कोविड आता आपल्यासोबत राहाणारा विषाणू आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळणार तेव्हा तेव्हा तो डोकं वर काढणार. ज्यावेळी कोविड वाढतोय अशा बातम्या दिसतील तेव्हा घाबरून न जाता सावध होणे गरजेचे आहे. या आजाराच्या कटू आठवणी मागे टाकून मनातल्या भीतीवर मात केली पाहिजे. कोविडला आता घाबरण्याची गरज नाही, कारण आता हा नूतन विषाणू नाही.
सिंगापूर, थायलंडमध्ये सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतातही महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोविड रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे माध्यमांमध्ये सावधान, तो पुन्हा आलाय, कोविड वाढतोय, कोविडची लाट येईल का? अशा बातम्या आपल्या कानावर पडत आहेत.
कोविड हा शब्द जरी उच्चारला तरी मनात भीती निर्माण होते. भीती वाटणे अगदी साहजिक आहे. कारण 2020 ते 2022 या काळात कोविडची महाभयानक साथ आपण अनुभवली आहे. पण आपण एक लक्षात घ्यायला हवे की कोविड पूर्णपणे संपलेला नाही. फक्त त्याची तीव्रता कमी झालेली आहे. त्यामुळे कोविड परत आलाय असे म्हणणे चुकीचे आहे. कारण कोविड इथेच आहे, फक्त त्याचं स्वरूप बदलले आहे.
जगात स्थिरावलेला विषाणू
कोविड आता आपल्यासाठी नवीन नाही. गेल्या पाच वर्षांपासून कोविड आपल्या आयुष्यात आहे. सगळ्या देशांनी कोविडला एन्डेमिक म्हणून जाहीर केले आहे. हे आजार पूर्ण वर्षभरात जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा डोकं वर काढतात. आता कोविड रुग्णांची संख्या वाढते आहे म्हणजे त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची संधी मिळाली आहे. सध्या वाढलेेले पर्यटन, सुट्टीचा कालावधी किंवा पर्यावरणातील बदल ही कारणे असू शकतात. किंवा विषाणूच्या प्रचलित उपप्रकारामध्ये म्युटेशन झाल्याने नवा उपप्रकार निर्माण झालेला असू शकतो. थोडक्यात काय तर, कोविड हा अधूनमधून डोकं वर काढणार हे निश्चित आहे. त्यामुळे कोविडसोबत जगण्याची मानसिकता आपण तयार करायला हवी. कोविडसोबत म्हणजे कोविडला न घाबरता समजून घेऊन जगायचं. कोविडसंबंधी ज्या बातम्या येतात त्या आपल्याला सावध करण्यासाठी असतात. त्या बातम्या ऐकल्यावर मनात भीती यायला नको, उलट बरं झालं समजलं, आता मी काळजी घेईन. असा विचार मनात यायला हवा. कारण काळजी घेणे हे अतिशय सोपे आहे.
JN.1 विषाणू काय आहे?
JN.1 म्हणजे जगभरात पसरलेला मायक्रॉनचा एक उपप्रकार. सिंगापूरमध्ये JN.1 याबरोबरच LF.7 आणि NB1.8.1 असे अजून उपप्रकार दिसत आहेत. या सर्व उपप्रकारांची ताकद अशी आहे की इम्युनिटीपासून लपून शरीरावर हल्ला करण्याची क्षमता यांच्यात अधिक आहे. यामुळे यांचा प्रसार लवकर होतो आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. सध्या जगभरामध्ये NB1.8.1 चे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे.
2021 ते 2022 या काळात डेल्टा प्रकाराची लाट मोठी होती. त्यानंतर जी लाट आली ती ओमायक्रॉन या उपप्रकाराची होती. ओमायक्रॉन या उपप्रकारात सहसा गंभीर लक्षणे दिसत नाही. ज्यांना लक्षणे दिसतात त्यांच्यामध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे जाणवतात. सध्याचा JN.1 हा ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे.
ऑगस्ट 2023 पासून हा विषाणू फिरत आहे. हा सौम्य लक्षणांचा आजार आहे. यात मृत्यूचा धोका कमी असतो. पण ज्यांना इतर आजार आहेत किंवा लहान मुले, वयस्कर व्यक्ती आहेत आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
खबरदारी कशी घ्यावी?
1. कोविड हातावरून किंवा हवेतून शरीरापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हातांची काळजी घेणे आणि हात तोंडाजवळ न नेणे हे उपाय महत्त्वाचे आहेत. हात स्वच्छ कसे राहतील याची काळजी घेतली पाहिजे.
2. मास्कचा वापर हा मुख्यतः ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी केला तर इतरांना संसर्ग होणार नाही. गर्दीच्या, विशेषतः बंदिस्त ठिकाणी जाताना खबरदारी म्हणून मास्क वापरू शकतो.
3. श्वसनसंस्थेशी निगडित आजार असेल किंवा लक्षणं जाणवत असतील तर इतरांपासून अंतर राखावे. योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे ही लक्षणे कोविड गछ.1 ची असू शकतात. लक्षणानुरूप उपचार आवश्यक आहेत. संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. धाप लागत आहे किंवा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
5. या उपप्रकाराची प्रसार क्षमता ख़ूप जास्त आहे. रूग्णाचा अगदी छोटा संपर्क आला तरी संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या प्रकारात रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसते. संसर्ग टाळण्यासाठी इम्युनिटीचा उपयोग होत नाही मात्र गंभीर आजार टाळण्यासाठी नक्कीच होतो. या उपप्रकारामुळे लाँग कोविड होण्याचा धोका असतो आणि शरीरातील इतर अवयव बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे संसर्ग टाळणे आवश्यक आहे.
6. इतर देशात ओमायक्रॉनसाठी लस तयार केली आहे. भारतातील लस ही ओमायक्रॉनसाठी नव्हती. त्यामुळे सरकारकडून काही सूचना येत नाही तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही. सरकारच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
कोविड आता आपल्यासोबत राहणारा विषाणू आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळणार तेव्हा तेव्हा तो डोकं वर काढणार. ज्यावेळी कोविड वाढतोय अशा बातम्या दिसतील तेव्हा घाबरून न जाता सावध होणे गरजेचे आहे. या आजाराच्या कटू आठवणी मागे टाकून मनातल्या भीतीवर मात केली पाहिजे. जेव्हा संसर्ग वाढतोय अशा बातम्या कानावर पडतील तेव्हा कोविड आपल्यापर्यंत पोहोचणार नाही यासाठी जे उपाय करायचे असतात ते केले पाहिजे. आताच्या परिस्थितीवर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. सरकारकडून ज्या काही सुरक्षेच्या उपाययोजना किंवा सूचना सांगितल्या जातील त्याचं तंतोतंत पालन आपण केले पाहिजे. कोविडला आता घाबरण्याची गरज नाही कारण आता हा नूतन विषाणू नाही. मात्र त्याचे परिणाम शरीरातील विविध अवयवांवर होत असल्याने संसर्ग होण्याची वाट पाहण्यापेक्षा आधीच काळजी घेणे चांगले आहे.
लेखिका एम.डी. रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ज्ञ असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे कार्यरत आहेत.