@रघुनंदन भागवत
काँग्रेस नेते राहुल गांधी एकेक विषय हातात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारवर शरसंधान करत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा पराकोटीचा द्वेष करताना आपण नकळत देशाचाही अपमान करत आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’चे वरवर समर्थन करतानाच, सरकारवर, सैन्यदलांवर अत्यंत बेजबाबदार टीका करून त्यांनी आपला अजेंडा राष्ट्रविरोधी आहे याची जणू साक्षच पटवली आहे. सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे की, ते असे का वागत आहेत. त्यांच्या अशा चमत्कारिक वागण्याचे मुख्य कारण म्हणजे राहुल गांधी ही एक कळसूत्री बाहुली बनलेली आहे. या बाहुलीचा ‘सूत्रधार’ (हँडलर) चीन, अमेरिका तसेच पाकिस्तानही असू शकतो.
गेल्या काही वर्षात राहुल गांधींनी देश पेटवण्यासाठी घेतलेले एकेक विषय बघा. 2019 च्या निवडणुकीआधी त्यांनी ’राफेल’ विमानखरेदीच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यात अनिल अंबानींना मोदींनी कॉन्ट्रॅक्ट दिले, अशी आवई उठवून ’चौकीदार चोर है’ अशी मोदींच्या बदनामीची मोहीम राबवून मोदींची छबी खराब करण्याचा चंग बांधला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.
सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहारात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचा निर्वाळा दिला. ’चौकीदार चोर है’ या घोषणेबद्दल राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. त्यानंतर हा विषय बंद झाला. (ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय ’राफेल’ विमाने ही चीनच्या विमानापेक्षाही सरस ठरली. आता आले का, लक्षात राफेलला विरोध का व कोणाचा होता.)
2020मध्ये सीएए (Citizenship Amendment Act) विरुद्ध देशात आंदोलन पेटवले गेले त्यावेळी आगीत तेल ओतण्याचे काम राहुल गांधींनी केले. मुसलमानांचे नागरिकत्व रद्द होणार असा खोटा प्रचार केला. आता त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एकाही भारतीय मुसलमान व्यक्तीचे नागरिकत्व गेलेले नाही. राहुल गांधी इथेही तोंडघशी पडले.
2020च्या शेवटी किसान आंदोलन घडवण्यात आले. त्यावेळी नाजूक परिस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीत खलिस्तानवाद्यांनी हैदोस घातला, तेव्हा केंद्र सरकारने संयमाने स्थिती हाताळली. राहुल गांधी व आंदोलक सरकारकडून केवळ एक गोळी चालवली जाण्याची वाट पहात होते. तसे झाले असते तर देशभर हिंसाचार माजवण्याची ब्लू प्रिंट तयार होती.
केंद्र सरकारने तीनही शेती सुधारणा कायदे मागे घेतल्याने शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. पंतप्रधानानी आपल्या भाषणात त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचा उल्लेख केला होता.
पण योगेंद्र यादवने नंतर स्पष्ट सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवसाठी पीच तयार करण्यासाठी शेतकरी आंदोलन केले गेले. (शेतकरी हितासाठी नव्हे.)
2020-21 मध्ये कोविड साथीने जगात तसेच भारतात धुमाकूळ घातला होता. भारताने लस विकसित करून लसीकरण सुरू केल्यावर राहुलने फायझर कंपनीचे वॅक्सीन भारतीय वॅक्सीन पेक्षा अधिक चांगले आहे, असे म्हणून जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. फायझर ही अमेरिकन कंपनी आहे हा निव्वळ योगायोग नव्हता. अखेर भारतीय वॅक्सीन परिणामकारक ठरून भारतात कोविडची साथ आटोक्यात आली.
2020 जून मध्ये लडाखमध्ये भारत-चीन संघर्ष सुरू झाला. गलवान खोर्यात दोन्ही सैन्यात चकमक होऊन 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले पण त्यांनी चीनचीही दुप्पट हानी केली. राहुल यांनी अपप्रचार सुरू केला की, चीनने भारतीय सैनिकांची पिटाई केली आणि चीन भारताच्या हद्दीत आतपर्यंत घुसला आहे. वास्तविक स्थिती अशी आहे की, 1962 मध्ये चीनने आपला जो प्रदेश गिळंकृत केला आहे, तो अजून भारताच्या ताब्यात आलेला नाही. सैनिकी स्तरावरील वाटाघाटी नंतर दोन्ही देशांनी सीमेवरील आपल्या फौजा मागे घेतल्या.
त्यानंतर आला हिंडेनबर्ग रिपोर्ट. राहुल गांधी यांनी मोदी, अदानींना लक्ष्य करून काहूर माजवले. अदानीना आर्थिक धक्का सहन करावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग अहवालात तथ्य नाही असा निर्वाळा दिला. नुकतीच हिंडेनबर्ग कंपनी बंद करण्यात आल्याची बातमी आली.
दरम्यानच्या काळात ’पॅगासस’ सॉफ्टवेअरद्वारे राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा जावईशोध राहुल गांधी यांनी लावला पण तसा एकही पुरावा त्यांना देता आला नाही. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपात तथ्य नाही असा निर्वाळा दिला.
मग राहुल यांनी महिला पहिलवानाना पुढे करून अराजक माजवण्याचा गलिच्छ प्रयत्न केला. विनेश फोगाट, साक्षी मलिक या महिला पहिलवानांनी भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध विनयभंगाचे आरोप करून देश घुसळून काढला. अमेरिकेत ’ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणून जो हिंसाचार झाला त्याची पुनरावृत्ती भारतात करण्याचा डाव होता. नुकतीच बातमी आली आहे की, न्यायालयाने कुठल्याही पुराव्याच्या अभावी सिंग यांच्याविरुद्धची केस बंद केली आहे.
या सबंध कालखंडात राहुल यांनी संसदेचे कामकाज होऊ न देण्याचे सातत्याने प्रयत्न केले आणि कामकाजाचा अमूल्य वेळ वाया घालवला. कारण सरकारला महत्त्वाचे कायदे करण्यापासून रोखणे हा त्याचा हेतू होता.
2024च्या निवडणुकीत 99 जागा मिळाल्याने व विरोधी पक्ष नेतेपद मिळाल्याने राहुल गांधी एकदम सातव्या अस्मानावर पोहोचले होते.
हरियाणाची निवडणूक हरल्यावर त्यांनी जणू ’ब्रह्मास्त्र’ बाहेर काढल्यासारखे निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील लाजिरवाणा पराभव वर्मी लागल्यावर त्यांनी आता महाराष्ट्रातील निवडणुका ’रिग’ झाल्याचा आरोप करून लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राहुल यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी मुद्देसूद उत्तर दिलेच आहे तसेच निवडणूक आयोगानेही ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे ’इंडियन एक्सप्रेस’ या सरकारविरोधी भूमिका घेणार्या वर्तमानपत्राने सुद्धा राहुल यांचा आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की, 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर, भाजपाने मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी अभियान हाती घेतले होते. निवडणूक आयोगाने सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. याचा सकारात्मक परिणाम होऊन मतदारसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
भाजपा मतदार नोंदणीसाठी कंबर कसत असताना, काँग्रेसवाले झोपले होते. त्यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. आपल्या या निष्काळजीपणामुळे आपण निवडणूक हरलो याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. पण आपल्यावर पराभवाचे खापर फुटू नये म्हणून राहुल गांधी निराधार आरोप करीत आहेत. गंमत म्हणजे त्यांनी आपले आरोप लेखी स्वरूपात निवडणूक आयोगाला अजूनपर्यंत कळवलेले नाहीत.
राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावरील हल्ला अधिक धोकादायक वाटत आहे. भारतातील मोदी सरकार गैरलोकशाही मार्गाने उलथवून टाकण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. याला पार्श्वभूमी आहे बांगलादेशात गेल्या वर्षी झालेल्या हिंसक सत्तांतराची. तिथे सर्वप्रथम सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेविषयी संशय व्यक्त करण्यात आला आणि ते निमित्त साधून धर्मांध शक्तींनी विद्यार्थ्यांना पुढे करून हिंसाचार माजवून पंतप्रधान हसीना वाजेद यांना सत्ता सोडून देशातून पलायन करायला भाग पाडले. (त्यावेळी भारतात सुद्धा मोदींना पळवून लावण्याची भाषा केली गेली होती.) अमेरिकेचा हस्तक मोहम्मद युनूस यांनी आता बांगलादेशाची काय वाताहात करून ठेवली आहे, हे आपण पाहतोच आहे.
नुकतेच घडलेल्या ’ऑपरेशन सिंदूर’च्या भव्य यशामुळे राहुल गांधी अधिकच बिथरले आहेत. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यावर बेईमानीचा आरोप करून झाल्यावर त्यांनी ’नरेंदर सरेंडर’ म्हणून मोदींची खिल्ली उडवून प्रतिमाभंजन करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. ते भारतीय लष्करावर अविश्वास दाखवत असतानाच पाकिस्तानला सोयीस्कर अशीच भूमिका सतत घेत आहेत.
वरील घटनांच्या जंत्रीची परत उजळणी केली आहे ते आपल्या लक्षात यावे की वरील सर्व घटनांत एक सूत्रबद्धता आहे, म्हणून हा राहुल गांधी यांना दिलेल्या टूल किटचाच त्या सर्व घटना भाग आहेत. आपण काय करत आहोत हे न समजण्याइतके राहुल ’दूधखुळे’ नाहीत. राहुल गांधी वारंवार परदेशी का जातात, तेथे कोणाला भेटतात हे एक गूढच आहे. एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आली आहे की, भारतात जेव्हा काही चिंताजनक घटना घडतात तेव्हा नेमके राहुल गांधी परदेशी गेलेले असतात. 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी जेव्हा धर्म विचारून हिंदूंची हत्या केली त्यावेळीही राहुल गांधी परदेश दौर्यावर होते. हा निव्वळ योगायोग समजावा का?
आपण वरील प्रत्येक घटना स्वतंत्रपणे बघितली तर आपल्या लक्षात येईल की, प्रत्येक घटनेमध्ये चीन, अमेरिका, पाकिस्तान यांचा संदर्भ आहे. ही राष्ट्रे राहुल यांचा पटावरील प्याद्यासारखा उपयोग करून भारतात अस्थिरता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत हा चीन व अमेरिका यांच्याशी स्पर्धा करत असल्याने भारताचा आर्थिक विकास रोखण्यासाठी चीन व अमेरिका यांचा आटापिटा चालला आहे. तशातच भारत लष्करी महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारतीय उपखंडात दुसरी महाशक्ती उदयास येणे चीन व अमेरिकेला परवडणारे नाही.
वरील परिस्थिती लक्षात घेता, भाजपा सरकारच्या मागे ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. जनतेला म्हणूनच आवाहन करावेसे वाटते की, ’उघडा डोळे बघा नीट’. आता पुढे डोळे मिटून मतदान करू नका. राहुल यांचे डोके ठिकाणावर नसले तरी सुजाण नागरिकांनी सूज्ञपणे ही परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे.