शिष्टाईची फलश्रुती !

विवेक मराठी    30-May-2025   
Total Views |
 
Operation Sindoor
जगाने दहशवादाविरोधात एकजूट दाखविणे अपरिहार्य. भारताच्या शिष्टमंडळांनी तोच मुद्दा अधोरेखित केला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या भूमिकेचे समर्थन केले. पाकिस्तान किंवा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद याला कोणीही पाठबळ दिले नाही किंवा भारताला संयम, सहिष्णुता याबद्दलचे चार शब्द अकारण सुनावले नाहीत. ही या शिष्टमंडळाच्या शिष्टाईची फलश्रुती म्हटली पाहिजे!
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले होते. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या आगळिकीला भारताने तितकेच चोख प्रत्युत्तर दिले होते. 10 मे रोजी दोन्ही राष्ट्रांदरम्यान संघर्षविरामाचा निर्णय झाला. त्यामुळे लष्करी मोहीम थांबली तरी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची निकड संपलेली नव्हती. विशेषतः चीन, तुर्कीये, अझरबैजान अशा राष्ट्रांनी पाकिस्तानला दिलेले समर्थन आणि पाठबळ; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला सशर्त का होईना पण मंजूर केलेले अब्जावधींचे अनुदान; संयुक्त राष्ट्रसंघाने पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन जारी करताना त्या हल्ल्यास जबाबदार ‘दि रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेच्या नावाचा आणि दहशतवाद्यांनी वेचून बिगर-मुसलमानांना केलेले लक्ष्य या वस्तुस्थितीचा टाळलेला उल्लेख आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षविरामात आपण मध्यस्थी केल्याचे लावलेले तुणतुणे या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर तथ्य आणि सत्य मांडणे आवश्यक आहे, अशी भारताची धारणा झाली होती. त्यासाठीचा मार्ग म्हणजे जगभर शिष्टमंडळे पाठविणे. या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी आपले दौरे सुरू केले आहेत. अमेरिका, रशियापासून जपानपर्यंत; कतारपासून कुवेतपर्यंत; सिंगापूरपासून बहारिनपर्यंत या शिष्टमंडळांनी दौरे केले आहेत. त्या दौर्‍यांमधून, तेथील बैठका-संवादातून या शिष्टमंडळांनी भारताची बाजू आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडली आहे. तेव्हा या शिष्टमंडळाच्या दौर्‍यांची दखल घेणे औचित्याचे.
 
 
सात शिष्टमंडळे; एक मोहीम
 
येथे हे ध्यानात ठेवणे आवश्यक की शिष्टमंडळे जरी सात असली; ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या राष्ट्रांना भेटी देणार असली तरी त्या सर्व शिष्टमंडळाच्या प्रतिपादनात साम्य आहे आणि असणार आहे. ते स्वाभाविक; याचे कारण त्याच हेतूने ती शिष्टमंडळे पाठविण्यात आली आहेत. तेव्हा प्रत्येक शिष्टमंडळाच्या कामगिरीचा वेगवेगळा लेखाजोखा मांडण्यात हशील नाही. या सर्व शिष्टमंडळाच्या एकूण प्रभावाचा धांडोळा घेणे जास्त उचित. ही सर्व शिष्टमंडळे सर्वपक्षीय आहेत. येथे विरोधक ऑपरेशन सिंदूरविषयी काही सवाल उपस्थित करीत आहेत. त्यांतही काँग्रेस आघाडीवर आहे. पण त्याच पक्षाचे खासदार शिष्टमंडळांचा भाग म्हणून जगात जाऊन भारताची बाजू मांडत आहेत. यास विरोधाभास म्हणायचे की काँग्रेस नेतृत्वाची केविलवाणी स्थिती म्हणायचे एवढाच काय तो प्रश्न. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडताना पक्षीय भेदाभेद नसतात, याचे उत्तम दर्शन या शिष्टमंडळांनी घडविले. तोच जगाला पहिला संदेश या शिष्टमंडळांनी दिला आहे. संघर्षविरामानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद आणि वाटाघाटी एकाच वेळी सुरू राहू शकत नाही; यापुढे पाकिस्तानशी चर्चा झालीच तर ती पाकव्याप्त काश्मीरवर होईल हे स्पष्ट केले होते. शिष्टमंडळांनी भारताची तीच भूमिका जगासमोर मांडली. विशेष म्हणजे ज्या राष्ट्रांना या शिष्टमंडळांनी भेटी दिल्या त्याही राष्ट्रांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आणि दहशतवादाचा निषेध केला.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
या शिष्टमंडळांनी आपल्या दौर्‍यात केवळ त्या त्या राष्ट्रातील राजकीय नेत्यांची; किंवा सत्ताधार्‍यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली नाही; तर तेथील विचारवंत, माध्यमांचे प्रतिनिधी; भारतीय समुदायातील प्रतिष्ठित आणि प्रभावशाली नागरिकांची देखील भेट घेतली; एवढेच नव्हे तर भारताची भूमिका सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निःपात करण्याची आहे हे अधोरेखित करण्याच्या दृष्टीने त्या त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या स्थळांना आवर्जून भेट दिली. दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या दृष्टीने भारतसमर्थक राष्ट्रांशी द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्यावर देखील या शिष्टमंडळांनी भर दिला आहे. तेव्हा नियोजनपूर्वक हे सगळे घडत आहे यात शंका नाही आणि ज्या राष्ट्रांना ही शिष्टमंडळे भेटी देत आहेत त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, ही उत्साहवर्धक बाब म्हटली पाहिजे.
 

Operation Sindoor  
 
थरूर यांची मांडणी
 
अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेथील 9/11 च्या स्मारकाला आवर्जून भेट दिली. न्यूयॉर्क येथील ट्वीन टॉवर्सवर 2001 साली अपहृत विमानातून दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात तीन हजार जणांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्यांची स्मृती म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यास भेट देऊन शिष्टमंडळाने आपला लढा केवळ भारताला ग्रासणार्‍या दहशतवादाच्या विरोधात नसून जागतिक दहशतवादाशी आहे हा संकेत दिला. अमेरिकेतील भारतीय वकिलातीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास भारतीय-अमेरिकी नागरिक, माध्यम प्रतिनिधी आणि विचारवंत उपस्थित होते.
 

Operation Sindoor

थरूर यांनी केलेले भाषण त्यांच्या उत्तम भाषणांतील एक म्हटले पाहिजे. भारताची बाजू आणि भूमिका त्यांनी तळमळीने पण कोणताही अभिनिवेश न येऊ देता केवळ तथ्यांवर आधारित मांडली. त्यांनी 2015 साली मोदी यांनी पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीचा उल्लेख केला; आणि त्यानंतर काहीच दिवसांत पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. त्यानंतर त्या हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानने देखील सहभागी व्हावे ही भारताची मागणी पाकिस्तानने अमान्य केली; ती पाकिस्तानसाठी शेवटची संधी होती असे थरूर यांनी सांगितले.
 
 
त्यांच्यासमोर थरूर यांनी केलेले भाषण त्यांच्या उत्तम भाषणांतील एक म्हटले पाहिजे. भारताची बाजू आणि भूमिका त्यांनी तळमळीने पण कोणताही अभिनिवेश न येऊ देता केवळ तथ्यांवर आधारित मांडली. त्यांनी 2015 साली मोदी यांनी पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीचा उल्लेख केला; आणि त्यानंतर काहीच दिवसांत पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. त्यानंतर त्या हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानने देखील सहभागी व्हावे ही भारताची मागणी पाकिस्तानने अमान्य केली; ती पाकिस्तानसाठी शेवटची संधी होती असे थरूर यांनी सांगितले. एका अर्थाने पाकिस्तानच्या विश्वासघातकी इतिहासावर त्यांनी बोट ठेवले.
 
 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने जारी केलेल्या निवेदनात ‘टीआरएफ’ या दहशतवादी संघटनेच्या नावाचा उल्लेख नसणे हा चीनचा कावा होता, हेही थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले. ऑपरेशन सिंदूर मोहीम हे भारताने दिलेले प्रत्युत्तर होते; युद्धाला तोंड फोडण्याची भारताची बिलकुल भूमिका नव्हती यावर थरूर यांनी भर दिला. परंतु कोणीही सीमेपलीकडून भारतात यावे; येथील नागरिकांच्या हत्या कराव्यात आणि तरीही त्या दहशतवाद्यांना शिक्षा होऊ नये हे यापुढे चालणार नाही ही दहशतवादाबद्दलची भारताची ’शून्य सहनशीलता’ भूमिका असल्याचे थरूर यांनी ठणकावून सांगितले. असल्या आगळिकीची किंमत मोजावीच लागेल हेही त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून लक्ष्य केले; याचाच अर्थ दहशतवादी आणि त्यांचे पुरस्कर्ते यांचा हेतू भारतात त्यावरून धार्मिक दंगल उसळावी; दुभंग निर्माण व्हावा असा होता; पण भारताने एकजुटीची भूमिका घेतली आणि दहशतवाद्यांचे कुटील मनसुबे उधळून लावले याचा उल्लेख थरूर यांनी केला. थरूर यांचे भाषण पाकिस्तानचा बुरखा फाडणार्‍या मुद्द्यांनी युक्त होते असे दिसेलच; पण त्याबरोबरच भारताचे लक्ष आर्थिक विकासावर आहे आणि भारताला लढाईत किंवा युद्धात स्वारस्य नाही असे थरूर यांनी सांगितले याचीही दखल घ्यावी लागेल. त्याचा अर्थही आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्षात घेतला असेल. तो म्हणजे पाकिस्तानला युद्धाची; संघर्षाची खुमखुमी आहे. पण भारत हे पाकिस्तानच्या तुलनेत सर्वार्थाने सरस राष्ट्र असूनही त्याचा भर शांततेवर आहे हा. थरूर यांनी जे मुद्दे मांडले त्याचेच प्रतिबिंब अन्य शिष्टमंडळाच्या भेटीत पडलेले दिसेल.
 

Operation Sindoor  
 
सर्वत्र भारताला समर्थन
 
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संयुक्त अरब अमिरातीला (युएई) भेट दिली. तेथील वरिष्ठ मंत्र्यांची भेट या शिष्टमंडळाने घेतलीच. त्याप्रमाणेच युएईमधील भारतीय समुदायाला ते सदस्य भेटले. युएई असो; कतार असो; कुवेत असो वा बहारीन असो; त्या राष्ट्रांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन करण्याचे महत्त्व आगळे आहे. ही राष्ट्रे मुस्लिमबहुल राष्ट्रे. पण केवळ धार्मिक निकषावर त्यांनी पाकिस्तानचे समर्थन केलेले नाही. किंबहुना युएईच्या नेत्यांनी धर्माच्या नावाखाली माजवण्यात येणारा दहशतवाद अमान्य आहे अशी ठाम भूमिका घेतली. पाकिस्तानकडून खोट्या बातम्या कशा पसरवल्या जात आहेत हे शिंदे यांनी सांगितले. अर्थात त्या खोटेपणाने जग प्रभावित होत नाही याचा प्रत्यय या शिष्टमंडळांना आला असेलच. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा ताबडतोब निषेध करणारी जी मोजकी राष्ट्रे होती त्यांत युएईचा समावेश होता. तेव्हा या शिष्टमंडळाच्या भेटीने हे द्विपक्षीय संबंध दृढ होतील ही ग्वाहीच दिली आहे. त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काँगोला भेट दिली. काँगोच्या मंत्र्यांना भेटून या शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूरमागील भूमिका त्यांना कथन केली. काँगोने भारताला दहशतवादाविरोधातील लढ्यात पाठिंबा दिला आहे. रवी शंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फ्रान्सला भेट दिली. फ्रान्सच्या सिनेटने भारताच्या भूमिकेला एकमुखी पाठिंबा दिला.
 
 
शिष्टमंडळांचा ठाम संदेश
 
झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दक्षिण कोरियाला दिलेली भेट; किंवा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कतारला दिलेली भेट; कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रशिया व स्लोव्हेनियाला दिलेली भेट आणि विजयन्त जय पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बहारिनला दिलेली भेट; या सर्व दौर्‍यांत भारताची बाजू मांडणे हा एक भाग होता; त्याप्रमाणेच पाकिस्तानच्या खोट्या कथानकाला उत्तर देणे हाही भाग होता. यात विशेषतः ‘एआयएमआयएम’चे खासदार ओवेसी यांच्या सहभागाची नोंद घ्यायला हवी. ओवेसी हे भाजपचे कट्टर विरोधक. परंतु पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी कोणतीही शंका उपस्थित होणार नाही इतकी दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधी ठाम भूमिका घेतली. पांडा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचे ते सदस्य आहेत. प्रत्येक भेटीत ओवेसी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पाकिस्तानचा समावेश ‘एफएटीएफ’ने ‘ग्रे लिस्ट’मध्ये करावा यासाठी बहारिनने दबाव आणावा, अशी मागणी ओवेसी यांनी केली. कुवेतमध्ये भारतीय समुदायासमोर बोलताना ओवेसी यांनी पाकिस्तानपेक्षा भारतात मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे याकडे लक्ष वेधत पाकिस्तानने दहशतवादास धार्मिक वळण देऊ नये, असा इशारा दिलाच; पण पाकिस्तानी मुस्लिमांपेक्षा भारतीय मुस्लीम जास्त प्रामाणिक आहेत अशी टिप्पणीही केली. देशांतर्गत असणारे टोकाचे राजकीय भेद विसरून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच राजकीय पक्षांनी शिष्टमंडळाचे सदस्य या नात्याने एकजुटीचे दर्शन घडविले. पाकिस्तानला कदाचित हे अपेक्षित नसेल!
 
 
या सर्वच शिष्टमंडळांनी त्या त्या ठिकाणच्या भारतीय समुदायाची भेट घेतली हा उल्लेखनीय भाग. जगाच्या कानाकोपर्‍यांत आता भारतीय आहेतच; पण अनेक जण त्या त्या देशात प्रभावशाली पदांवर आहेत हेही खरे. त्यास भारताची ’सॉफ्ट पॉवर’ मानले जाते. एकट्या बहारिनमध्ये साडेतीन लाख भारतीय आहेत; तर त्याच देशात असणार्‍या मूळच्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या भारतीयांच्या निम्मी आहे. तेव्हा भारतीयांचा दबदबा आहे. देशोदेशी असणार्‍या भारतीयांना दहशतवादाच्या समस्येविषयी जागृत करावे; त्यातून तयार होणार्‍या जनमताने त्या त्या राष्ट्रातील राजकीय व्यवस्थेवर प्रभाव टाकावा; जेणेकरून दहशतवादाविरोधात भारताच्या लढ्यात त्यांचे समर्थन मिळेल हे त्यामागील प्रयोजन. भारत या भारतीय समुदायाकडे ’फोर्स मल्टिप्लायर’- म्हणजे भारताचे बळ वाढविणारे घटक- या दृष्टिकोनातून पाहतो.
 
 
फलश्रुती
 
अमेरिकेत गेलेल्या शिष्टमंडळाने न्यूयॉर्क येथे 9/11 स्मारकाला भेट देऊन दहशतवादाशी लढताना सर्व जगाने एक असले पाहिजे हा संदेश दिला. काँगोला गेलेल्या शिष्टमंडळाने तेथील भारतीय दूतावासाच्या परिसरातील महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली; तर संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानमध्ये क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच्या समाधीस भेट देऊन आदरांजली वाहिली. (त्यानंतर तृणमूल काँग्रेसने बोस यांच्या समाधीची दुरवस्था असल्याची खंत व्यक्त केली आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली). गांधींचा भर अहिंसेवर तर बोस क्रांतिकारक.
 
 
या तीन भेटींमध्ये एक सूत्र दिसेल. दहशतवादाने जगाला ग्रासले आहे हे मान्य करून त्याच्याशी जागतिक स्तरावरच भिडले पाहिजे हा एक संदेश; भारताला शांततेच्या मार्गानेच जायचे आहे; आपल्या विकासाच्या मार्गावर घोडदौड करायची आहे हा दुसरा संदेश; पण भारताच्या वाटेला कोणी गेल्यास शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास भारत कचरणार नाही हा तिसरा संदेश. कदाचित या तीन भेटी याकरिताच ठरल्या असतील असे छातीठोकपणे सांगता येणार नाही; पण त्यांतून प्रतीकात्मकता साधली गेली हे निश्चित.
 
 
नमस्कार सुहृदहो !
 
32 देशांचे दौरे करून ही सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे परततील ती आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदिच्छा आणि समर्थन घेऊन. अर्थात आता सगळे आपसूक होईल असा त्याचा अर्थ नाही. मुत्सद्देगिरी कायम करत राहावी लागते. आताही थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमेरिकेला भेट दिली असली; तरी लवकरच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पवन कपूर हे अमेरिकेला भेट देणार आहेत. तेथे ते ट्रम्प प्रशासनाशी चर्चा करतील. भारत-पाकिस्तान संघर्षविरामात आपली मध्यस्थाची भूमिका होती असे पालुपद ट्रम्प यांनी लावले असले तरी भारताने तो दावा निःसंदिग्धपणे फेटाळून लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या अमेरिका भेटीचे महत्त्व आहे. अर्थात या सगळ्या किंतु-परंतुंमध्ये मूळ मुद्दा नजरेआड होता कामा नये. तो म्हणजे दहशतवादाशी जागतिक लढ्याचा. भारतीय शिष्टमंडळांनी तो मुद्दा जागतिक पटलावर मांडला आहेच; पण तो किती निकडीचा आहे याचा प्रत्यय नुकताच अमेरिकेत आला. दहशतवादाशी सर्व जगाने एकत्रितपणे लढले पाहिजे ही भूमिका भारतीय शिष्टमंडळे मांडत असतानाच अमेरिकेतील इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचार्‍यांना वॉशिंग्टन येथे इलियास रॉड्रिग्ज नावाच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे आणि पूर्वीपासून गाझा समर्थक आहे. त्याने हा गोळीबार केल्यानंतर ’पॅलेस्टिनला मुक्त करा’ अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या. हा एका अर्थाने दहशतवादी हल्लाच; कारण त्यामागची मानसिकता तीच.
 
 
जगाने दहशवादाविरोधात एकजूट दाखविणे अपरिहार्य. भारताच्या शिष्टमंडळांनी तोच मुद्दा अधोरेखित केला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या भूमिकेचे समर्थन केले. पाकिस्तान किंवा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद याला कोणीही पाठबळ दिले नाही किंवा भारताला संयम, सहिष्णुता याबद्दलचे चार शब्द अकारण सुनावले नाहीत. ही या शिष्टमंडळाच्या शिष्टाईची फलश्रुती म्हटली पाहिजे!

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार