@आदित्य शिंदे
निसर्गाने भरभरून दिलेली समृद्धी, त्या निसर्गाच्या सन्निध्याने तशीच मनाच्या हिरवाईने घडलेली माणसं पाहून सुजलाम् सुफलाम् मातेच्या कुशीत जन्म घेतल्याचे सार्थक वाटते. संपूर्ण प्रवासात नद्या, डोंगररांगा, सरोवर, अरण्य यांचे दर्शन झाले होतेच. भाषा, भूषा, भजन, भोजन कसलेच वैविध्य नव्या ओळखींच्या आड आले नव्हते त्यामुळे सांस्कृतिक एकात्मतेचेही दर्शन घेत सगळा प्रवास झाला होता.
दिब्रुगड जवळ आले तसे वैमानिकाने विमानाची एक गिरकी घेत विमान उतरण्याची घोषणा केली. ब्रह्मपुत्रेचे विराट दर्शन झाले. त्सांग पो नावाने तिबेटच्या परिसरातून वाहत ती अरुणाचल प्रदेशमधून पुन्हा मायभूमीमध्ये येते. हिमालयाच्या उंच शिखरांवरून तिचीच अगदी सख्खी बहीण गंगामाई उत्तराखंडमधून धावत खाली उतरते. ब्रह्मपुत्रा मात्र थोडा लांबचा वळसा घालून मग मायभूमीच्या ओढीने वेगाने धावत खाली येते. आसाममध्ये प्रवेश केल्यावर किती किती हातांनी मायभूमीला आलिंगन देऊ असं म्हणत तिला हवी तशी ती पसरते. असेच काही अंतर जात अखेर गंगा सागरात जाऊन विलीन होते. तिच्या अनेक भुजांचे ते विहंगम दृश्य डोळ्यात साठवत दिब्रुगडला उतरलो.
वेगाने आठवणी जाग्या झाल्या त्या 2005 सालातल्या!! मुलांचा गट घेऊन पहिल्यांदा आसाममध्ये आलो तेव्हाच्या!! सुमारे साडेचार दिवस प्रवास रेल्वेने करून गुवाहाटीला पोचलो होतो. महाराष्ट्र - छत्तीसगड - ओडिशा - झारखंड- पश्चिम बंगाल अशी तब्बल पाच राज्य ओलांडून भारताच्या पूर्वांचलात पोहोचलो होतो. दख्खनच्या पठारावरून थेट उत्तर भारतीय मैदानी प्रदेशच्या अतिपूर्वेकडे असा रेल्वेचा प्रवास विलक्षण आनंददायी असतो.
पुणे - नागपूर या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वेतल्या अनेकांशी गट्टी जमून जाते. नागपूरची संत्री आणि संत्रा बर्फी सगळ्यांनी मिळून वाटून घेईपर्यंत छत्तीसगडच्या खाणींची चाहूल लागते. मोठमोठ्या वॅगन्स दगडी कोळसा भरून घेऊन जात असतात. मातीचा गंध, अरण्याचा गंध असा वेगळा दरवळ अनुभवत आपण ओडिशामध्ये शिरतो. झालमुरा असा कैरी - तिखटमीठ घातलेला सुक्या भेळीचा बेत डब्यातले सगळेजण जमवतात आणि चला आता उद्या सकाळी हावडा स्टेशन येईल असा स्वतःला दिलासा देत असतात. टाटानगर ओलांडले की डब्यातल्या बॅग्स आणि अन्य साहित्य आवरत नव्या ओळखींचा निरोप समारंभ सुरू होतो.
पहाटे पहाटे हावडा स्टेशनवर गाडी लागते तेव्हा उजाडलेला सूर्य आपण पूर्वेकडे आलो असल्याचे सांगत फलाटावर आपल्यासोबतच उतरतो. संध्याकाळची गाडी करून पुढचा प्रवास सुरू होणार असतो. तोपर्यंत सुभाषबाबूंच्या घरी जाऊया आणि स्वामी विवेकानंदांच्या घरी जाऊया, येतानाच्या थांब्यावेळी बेलूरमठात जाऊ असं नियोजन होतं. सक्काळी सक्काळी सोंदेश, रसगुल्ला त्यावर सिंगाडा आणि मग चहा एवढा फक्कड बेत रिचवून ट्राम, फेरी बोट, टॅक्सी, स्थानिक बस, मेट्रो आणि प्रचंड गर्दी सारं अनुभवत धापा टाकीत आपण हावडा - गुवाहाटी प्रवासास निघतो.
रात्रीचे भोजन रेल्वेत संपवून झोप कधी लागते ते समजत नाही. सकाळी जाग येते ती आल्हाददायी गार वार्याने आणि ‘लाल चा’ म्हणजे लाल चहाच्या आरोळ्यांनी!! मातीच्या मडक्यातला लाल चहा, बाहेर दूरवर पसरलेली हिरवळ आणि असंख्य पाण्याचे लहान मोठे ओहोळ !! अहाहा !! उन्हं कलंडून गेली की गुवाहाटी स्टेशन येतं.
त्यावर्षीच्या प्रवासात आम्ही काझीरंगा - शिलाँग आणि उडालगुडी जिल्ह्यातले एक गाव पाहिले. निसर्गाने भरभरून दिलेली समृद्धी, त्या निसर्गाच्या सन्निध्याने तशीच मनाच्या हिरवाईने घडलेली माणसं पाहून सुजलाम् सुफलाम् मातेच्या कुशीत जन्म घेतल्याचे सार्थक वाटते. संपूर्ण प्रवासात नद्या, डोंगररांगा, सरोवर, अरण्य यांचे दर्शन झाले होतेच. भाषा, भूषा, भजन, भोजन कसलेच वैविध्य नव्या ओळखींच्या आड आले नव्हते त्यामुळे सांस्कृतिक एकात्मतेचेही दर्शन घेत सगळा प्रवास झाला होता. आज विमानातून उतरताना बह्मपुत्रा दर्शन घेताना पुन्हा नुसते ‘दर्शनमात्रे मनाच्या जणू सगळ्या कामना’ पूर्ण झाल्याच विलक्षण समाधान मिळालं.
यावेळी दिब्रुगडला उतरलो तेव्हा वेध लागले होते ते पुन्हा एकदा आसाम अरुणाचलच्या नव्या जुन्या मित्रांना भेटण्याचे. तुम्ही केव्हा घेताय हा अनुभव ?
लेखक ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे केंद्र व्यवस्थापक आहेत.