@शीतल खोत
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।
या संतविचारातून जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेच्या उद्धारासाठी समाजातील विविध क्षेत्रांतील अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा व साहित्य या क्षेत्रांमध्ये सेवाकार्यात उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या महानुभवांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज शिवाजी महाराज मोरे यांच्या श्रीक्षेत्र देहू येथील ‘वृक्षदाई प्रतिष्ठान’च्या माध्यमातून 4538 वृक्षांची लागवड आणि त्याचे संवर्धन करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे.
प्रत्येक संतांनी अध्यात्माला सामाजिक कार्याची जोड दिली तर खर्या अर्थाने मानवतेचे कल्याण होईल, हा विचार घेऊन पर्यावरणाचे संवर्धन आणि संगोपन करण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराज मोरे यांनी 2021 ला ‘वृक्षदाई प्रतिष्ठान’ची स्थापना केली. 2023-24 वर्ष हे संत तुकाराम महाराज यांचे 375वे वैकुंठगमन वर्ष होते. संपूर्ण महाराष्ट्राने ते साजरे केले. पर्यावरण संवर्धन म्हणून आपण काय करू शकतो, असा विचार वृक्षदाई प्रतिष्ठानने केला असता श्रीक्षेत्र देहू संस्थानच्या गायरान जमिनीवर 375 वृक्षलागवड करण्याचा उपक्रम त्यांनी राबविला.
पण केवळ 375 वृक्षलागवड करणे हे काही मोरे महाराजांना पटलं नाही. अजून काही तरी केलं पाहिजे, असा विचार करत असताना एक संकल्प पुढे आला तो म्हणजे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेत जितके अभंग आहेत तेवढ्या वृक्षांची लागवड करायची. तुकाराम महाराज संस्थान गाथेत एकूण 4538 अभंग आहेत, त्यामुळे तेवढे भारतीय वंशाचे वृक्ष लावून ‘अभंगगाथावन’ निर्माण करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने घेतला. वसंत पंचमीला त्याची सुरुवातही झाली. आतापर्यंत जवळपास 4000 वृक्षलागवड करण्यात आली आहे.
यासाठी रोपांची नर्सरी 2022लाच तयार करण्यात आली होती. 4538 वृक्षसंवर्धनाचा विषय सर्व संप्रदायांपर्यंत जाण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनी म्हणजेच वसंत पंचमीला या ‘अभंगगाथावन अभियानाची’ प्रत्यक्ष सुरुवात झाली. या सप्ताहात अनेक कीर्तनकारांचे, प्रवचनकारांचे देहूत आगमन होत असते. त्यावेळी पहिल्यांदा नामदासांचे वंशज केशव महाराज नामदास यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. त्यानंतर गोविंददेवगिरीजी महाराज, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत, ह.भ.प. दशरथे महाराज, ह.भ.प. बंडातात्या कराडकर अशा वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यासोबतच सामाजिक कार्यात सक्रिय असलेले पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, पद्मश्री रमेश पतंगे, हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार अशा सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या महानुभावांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचप्रमाणे प्रतिष्ठानच्यावतीने पेड, पाणी आणि प्लास्टिक या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. ‘पाणी’ या विषयावर पोपटराव पवार, प्रशांत अवचट यांनी ‘प्लास्टिक’या विषयावर तर गणेश शिंदे यांनी ‘वृक्ष’ या विषयावर जनजागृती केली. ही व्याख्यानमाला वर्षाच्या शेवटी 29, 30 आणि 31 डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. पर्यावरणाची हानी न होता तरुण पिढीला पर्यावरणरक्षणाचा संदेश मिळावा हा एकमेव उद्देश या व्याख्यानमालेच्या मागे होता. 31 डिसेंबरला दूध वाटपाने या व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली. देहू गावातील अनेक तरुण मंडळींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी 150 लीटर दूध वाटप करण्यात आले.
याच दरम्यान ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी दोन गावं दत्तक घेतली. या दोन गावांमध्ये गावकरी जेवढे वृक्ष लावतील त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी शिवाजी महाराज मोरे यांनी उचलली आणि या वृक्षांना जेवढे ठिबक लागेल त्याचा खर्च पोपटराव पवार यांनी उचलला. मोरे महाराज म्हणतात, संप्रदायातील महाराजांनी आता जमिनीवर येऊन काम केले पाहिजे. अध्यात्मासोबत समाजनिर्मितीचेही काम केले पाहिजे.
तुकाराम महाराज सांगून गेले,
बुडतां हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणोनिया॥
समाजात आज अनेक समस्या आहेत. मराठवाड्यामध्ये वंजारी समाजात मराठी कीर्तनकार कीर्तन करू शकत नाहीत, तर मराठी समाजात वंजारी कीर्तनकारांना प्रवेश नसतो. आजही हा प्रकार घडतो आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
यारे यारे लहान थोर। याती भलते नारीनर।
करावा विचार । न लगे चिंता कोणासी।
म्हणजे संतांनी जातीपातींचे निर्मूलन केले आहे. मोक्षमुक्तीचा मार्ग सांगत असताना ज्या काही सामाजिक समस्या होत्या त्यावरही त्यांनी वेळोवेळी भाष्य केले आहे. अंधश्रद्धा असेल, वर्णभेद, जातीभेद असेल. मग आताच्या संतमहंतांनीदेखील हे केले पाहिजे.
शिवाजी महाराज मोरे हे लहानपणापासून संघस्वयंसेवक आहेत. त्यामुळे भविष्यात आपण अशी संस्था स्थापन करू असा विचार त्यांच्या ध्यानीमनीदेखील नव्हता. संघाच्या माध्यमातून निर्मलवारी अभियान, धर्माचार्य संपर्क अभियान यात मोठ्या प्रमाणावर काम चालू आहेच. पण लहानपणापासून त्यांना वृक्ष लावणे आणि त्याचे संगोपन करणे ही आवड असल्याने वृक्षांशी त्यांचे जवळचे नाते निर्माण झाले आहे. कोणत्या वृक्षाला पाण्याची आवश्यकता आहे, कोणत्या वृक्षाला खताची आवश्यकता आहे, हे ते बघूनच सांगू शकतात, इतके त्यांचे वृक्षांशी नाते जडले आहे.
कोरोना काळ संपत असताना देहू गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने त्यांना त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले. मोरे महाराजांनी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि म्हणाले की, मी माझा जन्मदिवसदेखील साजरा करत नाही, आणि कोणाच्या जन्मदिवस पार्टीलाही जात नाही. कारण आपण पार्टी करणार म्हणजे पर्यावरणाचा र्हास करणार. यातून आपलं आयुष्य किती वाढेल हे सांगता येत नाही, पण जर या दिवशी तुम्ही तुमच्या वयाएवढी वृक्षलागवड केली, तर मात्र नक्कीच आपण दीर्घायुषी होऊ. महाराजांचा हा संदेश त्यांना मनापासून पटला आणि त्यांचा जन्मदिवस त्यांनी भारतीय वृक्षलागवड करून साजरा केला. आणि तिथूनच संस्था स्थापनेचा विषय खर्या अर्थाने पुढे आला.
संस्था स्थापन करण्याच्या विचारावर शिक्कामोर्तब झाले आणि संस्थेला काय नावं द्यावे याचा विचार सुरू झाला. अनेकांनी अनेक नावं सुचवली, पण मोरे महाराजांच्या मनाला काही पटतं नव्हती. नावासाठी जवळपास तीन महिने त्यांनी विचार केला आणि आपण झाडांची आई होऊ शकत नाही. कारण धरणी ही झाडांची आई आहे, पण आपण त्यांचे मुलांप्रमाणे संगोपन करू शकतो. म्हणजे आपण त्याची आई नाही, पण दाई बनू शकतो. त्यातून ‘वृक्षदाई’ या नावाचा जन्म झाला. सर्वांनी या नावाचे स्वागत केले आणि संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली. मग फक्त पर्यावरण दिनालाच झाडं लावायची का? तर नाही. म्हणून त्यांनी ‘सण वृक्षांचा, संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’ हा उपक्रम सुरू केला. आणि प्रत्येक सणाला वृक्षलागवड होऊ लागली.
आपले हिंदू संस्कृतीतील सर्व सण हे पर्यावरणाशी निगडित आहेत. पहिला सण चैत्राचा पाडवा. यात आपण कडुलिंबाची पानं खातो. डहाळी गुढीला लावतो. मग केवळ डहाळी तोडत राहिलो, पानं खात राहिलो, तर आपल्या पुढच्या पिढीला ही झाडं दिसतील तरी का? म्हणून दर पाडव्याला 30 ते 40 लिंबाची झाडं लावण्याचा संकल्प केला आणि त्यांचे संगोपन केले. दुसरा महिना वैशाख यात बुद्धपौर्णिमा असते, यावेळी पिंपळ वृक्षाची लागवड केली. ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा असते. यावेळी अनेक शिकल्या सावरलेल्या बायका वडाची फांदी घरीच आणून त्याची पूजा करतातपण अशाने वडाची झाडं टिकतील का? याचा त्या विचारच करत नाहीत. म्हणून या महिन्यात वडाची झाडं लावली जातात. पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वडाचे झाड प्रत्येक गावात, शहरात असलेच पाहिजे. ती नसतील तर यापेक्षा मोठी शोकांतिका नाही, असेही मोरे महाराज म्हणाले.
अशा प्रकारे आपले प्रत्येक सण भारतीय वृक्ष लावून साजरे केले जातात. याच प्रमाणे आणखी एक नवीन उपक्रम मोरे महाराजांनी राबविला, तो म्हणजे, ‘गौरव महानुभावांचा, संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात तृतीयपंथीयांतील प्रतिष्ठितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. सुरुवातीला संस्थेतील अनेक कार्यकर्त्यांनी याला नाराजी दर्शवली. ‘ती देखील माणसंच आहेत, दैवयोगाने त्यांच्या वाट्याला हे जीवन आले आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांनीही आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.’ अशी सर्वांची समजूत मोरे महाराजांनी घातल्यावर सर्वजण याला तयार झाले. यात महाराष्ट्रातील पहिली तृतीयपंथीय शिक्षिका रिया आवळेकर. भारतातील पहिल्या तृतीयपंथीय सरपंच माऊली कांबळे, ‘टाली बजाऊंगी नहीं बजवाऊंगी’ या सीरिजची प्रमुख, सखी चारचौघीच्या संचालिका श्रीगौरी सावंत, नाशिक येथील तृतीयपंथीयांच्या मठाच्या मठाधिपती श्री. श्री. 1008 महामंडळेश्वर डॉ. भगवती नंदा नंदगिरी अशा चार जणींना वृक्षारोपणासाठी आमंत्रित करण्यात आले. यांच्या हातून कोणते वृक्ष लावावे? याचा विचार करत असताना महाभारतात अज्ञातवासात असताना एक वर्ष बृहन्नला म्हणून काम करत असलेला अर्जुन, मोरे महाराजांना आठवला आणि या तृतीयपंथीयांसाठी त्यांनी अर्जुन वृक्षाची निवड केली. त्या त्या सणांना, प्रसंगांना समर्पक वृक्ष लावणे ही मोरे महाराजांनी खासियतच आहे. तेवढा त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे वृक्ष लावणारी सुखावतो.
असे अनेक प्रकल्प मोरे महाराजांनी राबवले आहेत. मंगळवेढा ते पंढरपूर रस्त्यावर वृक्षारोपण करण्याचा पायलट प्रोजेक्ट त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे. वारी करणार्या माझ्या भावा-बहिणींना वृक्षांच्या छायेखाली बसता यावे, उन्हापासून त्यांचे संरक्षण व्हावे, या भावनेने त्यांनी वृक्षारोपणाचा हा उपक्रम सुरू केला तो इथवर येऊन पोहोचला आहे.
आळंदीला गोविंददेवगिरी महाराज यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या तपोवनात 75 पिंपळ वृक्ष लावले. गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव बाबासाहेब देशमुख यांनी मुंबईत घोषणा केली की, मी जेवढ्या मतांनी जिंकून आलो, तेवढी झाडं लावणार. 25,386 मतांनी ते जिंकून आले. झाडं लावणं हे एक टक्का काम आहे, पण त्यांचे संगोपन करणे, मोठी करणे हे 99 टक्क्यांचं काम असतं. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराज मोरे यांच्याशी संपर्क साधला. देशमुख त्यांच्या मतदारसंघातील महू ते पंढरपूर आणि सांगोला ते पंढरपूर असे दोन पालखी महामार्ग निवडण्यात आले आणि त्यावर बारा-बारा हजार वृक्ष लावण्याचे ठरले. ते काम सध्या चालू आहे. त्यासाठी लागणारे वृक्ष हे सामाजिक वनीकरणाकडून दिले जातात.
2025 हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. आज संघाला वटवृक्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या वर्षी सहसरकार्यवाह अतुलजी लिमये यांच्या हस्ते 100 वडाची झाडं लावण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे.
त्याच प्रमाणे या अभंगगाथावनाची सांगता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा त्यांचा संकल्प आहे. 22 जुलै हा त्यांचा जन्मदिवस. या दिवशी त्यांच्या वयाच्या संख्येइतकी म्हणजे 55 झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
या अभंगगाथावनात भविष्यात मोरे महाराजांना नैसर्गिक अभ्यासिका बनवायची आहे. प्रत्येक झाडाखाली एक टेबल असेल. साधक मंडळींच्या चिंतनासाठी बैठक बनविण्याचा संकल्प आहे. हे सर्व गाथावन 8 एकर जमिनीवर वसले आहे. इथले आमदार सुनील शेटे यांनी अजून दोन एकर जमीन घेण्याचा सल्ला दिला. ही दोन एकर जमीन कशासाठी तर, भविष्यात हे गाथावन, पर्यटन स्थळ बघायला जी लोकं येतील त्यांच्यासाठी वाहनतळ या जागेवर असावे, असा संकल्प त्यांनी मांडला. यातही कौशल्य म्हणजे हे वाहनतळ सिमेंट, विटा किंवा पत्र्याचं नसून ते झाडांचंच बनविण्यात येणार आहे. खरेच भविष्यात या गाथावनाला प्रत्येकाने एकदा जरुर भेट द्या. पर्यावरण संवर्धनाचे एक मॉडेल मोरे महाराजांनी तयार करून दिले आहे. हे मॉडेल प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी राबवले तर, नक्कीच भविष्यात पर्यावरण संवर्धनाची, रक्षणाची समस्या राहाणार नाही.
यावेळी मोरे महाराजांनी एक खंत व्यक्त केली ती म्हणजे, शासनामध्ये पर्यावरणाविषयी, वृक्षसंवर्धनाविषयी आत्मियतेचा अभाव आहे. मदतीसाठी कोणीच पुढे येत नाही. ही स्थिती बदलली पाहिजे. एसीमध्ये बसणार्यांना, एसीमध्ये फिरणार्यांना कधीच पर्यावरणाचे गांभीर्य समजणार नाही. लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण झालेली आहे, फक्त शासनाने त्यांना सहकार्य केले पाहिजे, अशी विनंती मोरे महाराजांनी शासनाकडे केली आहे.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या मानाच्या ज्या सात पालख्या आहेत ते सर्व पालखी मार्ग हरीत करणे हा ‘वृक्षदाई प्रतिष्ठान’चा मुख्य संकल्प आहे. वारी ही आपली जवळपास 700-800 वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला वाढणार्या उष्णतेमुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी ही हरीत वारी करायची आहे.
शिवाजी महाराज मोरे यांना हरीत पालखी महामार्गाची प्ररेणा कर्नाटकमधील पद्मश्री सालुमरदा थिमक्का यांच्याकडून मिळाली. त्यांना मूलबाळ नव्हते म्हणून त्यांनी झाडांची सेवा करण्याचे ठरविले आणि आपल्या गावापासून बँगलोर हायवेपर्यंत 385 वडाची झाडं लावली. त्या झाडांना त्यांनी आपल्या डोक्यावरून आणून पाणी घातलं. त्यांना भेटायला जेव्हा मोरे महाराज गेले तेव्हा त्या झाडांखालून जाताना प्रचंड उन्हातही शांततेचा सुखद अनुभव घेता आला. अशा रस्त्यावरून पालखी गेली तर, वारकर्यांना किती आनंद होईल आणि इथूनच हरीत वारीची संकल्पना सूचली.
निर्मलवारी, हरीतवारी या वारकर्यांच्या आयुष्याची कवचकुंडलं आहेत. आज जागतिक व्यासपीठावर पर्यावरणाचा र्हास हा सर्वात मोठा विषय आहे. त्यामुळे हा धोका आपण वेळीच लक्षात घेऊन अधिकाधिक वृक्षलागवड केली पाहिजे. भविष्यात येऊ घातलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी असे अनेक शिवाजी महाराज मोरे प्रत्येक गावागावांत, शहरात तयार झाले पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढीला स्वच्छ, सुंदर पर्यावरणाचा आनंद घेता येईल.