सिद्धता, सतर्कता, संयम!

08 May 2025 18:01:46
पहलागाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्यदले कठोर प्रत्युत्तर देईल याची प्रतीक्षा सारे भारतवासीय करीत होते. 7 मे च्या पहाटे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. अ‍ॅक्शन -रिअ‍ॅक्शन स्वाभाविक असल्या तरी त्यासाठी केलेला विचार खूप महत्त्वाचा असतो, हेच भारत सरकारने केले आहे. कोणतेही राष्ट्र बलशाली तीन स्तंभांवर होत असते- सिद्धता, सतर्कता आणि संयम. भारत सरकारने या कृतीतून त्याचेच दर्शन दिले आहे.
Operation Sindoor
 
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून लक्ष्य केले होते. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती आणि दहशतवादीच नव्हे तर त्यांना पोसणार्‍या शक्तींविरोधात कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत होती. तो संताप आणि ती अपेक्षा अवाजवी नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानने कायम भारताच्या कुरापतीच काढल्या आहेत. त्याचे भारताने वेळोवेळी प्रत्युत्तरदेखील दिले आहे; तरीही पाकिस्तानचा खोडसाळपणा थांबत नव्हता. पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला म्हणजे नृशंसपणाची परिसीमा होती. त्यामुळे आता पाकिस्तानला भारतीय सैन्यदले किती कठोर प्रत्युत्तर देतील याची प्रतीक्षा सर्वच देशवासीयांना होती. ती प्रतीक्षा 7 मे च्या पहाटे संपली.
 
हवाई हल्ल्याची वैशिष्ट्ये
 
‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव असलेल्या या मोहिमेत भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरच नव्हे तर प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केले आणि दहशतवाद्यांची तळे उध्वस्त करून टाकली. नऊ ठिकाणी भारतीय हवाईदलाने लक्ष्यभेद केला आणि तोही अवघ्या पंचवीस मिनिटांच्या अवधीत. भारतीय नागरिक रात्री झोपलेले असताना सुरक्षा दले पाकिस्तानची झोप उडवत होते. हे भारताने दिलेले चोख प्रत्युत्तर आहे. आता आपल्या नागरिकांना काही तरी केल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि लष्कर कदाचित भारतातील काही भागांत गोळीबार करेल; किंवा अन्य काही मार्ग अवलंबेल. तेही केंद्रातील सरकारने गृहीतच धरले आहे आणि तशी सिद्धताही आहे. त्यासाठीच कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशभरात नागरी संरक्षण सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेण्यात आले. येता काही काळ भारत-पाकिस्तान तणाव कायम राहणार आहे यात शंका नाही. अशा वेळी देशांतर्गत वातावरण त्या चिंतेत भर घालावे असे असता कामा नये याची खबरदारी सामान्यांनीदेखील घ्यायला हवी. त्या दृष्टीने सतर्क असणे जितके गरजेचे तितकाच संयम ठेवणे निकडीचे. तेव्हा या तिन्ही दृष्टीने आताच्या परिस्थितीचा धांडोळा घेणे आवश्यक ठरते.
 
 
प्रथम भारताने केलेल्या प्रतिहल्ल्याच्या वैशिष्ट्यांची दखल घ्यायला हवी. कारण देशाची संरक्षण सिद्धता कशी चोख आहे याची कल्पना त्यातून येऊ शकेल. 1965 आणि 1971 या दोन्ही युद्धांत भारताने पाकिस्तानला पुरते नामोहरम केले होते. पण युद्धात जिंकले ते तहात गमावले याचा प्रत्यय त्या दोन्ही वेळा आला. 1999 साली कारगिलमध्ये पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीचेदेखील भारताने निर्विवाद प्रत्युत्तर दिले होते. अर्थात ते काही रूढ अर्थाने युद्ध नव्हते. मात्र पाकिस्तानचे कंबरडे भारताने मोडले होते हे नाकारता येत नाही. तथापि तरीही शेजारी राष्ट्राची खुमखुमी जिरलेली नव्हती आणि नाही. त्यानंतर संसदेवर झालेला हल्ला असो; किंवा 2008 साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असो; पाकिस्तानच्या कुरापतींना अंतच नव्हता. 2016 साली उरी आणि 2019 साली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. परंतु आता भारताने केलेल्या प्रतिहल्ल्याची व्याप्ती त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. उरी सर्जिकल स्ट्राईक ही मुख्यतः भारतीय सैन्याच्या पायदळाने केलेली कारवाई होती. 2019 साली बालाकोट येथे भारताने केलेले हवाई हल्ले होते. मात्र आता भारताने थेट क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचा वापर केला आहे. यात नेमकेपणा असतो तद्वत शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करण्याची क्षमता असते. हे प्रतिहल्ले करण्यासाठी भारताने स्काल्प आणि हॅमर या क्षेपणास्त्रांचा वापर केला. यांतील पहिली ही मध्यम पल्ल्याची तर दुसरी छोट्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे. ती डागण्यासाठी भारताने राफेल लढाऊ विमानांचा वापर केला. राफेल विमाने जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ विमानांमधील एक मानली जातात. बालाकोटच्या हवाई हल्ल्यात भारताने मुख्यतः मिराज-2000 श्रेणीतील लढाऊ विमाने वापरली होती आणि खैबर पख्तुनवाला परिसरात भारतीय हवाई दलाने हल्ले चढविले होते. तत्पूर्वी कारगिल संघर्षातदेखील तीच वापरण्यात आली होती. आता मात्र भारताने राफेल लढाऊ विमानांचा वापर केला आहे.
 

Operation Sindoor  
 
संरक्षण सिद्धतेची दूरदृष्टी
 
संरक्षण सिद्धता एका रात्रीत उभी करता येत नसते. त्यासाठी दूरदृष्टी आवश्यक असते. विद्यमान केंद्र सरकारने नुकताच फ्रान्सशी 26 राफेल विमान खरेदीचा सुमारे 63 हजार कोटींचा करार केला. ती विमाने भारतीय नौदलासाठी असणार आहेत. हे देखील दूरदृष्टीचेच उदाहरण. 2016 साली भारताने राफेल विमानांच्या खरेदीसाठी केलेल्या करारामुळे 36 राफेल विमाने भारतीय हवाईदलात दाखल झाली. त्यावेळी राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी त्या करारात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते. नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या करारात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसल्याचा निर्वाळा दिला होता. परंतु काँग्रेसने उडविलेला धुरळा देशाला किती महागात पडला असता याची आता कल्पना येईल. मिराज किंवा मिग विमाने भारतीय हवाई दलाकडे असली तरी एक तर ती जुनी झालेली; शिवाय त्यांच्या काही मर्यादाही आहेत. रशियन बनावटीची सुखोई विमाने भारतीय हवाई दलात असली तरी युक्रेन युद्धामुळे त्यांच्या सुट्या भागांची टंचाई जाणवू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूरदृष्टीचा संबंध इथे येतो. तहान लागल्यावर विहीर खणणे हे सुरक्षा दलाच्या सिद्धतेस परवडणारे नाही.
 
राफेल विमानांनी भारतीय हवाई दलाला कमालीचे सामर्थ्य दिले आहे. पाकिस्तानकडे असलेल्या एफ-16 विमानांशी टक्कर द्यायची तर भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य वाढविणे निकडीचे होते. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात ते केले नाही आणि भाजपा सरकारने ते केले तर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हवाई प्रतिहल्ला भारताने करण्याच्या आदल्याच दिवशी उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या टिनपाट नेत्याने राफेल विमानांच्या प्रतिकृतीला लिंबू-मिरची लावून आपल्या मानसिक कद्रूपणाचे दर्शन घडविले होते. आण्विक शस्त्रास्त्रांच्या मुद्यावरून एफ-16 विमाने पाकिस्तानला देणे अमेरिकेने बंद केले; सुटे भागही मिळणे दुरापास्त झाले. तेव्हा पाकिस्तानने जॉर्डनकडून वापरलेली विमाने खरेदी केली; त्यांनतर चीन व पाकिस्तानच्या परस्पर सहकार्याने जेएफ-17 थंडरबोल्ट लढाऊ विमानांचे उत्पादन झाले. या सगळ्याशी टक्कर द्यायची तर सामर्थ्य आणि क्षमता असलेली लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात असणे गरजेचे होते. राफेल विमानांनी ती कसर भरून काढली. तो निर्णय किती योग्य होता याचा प्रत्यय आता झालेल्या हवाई प्रतिहल्ल्याने दिला. ती संरक्षण सिद्धता वेळीच केली म्हणून 7 मे रोजी भारतीय लढाऊ विमानांनी नेमका लक्ष्यभेद करण्यात यश मिळविले.
 
दहशतवादाचा कणा मोडला
 
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी हवाई दलाने हल्ला चढविला. त्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याची गरज नव्हती कारण क्षेपणास्त्रे दूरवरून डागता येतात. ज्या ठिकाणी हे हल्ले चढविण्यात आले त्यांत लष्कर-ए-तैयबाचे लाहोरनजीकचे मुख्यालय मुरीदके; राजस्थान सीमेनजीकच्या बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला; पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद येथील लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र; ताबारेषेपासून तीस किलोमीटरवर असलेले कोटली हे प्रशिक्षण केंद्र इत्यादी नेमक्या ठिकाणांचा समावेश होता. हे दहशतवाद्यांचे अड्डे होते; अजमल कसाब किंवा डेव्हिड हेडली या भारतावरील दहशतवादी हल्ल्यांत सामील असणार्‍यांना तेथूनच प्रशिक्षण मिळाले होते. कंदहार विमान अपहार प्रकरणी प्रवाशांच्या सुखरूप सुटकेच्या बदल्यात भारताने 1999 साली तुरुंगातून सोडलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक मसूद अझर याच्या अड्ड्यावर भारताने नेमका हल्ला चढविला. त्यात त्याचे डझनभर कुटुंबीय ठार झाले. हाफिज सैदच्या लष्कर-ए-तैयबच्या अड्डा उध्वस्त झाला. (2013 साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद शब्दाचा वापर केला तेव्हा त्याचे स्वागत लष्कर-ए -तैयबाने केले होते याचे येथे स्मरण करून देणे गरजेचे). अर्थात हे दहशतवाद्यांचे अड्डे म्हणजे काही लहान-मोठ्या जागा वा इमारती नव्हेत. काही एकरांवर पसरलेले ते अड्डे आहेत. तेही पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या सानिध्यात. तेव्हा त्यावरील हवाई हल्ला म्हणजे एका अर्थाने आयएसआय आणि पाकिस्तानला दिलेला इशाराच. भारतीय हवाई दलाने केलेल्या या अचूक मार्‍याने देशाची संरक्षण सिद्धता अधोरेखित झाली आणि येणार्‍या कोणत्याही संकटाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतीय संरक्षण दलांमध्ये आहे याची पुन्हा एकवार ग्वाही मिळाली.
 
सतर्कतेला जोड हवी
 
परंतु ही एक बाजू झाली. सिद्धतेला जोड हवी सतर्कता आणि संयमाची. ही सतर्कता केवळ सीमेवरची नव्हे. ती काळजी संरक्षण दले निगुतीने घेतातच. पण तशीच सतर्कता सामान्य नागरिकांनीही आपल्या स्तरावर दाखवायला हवी. विशेषतः देशात जेव्हा युद्धसदृश स्थिती असते तेव्हा त्याचा गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न समाजकंटक आणि देशविघातक शक्ती नेहमीच करीत असतात. सीमेवर तणाव असताना देशांतर्गत तणाव निर्माण होणे हे अराजकाला निमंत्रण देण्यासारखे. मध्यंतरी मुंबई-इंदूर रेल्वे गाडीत एका हिंदू प्रवासी महिलेने रुद्राक्षाची माळ घातल्यावरून सहप्रवासी असलेल्या एक मुस्लीम महिलेने अभद्र टिप्पणी केली. ते प्रकरण त्या हिंदू महिलेवर वार करण्यापर्यंत गेले. नागपूर येथे झालेली दंगल असो किंवा पुण्याजवळील मुळशी येथे एका मंदिराच्या गर्भगृहात एका मुस्लीम अल्पवयीन मुलाने लघुशंका करणे असो वा रत्नागिरीत होळीच्या मिरवणुकीवरून आक्षेप घेतला जाऊन मशिदीवर हल्ला होणार इत्यादी खोट्या बातम्या पसरणे असो; या सगळ्यांत एक सूत्र दिसते. ते आहे चिथावणीखोरपणाचे. समाजात तेढ निर्माण करणे; त्यातून धार्मिक वाद पेटवणे आणि मग सरकारला बदनाम करणे असे हे षड्यंत्र असू शकते. सरकार कारवाई करतेच यात शंका नाही. नागपूर दंगल पोलिसांनी त्वरित नियंत्रणात आणली हे त्याचेच उदाहरण. परंतु मुळात असे घडवून आणणे आणि वातावरण तणावपूर्ण ठेवणे हाच काहींचा डाव असू शकतो. म्हणून सतर्क असणे हाच त्यावरील उपाय.
 
 
Operation Sindoor
ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देण्यासाठी सरकार आणि संरक्षण दलांनी लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलातील विंग कमांडर व्योमिका सिंग यांची योजना केली होती याचे मर्म अशा उथळ आणि उठवळ समाजमाध्यमवीरांनी लक्षात घ्यायला हवे. 
 
याबरोबर, खोट्या बातम्यांवर आंधळा विश्वास न ठेवणे ही दुसरी सतर्कता. समाजमाध्यमांचा इतका सुळसुळाट झाला आहे की माहितीचा प्रपात अंगावर येत असतो. त्यांतील तथ्य कोणते आणि फोलपटे कोणती हे शोधून काढण्याची यंत्रणा समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांकडे नाही. सरकारने पाकिस्तानच्या अनेक युट्यूब वाहिन्यांवर निर्बंध घातले असले तरी खोट्या बातम्यांत खंड नाही. अशावेळी सद्सद्विवेकबुद्धी वापरणे हा एक उपाय; पण सतर्क राहणे हे जास्त गरजेचे. आताही पाकिस्तानने आपण भारताची काही लढाऊ विमाने पाडली इत्यादी कपोलकल्पित बातम्या चालविल्या आहेत. भारतातील सामान्यांचे मनोधैर्य खचावे; आपल्याच सरकारवरील विश्वास उडावा हे त्यामागील प्रयोजन. अशा वेळी अशा खोट्या बातम्यांचे पेव फुटले तरी कोणतीही शहानिशा न करता त्यांचे वहन आपल्याकडून होत नाही ना याचीही सतर्कता हवी. अशा समाजमाध्यमीय बाष्कळपणात केवळ उघडपणे भारतविरोधी शक्तीच सामील असतात असे नव्हे. भारताने केलेल्या कारवाईने सामान्य भारतीयांना हर्ष होणार यात शंका नाही. पण त्या उचंबळून आलेल्या भावनांचा महापूर समाजमाध्यमांतून येताना आपण त्या सगळ्याला ‘राजापेक्षा राजनिष्ठ’ असे आततायी स्वरूप देऊन चिथावणीखोर टिप्पणी करीत नाही ना याचेही भान ठेवणे तितकेच आवश्यक. याचे कारण जेव्हा समाजात एकजुटीची आवश्यकता असते तेव्हाच ज्यांच्या उत्साहाची शहाणपणावर मात झालेली आहे असे उठवळ लोक अतिरंजित टिप्पणी करीत असतात आणि दुहीला निमंत्रण देत असतात. ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देण्यासाठी सरकार आणि संरक्षण दलांनी लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलातील विंग कमांडर व्योमिका सिंग यांची योजना केली होती याचे मर्म अशा उथळ आणि उठवळ समाजमाध्यमवीरांनी लक्षात घ्यायला हवे. सरकारची भलामण करताना सरकारच्या सद्हेतूंनाच तडा जाऊ देणे हे अगोचरपणाचे लक्षण. यासाठी सतर्कता हवी. आजूबाजूला काही समाजविघातक घडत नाही ना हे पाहण्यासाठी ती हवी तशीच ती स्वतःची कृती विवेकशून्य नाही ना हेही तपासून पाहण्यासाठी हवी.
 
संयमाची निकड
 
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्यानंतर देश त्याला प्रत्युत्तर देण्याची प्रतीक्षा करीत होता. पण अशा कारवाईची योजना अत्यंत गोपनीय असते. त्याची चर्चा चव्हाट्यावर होणे मूर्खपणाचे. माध्यमांनी आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तर युद्धज्वर इतका वाढविला होता की त्यांच्या स्टुडियोत युद्धाला कधीच तोंड फुटले होते. प्रश्न यातून काय साधते हा आहे. अशाने देखील सामान्यांचा संयम सुटू शकतो; किंवा सरकार काहीच करीत नाही अशी भावना बळावू शकते. सरकारने माध्यमांना वार्तांकनाबद्दल काही निर्बंध घातले; तशी वेळ यावी हेच माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्यासारखे. पण दोष एकट्या त्यांचा नाही. विरोधकदेखील कोणत्याही थराला जाऊन विधाने करीत होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर पातळी सोडून विधान केले. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही. पण संयम किती गरजेचा आहे याची कल्पना या सगळ्या घटनांतून प्रकर्षाने येते हे मात्र खरे. सरकारने चोख प्रत्युत्तर देण्याचे वचन दिले होते. तरीही रोज उठून सरकारने काही केले कसे नाही इत्यादी शेलक्या टिप्पण्या करणे हा निव्वळ बाष्कळपणा. 1971 च्या युद्धाच्या वेळी लष्करप्रमुख जनरल माणेकशा यांनी इंदिरा गांधी यांना एप्रिल 1971 मध्ये युद्ध करण्यास लष्कराची सज्जता नाही असे सांगितले होते आणि पूर्ण तयारीस काही महिने तरी मिळायला हवेत अशी विनंती केली होती.त्यानंतर जेव्हा डिसेंबर 1971 मध्ये प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटले तेव्हा माणेकशा यांनी आपले सर्वोत्तम योगदान दिले. तेव्हा भावनांवर स्वार होऊन असे निर्णय घेता येत नसतात. पंतप्रधान मोदींनी संरक्षण दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते; त्याचा अर्थ तोच होतो. अखेरीस योग्य वेळी हवाई दलाने मोहीम फत्ते केली. ती करताना सरकारने मोठा संयम दाखविला आहे. तो म्हणजे पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठिकाणांवर हल्ला न करण्याचा. केवळ दहशतवाद्यांच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. याचे कारण सरकार आणि संरक्षण दलाचे लक्ष्य होते ते दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणार्‍यांना धडा शिकविण्याचा. वास्तविक भारताची सामरिक स्थिती अत्यंत भक्कम अशी आहे. युद्धास तोंड फोडले असते तर देशात लोकप्रियताच मिळाली असती. पण सरकारचा हेतू तो नाही आणि असूही शकत नाही. सरकार आणि संरक्षण दले इतका संयम राखू शकतात तर माध्यमांनी आणि सामान्यांनीदेखील तो ठेवायला हवा ही अपेक्षा अवाजवी नाही. सामर्थ्याला तेव्हाच शोभा असते जेव्हा त्यास संयमाची जोड असते. एरव्ही त्यास खुमखुमी म्हणतात आणि त्या नादात अनेकदा दुःसाहस घडून जाते.
 
कोणतेही राष्ट्र बलशाली तीन स्तंभांवर होत असते- सिद्धता, सतर्कता आणि संयम. सरकार आणि संरक्षण दले आपले कर्तव्य चोख पार पाडत असताना माध्यमांसह नागरिकांनी सतर्कता आणि संयम ठेवणे गरजेचे नाही का?
 
9822828819
Powered By Sangraha 9.0