले असावेत, ज्याद्वारे व्यक्तीचे जीवन सफल होईल, त्याच्या कुटुंबाचा उद्धार होईल आणि सोबत समाजाचापण विकास होईल ही प्रगतिशील समाजाची गरज आहे. इथे आपण त्या प्रत्येक व्यक्तीला एक नाव देऊया - रजनीकांत. या पुढे प्रत्येकाने / मानवाने / मनुष्याने / सगळ्यांनी वगैरे म्हणण्याऐवजी -‘रजनीकांत’ म्हणू.
 
 
sanskar
 
तर रजनीकांत मोठा झाल्यावर आपोआपच चांगला वागेल याची शक्यता शून्य. चांगले वागण्यासाठी त्याला - चांगले काय, वाईट काय - ते शिकवायला हवे. चांगले अथवा वाईट वागल्याने काय फळ मिळते ते सांगायला हवे. त्याला चांगले शिक्षण द्यायला हवे. उपजीविकेसाठी काही कौशल्य शिकवायला हवे. त्याला चांगला नवरा आणि चांगला पालक होण्याचे शिक्षण द्यायला हवे. एकूण रजनीकांतला सुसंस्कृत करण्यासाठी, त्याला आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर मार्गदर्शन करायला हवे आणि वारंवार उपदेश पाजायला हवा. व्यक्ती घडवण्यासाठी निर्माण केलेल्या विविध प्रशिक्षण क्रिया म्हणजे संस्कार.
 
 
एखाद्या ओबडधोबड पाषाणावर छिन्नी-हातोडीने घाव घालून एक शिल्प तयार होते. आधी त्या वेड्यावाकड्या दगडाकडे कोणी पाहिलेसुद्धा नसते, पण त्या दगडावर जेव्हा संस्कारांचे घाव घातले जातात तेव्हा त्याचे रूपांतर एक सुंदर शिल्पात होते. मग लोक ते शिल्प पाहायला गर्दी करतात. आखीवरेखीव शिल्प पाहून, त्यामधील कथा समजून घेतात, त्यामधून आनंद मिळवतात! दगड ते शिल्प हा प्रवास संस्कारातून होतो.
 
नमस्कार सुहृदहो !
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!
वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
 
आपण तांदूळ निवडून, दोनदा धुवून, त्यामध्ये नारळ, गूळ घालून शिजवून, त्यात काजू, बेदाणे, वेलची घालून नारळी भात करतो. तांदळावर जेव्हा धुण्याचे, शिजवण्याचे संस्कार केले गेले तेव्हा तो - खाण्यायोग्य झाला, चविष्ट झाला आणि पौष्टिक पण झाला. हा संस्काराचा परिणाम आहे. दुधाला विरजण लावून, त्याचे दही झाले की घुसळून, त्याचे लोणी काढून, ते कढवून तूप करतो. जे एका दिवसात खराब होऊ शकले असते ते दूध आता वर्षभर टिकेल असेल तूप होते. विरजण्याचे, घुसळण्याचे, कढवण्याचे संस्कार केल्याने दूध अधिक पौष्टिक, चविष्ट आणि औषधी झाले.
 
 
सोन्याचा गोळा गरम करून, ठोके घालून त्याचा अलंकार तयार होतो, तेव्हा तो सुंदर दिसतो आणि अंगावर घालून मिरवता येतो. अथवा खाणीत मिळालेला हिरा - स्वच्छ करून, त्याला पैलू पाडल्यावर कोंदणात बसवता येतो. ज्याच्याकडे काच म्हणून तुच्छतेने पहिले असते, तो मुकुटात बसून राजाच्या डोक्यावर विराजमान होण्याचा मान मिळवतो - हे संस्कारातून त्याच्यातील सुप्त गुण प्रकट झाल्याने.
 
 
संस्कारांनी एखादी वस्तू किंवा व्यक्ती सुंदर, शुद्ध, दीर्घायु व समृद्ध होते; पाहणार्‍याच्या मनात आदरयुक्त कौतुक निर्माण करते. जी शिकवण मनुष्याला सुसंस्कृत करते, शहाणे करते, जगण्याला लायक करते, समाजासाठी हितकारक करते, ती शिकवण म्हणजे संस्कार. जी क्रिया केली असता एखादी वस्तू अथवा मनुष्य काही कार्याला उपयुक्त होतो ती क्रिया म्हणजे संस्कार. असलेले दोष नाहीसे करणे आणि नवीन गुण उत्पन्न करणे अशी दोन कामे संस्कार करतात. मनुष्याच्या अभ्युदयासाठी त्याच्या अंगच्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते असे फार पूर्वीपासून जाणले गेले आहे.
 
नमस्कार सुहृदहो !
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!
वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
 
 
सुदृढ असणे, अंगात शक्ती असणे, प्रसन्न वृत्ती बाळगणे, समाधानी असणे, विजिगीषु असणे, पुरुषार्थ साधणे, उत्तम मित्र होणे, चांगला पती अथवा पत्नी होणे, उत्तम पालक होणे, गरजवंतास दान देणे हे वागणे संस्कारांतून शक्य होते. आपल्या मुलांना स्वच्छता शिकवणे, शाळेत घालणे, स्वाध्याय करायला लावणे, व्यायाम करायला लावणे, लवकर उठायला शिकवणे, चांगली पुस्तके वाचायला देणे, चांगली पुस्तके वाचून दाखवणे, गोष्टी सांगणे, पाठांतर करवून घेणे हे वेगवेगळे संस्कार आहेत. लहान असेपर्यंत संस्कार करायची जबाबदारी आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक आदींकडे असते. पण मोठे झाल्यावर ते काम स्वत: करायचे असते. दर चातुर्मासात काही व्रत धरणे ज्यामुळे आपली ुळश्रश्र िेुशी वाढेल, आपल्या मध्ये सुधारणा घडवत राहणे, नियमित चांगले वाचन करणे, कोणा अधिकारी व्यक्तीकडून चांगल्या गोष्टी ऐकणे, प्रेयस सोडून श्रेयस गोष्टी करणे - ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
 
 
संपूर्ण समाज जेव्हा काही ठरावीक संस्कार आत्मसात करतो तेव्हा त्याला ‘संस्कृती’ म्हटले जाते. संस्कारहीन समाजाला ‘टोळी’ म्हटले जाईल. आपल्या पूर्वजांनी शेकडो संस्कारांमधून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेले काही संस्कार निवडले आणि ते प्रत्येकासाठी सुचवले. हिंदू धर्मात महत्त्वाचे असे 16 संस्कार सांगितले आहेत - जे जन्माच्या आधी सुरू होतात, जन्मभर वाटाडे होऊन मार्गदर्शन करतात आणि मृत्यूनंतर संपतात. या लेखमालेतून आपण रजनीकांतवर होणारे विविध हिंदू संस्कार पाहू. तसेच इतर पंथातील आणि धर्मातील संस्कार पाहू. त्या संस्कारांचा हेतू जाणून घेऊ. त्यामधून काय साध्य होते ते पाहू. तसेच संस्कारहीन समाजाचे काय होते तेही पाहू.
Powered By Sangraha 9.0